सूर्यस्तवन

‘‘अरे वा वेदांत, आज चित्रकलेचा तास दिसतोय सगळ्यांचा.’’

‘‘अरे वा वेदांत, आज चित्रकलेचा तास दिसतोय सगळ्यांचा.’’ वेदांत आणि कंपनी रंगांच्या पसाऱ्यात चांगलीच रंगून गेलेली बघून आजीने हळूच विचारलं.

‘‘कसलं चित्र काढताय सगळे?’’

‘‘आजी, निसर्गचित्र काढतोय मी. म्हणून हे बघ त्रिकोणी डोंगर काढले. नारळाचं झाड काढलं. वळणं घेत पुढे जाणारी नदी काढली. आणि आता डोंगरामागून दिसणारा सूर्य काढणार आहे. मला नं त्याची भरगच्च किरणं म्हणजे एक मोठी रेघ, एक छोटी रेघ काढताना मजा वाटते.’’ वेदांतची सांगण्याची ही पद्धत आजीला खूपच भावली.

‘‘मस्त रंगव हं,’’ असं म्हणताच त्याने मस्त मान हलवली.

‘‘अगं, आम्ही गावाहून आलो ना त्यावेळी मी गाडीतून सूर्यास्त पाहिला. काय भारी दिसत होता. भडक केशरी, पिवळा, नारिंगी गोळा चकचकत होता. आकाशात अगदी उठून दिसत होता. तो डोंगराच्या मागे जाईपर्यंत मी एकटक बघत होते. तेव्हा डोळ्यांना अगदी दिसेनासं झालं.’’ आत्ताच सूर्यास्त बघितल्यासारखी डोळ्यांची उघडझाप करीत मुक्ता म्हणाली. तिच्या डोळ्यांत सूर्य मावत नव्हता.

एवीतेवी सगळ्यांच्या कागदावर सूर्य होता, डोळ्यांतही भरलेला होता; म्हणून आजी सूर्याविषयीच बोलत राहिली.

‘‘बरं का वेदांत, हा सूर्य पाच अब्ज वर्षांपूर्वी निर्माण झाला आहे,’’असं आजीने सांगताच नेमका अंदाज सर्वाना आला नाही, पण खूप खूप खूप मोठा काळ एवढं कळल्यामुळे सगळ्यांचे डोळे विस्फारले गेले.

‘‘आजी, सूर्य पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो ना गं?’’ विराजने ‘आपल्याला खूप माहिती आहे अशा थाटात सगळ्यांकडे बघत सांगितले.

‘‘हो ना, वर्षभर तो बारा राशींतून फिरत असतो, म्हणजे संक्रमण करत असतो. पण कर्क आणि मकर राशीत केलेली संक्रमणं महत्त्वाची मानली जातात.’’ – इति आजी.

‘‘दिवस मोठा होण्याशी याचा संबंध आहे का गं?’’ अथर्वदादाने विचारपूर्वक चौकशी केली.

‘‘हो तर.. मकर संक्रमणापासून सूर्याचे उत्तरायण चालू होते. त्यामुळे जास्तीत जास्त सूर्याचा सहवास आपल्या वाटय़ाला येऊ लागतो. मे महिन्यात- म्हणजे परीक्षा संपून सुटीच्या काळात दिवस खूप मोठा होतो. कारण तुम्हा मुलांना भरपूर खेळायला मिळावं म्हणून. सूर्यालाही काळजी आहे तुमची. खरं ना!’’ सगळ्यांचे चेहरे उजळले आणि माकडउडय़ांनी आनंद व्यक्त केला गेला.

‘‘तर पृथ्वीला सर्वात जवळचा असा हा तारा पृथ्वीपासून पंधरा कोटी कि. मी. अंतरावर आहे. किंचित कललेल्या पृथ्वीभोवती चंद्र फिरतो. म्हणून दिवस-रात्र होतात. तर चंद्रासह पृथ्वी सूर्याभोवती फिरते त्यामुळे ऋ तू होतात. विविध ऋ तूंमुळे हवामान, फुलं, फळं, धान्य या-बाबतीतलं वैविध्य अनुभवायला मिळत असल्यामुळे आपण अतिशय भाग्यवान आहोत. नाही तर पृथ्वीच्या पाठीवर काही ठिकाणी सूर्यदर्शनच दुर्मीळ असतं. त्यामुळे ते झालं की लोक लगेच बाहेर बागांमध्ये जाऊन ते सलिब्रेट करतात. आपण काय करतो सांग बरं वेदांत?

‘‘आठची शाळा असली तरी कोवळं ऊन, त्यातलं ‘ड’ जीवनसत्व खात चालत जातो का?’’ वेदांतने तोंड वाकडं केलं.

‘‘आजी, हा लवकर उठत नाही. मग शाळेला उशीर होऊ नये म्हणून बाबा गाडीने सोडतात.’’ अथर्वने न राहवून उलगडा केला.

‘‘अरे, मोठ्ठा झाला की तो उठणार आहे लवकर. मग त्याची सूर्याशी गट्टीपण होईल. ती व्हावी म्हणून तर आपण सूर्य या विषयाभोवती फिरतोय ना!’’ आजीने वेदांतला जरा चुचकारलं.

‘‘आणखीन काहीतरी सांग की गं आजी.’’ मुक्ताने उत्सुकतेनं विचारलं.

‘‘सूर्यामध्ये सृ हा मूळ धातू आहे. त्याचा अर्थ आहे गती. आकाशामध्ये जो गतिशील आहे तो. षू धातूपासूनसुद्धा सूर्य शब्द बनू शकतो. षू म्हणजे प्रेरणा देणे. बुद्धीला जो प्रेरणा देणारा तो सूर्य, असं बेलसरे यांनी सांगितलं आहे बरं का!’’

‘‘आजी, सूर्यापासून प्रकाश आणि उष्णता मिळते, म्हणूनच नळाचं पाणी दुपारच्या वेळी अगदी तापवल्यासारखं गरम असतं ना!’’ अथर्वने आपला अनुभव सांगितला.

‘‘हो तर.. सूर्य हा हायड्रोजन आणि हेलियम या वायूंचा, ऊर्जेचा, तेजाचा जणू गोळाच आहे. या सौरऊर्जेचा वापर सूर्यचुलीत होतो तसाच अनेक गोष्टीत जास्त प्रमाणात व्हायला हवा. पृथ्वी सूर्याभोवती फिरत असताना अमावास्येला ज्यावेळी चंद्र मधे येतो त्यावेळी पृथ्वीवरून सूर्याचा काही भाग दिसत नाही आणि आपण म्हणतो ग्रहण लागलं. ते कधी खग्रास, कंकणाकृती किंवा खंडग्रास असतं. नुसत्या डोळ्यांनी आपण ते बघू शकत नाही. ग्रहण सुटलं की ‘दे दान सुटे गिराण’ असं म्हणत काहीजण रस्त्यावरून जात असतात. आपण त्यांना काहीतरी देतो, आठवतंय ना विराज?’’ आजीने विराजला जागं केलं.

‘‘हो आठवतंय तर. आणिक एक गंमत आठवली. तू सूर्यचूल म्हणालीस ना, तशी सूर्यचूल पनवेलला बाबांच्या मित्राच्या बंगल्याच्या गच्चीवर होती. त्या काकू दरवेळी गरमागरम शेंगदाणे हातावर ठेवायच्या. आणि हो, ही झाडं सूर्यप्रकाशाच्याच मदतीने अन्न तयार करतात, म्हणजे ते सूर्यावर अवलंबून आहेत.’’

‘‘अगदी बरोबर. अरे, पृथ्वीवरील सगळी जीवसृष्टी या सूर्यामुळेच अस्तित्वात आली आहे. समुद्राच्या पाण्याची वाफ करून तोच पाऊस पाडतो. त्यामुळे शेतात अन्नधान्य पिकतं. असं आपलं जीवन सर्वस्वी त्याच्यावर अवलंबून आहे. तो पूर्वेला उगवला की आपले सर्व व्यवहार  चालू होतात. तो पश्चिमेला अस्ताला गेला की बंद होतात. तो यात कधीही चूक करत नाही. म्हणून एरवी कधीही न येणारी व्यक्ती आली किंवा कधीही न केलेली गोष्ट केली की आपण म्हणतो- आज सूर्य पश्चिमेला उगवला वाटतं!’’ हे ऐकून सगळ्यांनाच मजा वाटली.

‘‘आणि म्हणून सूर्याला देव मानून आपण त्याची उपासना करतो. समर्थ रामदास-स्वामींनी तर दासबोधात ‘सूर्यस्तवन निरूपण’ हा समास लिहून त्याच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त केली आहे. समर्थ रोज किती सूर्यनमस्कार घालायचे माहिती आहे का?’’

‘‘किती गं?’’ वेदांतने हळूच विचारले.

‘‘बाराशे!’’ असं आजीने सांगताच ‘बाप रे’ म्हणत सगळेच नमस्कारांच्या प्रात्यक्षिकात गुंतले.

‘‘आम्ही रोज व्यायामशाळेत सूर्यनमस्कार घालतो बरं का आजी.’’ अथर्वने माहिती पुरवली.

‘‘चांगलंच आहे की. पण व्यायामशाळा नसली की..’’ पुढचं न सांगता सगळ्यांना कळलं.

‘‘आता सूर्याची बारा नावे सांगा बघू.’’ आजीने प्रस्ताव ठेवला. सगळे गप्प.

‘‘बरं, ते जाऊ दे. सध्या दासनवमीचा उत्सव चालू आहे ना म्हणून सूर्यासारख्या या तेजस्वी संताला- म्हणजेच समर्थ रामदास-स्वामींना मनोभावे वंदन करू या आणि बारा नावं पाठ करून रोज सूर्यनमस्कार घालण्याचा संकल्प करू या. चालेल ना?’’

‘‘होऽऽऽ’’ म्हणत सगळे बाहेर धावले.

सुचित्रा साठे

suchitrasathe52@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Suchitra sathe story for kids