गावातल्या बाजारात जेवायच्या वेळी रोज एक आजीबाई आपल्या डोक्यावरून काळ्या रंगाचे भांडे घेऊन येत. त्या भांडय़ात वेगवेगळ्या स्वादांचे गरमागरम पुलाव असत. त्यात कधी मटारचा, मशरूमचा, भाज्यांचा तर कधी चिकनचा पुलाव असे. ते सगळे पुलाव इतके चवदार असत की थोडय़ाच वेळात संपून जात. पुलाव विकून आलेल्या पशातून आजीबाई बाजारातून सामान विकत घेऊन घरी परतत.
राशाला आजीबाईंकडचे पुलाव खूप आवडायचे. बाजारात गेली की ती त्यांच्याकडे पुलाव खायला जायची. हळूहळू दोघींची खूप दोस्ती झाली. राशा त्यांना विचारायची, ‘‘आजीबाई तुम्ही मला तुमच्यासारखे असे पुलाव बनवायला शिकवाल का?’’ त्यावर त्या नुसत्याच हसायच्या आणि विषय बदलायच्या. मग राशाला एक युक्ती सुचली. आजीबाई बाजारात पुलावसाठी काय सामान विकत घेतात ते बघायला, तिने लपतछपत त्यांच्या मागे मागे जायचे ठरवले. पहिल्या दिवशी आजींनी बाजारातून स्वत:साठी एक छानसा अबाया (अरेबिक ड्रेस) घेतला. दुसऱ्या दिवशी ब्रेड आणि जॅम घेतला तर तिसऱ्या दिवशी केळी आणि सफरचंदं घेतली. त्यांनी पुलावसाठी लागणारे काहीच सामान घेतले नाही, हे बघून राशाची उत्सुकता आणखीनच ताणली.
चौथ्या दिवशी मात्र राशाने आजीबाईंच्या मागे त्यांच्या घरीच जायचे ठरवले. लपत लपत ती त्यांच्या मागे चालत राहिली. दूरवर डोंगरावरच्या पाऊलवाटेने चालल्यावर आजीबाई एका लालचुटुक कौलारू घरात शिरल्या. टेबलावर सामानाची पिशवी ठेवली व पुलावचे रिकामे भांडे घेऊन स्वयंपाकघरात गेल्या. राशा पळत पळ्त स्वयंपाकघराच्या खिडकीशी गेली. आजीबाईंनी ते भांडे एका तिवईवर ठेवले आणि िभतीवर टांगलेला लाकडी चमचा काढला. डोळे मिटून त्यांनी तो चमचा पुलावाच्या भांडय़ाभोवती तीन वेळा फिरवला व म्हणाल्या, ‘‘आज माझ्या भांडय़ात मला मशरूमचा पुलाव दे.’’ आणि थोडय़ाच वेळात त्या भांडय़ातून वाफा यायला लागल्या व पुलावचा वास सुटला. आजीबाईंनी बशीत भांडय़ातला पुलाव घेतला व त्या टेबलवर जाऊन बसल्या. राशाला काही कळेना. तिवईखाली विस्तव नाही, पुलावाचे भांडे रिकामे, मग आजीबाईंऩी पुलाव दे म्हटल्यावर गरमागरम पुलाव कसा मिळाला?
राशा चालून चालून दमली होती. पुलावाच्या वासाने तिला भूक लागली. आजीबाई बाहेर गेल्यावर ती मशरूम पुलाव खावा म्हणून हळूच आत गेली तर पुलावाचे भांडे रिकामे. राशाला काय करावे ते कळेना. थोडा विचार करून घाबरत घाबरतच तिने भिंतीवर टांगलेला चमचा काढला. तो तीन वेळा भांडय़ाभोवती फिरवला आणि म्हणाली, ‘आज माझ्या भांडय़ात मला चिकनचा पुलाव दे.’ आणि काय आश्चर्य भांडय़ात गरमागरम चिकन पुलाव तयार. राशा तो चमच्याने घेणार इतक्यात तिचा व भांडय़ाचा आवाज ऐकून आजीबाई स्वयंपाकघरात आल्या. त्यांनी चिडून राशाच्या हातातला चमचा काढून घेतला व राशाला मारायला धावल्या. राशा घराबाहेरच्या पाऊलवाटेवरून जोरात पळायला लागली. आजीबाई तिच्या मागे धावल्या, पण राशाला काही त्या पकडू शकल्या नाहीत.
भुकेलेली राशा धावत पळत घरी पोचली. इतक्या उशिरापर्यंत कुठे होती म्हणून घरी आल्यावर आई रागावली. पायही खूप दुखायला लागले होते. एवढे प्रयत्न करून काही हाताला लागले नाही याचे तिला खूप वाईट वाटले.
या घटनेनंतर पुलाववाल्या आजीबाई बाजारात कधीच आल्या नाहीत. त्या एकाएकी यायच्या बंद झाल्या याचे सर्वानाच आश्चर्य वाटत राहिले. सगळे जण एकमेकांना आजीबाईंबद्दल विचारायचे, पण त्याचे उत्तर फक्त राशालाच माहीत होते.
(अरेबिक कथेवर आधारित)
–  मृणाल तुळपुळे
mrinaltul@hotmail.com