रविवार.. भर दुपारची वेळ. मुक्ता आणि मित्रमंडळाने दिवाणखान्यातच मुक्काम ठोकला होता. ‘काय करताहेत मंडळी’ असा विचार करत आजीने खोलीत डोकावून पाहिलं. सगळे जागा मिळेल तिथे आणि तसे जणू वेगवेगळ्या आसनात होते. एक भुजंगासनात होता तर दुसरा शलभासनात. तिसरा मार्जारासनात नाहीतर हलासनात. एक तर सिंहमुद्रा करून ‘दातातले खड्डे’आरशात न्याहाळत होता. ‘‘हे काय, आज कॅरम, व्यापार, सापशिडी असं काही खेळायचं नाही वाटतं.’’ आजीने अंदाज घेतला. ‘‘आम्हाला अगदी कंटाळा आलाय. मूड नाहीए.’’ शवासनातून हलत रती म्हणाली. ‘‘मग कसा गेला शाळेचा पहिला आठवडा.’’ आजीने मुलांच्या मनात डोकवायचा प्रयत्न केला आणि मुलांची कळी खुलली. सगळे सरसावून बसले. प्रत्येकाला काहीतरी सांगायचं होतं. रतीने सुरुवात केली- ‘‘आजी शाळेच्या पहिल्या दिवशी कुठला वर्ग असेल, कुठल्या विषयाला कुठल्या बाई असतील, वर्गशिक्षिका कोण असतील ही उत्सुकता असते. एखाद्या बाई वर्गाजवळ येताना दिसतात, आम्ही स्वागताचा पवित्रा घेतो, त्या पुढच्या वर्गावर जातात. आम्ही एकमेकांकडे बघत राहतो. मी तर लवकर जाऊन पहिला बाक पकडते.’’ ‘‘तशीही अस्मादिकांची उंची इतरांच्या डोळ्यांत येत नसल्यामुळे बहुतेक पहिला बाक टिकतोही.’’ आजीच्या या बोलण्यावर रतीने हळूच डोळे मिचकावले. ‘‘मी नवीन गणवेश, रेनकोट घालूनच शाळेत गेलो होतो. वाटेत पाऊस आला तर.. शिवाय पहिल्या दिवशी आईने मला आम्रखंड आणि पोळी दिली होती.’’ जणू पहिल्या बोटाने आम्रखंडच चाटतोय या विचारात ओंकार रमून गेला. ‘‘माझं दप्तर ना सगळ्यांपेक्षा छान आहे.’’ वेदांतने जाहीर करून टाकलं. ‘‘हा दप्तर कसं घेतो माहिती आहे का आजी. अगं, कधी पट्टा डोक्यावर ठेवतो. कधी दप्तर पुढे घेऊन तबल्यासारखं वाजवतो. तर कधी जड म्हणून लळत लोंबत घेऊन जातो. कधी हमालासारखं डोक्यावरही घेतो. इतक्या गोष्टी त्यात कोंबतो की विचारूच नको.’’ रतिताईने केलेल्या कौतुकाने ओंकारला ‘भारी’ वाटलं. ‘‘पहिल्या दिवशी मॉनेटरची निवड झाली. तुला माहीत आहे का आजी, ज्याची निवड होते तो अगदी भाव खात असतो वर्षभर. बाईंचा शब्द खाली पडू देत नाही. मागच्या वर्षी मी होतोना! सगळ्यांचा मी आवडता आहे.’’ वैभवच्या मनातला अभिमान चेहऱ्यावर उमटला. ‘‘अगदी ऑस्कर मिळाल्यासारखा बोलतोय.’’ रतीने हटकलं. ‘‘होच मुळी, चांगलं वागावं लागतं. सगळा गृहपाठ पूर्ण ठेवावा लागतो. खाडाखोड चालत नाही.’’ वैभवने त्यामागची कारणं स्पष्ट केली. ‘‘आजी, वेदांतची वही दाखवू का? बघण्याजोगी आहे. मस्त अभ्यास चालतो त्याचा. थुंकी लावतो खोडतो, लावतो खोडतो की शेवटी पान फाटतं. पेनांची पळवापळवी चालूच असते. पण बाबा पेन आणायला कधीही नाही म्हणत नाहीत. अभ्यास करायचा ही एकच अट.’’ रतिने धपाटा खाण्याच्या तयारीनेच कागाळी केली. आजीने मध्यस्थी केल्यामुळे युद्ध टळलं. ‘‘आजी, मी यावर्षी वह्य छान ठेवणार आहे. तुला दाखवीन बरं का!’’ वेदांतने लाडीगोडी लावली. ‘‘शाळा सुरू झाल्यावर लगेचंच माझा वाढदिवस येतो. त्या दिवशी नवीन कपडे घालून शाळेत जाता येतं. सगळे शुभेच्छा देतात. मी सगळ्यांना कॅडबरी वाटते. त्यावेळी माझी मैत्रीणपण माझ्याबरोबर येते. बाई कौतुकाने गालाला हळूच हात लावतात, ते मला खूप आवडतं. तंद्रीत असलेली मुक्ता कल्पनेनेही खूश होते. ‘‘वेळापत्रक दिलेलं असलं तरी कधी बाई आलेल्या नसतात किंवा दुसराच विषय घेतात. मग मी अशा वेळी वहीतली पानं फाडते, पण पुढचीही पानं हळूच बाहेर येतात. कधी एखादी वही दोन-चार भरलेल्या पानांनंतर रिकामी राहते. मग मी ती पानं अशी त्रिकोणी दुमडून ठेवते. आणि दुसऱ्या विषयाला वापरते. आई म्हणते, किती पानं फुकट घालवतेस.’’ रती हळूच जीभ बाहेर काढते. ‘‘ही मैत्रिणींनासुद्धा पानं फाडून देते हं आजी. अगदी बिनधास्त आहे.’’ वैभव तक्रार नोंदवतोच. ‘‘माझ्या जिवलग मैत्रिणी आहेत त्या मग संकटकाळी मदत करायला नको का? त्या लांबून येतात आणि बाई पुन्हा सांगत नाहीत.’’ रति कारण पुढे करते. ‘‘तुमच्या सगळ्यांच्या वह्य़ांत काही कोरी पानं आहेत का रे शिल्लक? काय करता त्यांचं?’’ आजी उगाच भूतकाळात शिरली. ‘‘आहेत ना, पण आईला देऊन टाकतो. तिला लागतात कशाला तरी.’’ मुक्ता सांगून मोकळी होते. ‘‘एखाद्या दिवशी गृहपाठ केला नाही, वाचून गेलं नाही की बाई नेमकं आपल्यालाच प्रश्न विचारतात. तरी अशा वेळी मी खाली मान घालून बसलेले असते. पण बाई कसं बरोबर ओळखतात याचं नवल वाटतं. ‘मी सांगू’ ‘मी सांगू’ म्हणून हात वर केला की मात्र विचारत नाहीत. मग माझी त त प प होते उत्तर देताना. वाईट वाटतं, डोळ्यात पाणीही यायला लागतं. पण घरी पाहुणे आल्यावर मी एकटीनं अभ्यास का करायचा आणि कसा करायचा?’’ रती शाळेच्या आठवणींमध्ये रमून जाते. ‘‘डबा खाताना आम्ही एवढय़ा गप्पा मारतो की नावडती भाजी संपलेली लक्षातही येत नाही. आईही खूश होते. शिवाय प्रत्येकीच्या डब्यातलं ‘खास’ खायला मिळतं. आईकडून पेप्सीकोलाही वसूल करते.’’ मुक्ता खुशीत येते. ‘‘एखादा तास रिकामा मिळतोय का याची आम्ही वाटच बघत असतो. काहीही करून वर्गात नाहीतर मैदानात क्रिकेट खेळतोच. पाण्याच्या बाटल्या स्टम्प म्हणून उभ्या करतो. फूटपट्टी किंवा लिहिण्याचं पॅड बॅट म्हणून कामी येतं. पेन, रबर, डबा काहीही ‘चेंडू’ म्हणून फेकतो. बाकावर ‘विजय’ साजरा करतो. मज्जा येते.’’ वेदांत लगेच ‘सचिन’च्या भूमिकेत उभा राहतो, ओंकार फिल्डिंगची ‘अॅक्शन’ घेतो. ‘‘फळा पुसताना तर अगदी बाई झाल्यासारखं वाटतं. छान ऐटीत पुसायचा आणि मग डस्टर आपटायचं. सगळीकडे पांढरी पावडर उडते. गंमत वाटते.’’ रति शेपटा हलवत बाईंची नक्कल करते. ‘‘मी रोज बाईंना आमच्या झाडाचं गुलाबाचं फूल देते. मग बाई हळूच थँक्यू म्हणतात. मी भाव खाऊन घेते. कधी कधी आईला न्यायला यायला उशीर होतो. मला तिची वाट बघत बसायला आवडतं. मग मी विचार करते, आईने कोणता ड्रेस घातला असेल. कधी मी मनात ठरवलेलाच ती घालून येते. मी एकदम खूश होते. धावतच जाऊन मिठी मारते.’’ मुक्ता स्वप्नात रंगून जाते. ‘‘आजी, मला शाळेत जायला लागल्यापासून सर्वात काय आवडतं सांगू, वहीचं शेवटचं पान. एकदम खास असतं माझ्यासाठी ते. ट्रीपची वर्गणी, स्पर्धेचं नाव, विषय, ठिकाण मैत्रिणींचे नंबर, बाबांना आणायला सांगायच्या गोष्टी, वाढदिवसाला कोणाकोणाला बोलवायचं त्यांची नावं. भेंडय़ा खेळताना सुचलेली अवघड गाणी, मुखडे, स्नेहसंमेलनातील डान्ससाठी ड्रेसचा रंग. इतकं काय काय लिहिलेलं असतं. त्याच्या मध्येमध्ये पेन उठतंय की नाही हे बघितल्याच्या ढीगभर खुणांची गिचमिड. त्यामुळे खरं तर फुकटच जातं, पण मला फार आवडतं.’’ रतिचा मोकळेपणा आजीला खूप आवडला. ‘‘एकंदरीत मुलांना शाळा हवीहवीशी वाटत होती.’’ ‘‘आजी, मला मात्र मित्र चिडवत होते.’’ ओंकारची मुंज झाल्यामुळे त्याला जरा अवघड वाटत होतं. ‘‘मस्त तबला वाजवत असतील.’’ वेदान्तने लगेच संधी साधली. ‘‘मग तू थोडे दिवस शाळेत जाऊ नकोस.’’ आजीने उपाय सुचवला. ‘‘नाही. मला शाळेत जायचंच आहे.’’ ‘‘आता चला, गृहपाठ करायला घ्या थोडय़ावेळ खेळा आणि उद्या नव्या उत्साहाने शाळेत जा.’’ आजीने फर्मान सोडलं. suchitrasathe52@gmail.com