शाळेला नाताळची सुट्टी लागली आणि मिहिर आईच्या मागे लागला. त्याला त्याच्या मावशीकडे, वसईला राहायला जायचं होतं. दिवाळीच्या सुट्टीत मामाकडे जेव्हा सगळी भावंडं भेटली होती तेव्हा खूप सारे खेळ आणि गप्पाही झाल्या होत्या. त्यावेळी आकाशनं, मिहिरच्या मावसभावानं त्याला ख्रिासमसच्या सुट्टीत त्यांच्या घरी यायचं आमंत्रण दिलं होतं.
‘‘का रे एवढं काय असतं ख्रिासमसला तिथे?’’ मिहिरला प्रश्न पडला होता.
‘‘अरे काही विचारू नकोस… खूप धमाल असते आमच्याकडे…’’ आकाशनं सांगितलं.
‘‘म्हणजे काय?’’
‘‘म्हणजे सगळं गाव दिव्यांच्या रोषणाईनं सजलेलं असतं. सांताक्लॉज काय, मोठमोठाले ख्रिासमस ट्री, वेगवेगळ्या चांदण्यांच्या आकाराचे आकाशदिवे आणि सर्वात मोठं आकर्षण म्हणजे ‘नाताळ गोठे.’ आकाशनं वर्णन केलं.
‘‘नाताळ गोठे? हा काय प्रकार असतो?’’ मिहिरनं आश्चर्यानं विचारलं.
‘‘याला ‘क्रिब’ असंही म्हणतात. येशू ख्रिास्ताचा जन्म गाईच्या गोठ्यात झाला. म्हणून असा गोठ्याचा देखावा करण्याचा प्रघात आहे.’’ आकाश बोलला.
‘‘मग हे देखावे करतात कुठे?’’ मिहिरची उत्सुकता वाढत चालली होती.
‘‘गोठ्यांचे देखावे घरोघरी करतात. पण ते लहान असतात. प्रत्येक गावपातळीवर मात्र एक मोठा गोठा करतात. गावातील सगळी लहानथोर मंडळी एकत्र येऊन तो गोठा बनवतात.’’ आकाशनं सांगितलं.
‘‘अरे व्वा ! मग आता काही सांगू नकोस. मला पाहायला आवडेल.’’ मिहिरनं यायची तयारी दाखवली. म्हणूनच आता तो आईच्या मागे लागला होता.
वसई स्टेशनवर उतरल्यावर रिक्षातून मावशीकडे जातानाच सगळीकडे झगमगाट दिसत होता. इमारतींवर, घराघरांवर चांदण्या लावल्या होत्या. काही घरांच्या समोर मोठे मोठे ख्रिासमस ट्री लावले होते. त्याच्या बाजूलाच छोट्या छोट्या मूर्ती ठेवलेल्या दिसत होत्या. आकाश सांगत होता तसा नाताळ गोठा असावा का हा? मिहिर विचार करत होता.
दुसऱ्या दिवशीच आकाश मिहिरला त्याच्या मित्राकडे ख्रिासमससाठी घेऊन गेला. त्यांच्या घरी ख्रिासमस ट्री सजवला होता. चांदणी लावली होती. आणि मिहिरला जे पाहायचं होतं, तो नाताळ गोठा ही होता.
‘‘यामध्ये कोण कोण आहेत?’’ मिहिरनं विचारलं.
‘‘हे बघ, हे आहेत मरिया माऊली आणि जोसेफ. हे येशू बाळ आहे. येशू ख्रिास्तांचा जन्म गाईच्या गोठ्यात झाला. म्हणून आजूबाजूला गाई दिसतात. आणि देवदूतानं येशू जन्माची बातमी पहिली मेंढरे चारणाऱ्या मेंढपाळांना दिली. म्हणून ही मेंढरे आणि मेंढपाळ बाळाला पाहायला पोहोचली.’’ जिमी, आकाशचा मित्र मिहिरला माहिती सांगत होता.
‘‘मग हे उंट कसे इथे?’’ मिहिरला प्रश्न पडला.
‘‘अरे हो, हे सांगायचंच राहिलं. येशू बाळाच्या जन्मानंतर आकाशात मोठा तारा दिसायला लागला. त्याचंच प्रतीक म्हणून घरावर चांदणी लावतात. हो तर मी काय सांगत होतो… आकाशात तो तारा पाहून तीन ज्ञानी पुरुष खूप दूरवरून येशू बाळाला भेटायला आले. त्यांना तीन राजे असंही म्हणतात. त्यांचेच हे उंट…’’ जिमीनं सांगितलं.
मिहिरला ते पाहून खूप छान वाटलं. मोठे गवतानं शाकारलेलं घर आणि आजूबाजूला हिरवळ, नदीचा पाट आणि गुरामेंढरांनी सजलेलं आवार. सगळं खूप गोड वाटत होतं.
‘‘आकाश उद्या रात्री आपण मिहिरला घेऊन गोठे पाहायला जाऊ या.’’ जिमी म्हणाला.
‘‘असे गोठे पाहायला आपण दुसऱ्यांच्या घरी जायचं?’’ मिहिरला कळेना.
‘‘दुसऱ्यांच्या घरी नाही मिहिर. इथे काही ठिकाणी खूप मोठे गोठे बनवतात. अगदी पाहण्यासारखे. ते पाहायला लांबून लोक येतात. ख्रिासमसपासून बारा दिवस हे गोठे असतात. त्यामुळे हे बारा दिवस इथे रात्रंदिवस छान जल्लोषाचं वातावरण असतं.’’ जिमीनं सांगितलं.
‘‘चालेल मग उद्या जाऊ या आपण…’’ मिहिर उत्साहानं म्हणाला.
दुसऱ्या दिवशी रात्री लवकरच सगळे मित्र गोठे पाहायला निघाले. रात्र असूनसुद्धा तरुण-तरुणी, लहान मुलं अगदी बिनधास्तपणे गावात गोठे पाहात फिरत होती. अगदी प्रत्येक घरासमोर सजावट केलेली होती. पहिलाच गोठा बघायला गेले तिथे सगळ्या मूर्ती मोठ्या आणि सुंदर होत्या. मुख्य म्हणजे येशू जन्माच्या देखाव्याखेरीज तिथे अजूनही काही होतं. मिहिरनं पाहिलं तर तो पहेलगाममध्ये आतंकवाद्यांनी हत्या केलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहिली होती, त्याचा देखावा होता. सगळं वातावरण एकदम शांत आणि पवित्र वाटत होतं.
असेच एक एक करत मिहिर आणि आकाशच्या मित्रमंडळीनं बऱ्याच जागी गोठे पाहिले. कल्पकतेनं आणि कलाकृतीनं सजलेले होते. प्रत्येक ठिकाणी काहीतरी सामाजिक संदेश देणारे देखावे चितारलेले होते. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाच्या अपघाताचे चित्रण, ऑपरेशन सिंदूर, अगदी खड्ड्यांच्या रस्त्याचासुद्धा विषय सोडला नव्हता. बरेचसे गोठे गावातील मोकळ्या ठिकाणी बनवले होते, तर काही जुन्या वाड्यांत होते. एकदोन तर तलावातदेखील बांधले होते. मिहिरला हे सगळं पाहून आश्चर्य वाटत होतं आणि आनंदही झाला होता.
बहुतेक ठिकाणी सुंदर नाताळ गीतं ऐकायला मिळत होती. त्यामुळे संपूर्ण वातावरण अगदी निर्मळ आणि भारावून टाकणारं झालं होतं. एक वेगळा अनुभव मिहिरला आला होता. लोक जाता येता एकमेकांना ‘हॅपी ख्रिासमस’ म्हणून शुभेच्छा द्यायला विसरत नव्हते. आपोआपच त्यांच्या मुखातून नाताळ गीतं उमटत होती- ‘‘आज गव्हाणी जन्मले बाळ ऽऽऽ पाहू चला ऽऽऽ वंदू चला ऽऽ ख्रिास्त राजाला आज ऽऽऽऽ.’’
