‘‘ता ई, काय करू गं? स्पर्धेत भाग घेऊ का?’’ मोनाचं काही ठरत नव्हतं. ‘‘ताई सांग ना गं.’’ पुन्हा एकदा मोनाचा प्रश्न. ताईला समजेना काय सांगावं. कारण भाग घे म्हटलं आणि नंबर नाही मिळाला तर पुन्हा हिचं टुमणं चालू होईल, ‘‘बघ, म्हणून मी भागच घेत नव्हते.’’
ताई गमतीनं म्हणाली, ‘‘यक्षप्रश्न आहे बाई मोठा!’’ मोनाला वाटलं ती काहीतरी चिडवते आहे, लगेच गेली आईकडे. ‘‘आई, बघ हं, मला सांग आधी काय ते यक्षप्रश्न.’’
आई म्हणाली, ‘‘अगं मोना, यक्षप्रश्न म्हणजे खूप कठीण असा पेच. काय करावं कळत नाही आणि काहीतरी निर्णय घ्यावाच लागतो, असा. तू बस बघू, मी तुला याचीच गोष्ट सांगते. मग तुझं तू ठरव- स्पर्धेत भाग घ्यायचा का ते!’’
कौरव-पांडवांच्या द्यूताच्या खेळात पांडव हरले आणि त्यांना बारा वर्षे वनवास भोगावा लागला. तेव्हा वनातील काळ संपताना पांडव द्वैतवनात आले. (महाभारत-अरण्यपर्व) एकदा वनात हिंडताना ते थकले आणि तहानेने व्याकूळ झाले. जवळ कुठे पाणी पिण्यासाठी तळं, सरोवर काही आहे का, हे पाहण्यासाठी पांडवांचा मोठा भाऊ युधिष्ठिराने नकुलाला पाठविले.
बराच वेळ झाला तरी तो परत आला नाही म्हणून त्याला पाहण्यासाठी सहदेवाला पाठवले. तोही बराच वेळ आला नाही म्हणून भीम.. तोही आला नाही म्हणून अर्जुन.. असे करत चौघेही भाऊ परत आलेच नाहीत. युधिष्ठिर काळजीत पडला. शेवटी तो स्वत: गेला. पाहतो तो काय, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव सगळे मृत अवस्थेत दिसले. तो पाणी घेण्यासाठी वाकला. एवढय़ात त्याला आकाशातून शब्द ऐकू आले, ‘‘हे सरोवर माझे आहे. हे चारही पुरुष माझे न ऐकल्याने मरण पावले आहेत. माझ्या प्रश्नाची योग्य उत्तरे दिलीस तर तुला पाणी पिता येईल.’’
संवादातून युधिष्ठिर समजला, की तो आवाज यक्षाचा म्हणजे इंद्राच्या दरबारातील सदस्याचा आहे. त्याच्या आज्ञेविरुद्ध पाणी प्यायल्यानेच त्याचे भाऊ मृत झाले आहेत.
युधिष्ठिर त्याच्या प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार झाला.
यक्ष प्रश्न विचारू लागला.
‘‘भूमीहून मोठे, नभाहून उंच आणि वाऱ्यापेक्षा चंचल असे काय आहे?’’
युधिष्ठिर म्हणाला, ‘‘भूमीहून मोठी माता, नभापेक्षा उंच पिता आणि वाऱ्यापेक्षा चंचल असे मन आहे.’’
यक्षाने पुढचा प्रश्न विचारला, ‘‘दिसत नाही असा शत्रू कोण?’’
युधिष्ठिर म्हणाला, ‘‘न दिसणारा शत्रू म्हणजे राग.’’
यक्षाने पुढचा प्रश्न विचारला, ‘‘कशाचा त्याग केल्याने मनुष्य श्रीमंत होतो?
युधिष्ठिर म्हणाला, ‘‘इच्छा, स्वार्थ यांचा त्याग केल्यास मनुष्य श्रीमंत होतो.
यक्षाने पुढचा प्रश्न विचारला, ‘‘स्वत:च्या घरात मित्र कोण वा मरताना मित्र कोण?’’
युधिष्ठिर म्हणाला, ‘‘स्वत:च्या घरात मित्र म्हणजे भार्या किंवा पत्नी आणि मरताना मित्र म्हणजे दान.’’
यक्षाने विचारले, ‘‘ काय ताब्यात ठेवल्यास माणूस दु:खी होत नाही?’’
युधिष्ठिर म्हणाला,‘‘मन ताब्यात ठेवल्यास मनुष्य दु:खी होत नाही.’’
यक्षाच्या अशा अनेक प्रश्नांची युधिष्ठिराने योग्य उत्तरे दिली.
युधिष्ठिराची उत्तरे ऐकून यक्ष प्रसन्न झाला. त्याने विचारले, ‘‘तुझ्या कोणत्याही एका भावाला मी जिवंत करीन. तेव्हा विचार करून सांग.’’ युधिष्ठिर तेव्हा म्हणाला, ‘‘नकुलाला जिवंत कर.’’
नकुल हा माद्रीचा पुत्र होता, तर युधिष्ठिर हा कुंतीचा.
‘‘नकुल का?’’ असे विचारता तो म्हणाला, ‘‘कुंती आणि माद्री दोन्ही माता मला समानच आहेत.’’ त्याचे चातुर्यपूर्ण उत्तर ऐकून यक्ष प्रसन्न झाला. तो प्रत्यक्षात यक्ष नसून यक्षाचे रूप घेतलेला यम (मृत्युदेवता) होता. त्या यक्षाचे रूप घेतलेल्या यमाने चारही भावांना जिवंत केले.
आई मोनाला म्हणाली, ‘‘बघ, एवढा प्रसंग आला तरी युधिष्ठिराने न घाबरता कशी हुशारीने, समयसूचकतेने उत्तरे दिली! यक्षप्रश्न म्हणजे ज्याची उत्तरे सर्वसामान्य माणसाला देता येत नाहीत किंवा कठीण जाते, पेच पडतो अशा समस्या. जेव्हा असा प्रसंग येतो, की तेव्हा काय करावे याबाबत निश्चित निर्णय होत नाही त्याला यक्षप्रश्न म्हणतात.
‘‘हा तुझा काही यक्षप्रश्न नाहीये हं!’’ शांतपणे ऐकणाऱ्या मोनाला पुन्हा एकदा ताईने डिवचले. ल्ल
मेघना फडके- memphadke@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Story for kids
First published on: 14-09-2015 at 01:04 IST