चमत्कार? नव्हे, विज्ञान!

आर्चिसचे बाबा थोडं सामान घेऊन बाहेर आले. आर्चिसला थोडं दूर बसवलं आणि त्यांनी तो चमत्कार करून दाखवला.

डॉ. नंदा संतोष हरम nandaharam2012@gmail.com

आर्चिसचे आई-बाबा ऑफिसमधून यायला अजून वेळ होता. आर्चिसची आजी भजनी मंडळात- म्हणजे सोसायटीतच गेली होती. आर्चिस सोसायटीच्या बागेत खेळायला गेला. बागेत झोपाळा मोकळा बघून तो खूप खूश झाला. झोपाळ्यावर तो मस्त झोके घेऊ लागला. एवढय़ात रोहन दुरून धावत येताना दिसला. तो आर्चिसकडे बघून हात हलवत होता.

‘‘आर्चिस.. मला तुला एक गंमत सांगायची आहे.’’ जवळ येऊन थांबण्यापूर्वीच त्याने बोलायला सुरुवात केली. आर्चिसने झोका थांबवला आणि रोहनला म्हणाला, ‘‘एवढं काय तुला सांगायचं आहे मला?’’

रोहन आधीच मोठे असलेले डोळे आणखी मोठे करत म्हणाला, ‘‘मी ना.. काल एक चमत्कार पाहिला.’’

‘‘चमत्कार? म्हणजे काय?’’ आर्चिस विचारू लागला.

रोहन म्हणाला. ‘‘काल मी आजीबरोबर लांब कुठेतरी.. एका सद्गुरूबाबांच्या आश्रमात गेलो होतो. तिथे आधी भजन, बाबांचं भाषण झालं. ते काही मला नीट कळलं नाही. मी तर पेंगतच होतो..’’

‘‘बरं, मग..’’

‘‘अरे, आर्चिस! त्यानंतर त्या बाबांनी एक चमत्कार करून दाखवला.’’

आर्चिसची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. ‘‘सांग ना लवकर.. काय झालं ते!’’

आर्चिसची उत्सुकता बघून रोहनलाही बरं वाटलं. तो म्हणाला, ‘‘बाबा, थोडे दूर स्टेजवर होते. त्यांनी आपल्या तळहातावर आग धरली. देवाची आरती करावी तसे ते ओवाळत होते. मग एका हातावरून दुसऱ्या हातावर.. आणि बघता  बघता जिभेवर ती आग ठेवली.’’

‘‘बाप रे! हे कसं शक्य आहे?’’ आर्चिस उद्गारला.

‘‘तेच तर! सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवल्या. कुणीतरी आग्रह केला म्हणून परत त्यांनी तो चमत्कार दाखवला.’’ रोहन अगदी गुंग होऊन बोलत होता.

आर्चिस सारखा म्हणत होता- ‘‘कसं शक्य आहे हे? त्यांचा हात, जीभ भाजली नाही?’’

सहा-सात वर्षांची चिमुकली मुलं ती. डोकं खाजवत बसली होती. पण त्यांना काही ते कोडं उलगडेना. शेवटी आर्चिस म्हणाला, ‘‘रोहन, मी माझ्या आई-बाबांना विचारतो. त्यांना नक्की माहिती असणार यामागचं रहस्य!’’

संध्याकाळचे सात वाजताच दोघे घरी पळाले.

आर्चिस घरी गेला तेव्हा आजी घरी येऊन देवापुढे निरांजन लावत होती. आर्चिसने हात- पाय धुतले, ‘शुभंकरोति’ म्हटली. आजीला नमस्कार केला. नंतर हॉलमध्ये आपल्याच विचारांत तो बसून राहिला. रोहनने सांगितलेला त्या बाबाचा चमत्कारच सतत त्याच्या डोळ्यापुढे येत होता. आर्चिसचे बाबा घरी आले तरी आर्चिस शांतच! त्यांनी ओळखलं, की स्वारी कसल्या तरी विचारात गढली आहे. ते फ्रेश होऊन आर्चिसजवळ आले. म्हणाले, ‘‘आर्चिस बेटा, काय विचार चाललाय एवढा?’’

आर्चिस वाटच बघत होता. त्याने लगेच रोहनने सांगितलेला चमत्कार अगदी शब्द न् शब्द बाबांना सांगितला. ते म्हणाले, ‘‘बाळा, हा चमत्कार वगैरे काही नाही. मीच तुला करून दाखवतो सारं. खात्री पटेल तुझी. यामागे विज्ञान आहे.’’

आर्चिसचे बाबा थोडं सामान घेऊन बाहेर आले. आर्चिसला थोडं दूर बसवलं आणि त्यांनी तो चमत्कार करून दाखवला. ऐकणं वेगळं आणि बघणं वेगळं. आर्चिस ‘आ’ वासून बघत राहिला. ‘‘बाबा, मला समजवा ना सारं.’’ त्याने रोहनलाही फोन करून बोलावून घेतलं. आर्चिसने बाबांना परत तो चमत्कार करून दाखवायचा आग्रह केला. दोघंही टाळ्या वाजवू लागले. आर्चिस म्हणाला, ‘‘बाबा सांगा ना, या चमत्कारामागचं विज्ञान!’’

बाबांनी आपल्या हातावर काहीतरी ठेवलं आणि म्हणाले, ‘‘ओळख बरं, काय आहे ते?’’ आर्चिस आणि रोहन एका सुरात ओरडले- ‘‘कापूर! आरती करताना आपण जाळतो ना! वासही येतोय त्याचा.’’

बाबा म्हणाले, ‘‘शाब्बास मुलांनो! बरोब्बर ओळखलंत! आता सांगतो तुम्हाला हात आणि जीभ का भाजत नाही ते!’’

आर्चिसचे बाबा म्हणाले, ‘‘कापूर आपण नुसता बाटलीत उघडा ठेवला तरी त्याचा वास येतो. बरोबर?’’ दोघांनी मान हलवली. याचाच अर्थ आपल्या आजूबाजूला असलेल्या तापमानालाही त्याची वाफ होत असते. कापराजवळ आग आणली की तो चटकन् पेटतो. त्यातला गमतीचा भाग हा, की कापूर पेटला की तो वितळत नाही, त्याची वाफ तयार होते. त्याचं वायूत रूपांतर होतं. कापूर जळल्यावर खाली राख शिल्लक राहत नाही.’’

आर्चिसच्या बाबांनी कापूर जाळून दाखवला. आर्चिस आणि रोहन दोघेही विचारात पडले.

रोहन म्हणाला, ‘‘पण अंकल, हात भाजत कसा नाही?’’

आर्चिसचे बाबा म्हणाले, ‘‘त्या सद्गुरूबाबांनी हातावर कापूर जाळला, पण तो स्थिर एके ठिकाणीच ठेवला नाही. ओवाळल्यासारखा त्यांचा हात हलत होता ना?’’

रोहनने होकारार्थी मान डोलावली.

बाबा पुढे सांगू लागले, ‘‘त्याने तो कापूर थोडय़ाच वेळात दुसऱ्या हातावर घेतला, कारण पहिला हात गरम झाला. दुसरा हातही जेव्हा गरम झाला, तेव्हा तो जळता कापूर त्याने जिभेवर ठेवला. जीभ त्याने भरपूर ओली करून ठेवली होती असणार. त्यामुळे जिभेच्या ओलाव्याने त्याला चटके बसले नाहीत. काही सेकंद तो हे सहन करू शकला. नंतर त्याने तोंड मिटलं. त्याबरोबर ती आग विझली.. किंवा त्याने जोरात उच्छ्वास बाहेर टाकला असेल.’’

‘‘त्याने काय होतं बाबा?’’ आर्चिस विचारू लागला.

बाबा म्हणाले, ‘‘बेटा, आपण श्वास घेतो तेव्हा ऑक्सिजन आत ओढून घेतो आणि उच्छ्वासात कार्बन डायऑक्साइड बाहेर टाकतो.’’

पुढे ते काही बोलणार एवढय़ात आर्चिस म्हणाला, ‘‘कळलं बाबा. त्यामुळे आग विझते.’’

रोहननेही पुस्ती जोडली, ‘‘ऑक्सिजनने आग मोठी होते. हो ना काका?’’

‘‘शाबास मुलांनो! आता कळलं? म्हणून अशा बाबांच्या नादी लागायचं नाही. अडाणी लोकांना ते फसवतात.’’

आर्चिस आणि रोहन रंगात येऊन बोलत होते. एवढय़ात आर्चिसचे बाबा म्हणाले, ‘‘एक लक्षात ठेवायचं.. हा प्रयोग तुम्ही एकटय़ाने करायचा नाही. कापूर एके ठिकाणी हातावर राहिला तर भाजायला होईल. कळलं ना?’’

दोघेही एका सुरात ओरडले- ‘‘हो..’’

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Story for kids based on science science based stories zws