‘‘रोहन, झाली उद्याची सगळी तयारी?’’
‘‘जवळजवळ झालीच.’’
‘‘वह्या-पुस्तकं? अरे हो, पहिले तीन दिवस ‘नो वह्या-पुस्तकं’. मज्जा आहे बुवा!’’
‘‘पहिल्या दिवशीपण ‘फुल-डे’ शाळा, छ्या! अर्धा दिवस असती तर काय बिघडलं असतं?’’
‘‘हो, नं! पण काही पर्याय? नंतर वर्षभर असतातच हाफ-डे, फुल-डे, हॉलिडे… बूट पॉलिश केलेस?’’
‘‘केले की! नवीन मोजेपण घेतले.’’
‘‘दोन वह्यांना अजून पेपर कव्हर्स घालायची राहिली आहेत नं?’’
‘‘हो, आधी चांगली प्लॅस्टिक कव्हर्स घातली होती… ती काढा आणि आता पुन्हा पेपरची कव्हर्स घाला!’’
‘‘शाळेला प्लॅस्टिक नकोय हा विचार छानच आहे की! बिघडलं कुठे?’’
‘‘बाई म्हणाल्या, वर्तमानपत्रांचीच कव्हर्स घाला म्हणजे कागद वाया जात नाही. कागद झाडांपासून बनतो तर मग तितकी झाडंही वाचतील नं?’’
‘‘ते आहेच! पण काय बोअरिंग काम आहे कव्हर्स घालणं… ओक्के, रात्रीचं जेवण झालं की झोपायच्या आधी घालू या कव्हर्स…’’
‘‘काय तू? शाळेची तयारी बोअरिंग काय वाटते तुला? ती एक वेगळीच मज्जा असते, उत्साह असतो- नवीन बॅग, नवीन बूट, नवीन युनिफॉर्म…’’
‘‘पण यंदाचा युनिफॉर्मही गेल्या वर्षीचाच, बूट आणि बॅगही!’’
‘‘नवीन पेन्सिल बॉक्स, नवीन डबा, नवीन पाण्याची बाटली, नवीन मोजे… त्याचं काय?’’
‘‘हो, नव्या कोर्या वह्या आणि पुस्तकं…’’
‘‘मग? हा नवीन पुस्तकांचा वास बघ किती मस्त आहे… आहाहा!’’
‘‘तो छानच आहे! पण सुट्टी संपली नं आता? अभ्यास, गृहपाठ सगळंच सुरू होईल एकदम.’’
‘‘दररोज सुट्टी असेल तर दिवाळी-उन्हाळ्याच्या सुट्टीची काय मजा? वर्षभर भरपूर अभ्यास करून जेव्हा अख्खे दोन महिने उन्हाळ्याची सुट्टी मिळते ती स्पेशल.’’
‘‘काय धम्माल केलीये नं आपण सुट्टीत- मुंबई दर्शन, महाबळेश्वर ट्रीप…’’
‘‘मग? आंबे, जांभळं, ताडगोळे…’’
‘‘पिझ्झा, बर्गर, आइस्क्रीम…’’
‘‘झब्बू चॅलेंज, नॉट-ॲट-होम…’’
‘‘हॉकी, फुटबॉल, क्रिकेट – खेळणं आणि बघणं…’’
‘‘बघणं?’’
‘‘आयपीएल…’’
‘‘आपलीपण आयपीएल रंगलीच की!’’
‘‘लहान-मोठ्या सर्वांनीच सुट्टी यासाठीच तर असते… धम्माल करायला.’’
‘‘ये ऽऽऽ! उद्यापासून शाळेत मोठ्या सुट्टीसाठी स्पायडरमॅनचा नवीन डब्बा… आणि डब्ब्यात मस्त मेथी पराठा!’’
‘‘किती तुझ्या उड्या… पत्त्यांवरून डायरेक्ट पराठे? आणि या वर्षी डब्ब्यात पुन्हा पराठेच हवे आहेत? गेल्या वर्षी दररोज तेच-तेच पराठे खाऊन कंटाळा नाही आला?’’
‘‘तेच-तेच कुठे आई? कधी पालक, कधी मेथी, बीट, गाजर, मुळा… एक नंबर पौष्टिक डबा! आई, मला सांग, तू काय नेणार उद्या डब्ब्यात?’’
‘‘माझी आवडती भाजी-गवार-बटाटा.’’
‘‘हो! बाबाला परवा रात्री पाहिलं त्याचे कामाचे कॉल संपल्यावर गवार मोडताना.’’
‘‘बाबाची मदत असते म्हणूनच तर इतकी मोठी उडी घेतलीय मी…’’
‘‘आणि माझी मदत?’’
‘‘तुझी तर पहिली. तू ‘हो’ म्हणालास म्हणून विचार करू लागले.’’
‘‘दहा वर्षांनंतर! मी तर केव्हाच ‘हो’ म्हणालो होतो, तू तयारच नव्हतीस पुन्हा शाळेत जायला. आई. गणित आणि विज्ञानाची शिक्षिका होतीस तू! बास्केटबॉलसाठी शिवछत्रपती मेडल मिळालंय तुला. शाळेच्या ग्राऊंडवर बास्केटबॉलचं ट्रेनिंगही द्यायचिस मुलींना. स्कूल ऑलिम्पिक्समध्ये मेडल्स पटकावली आहेत तुझ्या टीमनं. पण तुझी शाळा, तुझं बास्केटबॉल माझ्या जन्मानंतर सुटलं.’’
‘‘माझ्या पोटातल्या बास्केटमध्ये हे गोडू बाळ आलं नं, म्हणून ठरवून सोडलं खेळ, शाळा. आता तू बास्केटबॉल शिकतो आहेस, खेळतो आहेस. माझं शिक्षण तुझा अभ्यास घेताना उपयोगी पडतंच नं. आता नवीन शाळेत पुन्हा गणित आणि विज्ञान शिकवणार आहे मी. स्पोर्ट्स इन-चार्ज केलंय मला… खूप आहे की काम!’’
‘‘तू तुझा फिटनेस मेन्टेन केलास म्हणून.’’
‘‘पण दहा वर्षांत बर्याच गोष्टी बदलतात! शिकवण्याच्या पद्धतींमध्ये फरक पडतो. तुला शिकवताना जाणवतं मला. आठवी-नववीला शिकवणं सोपं नाही. मला नव्यानं शिकाव्या लागणार आहेत खूप गोष्टी. इतक्या मोठ्या गॅपनंतर नव्यानं कामाची सुरुवात करणार्या प्रत्येक आईला ते करावं लागतंच.’’
‘‘टेंशन आलंय?’’
‘‘थोडं असणारच- जमेल की नाही इतक्या वर्षांनी!’’
‘‘‘जमेलच’ म्हणायचं. तूच शिकवलं आहेस नं मला? आमची शाळा लवकर सुरू होते दरवर्षी. पण तुझ्या शाळेतल्या मुलांना यायला अजून थोडे दिवस आहेत. तोपर्यंत ‘सेट’ होशील तिथे.’’
‘‘ए, पोपटा! बाबासारखंच बोलतोय अगदी!’’
‘‘बाबानं एक गंमत ठेवली आहे तुझ्या बॅगेमध्ये! तो आजच कलकत्त्याला गेला कामासाठी, म्हणून तुझ्या शाळेच्या पहिल्या दिवसासाठी खास गिफ्ट.’’
‘‘‘चिकन सूप फॉर द टीचर्स सोल’? वॉव! या ‘चिकन सूप’ पुस्तकांच्या मराठी सीरिजमधलं ‘मदर्स सोल’ वाचलंय मी!’’
‘‘म्हणूनच आता ‘टीचर्स सोल’… फॉर युअर न्यू रोल… ‘मदर्स सोल’ तुझा कायमच असणार आहे.’’
‘‘बापरे! पाचवीच्या मुलाचा केवढा हा विचार! माझ्या नकळत तुम्हा बाप-लेकाची ही गुप्तयुती एकदम आवडली. बसमध्ये वाचायला पुस्तक बेस्ट गिफ्ट.’’
‘‘चला मग, उरलेल्या वह्यांना उत्साहानं कव्हर्स घालायला. या टीचर्स सोललापण कव्हर घालू म्हणजे पुस्तक खराब नको व्हायला. अजून जेवायचंय, सकाळी लवकरही उठायचंय. शाळा आहे- दोघांची!’’
‘‘माझ्याच सूचना मला! छान! चला…’’
‘‘गुरुजींचे प्रेमळ शब्द, बाईंची ती गोड माया…’’ रोहन कविता म्हणू लागला.
‘‘अरे वा, रा. रं. बोराडे यांची किती सुंदर कविता आठवली तुला!’’
‘‘ज्ञान मंदिराच्या वाटेने, धावत पळत चाललो आम्ही!’’ त्यानं पुढचं कडवं म्हटलं.
‘‘शाळेला चाललो आम्ही, शाळेला चाललो आम्ही…’’ दोघांनी आपापल्या स्वप्नांचे सूर मिळवले.
mokashiprachi@gmail.com
