‘हू ऽ ऽ हूऽऽ’ करीत थंडी आली
लोकरी कपडय़ांची गर्दी झाली

दातांनी ‘किट किट’ धरला ताल
गोबरे गोबरे तडकले गाल

नाकातून जणू वाहते नदी
थंडगार चटके देते लादी
दिवस भर्रकन जातो निघून
रात्र मोठी, घ्या भरपूर निजून

दिवसभर वाटतं काही तरी खावं
मौजेसाठी कुठे फिरायला जावं

थंडीत तब्येत असते छान
आनंदी राहतात थोर-सान

कधी धुक्यात हरवते वाट
मध्येच थंडीची येते लाट
या लाटेपासून सावध राहावं
गुलाबी थंडीचं गाणं गावं.

– दिलीप पाटील

=====

हुहुहु थंडीबाई
हुहुहु थंडी आली
निळी-निळी शाल अंगावरती
बब बर्फाने घेतली एंट्री
कककडकड थंडी आली
पाचोळय़ांची गिरगिर गिरकी
गारठली मांऊ ऊनात बसली

हीहीही थंडी आली
सोनू-मोनू गुडूप झोपली
आजूने घातली मायेची गोधडी

सननन थंडी आली
काऊने घातली काळी चड्डी
छोटय़ा चिऊची चॉकलेटी बंडी
छींछींछींक थंडी आली
माकडुला झाली फारच सर्दी
डॉक्टरने पाजलं औषध भारी

औषधं पिताच माकड हुशारलं
सरसर झाडावर चढलं
हुपहुप थंडी वेडारू लागलं

– माधवी सामंत