अमिताभ बच्चन आणि राणी मुखर्जी या दोन गुणी आणि ताकदीच्या कलावंतांच्या अभिनयाने नटलेला, संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘ब्लॅक’ हा सिनेमा मी साधारण दहाएक वर्षांपूर्वी पाहिला. हा सिनेमा एक स्वतंत्र कलाकृती म्हणून उत्तम आहे यात शंकाच नाही. मात्र या सिनेमाची गोष्ट ज्या दोन व्यक्तींच्या आयुष्यापासून प्रेरित आहे त्या दोन आयुष्यांची गोष्ट थक्क करणारी आहे.
अलाबामा नावाच्या अमेरिकेतल्या राज्यात जून १८८० मध्ये एका गोड मुलीचा जन्म झाला. तेव्हाच्या अमेरिकेतल्या एका घरंदाज आणि सधन कुटुंबात या मुलीच्या जन्माने आनंदाचं उधाण आलं. या चिमुकलीच्या आयुष्याची सुरुवात अन्य साधारण मुलांप्रमाणेच झाली असली तरी एक-दीड वर्षांच्या वयात एका आजारपणामुळे ती कायमची बहिरी आणि अंध झाली. घरच्या सगळ्यांनाच हा आघात पचवणं अवघड होतं, मात्र, ‘आईच्या प्रेमळ समजूतदारपणेच या ठार अंधाऱ्या दिवसातही मी आनंदी राहू शकले.’ अशी एक आठवण या पुस्तकाच्या सुरुवातीलाच येते.
पहिल्या सहा वर्षांत सारीच लहान मुलं आपल्या भवताली चाललेल्या घटनांमधून, मोठय़ांच्या अनुकरणांमधून अनंत गोष्टी शिकतात. आवाजाच्या आधारे भाषा शिकतात. आई-वडिलांचं अनुकरण करून, तसेच आवाज काढण्याचा प्रयत्न करून बोलायला शिकतात. इतरांना चालताबोलताना पाहून सामाजिक व्यवहारांचं भान घेतात. एक ना अनेक गोष्टी.. नेमक्या याच वयात या मुलीला अपंगत्व आलं. ऐकू न आल्याने पहिल्या वर्षांपर्यंत शिकलेल्या काही मोजक्या शब्दांवरच तिची भाषेची प्रगती थांबली. ‘वॉ वॉ’ असा काहीसा आवाज काढून वॉटर, अर्थात पाणी हा शब्द ती शिकली होती. पहिल्या एक-दीड वर्षांत आपल्या ग्रामीण भागातल्या घरात राहताना पाहिलेला निसर्ग या चिमुकलीच्या आठवणींत साठला होता. मात्र अपंगत्व नशिबी आल्यानंतर या आठवणींमध्ये आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या शिकण्यामध्ये फारशी भर पडलीच नाही. अगदी रोजच्या वापरातल्या गोष्टींनाही नावं असतात, त्याकरता काही शब्द ठरलेले असतात याची जाणीव मागे पडत गेली.
आपल्या लेकीच्या भविष्याची, शिक्षणाची काळजी असल्याने या मातापित्यांनी काही संस्था, खाजगी शिक्षक यांची चौकशी केली. त्याकरता, खास अंध मुलांना शिकवण्याकरता संशोधन करणाऱ्या व्यक्ती, संस्थांसोबत पत्रव्यवहार केला. या शोधातूनच १८८७ मध्ये, ही चिमुरडी साधारण आठ वर्षांची होत असताना त्यांना एक कायम, खाजगी शिक्षिका मिळाली. या शिक्षिकेची, बाईंची जीवनकहाणी इथून पुढे तब्बल पाच दशकं या मुलीसोबतच गुंफली गेली. या मुलीने स्वत:च ठरवलेल्या खाणाखुणा आणि त्यायोगे चालणारे तिचे व्यवहार मागे पाडायचा चंग बाईंनी बांधला. पहिल्या शब्दापासून सुरुवात झाली. बाईंनी चिमुकलीच्या हातावर डॉल, अर्थात बाहुली असा पहिला शब्द लिहिला आणि तिच्या हातात बाहुली दिली. पुढे अशाच अनंत शब्दांचा खजिना बाईंनी या चिमुकलीच्या हाती सोपवला.
प्रत्येक वस्तूला एक नाव असतं ही गोष्ट या मुलीला नव्यानेच कळली. त्याच उत्साहात अभ्यासाला सुरुवात झाली. अतिशय आनंद, आपल्याला शिकायला इतरांपेक्षा अधिक वेळ लागतो यातून येणारं नैराश्य, बोलायला शिकतानाची धडपड, या साऱ्या खडतर प्रवासात बाईंनी या चिमुकलीला योग्य साथ दिली. प्रोत्साहन दिलं. त्यांनी आपल्या या शिष्येला अभ्यासच नाही तर आयुष्याविषयीही अनेक गोष्टी शिकवल्या. बाईंच्या मदतीनेच या मुलीने महाविद्यालयापर्यंत मजल मारली, पदवी संपादन केली. नुसती बोलायला शिकली नाही तर अंध-बहिऱ्या मुलांच्या शिक्षणाकरता त्यांनी व्याख्यानं द्यायला, त्यायोगे धन एकत्र करायला, आणि या धनाचा उपयोग अंध मुलांच्या शिक्षणासाठी दान करायला सुरुवात केली. स्वत:च्या चरितार्थाकरता पत्रकारिता केली. पत्रकारितेच्या माध्यमातूनही या मुलीने समाजातल्या आपल्यासारख्या इतरांचे प्रश्न मांडायला सुरुवात केली.
ही गोष्ट जशी या चिकाटी असलेल्या मुलीची आहे, तेवढीच तिला घडवणाऱ्या तिच्या बाईंची आहे. एक खाजगी शिक्षिका म्हणून काम पत्करलेली ही बाई एक-दोन नव्हे, तर तब्बल पाच दशकांचा काळ, अगदी स्वत:च्या मरणापर्यंत आपल्या या शिष्येकरता झटते. तिला शिकवण्याकरता नवनवे प्रयोग करते, स्वत: चार गोष्टी नव्याने शिकते. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या शिष्येला स्वावलंबी, स्वयंपूर्ण आणि त्यापुढे जाऊन प्रेरणादायी बनवण्यात आपलं आयुष्य खर्ची घालते. बाई अगदी शेवटच्या दिवसांपर्यंत आपल्या या लाडक्या शिष्येसोबत सावलीसारख्या राहतात.
अगदी बालपणापासूनही ऐकू आणि दिसू शकत नसतानाही शिक्षण घेणं, अगदी पदवीपर्यंत मजल मारली. ऐकू येत नासतानाही चिकाटीने बोलायला, एवढंच नव्हे तर श्रोत्यांना खिळवून ठेवणारी व्याख्यानं देण्यापर्यंत स्वत:ची तयारी केली. आपल्यासारख्याच अपंगत्व असलेल्या इतरांकरता आयुष्य वेचलं. हे सारं अचाट काम करणाऱ्या या मुलीचं नाव हेलन केलर. तिला सावलीसारखी सोबत करणाऱ्या तिच्या शिक्षिकेचं, बाईंचं नाव अॅनी सुलिव्हन. सगळ्यात गमतीची गोष्ट म्हणजे हेलन केलर यांनी आपलं हे आत्मचरित्र, वयाच्या बावीसाव्या वर्षी लिहिलेलं आहे. अठ्ठय़ाऐंशी वर्षांपर्यंत सक्रिय आयुष्य जगलेल्या हेलन केलर यांनी खूपच विविध क्षेत्रांत आपलं योगदान दिलेलं आहे. दुसऱ्या महायुद्धादरम्यान हेलन केलर यांनी प्रत्यक्ष युद्धभूमीवर जाऊन युद्धात अंधत्व आलेल्या सैनिकांना धीर देण्याचं, नवी उमेद देण्याचं मोलाचं काम केलं. १९४६ ते १९५७ या वर्षांदरम्यान हेलन केलर यांनी सात सफरींमध्ये पाच खंडांतल्या तब्बल ३५ देशांना भेटी दिल्या. या प्रवासादरम्यान त्या अनेक जागतिक नेत्यांना भेटल्या; यामध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंचादेखील समावेश होता. हेलन केलर यांनी तब्बल १२ पुस्तकं आणि अनेक लेख लिहिलेले आहेत. त्यांनी आपल्या व्याख्यानांकरता जगभरच्या अनेक देशांमध्ये प्रवास केला.
सातवी-आठवीत असताना हे पुस्तक मी वाचलं. इतकं भारावून टाकणारं आयुष्य सामावणारं हे पुस्तक उणंपुरं शंभर पानांचंदेखील नाही. मराठीतला हा अनुवाद वाचल्यानंतर काही वर्षांनी मी हेलन केलर यांनी लिहिलेलं मूळ इंग्रजीतलं ‘द स्टोरी ऑफ माय लाइफ’देखील वाचलं. इतक्या रसाळ, सोप्या, काव्यमय आणि खिळवून ठेवणाऱ्या भाषेत लिहिलेलं आत्मचरित्र आजतागायत माझ्या वाचनात आलेलं नाही. आपल्या दु:खद अनुभवांकडे, सुखद क्षणांकडे, बालपणी पाहिलेल्या निसर्गाकडे आणि आयुष्यातल्या यशापयशाकडे इतक्या तटस्थपणे पाहत, त्याविषयी अतिशय तन्मयतेने लिहिलेलं आहे. आयुष्याविषयी एक खूप सकारात्मक दृष्टिकोण या आत्मचरित्रात पानोपानी वाचायला मिळतो, आणि त्यामुळेच हे छोटंसं पुस्तक खूप मोठ्ठं होतं.
हे पुस्तक कुणासाठी?- सातवी-आठवीपुढच्या मुलामुलींकरता, आणि खासकरून दहावी-बारावीच्या परीक्षा दिलेल्या, त्यांच्या निकालांचा ताण आलेल्या माझ्या वाचक मित्रमैत्रिणींकरता.
‘ माझी जीवनकहाणी’
हेलन केलर, अनुवाद : माधव कर्वे
राजहंस प्रकाशन – ideas@ascharya.co.in
पुस्तकांशी मैत्री : एक चिमुकलं मोठ्ठं पुस्तक
प्रत्येक वस्तूला एक नाव असतं ही गोष्ट या मुलीला नव्यानेच कळली. त्याच उत्साहात अभ्यासाला सुरुवात झाली.
First published on: 03-04-2016 at 01:10 IST
मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Story of two souls