मंगल कातकर

वार्षिक परीक्षेचा शेवटचा पेपर संपवून साहिल घरी आला ते नाचतच. ‘‘सुट्टी रे सुट्टी, उद्यापासून शाळेला बुट्टी..’’ असं ओरडतं त्यानं दप्तर एका कोपऱ्यात टाकलं आणि आईचा मोबाइल घेऊन सगळय़ा मित्रांना खेळायला बोलावण्यासाठी धडाधड चॅटिंग सुरू केलं. हातपाय धुणं नाही, कपडे बदलणं नाही. फक्त मोबाइलवर बोलण्यासाठी त्यानं स्वच्छतेचे सगळे नियम धाब्यावर बसवले होते. पाच मिनिटं हे सगळं बघून साहिलला ऐकायला जाईल असं आई मोठय़ानं ताईला म्हणाली, ‘‘संजू, मी तुला सकाळी एका शिबिराची चौकशी करायला सांगितली होती. केलीस का?’’

How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
Loksatta chaurang Isolation due to the person uniqueness or perceived inferiority
‘एका’ मनात होती..!: शिक्का.. लादून घेतलेला!
Money Mantra, insurance, tax saving, investments
Money Mantra: कर बचतीसाठी केलेल्या गुंतवणुकीत विम्याचे काही चांगले पर्याय आहेत का?
municipal administration not in favour of cut water even lowest water storage in mumbai lakes
पाणीकपातीची गरज नाही! महापालिका प्रशासनाची भूमिका

‘‘हो केली चौकशी. सर्व डिटेल्स ते संध्याकाळपर्यंत तुला व्हॉट्सअ‍ॅपला पाठवणार आहेत.’’

‘‘बरं.. साहिल, फोन दे मला थोडं काम आहे.’’

‘‘आई पाच मिनिटं. एक मेसेज करून मी खालीच चाललो आहे.’’

‘‘शाळेतून आत्ताच आलास ना.. फ्रेश हो. काहीतरी खा. संध्याकाळी खेळायला जा.’’

‘‘हे बघ आई, आता परीक्षा संपली. आता सगळा वेळ माझा आहे. नो स्टडी, म्हणून मज्जा.’’

आई आणखी काही बोलेपर्यंत साहिल हातपाय धुण्यासाठी बाथरूममध्ये घुसला.  

परीक्षा संपल्याच्या आनंदात साहिल अख्खा दिवस खेळत राहिला. आईनं चार वेळा हाक मारून बोलावलं तरी त्याला घरी यावंसं वाटलं नाही. रात्री बाबा घरी येताना त्याला सोसायटीच्या कंपाऊंडमधून घेऊन आले.

रात्रीची जेवणं झाल्यावर आईनं शिबिराचा विषय साहिलजवळ काढला. साहिल शिबिराला जाणार नाही म्हणून अडून बसला. त्याचं म्हणणं होतं की वर्षभर शाळा, क्लास यात आम्ही मुलं बिझी असतो. त्यामुळे परीक्षा संपल्यानंतर आम्हाला मिळणारी सुट्टी फक्त मौज-मजा आणि खेळ यासाठीच दिलेली असते. सगळी मुलं हेच करतात. मग मी का बरं असं कुठल्यातरी शिबिराला जायचं..

बाबा मायलेकाचं बोलणं ऐकत होते. त्यांनी कपाटातून जुना अल्बम आणून साहिलला आपले लहानपणीचे फोटो दाखवत म्हटले, ‘‘मी आठवीला असताना आमच्या शाळेनं अख्खा मे महिना संस्कार शिबीर भरवलं होतं. त्यात सगळय़ा मुलांना सहभागी व्हायला लावलं. सुरुवातीचे दोन दिवस आम्ही मुलं नाराज होतो. पण शिबिरातले ताई, दादा नवीन नवीन गोष्टी शिकवायला लागले आणि आमची नाराजी पळूनच गेली. माझं हस्ताक्षर त्या शिबिरातच सुधारलं. तिथे आम्ही मातीची भांडी, मूर्त्यां, कागदी वस्तू बनवायला शिकलो. त्याचबरोबर विविध खेळ शिकलो. प्रसिद्ध वक्त्यांची भाषणं ऐकली. सगळय़ांना नाटय़गृहात नाटक बघायला घेऊन गेले. इतकी मज्जा केली आम्ही त्या दिवसांमध्ये काही विचारू नकोस. तुला माहीतेय साहिल, त्यानंतर आम्ही दरवर्षी सुट्टीत अशी शिबिरं एन्जॉय केली. त्यामुळे आमचं व्यक्तिमत्त्व बदललं.’’

‘‘बाबा, पण तुमची सुट्टी तर वाया गेली ना..’’

आता आईला बोलायला संधी मिळाली. ती समजावत म्हणाली, ‘‘मला सांग साहिल, परीक्षा झाली की सुट्टी का असते?’’

‘‘का असते म्हणजे काय? परीक्षेच्या अभ्यासाने आम्ही थकतो ना.. मग जरा मेंदूला रिलॅक्सेशन नको का..’’

 ‘‘अगदी बरोबर. अभ्यास करून शरीरावर व मनावर जो ताण येतो तो दूर व्हावा व पुढच्या शैक्षणिक वर्षांची सुरुवात उत्साहानं व्हावी म्हणून सुट्टी असते. पण ही असणारी सुट्टी फक्त मजा करून, मोबाइलवर गेम खेळून घालवण्यापेक्षा जर काही नवीन वेगळय़ा गोष्टी शिकण्यासाठी उपयोगात आणली तर आपले सुट्टीचे दिवसही मजेत जातात व आपल्याला चांगल्या गोष्टी शिकता येतात, अनुभवता येतात. चांगलं ऐकणं, वाचणं, पाहणं, अनुभवणं तुझ्या वयाच्या मुलांना आवश्यक असतं रे..’’

नाराजी व्यक्त करत साहिलनं म्हटलं, ‘‘म्हणजे शाळेतही शिकायचं आणि शिबिरातही पुन्हा शिकायचचं. मग रिलॅक्सेशन कधी मिळणार आई?’’

‘‘अरे, शिबिरात काही शाळेसारखा अभ्यासक्रम शिकवणार नाहीत. तिथे तुला नवीन गोष्टी करायला मिळतील. जसं गाणी शिकवली जातील, पपेट शो कसा करायचा दाखवतील, ट्रेकिंगला घेऊन जातील, गोष्टी लिहायला शिकवतील.. अशा बऱ्याच गोष्टी शिबिरात घेतल्या जातात. शाळेत वेळेअभावी बऱ्याच गोष्टी शिकवता येत नाहीत. त्यामुळे मुलं त्या गोष्टी सुट्टीतल्या शिबिरांत शिकतात.’’

साहिल विचार करू लागला. त्याला आईचं म्हणणं पटत होतं, पण मग धमाल-मस्ती करायचं प्लॅन केलं त्याचं काय.. असा प्रश्न त्याच्या मनात आला.

शांत बसलेल्या ताईनं मोबाइलवर गेल्या वर्षीच्या शिबिराचे फोटो दाखविले. त्यात विविध गोष्टींमध्ये रमलेली मुलं बघून साहिल खूश झाला.

‘‘खूप मुलं जातात वाटतं शिबिराला..’’

‘‘मग तुला काय वाटलं तू एकटाच जाणार आहेस का? अरे, दहावीनंतर अशा शिबिरांना जायला वेळ मिळत नाही. तेव्हा मिळणाऱ्या सुट्टीचा सदुपयोग करून घे.’’

 ताईच्या बोलण्याचा साहिलवर प्रभाव पडला. तो आईला म्हणाला, ‘‘एकूण काय सुट्टीचं शिबीर बोरिंग नसेल असं वाटतंय. त्यामुळे मी या वर्षी जाऊन बघतो.’’

‘‘व्वा व्वा साहिल, गुड.. आता तू मित्रांनाही सांग याबद्दल.’’ बाबांनी हसत साहिलची पाठ थोपटली.

‘‘हो नक्कीच!’’ असं म्हणत साहिलनं आईचा फोन घेऊन पटकन मित्रांच्या ग्रुपवर शिबिराची माहिती शेअर केली व खाली लिहिलं, ‘‘ सुट्टी रे सुट्टी..शिकूया आपण पुष्कळ गोष्टी..’’

mukatkar@gmail.com