गणेशोत्सवानिमित्त मी तळकोकणात होतो. किर्र अंधार्या रात्री उशिरा भजन संपवून आम्ही खालच्या वाडीत परतत होतो. तितक्यात वाटेतल्या गवतातून कुणी तरी झर्रकन् सळसळत गेलं. मला तर काही कळलंच नाही, पण मागून एक स्थानिक माणूस ओरडला, ‘‘ही बघ, केलडी गेली!’’ जे मला समोर असून दिसलं नाही, ते त्याला मागे असून कसं काय ओळखता आलं? पळण्याची ढब, वेग, अंधारात क्षणभर दिसलेला शरीराचा थोडासा आकार, धावताना केलेला आवाज, उंची, वास की असाच अंदाज… यापैकी नेमकं त्यानं काय पाहिलं असेल?

आपल्या समोरून एखादी गाडी झपकन गेली तर आपणही ती पटकन ओळखू शकतोच. गाडीचं मॉडेल कदाचित सांगता येणार नाही; पण तिचं डिझाईन पाहून कंपनी ओळखता येतेच. अंधारातसुद्धा कधी कधी हे शक्य होतं. मग प्राण्यांच्या बाबतीतही अभ्यास असणार्यांना असंच अंधारातही कळत असेल का? मांजर, कुत्रा, घोडा, कासव, खेकडा, साप, मासा, मोर यांची चित्रं काढताना आपण रंग, डोळे, कान, पाय, शेपटी, खवले, पिसं असे किती तरी तपशील काढत बसतो तेव्हा कुठे प्राणी जमला असं वाटतं. पण हे सगळे तपशील चित्रातून काढून टाकले तर? फक्त प्राण्याचा साधारण आकार ठेवला तरी तो ओळखता येईल का? पाहू या. मी काही कोडी घालतो.

फार विचार न करता सेकंदात उत्तरं सांगायची. लांब मान आणि लांब पायांचा जीव कोणता? डोक्यात पटकन जिराफ आले का? पण उंट, शहामृग, इमू, कांगारू त्यांच्याही माना आणि पाय लांब असतात ना! आता दुसरं कोडं- आठ पायांचा पसरट आकार दिसला तर मनात कोण येतो? कोळी की खेकडा? सोबत झुरळ, ऑक्टोपस, कोळंबी यांचाही विचार आला का? म्हणजे प्राणी ओळखायला फक्त काही शब्द किंवा एक साधा आकार पुरेसा नसतो. किंवा प्राणी जगतातील अनेक जीव यात येऊ शकतात, पण एखादं चित्र, एखादा स्ट्रोक, एखादा रंग प्राणी ओळखायला पुरेसा ठरतो.

प्राणी जगताचा अगदीच अभ्यास नसेल, चित्ता आणि बिबळ्या यांच्यात अनेकदा गोंधळ होतो तसा या अमूर्त चित्रातही होऊ शकेल. प्राण्याची ओळख त्याच्या प्रत्येक तपशिलात असतेच असं नाही. कधी कधी ती त्याच्या मूळ बाह्य आकारात असते. कधी त्या आकाराच्या हालचालीत असते. कधी त्याच्या उंची किंवा लांबीत असते. कधी त्याच्या आवाजात किंवा उग्र वासात असते. कधी त्याच्यावरचा रंग, पोत आणि पॅटर्नमध्ये असते. त्यातले एक जरी चित्रात उतरले तरी आपल्याला पूर्ण प्राणी न काढताच ते ओळखता येईल.

जसे की आपण- आपण देखाव्यातल्या दोन डोंगरांमध्ये पक्षी काढताना अनेकदा न्न् अशा साध्या आकाराचा उपयोग करतो. त्यात डोळा नाही, पिसं नाहीत, चोच नाही, तरी त्यात आपल्याला पक्ष्याचा आभास होतो आणि इतरांनाही तो पक्षी आहे हे कळतं. म्हणजे आपण काढलेला हा पहिला अमूर्त पक्षीच झाला. आज आपणही नवा अमूर्त जीव बनवून पाहू या का! त्याआधी एक सराव करू या तू डोळ्यासमोर दोन प्राणी आण. खरा प्राणी, प्राण्याचा फोटो किंवा मोबाइलवरील फोटो काहीही चालेल. पण चित्र नको. फोटो हवा. तोही एका बाजूने, आडवा दिसणारा.

उदा.

मगर आणि सुसर
सुरमई आणि बांगडा
कुत्रा आणि कोल्हा
उंदीर आणि चिचुंद्री
गाढव आणि घोडा
यांपैकी कोणतीही एक जोडी निवड.


तू मगर आणि सुसर निवडलीस.

१. दोन्ही प्राण्यांमध्ये काय साम्य आहे ते शोध. शेपूट? खवले? रंग? पाठ? मान? पाय?
आता दोघांमध्ये काय वेगळं आहे ते शोध.
तोंडाचा आकार? पाठीचा बाक? दात?

२. आता दोन कागद घे.
एका कागदावर सारख्या गोष्टी चित्रातून दाखवायच्या आणि दुसर्या कागदावर वेगळ्या गोष्टी चित्रातून दाखवायच्या. पण एक अट आहे. तपशील अजिबात नकोत. फक्त एक-दोन आयतं, एखादा त्रिकोण, दोन-तीन रेषा, एखादा पसरलेला आकार… एवढंच. तू केवळ फ्लॅट ब्रशचे रंगलेपन किंवा भौमितिक आकारात काढले तरी चालेल. डोळे दाखवलेच पाहिजेत असं नाही. पूर्ण रंग भरलाच पाहिजे असंही नाही. दोन्हींसाठी एकच काळा रंग वापरला तरी चालेल.इथंच ‘पाहण्या’ची गंमत सुरू होईल.

आपल्याला कळेल की दोन प्राण्यांच्या बाह्य आकारात नेमकं काय सारखं आहे आणि काय वेगळं आहे. त्यांच्या ठेवणीचा, लकबीचा, हालचालीचा वेगळा ‘आकार’. रंग बदलला तरी आकार आणि हालचाल ओळखीची असेल तर प्राणी ओळखू येऊ शकतो. (कधी कधी हालचाल आणि आकार पाहिला नाही आणि केवळ रंग आणि पोत कागदावर आले तरीही प्राणी ओळखता येऊ शकतो.) मग आता एकेका चित्रात एकेक प्राण्याचा घटक घे. तपशील वगळून पाहा. तू प्रयत्न केलेली ही सर्व अमूर्त चित्रं मला ई-मेल कर. आजपासून तुला एक प्रश्न नक्की सतावेल. चित्रातल्या प्राण्याची ओळख नेमकी कुठे असते? आकारात की आपल्या डोक्यात साठलेल्या त्या प्राण्याच्या आठवणीत? आणि असेच आपण आपले पालक, शिक्षक, मित्र-मैत्रिणींना ओळखतो का?
तुझा चित्र मित्र, श्रीबा

शिक्षक आणि पालकांसाठी…

१. आपल्या शहरात किंवा गावात प्राणिसंग्रहालय असल्यास मुलांना तिथं खास स्केचिंगसाठी नक्की न्या. प्रत्यक्ष निरीक्षण आणि प्राणी-अभ्यासासाठी हा अनुभव महत्त्वाचा आहे.
२. बकरी, गाय, म्हैस, कुत्रा, मांजर, झुरळ, मुंगी किंवा मासळी बाजारातील मासे… असे सहज दिसणारे प्राणीही मुलांना प्रत्यक्ष पाहता आणि रेखाटता येतील, अशी नाक न मुरडता संधी द्या.

हट्टी त्रिकोण वर्तुळाला अर्धा कापला की…होतो अर्धवर्तुळ, अर्धवर्तुळाला अर्धा कापला की… होतो पाववर्तुळ.चौरसाला अर्धा कापला
की…होतो आयत, आयताला अर्धा कापला की…. चौरस परत आपल्या मूळ रुपात येतो. वर्तुळ, चौरस, आयत कापले की एक नवीन आकारला जन्म देतात, कुणीही आपल्या मूळ आकाराला चिकटून राहत नाही. पण, फारच हट्टी असतो त्रिकोण… कितीही समानभाग करा तो राहतो त्रिकोणच. संजय पाटील

झाड… वडाच्या पारंब्या लांबच लांब पारंब्यांवर मुंगळ्यांची रांग वडाच्या सावलीत बसलंय कोण? गोजिरी कपिला हलवीत तोंड वडाच्या झाडाची सावली गार कुणीतरी बांधला सुंदर पार पारावर संध्याकाळी बसतं कोण? आजोबा न् त्यांचे मित्र दोन वडाच्या झाडाखाली आणखी काय मोतीही झोपतो पसरून पाय वडाखालची माती ओलसर छान काळ्या काळ्या मुंग्याचं विसावा स्थान किती किती जिवांना पोसतं झाड म्हणून तर हिरवं असतं झाड! पद्माकर भावे