देखणे हे ‘हात’..

खरं तर हे नेहमीचंच होतं. तिन्ही- सांजेला आजीने घरात पाऊल टाकलं रे टाकलं की ‘बाल’ मैफल तिच्याभोवती जमायचीच

(संग्रहित छायाचित्र)

सुचित्रा साठे

खरं तर हे नेहमीचंच होतं. तिन्ही- सांजेला आजीने घरात पाऊल टाकलं रे टाकलं की ‘बाल’ मैफल तिच्याभोवती जमायचीच. सगळ्यांचं लक्ष आता ‘हातावर’ काय खाऊ मिळणार याकडे असायचं. छोटय़ांची गडबड शांत झाली की कुमारवयीन हळूच ‘हात’ पुढे करायचे. किंबहुना आजीचं लक्ष त्यांच्याकडे असायचंच. आजही तसंच झालं. आजीने वाटलेल्या खडीसाखरेने कुडुमकुडुम करत सगळ्यांची तोंडं गोड केली. छोटी सई तेवढी मागे राहिली. तिच्या दोन्ही हातावर ताईने मेंदी काढली होती ना! सगळ्यांनी केलेलं ‘टुकटुक’ झेलत, मेंदीला जपत चेहरा पाडून ती पुढे गेली आणि तिने चक्क आजीसमोर ‘आ’ करत तोंड पसरलं. सईकडे बघताना काहींचे नकळत ‘आ’ झाले आणि त्यांना पुन्हा प्रसाद मिळाला. आजीने हे आधीच ओळखले होते. परंतु इतरांना तिला चिडवण्याचं निमित्त मिळालं.

‘‘ए सई, हातात घे नं, मेंदीचा छान वास येतो.’’ विराज पुटपुटला.

‘‘अरे, तिच्या ताईने हाताने सुंदर मेंदी काढलीय आणि सईने ती पुसू नये म्हणून काळजीपूर्वक संभाळलीयसुद्धा. एका हाताने दुसऱ्या हाताचं केलेलं कौतुक आहे ते.’’ आजीने सईची बाजू घेतली.

‘‘हाताचं काय गं एवढं कौतुक?’’ समीर कुरकुरला.’’

‘‘ए, हाताने आपण किती कामं करतो. जेवतो, खातो, पितो, लिहितो, अभ्यास करतो.’’ विभाताईने चटकन् माहिती पुरवली.

‘‘हे तर आहेच. शिवाय हातांच्या काही कृतींनी आपण वेगवेगळ्या भावना, विचार व्यक्त करतो. एखाद्याची नवीन ओळख झाली की विराज काय करतोस, कसा प्रतिसाद देतोस, सांग बघू?’’ आजीने विषयाची मांडणी सुरू केली.

‘‘मी पटकन् त्याचा हात हातात घेतो. नावानिशी ओळख करून घेतो. एखाद्याचं अभिनंदन करताना किंवा शुभेच्छा देताना असंच हस्तांदोलन केलं जातं.’’ हे सांगताना विराजला मजा वाटली.

‘‘म्हणजे मैत्रीचं नातं हातात हात गुंफून प्रस्थापित होतं किंवा असलेलं दृढ होतं. आपलेपणा वाढतो. सकाळी उठल्यावर बाप्पासमोर उभं राहून काय करतेस, सांग बघू सई?’’ आजीने सईकडे मोर्चा वळवला.

‘‘हात जोडून मोरया करतो ना!’’ तिचं सगळं लक्ष मेंदीकडे असल्यामुळे सईने जपूनच नमस्काराची ‘अ‍ॅक्शन’ केली.

‘‘अस्सं..’’ विराजने नक्कल केलीच.

‘‘लक्ष नको देऊ सई. हं, आपण काय म्हणत होतो? सकाळी देवाला वंदन करतो. प्रार्थना म्हणतो. म्हणजेच दोन ‘हात’ जोडून भगवंताची भक्ती करतो. मोठय़ांना खाली वाकून असाच नमस्कार करतो. त्यांचे आशीर्वाद घेतो. बरोबर ना विभाताई?’’ ताई म्हणून मोठेपणा दिला की विषयात जास्त रस घेतला जातो, हे आजी ओळखून होती.

‘‘आजी, हातांनी हेही करतो.’’ असं म्हणत समीरने जोरजोरात टाळ्या वाजवत सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.

‘‘हो तर! कौतुकाने प्रोत्साहन देण्यासाठी आपण नेहमी टाळ्या वाजवतो. मात्र कधी कधी एखादा कार्यक्रम कंटाळवाणा झाला, वक्त्याचे भाषण प्रमाणाबाहेर लांबले, तर ते थांबवण्यासाठी टाळ्या वाजवण्याची युक्ती केली जाते. पण हे चांगलं नाही बरं का! आपण तसं कधीच करायचं नाही. असं करण्याने त्या व्यक्तीचा अपमान केल्यासारखं होतं.’’ आजीने महत्त्वाची गोष्ट अधोरेखित केली.

‘‘आजी, समोरच्या व्यक्तीशी संवाद साधताना आपलं एकमत झालं, विचार पटले, आवडलं की ‘दे टाळी’ म्हणून आपण टाळी देतो.’’ विराज टाळीत गुंतला होता. मुद्दाम सईसमोर ‘दे टाळी’ म्हणत त्याने हात पुढे केला.

‘‘रस्ता क्रॉस करताना आजूबाजूला बघायचं आणि वृद्ध व्यक्तींना मदतीचा ‘हात’ द्यायचा, असं आमच्या शाळेतल्या बाईंनी आम्हाला सांगून ठेवलंय, म्हणून मी जागरूक असतो. कोणी ज्येष्ठ व्यक्ती जिना उतरत किंवा चढत असेल तर लगेच मी ‘हात’ धरून मदत करतो. त्यांना इतकं बरं वाटतं आणि ते त्यांच्या चेहऱ्यावर दिसतं.’’ समीर थोडा भावूक झाला. म्हणून आजीने ‘हाता’ने त्याच्या पाठीवर थोपटलं.

‘‘विराज, अभ्यासात टंगळमंगळ केली तर आई ‘हात’ उगारते आणि धम्मक लाडू देते की नाही?’’ विभाताईने अवघड प्रश्न विचारल्यामुळे विराजने हळूच जीभ बाहेर काढली.

‘‘बरं का मुलांनो, ‘हात’ वर केले तर असहायता दिसते, शरणागती दिसते. कोणापुढे  कधीही ‘हात’ पसरू नये- म्हणजे काहीही मागू नये. जे आपल्याकडे आहे. त्यातच समाधान मानावे. दुसऱ्याकडून कधीही काहीही घेऊ नये आणि कितीही कंटाळा आला तरी ‘हाता’वर हात ठेवून बसू नये. यात आळशीपणा, निष्क्रियता दिसून येते.’’ आजीने असं सांगताच प्रत्येकाचे लक्ष आपल्या हातांकडे गेले.

‘‘आजी, नृत्यातल्या हातांच्या मुद्रा किती आणि काय काय व्यक्त करतात, नाही का गं? त्यावरच नृत्यकला आधारलेली आहे. मला खूप आवडतं नृत्य करायला. आणखी एक सांगू का, कर्णबधिर मुलं असतात नं, ती हातांनी खुणा करत बोलतात.’’ बोलता बोलता विभाताईने आनंदाने गिरकी घेतली. मेंदी बरीचशी वाळल्यामुळे सईने ताईचा कित्ता गिरवला.

दोघींनाही ‘हाता’ने पाठीवर शाबासकी देत आजीने अनेक रोगांवर हातांच्या मुद्रा उपयुक्त असल्याची माहिती दिली.

‘‘हे कर्मेद्रिय खूप महत्त्वाचं आहे. ‘देखणे जे हात ज्यांना निर्मितीचे डोहाळे’ असं म्हटलं जातं. या हातांमधूनच नवजीवन, कलानिर्मिती होत असते. अनेक ‘हात’ पुढे आले तर अशक्य ते शक्य होऊन जातं. म्हणजेच सगळ्यांनी मदत केली तर काम वेगाने पूर्ण होतं. चला तर मग दोन-तीन मेथीच्या जुडय़ा आणल्या आहेत मी येताना. या सगळे मेथी निवडायला म्हणजे पोटभर पराठे खाण्याचा आनंद घेता येईल. चालेल नां?’’

हसत हसत सगळी वानरसेना मेथी निवडायला बसली.

suchitrasathe52@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Seeing hand balmaifal article abn

ताज्या बातम्या