|| श्रीनिवास बाळकृष्णन

कार्टूनप्रेमी मित्रांनो, कार्टून गाथेच्या निमित्ताने गेली ३-४ महिने आपण जुन्या आणि प्रसिद्ध अशा कार्टूनची माहिती घेत आलो आहोत. तुमच्यापैकी अनेकांनी यूटय़ूबवर जाऊन लेखात आलेल्या कार्टूनचे एपिसोड पाहिले आहेत. काहींनी आपल्या आई-वडिलांच्या लहानपणीच्या आवडत्या कार्टूनबद्दल खास चर्चाही केलीये. तर ही कार्टून काहींच्या स्वप्नातही येऊन गेलेत, असे खास सूत्रांकडून आम्हाला कळलेय. देश-विदेशातील अजून चिक्कार कार्टून्स तुम्हाला भेटायला यायला उत्सुक आहेत, पण ते इतक्यात येणार नाहीत.

कारण तुमच्यासारखीच कार्टून्सनादेखील उन्हाळी सुट्टी लागल्याने आता दोन महिने ते काही तोंड दाखवायचे नाहीत. म्हणून तोवर आपणच हा प्रवास पुढे नेत त्याला आणखी गमतीदार बनवू. कसे ते सांगतो.

आजवर रेडिमेड कार्टून्स आपण पाहात व कॉपी करत आलोय. पण यापुढे आपण आपल्या मनातील कार्टून काढायचंय!

कोणालातरी पाहून प्रत्येकाच्या मनात अशा काही कल्पना येत जात असतात, याची खबर आम्हाला लागली आहे. आता तीच कार्टूनकल्पना कागदावर उतरवायची आहे. यासाठी पुढील लेख मदत करेल.

सुरुवातीला आपण तुमच्या जुळ्या भाऊ-बहिणीचे चित्र काढणार आहोत.

आपल्याला A4 आकाराचा पांढरा कागद ,(अ4 आकाराच्या फोटोकॉपीच्या कागदाचा अर्धा भाग)  काळा स्केचपेन हे साहित्य लागेल. पेन्सिल नकोच. नाहीतर तुम्ही कार्टून काढण्यापेक्षा खोडतच राहता. चुकलं तर दुसरा कागद! मोठय़ा आकाराचे हलते डोळे (मुव्हिंग आईज्) इतकंच!

ज्यांच्याकडे आपल्यासारखेच दिसणारे जुळे भाऊ-बहीण नसतील त्यांनी घरातला आरसा समोर ठेवा.

१. आरशात स्वत:ला नीट पाहा. डोळे, नाक, कान वगैरे जागेवर नसतील तर तसे लावून घ्या. आणि आरशातल्याला चेहरे वेडेवाकडे करायला सांगा. लाजायला होत असेल तर आजूबाजूला कोणी नसताना करा.

२. आपलं चेहऱ्यासकट डोकं कुठल्या आकाराचं आहे, हे ओळखा. माझ्या मते, ते गोल, त्रिकोणी, चौकोनी, अंडय़ासारखे असते. कुणाचे षटकोनी, अष्टकोनी, पतंग किंवा चांदणी आकाराचे असल्यास तसा आकार कागदावर काढा.

३. हा आकार स्केचपेनने काढताना सलग रेषेत काढा. तुटक रेषा तितकी छान वाटत नाही.

४. डोक्यावरल्या केसांची स्थिती पाहा. कुरळे की सरळ, भांग कुठला, कट कुठला, कपाळावर केस येतात का? मग तसे काढा.

५. नाक कसे आहे तुमचे?

बारीक, चपटे, लांब, आखूड की नाकाचा भजा?

६. ओठ? खालचा छोटा की वरचा मोठा? घट्ट बंद असतात की सतत उघडं तोंड? हसल्यावर आतले दात दिसतात की जीभपण?

आता सर्वात महत्त्वाचे ते म्हणजे डोळे. ज्यामुळे हे चित्र कार्टूनमध्ये बदलणार आहे. आता डोळे कसेही असोत, आपल्याला दुकानातून आणलेले हलते डोळे कागदावरच्या चेहऱ्यावर योग्य जागी चिटकवायचे आहेत. तुम्ही चष्मा वापरत असाल तर त्यावर तसाच चष्माही काढायचाय.

मात्र, भुवया जाड आहेत की पातळ ते नीट पाहा. हसताना, रडताना, ओरडताना, वाकडं तोंड करताना, कंटाळा करताना आपल्या भुवया कशा वळतात हेही पाहायचंय.

फोटोत दिल्याप्रमाणे कृती होईलच, पण हे चित्र माझ्याच जुळ्याचं असल्याने प्रत्येकाचं चित्र वेगवेगळं येईल. नाहीतर हेच कॉपी करत बसाल.

इतकं केलं की कार्टून तयार झालंच म्हणून समजा! त्याला स्केचपेनने रंगवण्याच्या भानगडीत शक्यतो पडू नका. कारण तुमचा स्किन टोनचा स्केचपेन अजून बनायचाय.

आता पहिल्याच प्रयत्नात, पहिल्याच कागदावर कदाचित १००% मजेदार कार्टून बनणार नाही. पण आणखी दोन वेळा हे केलेत तर मात्र नक्कीच मजेदार होईल. पुढे तुमचे चित्र विचित्र कार्टून पाहून कोणाचे हसून हसून पोट फुटल्यास मंडळ जबाबदार नाही.

‘इतरांना हसण्याआधी स्वत:वर हसायला शिका’ हे ऐकून गुळमुळीत झालेलं वाक्य तुम्हाला माहीत असेलच. तसेच ‘इतरांनी तुम्हाला ओळखायच्या आधी स्वत:ला ओळखायला शिका’ हा महान मंत्र मी तुम्हाला देत आहे.

chitrapatang@gmail.com