विनया साठे lokrang@expressindia.com

खुराडय़ाच्या फटीतून उन्हं आत आली तसे लालूने हळूच डोळे उघडले. आता उठायलाच हवं होतं. लालूने कितीही ठरवलं तरी त्याला पहाटे जाग येत नसे. आजही हळूच उठून तो खुराडय़ाबाहेर आला. सगळीकडे कशी सोनेरी उन्हं पसरली होती. ‘चला, आजही नेहमीसारखाच उशीर झालाय तर..!’ मग त्याने पंख फडफडवून मोठा आळस दिला आणि मान उंचावून बांग दिली.. ‘कुकुऽऽ चकू!’

त्याबरोबर समोरच्या झाडावरून हसण्याचा आवाज आला. फांदीवर बसून कावळेदादा लालूकडे पाहत होते.  ते म्हणाले, ‘‘काय लालू, झाली का झोप?’’

एवढय़ात घराच्या अंगणात बसलेला मोती कुत्राही म्हणाला, ‘‘लालूची काय बुवा ऐट असते! माझ्यासारखी त्याला काही रात्रभर राखण करावी लागत नाही.’’

आता मात्र लालूने मनाशी ठरवून टाकलं की रोज पहाटेच उठायचं.. हाक मारून सर्वाना जागे करायचं!

परंतु दुसऱ्या दिवशी पुन्हा डोक्यावर उन्हं आल्यावरच लालू जागा झाला. खुराडय़ाबाहेर येऊन त्याने इकडेतिकडे पाहिलं. अंगणात चार चिमण्या दाणे टिपत होत्या.

‘‘लालू उठलास का रे? तुला काय, कितीही उशिरा उठलं तरी मस्त खायला मिळतं. आमच्यासारखं शोधत फिरावं लागत नाही.’’ एक चिऊताई म्हणाली.

लालूला मग भारीच वाईट वाटलं. विचार करता करता त्याला झोप येऊ लागली. उन्हं कलल्यावर लालू जागा झाला. झाडांवर पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होता.

लालू खुराडय़ात आला. एवढय़ात त्याला खुडखुडल्यासारखा आवाज आला. पाहिलं तर एक छोटासा पक्षी थाळीतलं धान्य टिपताना त्याला दिसला. त्याचं अंग रंगीबेरंगी होतं. डोक्यावर छोटासा तुरा होता.

‘‘कोण रे तू? नाव काय तुझं? माझ्या घरात कसा आलास?’’ लालू म्हणाला.

त्याबरोबर तो पक्षी थरथर कापत म्हणाला, ‘‘माझं नाव बंबू बुलबुल! माझ्या पंखाला दुखापत झाली. त्यामुळे मला उडता येत नाहीए. लालू, मला आजची रात्र तुझ्या घरात राहू दे ना.. सकाळी मी उडून जाईन.’’ गयावया करीत तो म्हणाला.

‘‘बरं, बरं, राहा तू कोपऱ्यात.’’ लालू म्हणाला.

पहाटे लालूला जाग आली ती त्या पक्ष्याच्या गोड गाण्यानं. कोण बरं इतकं छान गाणं गातंय? लालूने मान उंचावून इकडेतिकडे पाहिलं तर बंबू सुरेल आवाजात गाणं गात होता. गाणं ऐकता ऐकता लालूची झोप उडाली. आनंदातच तो खुराडय़ाबाहेर आला. गार वारा सुटला होता. फांद्याफांद्यांवर पक्षी किलबिलत होते. पूर्व दिशा उजळत होती.

‘वा! किती रम्य असते पहाट!’ लालू मनाशी म्हणाला. उत्साहातच त्याने साद घातली.. ‘‘कुकुऽऽ चकू.’’

लालूच्या आवाजानं घरातील माणसं उठली. लालू खुशीतच खुराडय़ात गेला. तो चिमुकला पक्षी पंख फडफडवत बसला होता.

‘‘बंबू, तू आता इथेच राहा. मग रोज पहाटे गाणं गाऊन मला उठवशील ना? मला लवकर जाग येत नाही म्हणून सगळे जण मला चिडवतात.’’

‘‘लालू, आता मला जाऊ दे. पण रोज पहाटे मी तुझ्या घरी येऊन गाणं गाईन व तुला उठवीत जाईन. मग तर झालं!’’ बंबू म्हणाला.

आता रोज पहाटे बंबू लालूच्या घराजवळ बसून गोड गाणं गातो. लालूही मग ‘कुकुऽऽ चकू’ हाक मारून सर्वाना उठवतो. आता बंबू आणि लालूची छान मैत्री झाली आहे.