-चंद्रकांत घाटाळ

‘‘गुड मॉर्निंग सर!’’ सगळ्या मुलांनी एका स्वरात वर्गात माळी सरांचे स्वागत केले. माळीसर म्हणजे शाळेतील सर्वच मुलांचे आवडते शिक्षक, कारण त्यांचा स्वभाव आणि शिकवणं फार प्रभावी होतं. मुलांना एखादी शंका असली तर त्याचं निरसन ते एखादी छानसी कथा किंवा अतिरिक्त माहिती देऊन करत. ते कधीही रागवत नसत आणि म्हणून ते सर्वच मुलांचे आवडते शिक्षक होते.

आज वर्गात त्यांनी शिकवायला सुरुवात केली. मात्र काही वेळानंतर त्यांच्या लक्षात आलं की, समीर फार शांत बसला आहे आणि त्याच्या चेहऱ्यावर कसली तरी भीती दिसतेय. समीर म्हणजे वर्गातील सर्वात हुशार मुलगा. नेहमी हसत खेळत असणारा. त्यामुळे माळी सरांना त्याच्या चेहऱ्यावरची भीती लगेचच लक्षात आली.

हेही वाचा…बालमैफल : चिन्मयची दुनिया

‘‘समीर, तू फार घाबरलेला वाटतोस? तुझी तब्बेत बरी नाही का?’’
‘‘नाही सर, तब्बेत ठीक आहे.’’ समीर काहीशा कापऱ्या स्वरात उत्तरला.
‘‘समीर, खरं खरं सांग! नक्की काय झालंय तुला?’’
‘‘सर, ते अपोफिस.’’ समीर अडखळत अर्धवट बोलला.
‘‘अपोफिस?’’ सरांनी काहीशा आश्चर्यानं विचारलं.
‘‘सर, काल मी मोबाइलवर एक व्हिडीयो पाहिला की, साल २०२९ मध्ये ‘अपोफिस’ नावाचा लघुग्रह पृथ्वीला येऊन धडकणार आहे आणि त्यामुळे आपण सर्वच नष्ट होणार आहोत.’’ समीरच्या वाक्यावर वर्गातील सर्वच मुलांच्या चेहऱ्यावर भीती दिसली.
‘‘अरे बाप रे! म्हणून तू इतका घाबरला आहेस तर?’’
‘‘हो सर!’’ सरांच्या प्रश्नावर समीरने मान हलवली.
‘‘सर, खरंच आपली पृथ्वी नष्ट होणार?’’ आणखी एकदोन मुलांच्या प्रश्नाने वर्गात काहीसा गोंधळ सुरू झाला.
‘‘शांत बसा!’’ सरांच्या आदेशाने सर्व वर्ग चिडीचूप झाला.

‘‘मुलांनो, समीरची शंका बरोबर आहे. मात्र त्याने याविषयी काहीशी अर्धवट माहिती मिळवली आहे. कारण समाजमाध्यमावर प्रसिद्धीसाठी असे भीतीदायक व्हिडीयो बनवले जातात. तर मुलांनो, साल २०२९ वर्षांमध्ये अपोफिस नावाचा लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळून जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे शोधाच्या वेळी हा सर्वात धोकादायक लघुग्रह मानला गेला. त्याचा परिणाम विनाशकारी असू शकतो, असा इशारा तज्ज्ञ देत आहेत. अशा लघुग्रहांपासून पृथ्वीला वाचवण्यासाठी जगभरातील अवकाश संस्था प्रयत्नशील आहेत. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्राो) प्रमुख एस. सोमनाथ यांनी स्वत: लघुग्रहाच्या पृथ्वीशी टक्कर होण्याचा इशारा दिला आहे. मात्र, याबाबत नासाने थोडा दिलासा दिला आहे. आता ‘अपोफिस’ म्हणजे नेमकं काय ते सांगतो. तर नासाच्या वेबसाइटनुसार, लघुग्रह ९९९४२ अपोफिस ही पृथ्वीच्या जवळची वस्तू आहे. खरं तर वस्तू म्हणजे तो एक लघुग्रह आहे. ज्याचा अंदाजे व्यास ११०० फूट आहे. साल २००४ मध्ये याचा शोध लागला आणि त्यावेळी हा सर्वात धोकादायक लघुग्रह मानला गेला. विशेष बाब म्हणजे अल्पावधीतच अपोफिसला एक लघुग्रह म्हणून ओळखले गेले- जो पृथ्वीसाठी मोठा धोका बनू शकतो. साल २०२९ मध्ये हा लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळ येऊ शकतो. खरं तर हा लघुग्रह या आधीही पृथ्वी जवळून गेला आहे व साल २०३६ मध्येही पृथ्वीजवळून जाऊ शकतो. यानंतर २०६८ मध्येही याचा धोका आहे.

‘‘सर, सध्या हा अपोफिस पृथ्वीपासून किती दूर आहे?’’ मनोजचा प्रश्न.

हेही वाचा…बालमैफल: जागते रहो…

‘‘सध्या अपोफिस पृथ्वीपासून १४९,५९७,८७१ किमी दूर आहे. या लघुग्रहाचा शोध खगोलशास्त्रज्ञ रॉय टकर, डेव्हिड थोलेन आणि फॅब्रिझियो बर्नार्डी यांनी १९ मार्च २००४ लावला होता. येथे विशेष बाब म्हणजे, जेव्हा ५ मार्च २०२१ रोजी अपोफिस पृथ्वीजवळून गेला तेव्हा खगोलशास्त्रज्ञ बऱ्याच अभ्यासानंतर ते या निष्कर्षापर्यंत पोहोचले की अपोफिसचा धोका साल २०२९ काय, पण साल २०३६, २०६८ आणि त्यापुढील काळातही याचा पृथ्वीवर कोणताही महत्त्वपूर्ण परिणाम होण्याची शक्यता नाही. त्यामुळं समीर या अपोफिसची भीती बाळगण्याची अजिबात गरज नाही समजलं?’’

माळी सरांच्या या सखोल माहितीने सर्वच मुलांनी टाळ्यांचा कडकडाट केला. त्यात हसतमुखाने समीरही सामील होता.

anujasevasanstha3710@gmail.com