प्राची मोकाशी

२६ जानेवारीनिमित्त शाळेत होणाऱ्या परेडची तालीम संपल्यावर स्काऊट अनवीर घरी निघाला होता. तो नेहमीच्या बसमध्ये चढला. बस बरीचशी रिकामी असल्यानं त्याला खिडकीजवळची सीट मिळाली. त्यानं कंडक्टरला पास दाखवला. बसनं वेगळा रूट घेतला तसं त्यानं कंडक्टरला विचारलं, ‘‘काका, आज बसचा रूट का बदललाय?’’

Sandhya Devanathan
व्यवसाय वाढीमध्ये ‘एआयʼची महत्त्वाची भूमिका, मेटाच्या व्यवस्थापकीय संचालक संध्या देवनाथन यांचे मत
UP Man Brijesh Pal suicide
“शिक्षण घेण्यात अर्ध आयुष्य गेलं, पण…”, यूपीतल्या तरूणाने पदवी जाळून स्वतःला संपवलं
Will Julian Assange be extradited to the America What will be the next action
ज्युलियन असांज यांचे अमेरिकेत प्रत्यार्पण होणार का? पुढील कारवाई काय असेल?
Shubman Gill won the hearts of netizens
शुभमन गिलने जिंकले नेटकऱ्यांचे मन! चाहत्याच्या इंस्टाग्राम रीलवर कमेंट करत दिला मोलाचा सल्ला, Post Viral

‘‘एम. जी. रोडवर दगडफेक झाल्यामुळे पोलिसांनी तिथे बॅरीकेड्स लावल्या आहेत.’’

‘‘दगडफेक? कशामुळे?’’

‘‘काय झालंय ते नक्की नाही समजलंय अजून. पण कुठल्या तरी धार्मिक स्थळाची विटंबना झाल्यामुळं टेंशन आहे.’’

यावर अनवीर काहीच बोलला नाही आणि खिडकीबाहेर पाहू लागला. त्याच्या विचारांची गाडी आता भरधाव वेगानं धावू लागली. ‘त्या एरियामध्ये तर एकाच गल्लीत मंदिर आणि मस्जिद आहेत. मग विटंबना झाली तरी कुणाची? एरवी गुण्यागोिवदानं राहणारी ही माणसं अचानक अशी विचित्र का वागतात?’

अनवीर अस्वस्थ झाला. घरी येताच त्यानं झटपट आवरलं आणि तो मनातले विचार कागदावर उतरवू लागला..

‘२६ जानेवारी, आपला प्रजासत्ताक दिन! याच दिवशी ७३ वर्षांपूर्वी आपल्या देशाला ‘घटना’ मिळाली जिचा मूलभूत पाया होता ‘सर्व-धर्म-सम-भाव’! मी ‘गूगल सर्च’ करताना एकदा वाचलं होतं की ‘सर्व-धर्म-सम-भाव’ म्हणजे प्रत्येक धर्माप्रति समान भाव. ईश्वर, अल्लाह, ख्रिस्त किंवा इतर कुठल्याही देवाच्या रूपाला नमन केलं तरी ती प्रार्थना एकाच देवाला जाऊन मिळते. भारतात अनेक धर्म आहेत. जणू भारत म्हणजे एका वृक्षाचा बुंधा आणि सगळे धर्म त्या वृक्षाच्या शाखा! आपण मुळाला जसं खत-पाणी घालू, त्याप्रमाणे वृक्ष बहरतो.

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा समाजात ‘सर्व-धर्म-समभाव’ ही धारणा रुजविण्यात मोलाचा वाटा. त्यांनी मस्जिद, हिंदू मंदिर, बौद्ध विहार बनवले आणि एकतेचा संदेश दिला. रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद यांनी देखील याचा प्रचार केला. पण हा संदेश लोकप्रिय झाला महात्मा गांधीजींमुळे. ब्रिटिशांविरुद्ध हिंदू-मुस्लीम समाजामध्ये सलोखा आणण्यासाठी गांधीजी हा संदेश रुजवण्याकरिता नेहमीच प्रयत्नशील राहिले आणि आज त्यांच्याच नावानं प्रसिद्ध असलेल्या एम. जी. रोडवर धर्मस्थळाची विटंबना झालीये. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झाली तरी अजूनही जातीय, धार्मिक विषमता का आहे?

मी हिंदू आहे, पण माझे मित्र-मैत्रिणी सगळय़ा जाती-धर्माचे आहेत. आम्हाला इंग्लिश शिकवणाऱ्या मेरी डिसोझा टीचर ख्रिश्चन आहेत. सायन्स टीचर शिल्पा बाफना जैन आहेत. फ्रेंच शिकवणाऱ्या फरझाना मर्चंट पारसी आहेत. मी घराजवळच गणिताचा क्लास लावलाय. तिथे गणित शिकवणारे खानसर कसलं भारी गणित शिकवतात! माझे तर ते सगळय़ात आवडते सर! त्यांच्यासारखं गणित सोपं करून शिकवणारा शिक्षक मी अजून पाहिला नाही. आईची बेस्ट फ्रेंड बलजीत आंटी शीख आहे. दोघींच्या पुढाकारानं सोसायटीमध्ये लोहरी-मकरसंक्रांत एकत्र साजरी करत, आमची नवीन वर्षांची सुरुवात एकदम मस्त होते. गणेशोत्सव, दिवाळी, ख्रिसमस, ईस्टर, ईद, पारसी नववर्ष.. या सगळय़ाच सणांना आम्ही एकमेकांना आवर्जून शुभेच्छा देतो.

‘सर्व-धर्म-सम-भाव’ आम्ही इतका सहजतेनं पाळतो, तर हीच भावना मला माझ्या देशात का जाणवत नाही? तिथे जाती-धर्मवाद अजूनही का आहे? ज्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी सगळे देशवासी एकत्र होऊन लढले, तेच आज जात-पात-धर्म या गोष्टींवरून पुन्हा एकमेकांविरुद्ध का उभे आहेत?’

एवढय़ात आईनं खायला आणलं म्हणून अनवीर लिहायचा थांबला. खाता-खाता त्याचं लक्ष नुकताच हँगरवर लावलेल्या त्याच्या स्काऊटच्या गणवेशाकडे गेलं आणि त्याला काहीतरी आठवलं. खाणं बाजूला ठेवून तो पुन्हा लिहू लागला..

‘आमच्या स्काऊट्स-गाईड्सचे कॅम्प असले की आम्ही ‘ऑल फेथ प्रेयर’, म्हणजेच ‘सर्व-धर्म प्रार्थना’ एकत्र म्हणतो. १० भागांमध्ये विभागलेल्या या प्रार्थनेमधील ‘राम-धुन’ भागात आम्ही म्हणतो, ‘ईश्वर-अल्लाह तेरे नाम, सबको संमती दे भगवान’. ‘नाम-धुन’ मध्ये ‘जय बोलो सत धर्मो की, जय बोलो सत कर्मो की, जय बोलो मानवता की, जय बोलो सब जनता की’ चा नारा देतो. मग हिंदू, मुस्लीम, जैन, बौद्ध, पारसी, ख्रिश्चन.. असे देशातील प्रत्येक धर्माचे प्रतिनिधी आपापल्या धर्माची प्रार्थना म्हणतात. भगवद्गीता, गुरुग्रंथसाहिब, बायबल, कुराणसारख्या पवित्र ग्रंथांमधला उतारा त्या-त्या धर्माचं प्रतिनिधित्त्व करणारा स्काऊट वाचतो. त्यानंतर ‘We shall overcome’  च्या भागात ‘We shall walk hand in hand,  some day’ किंवा ‘We shall live in peace,  some day’ असा आशावाद व्यक्त करतो. ‘हर देश में तू, हर वेश में तू, तेरे नाम अनेक तू एक ही है’ म्हणत सर्व धर्माच्या एकतेचा संदेश देतो. प्रार्थनेच्या शेवटी ‘शांती पाठ’ म्हटला जातो. त्यातल्या ‘सर्वे भद्राणि पश्यन्तु’ या ओळीतून एकमेकांमध्ये चांगलं पाहण्याचा संदेश मिळतो. स्काऊट्सचे िबद्रासर आम्हाला नेहमी सांगतात की प्रत्येकाने आपापला धर्म सांगतो त्याप्रमाणे जरूर वागावं, पण ते स्वत:पुरतं. आपण जेव्हा घराबाहेर पडतो तेव्हा आपण फक्त भारतीय असलं पाहिजे.

‘सर्व-धर्म-सम-भाव’ यापेक्षा वेगळा तो काय? ‘सर्वेऽपि सुखिन: सन्तु’ अर्थात ‘सगळे आनंदी राहा’ हा साधा विचार मनाशी बाळगून आपण शांततेने नाही का राहू शकत?’

एक-दोन दिवसांतच अनवीरने त्याचे विचार २६ जानेवारीनिमित्त शाळेत होणाऱ्या निबंध स्पर्धेत निबंधस्वरूपात लिहून पाठवले. अनवीरचे क्लास-टीचर, मराठी शिकवणाऱ्या मुकादमसरांनी त्याचा निबंध वर्गात वाचून दाखवला. तो ऐकून आपणही असे विचार अंगीकारले पाहिजेत, असं अनेकांना जाणवलं. विचारात पडलेल्या काही मुलांचे चेहरे पाहून सर वर्गाला म्हणाले, ‘‘मुलांनो, प्रजासत्ताक दिन हा नुसताच ‘सेलिब्रेट’ करण्यापेक्षा, घटनेतील ‘सर्व-धर्म-सम-भाव’ हा विचार स्वत:मध्ये आणि जनमानसात रुजला पाहिजे. कवी गुलजार त्यांच्या एका गीतात म्हणतात, ‘नाम कोई बोली कोई लाखो रूप और चेहरे, खोल के देखो प्यार की आंखे सब तेरे सब मेरे रे..’  हे जेव्हा घडेल, तेव्हाच प्रजासत्ताक दिनाचा उद्देश सफल होईल.’’mokashiprachi@gmail.com