फुलांच्या विश्वात : सीताअशोक भरत

अशोकाच्या झाडाची साल तपकिरी रंगाची असून ती अत्यंत औषधी मानली जाते.

शोक दूर करणारा तो ‘अशोक’ अशी ज्याची ख्याती सांगितली जाते ते हे झाड. रावणाने सीतेचे हरण करून ज्या उद्यानात तिला ठेवले ती अशोकवाटिका आणि सीतामातेच्या सहवासाने या अशोकाला नाव प्राप्त झाले ‘सीताअशोक’.

सीताअशोक ही मूळची भारतीय वनस्पती. सदाहरित प्रकारातील एक लहान आकाराचा वृक्ष. Saraca asoca  (सराका अशोका) हे त्याचे शास्त्रीय नाव. स्वत:चा विशिष्ट पर्णसंभार राखणारं हे सीताअशोकाचं पूर्ण वाढलेलं झाड पाहणं म्हणजे स्वर्गसुखच. हे खूप हळू वाढणारं झाड आहे. मुंबईच्या जिजामाता उद्यानात अशोकाची खूप जुनी नि मोठी झाडं आहेत.

अशोकाची पानं लांबडी आणि मऊ असतात. कोवळ्या पानांना लालसर रंग असतो. भरगच्च पर्णसंभारामुळे या झाडाला विशिष्ट असा गोल आकार प्राप्त झालेला दिसतो.

फेब्रुवारी ते एप्रिल या कालावधीत अशोकाला फुलांचा बहर येतो. फुले आली की हे झाड विशेष सुंदर दिसते. छोटय़ा छोटय़ा चार गोलसर पाकळ्या असणारी लांब दांडय़ांची असंख्य फुले एका गुच्छात असतात. अशा असंख्य गुच्छांनी बहरलेला सीताअशोक  पाहण्याचा आताचा हा कालावधी. अशोकाच्या फुलांचा रंग आधी पिवळा, मग भगवा नि नंतर लालसर होत जातो. सूर्याच्या किरणांमुळे फुलांच्या रंगांत होणारा बदल झाडाला विशेष सौंदर्य प्रदान करतो. हिरव्याकंच पानांत अशी गुच्छांनी लगडलेली फुले पाहिल्यावर नकळत तोंडातून ‘केवळ अप्रतिम’ असेच शब्द बाहेर पडतात. प्रत्येक फुलातून  पुंकेसर बाहेर डोकावतात. त्यांची लांबी फुलाच्या लांबीपेक्षा जास्त असते. या लांबडय़ा पुंकेसरांमुळे अशोकाच्या फुलाला आणि गुच्छाला एक विशेष सौंदर्य प्राप्त होते नि याच्या पुंकेसरामुळे एक्झोरा फुले नि सीताअशोक ही वेगवेगळी फुले सहज ओळखता येतात. अशोकाच्या फुलांना खूप सुंदर सुवास येतो. सुंदर स्त्रियांचा लत्ताप्रहार झाल्यास अशोकाला लवकर फुले येतात, असा एक समज आहे.

अशोकाच्या झाडाची साल तपकिरी रंगाची असून ती अत्यंत औषधी मानली जाते. अशोकाची साल, खोड आणि फुले वेगवेगळ्या औषधात वापरले जातात. ‘अशोकारिष्ट’ नावाने एक प्रसिद्ध आयुर्वेदिक औषध तयार केले जाते. त्याच्या झाडाच्या सालीपासून मूत्रविकार तसेच विशेषकरून महिलांचे रक्तशुद्धीकरण व इतर अनेक विकारांवर अशोक अत्यंत गुणकारी मानला जातो. मूत्राशय, मूळव्याध, हगवण, वातविकार यात अशोकाची साल गुणकारी मानली जाते. विंचुदंशावरदेखील याच्या सालीचा वापर केला जातो. या झाडाच्या वाळलेल्या फुलांची पावडर मधुमेह या विकारात उपयुक्त ठरतो.

सीताअशोक ही एक धार्मिक महत्त्व असणारी वनस्पती आहे. सीतेच्या सान्निध्याने पुनीत झालेला म्हणून हिंदूंना पूजनीय, तर एका आख्यायिकेनुसार भगवान बुद्धांचा जन्म सीताअशोक या झाडाखाली झाला असे मानले जाते. त्यामुळे बौद्ध धर्मीयदेखील या झाडाला पवित्र मानतात. नक्षत्रवनातदेखील अनुराधा आणि पूर्वाषाढा या नक्षत्रांचे पर्यायी वृक्ष म्हणून सीताअशोकाची लागवड केली जाते. उद्यानात, रस्त्याच्या कडेलादेखील सीताअशोक शोभेची वनस्पती म्हणून लावला जातो. व्यापारी तत्त्वावरदेखील सीताअशोकाची लागवड केली जाते.

अशोकाच्या फुलांचे सौंदर्य लक्षात घेऊन कदाचित देवीच्या पूजेतील नऊ फुलांपैकी एक म्हणून अशोकाची फुले वापरली जातात. भारतातील ओरिसा राज्याचे सीताअशोकाचे फूल हे राज्यफूल आहे, तर सीताअशोकाचे झाड हे उत्तर प्रदेशाचा राज्यवृक्ष आहे.

कॉमन सिरुलियन नावाचे फुलपाखरू सीताअशोकाच्या पानांवर अंडी घालते आणि त्याचे संपूर्ण जीवनचक्र या झाडावर जाते.

फुले गळून पडली की झाडाला शेंगा लागतात. या शेंगांमध्ये मोठय़ा मोठय़ा बिया असतात. या बिया ओल्या असतानाच रुजतात. सुकल्यानंतर बिया रुजत नाहीत. सीताअशोकाची  नवीन रोपे बियांपासून तयार केली जातात.

असा हा धार्मिक संदर्भ असणारा, सीतामातेच्या सहवासाने पुनीत झालेला.. चिंता, दु:ख, काळजी दूर करणारा, पिवळ्या-भगव्या फुलांची उधळण करणारा, बहुसंख्य औषधी वापर असणारा हा दुर्मीळ आणि देखणा सीताअशोक आपल्या सोसायटीच्या हरित धनात नसेल तर आपल्यासारखे दुर्दैवी आपणच!

गोडांबे bharatgodambe@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Saraca asoca tree sita ashok tree ashoka tree

ताज्या बातम्या