मित्रा, समजा, एका फिशटँकमध्ये पाल आणि मगरीचं पिल्लू आहे आणि तुला डोळे बंद करून, केवळ हाताच्या स्पर्शानं दोघांपैकी पाल कुठली आणि मगरीचं पिल्लू कोणतं हे ओळखायचं आहे. जमेल? ग्रेट! बरोब्बर ओळखलंस.

आता दुसरा प्रश्न.

मिट्ट अंधार्‍या खोलीत एक घोडा आणि एक झेब्रा उभे आहेत. त्यांच्या पाठीवरून हात फिरवून तू दोघांना अचूक ओळखू शकशील का? हं… कदाचित नाही!

कारण घोडा आणि झेब्रा ओळखण्यासाठी केवळ त्यांच्या पाठीवरचा स्पर्श पुरेसा नाही. झेब्य्राच्या अंगावरचे पट्टे दिसणंही महत्त्वाचं आहेत. म्हणजे एखाद्या वस्तूला आपण फक्त पाहत नाही किंवा फक्त स्पर्श करत नाही. तिचा स्पर्श कसा आहे आणि ती कशी दिसते, यावरूनही आपण तिच्याबद्दल माहिती मिळवत असतो. वस्तूचा हा वेगळा दिसणारा किंवा जाणवणारा स्वभाव म्हणजे पोत ( ळी७३४१ी). मऊ मऊ कापूस, खरखरीत वाळू, चुरचुरीत गवत, वळणावळणाचा दोरा, गच्च लोकरीची मेंढी, सरसर धावणारी राई, सर्रकन् घसरणारे बारीक मीठ, अंगावरचे ठिपके आणि चकाकणारे खवले… या प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे.

आणि गंमत म्हणजे, आपण हा स्वभाव हातानेही वाचू शकतो. पण आज आपण चित्र काढणार नाही! मग काय करणार? सांगतो.

सगळ्यात आधी पटकन एक कागद घे. त्यावर सफेद गोंद लाव. आता घरात सहज सापडतील अशा स्वस्त वस्तू शोध. कापूस, वाळू, तांदूळ, गवत, चुरमुरे, दोरा, मीठ… जे मिळेल ते. जितकं मिळेल तितकं, पण एक महत्त्वाचा नियम आहे.

यातून काय चित्र बनवायचं, हे अजिबात ठरवायचं नाही. तुझी नेहमीची सवय मला माहीत आहे. ‘‘आज मी घोडा काढणार!’’ मग घोड्याचा गाढव होतो आणि तुझा मूड जातो. तर आज तसं काही नाही. आज कापसाला विचार, तुला कागदावर कुठे राहायला आवडेल? असंच वाळूलाही विचार.

दोर्‍याला वाट्टेल तिथे वळू दे. कुठे भरपूर वस्तू लाव. कुठे कागद मोकळा ठेव. कुठे एकच दोरा ठेवून विसरून जा. चित्राचा निर्णय तू एकट्यानं घेणार नाहीस. कापूस, वाळू, तांदूळ, दोरा, गोंद आणि तुझा हात, असे सगळे मिळून तो निर्णय घेतील.

आता टीव्हीवर ३० मिनिटं एक आवडतं कार्टून पाहा. तोवर गोंद नीट सुकू दे. पाऊस असेल तर जरा जास्त वेळ लागू शकतो. म्हणून आणखी एक कार्टून पाहिलंस तरी चालेल! गोंद पूर्ण सुकून कागद खडखडीत झाला की जलरंग घे.

आणि त्या त्या वस्तूंवरून ब्रश फिरव.

आता खरी गंमत सुरू!

गुळगुळीत कागदावर रंग सरळसरळ पसरतो. वाळूवर ब्रश फिरवताना हातालाही खरखर जाणवते. तांदळावर रंग तुटत-तुटत पुढे जाईल. एखाद्या तांदळाच्या शिताला कदाचित तुझा ब्रश इतका आवडेल की तो त्याला सोडणारच नाही! दोर्‍याच्या वेटोळ्यात रंग साचेल आणि कागद खड्ड्यांच्या रस्त्यासारखा दिसेल. कापसावर रंग गेला की त्याचा स्वभावच बदलेल. मऊ कापूस रंग पिऊन गच्च होईल. मी म्हटलं ना, आज तुला चित्र काढायचंच नाहीये. आज या वस्तूच तुझ्या मदतीनं चित्र काढणार आहेत. आता तयार झालेलं चित्र थोडं लांबून बघ. काय दिसतंय? एखादं वादळ? उ उद्ध्वस्त शहर? एखादा विचित्र प्राणी? एखाद्या ग्रहाचा नकाशा? की काहीच नाही? ‘‘काहीच नाही’’ हे उत्तरही चालेल… धावेल!

अमूर्त चित्राची हीच तर गंमत आहे. त्याला प्रत्येक वेळी, ‘‘हे काय आहे?’’ या प्रश्नाचं उत्तर द्यावंच लागत नाही.

पण आता आणखी एक वेगळा प्रयोग करू. डोळे बंद कर. आणि चित्रावर हात फिरव. हळू. कुठे मऊ? कुठे खरखरीत? कुठे उंच? कुठे खाच? कुठे दाणेदार? कुठे हात सहज पुढे जातो? आणि कुठे हात थांबतो?

आता डोळे उघड.

चित्र आधीपेक्षा वेगळं वाटलं का? कारण आजपर्यंत तू चित्र डोळ्यांनी पाहत आलास. आज ते हातानंही पाहिलंस. आपण नेहमी म्हणतो की, ‘‘हे नीट बघ.’’ पण कधी सांगतो का?

‘‘हे हाताने बघ.’’ कारण हात हा फक्त वस्तू उचलण्यासाठी नसतो.

तो स्पर्शानं माहितीही गोळा करतो. वस्तू कडक आहे की मऊ. ओलसर आहे की कोरडी. गुळगुळीत आहे की खरखरीत. उबदार आहे की थंड. स्थिर आहे की हलतंय. म्हणजेच स्पर्श हादेखील एक प्रकारचा माहिती मिळवण्याचा मार्ग आहे.

आणि म्हणूनच चित्राला फक्त रंग आणि आकार नसतात. चित्राला अंग असतं. त्वचा असते. त्वचेला पोत असतो आणि पोताला स्वत:ची ओळख असते. डोळ्या-हातांना मिळणारा हा अनुभव चित्र पाहताना महत्त्वाचा असतो.
तू केलेला आजचा प्रयोग मला नक्की पाठव.
-तुझा चित्रमित्र, श्रीबा

शिक्षक आणि पालकांसाठी…

आजची मुलं पूर्वीपेक्षा जास्त सपाट दृश्य जगात राहत आहेत. स्क्रीन, फोटो गुळगुळीत आहेत. सपाट आहेत. ऑनलाइन कपड्याचा पोत घेताना स्क्रीनवर दिसतो, पण हाताला जाणवत नाही. मातीचा खरखरीतपणा, झाडाची साल, दगडाची थंडी, गवताची चुरचुर, हे सगळे अनुभव मुलांच्या ज्ञानाचा भाग असतात. मुलं वस्तू पाहायला शिकत आहेत; पण वस्तूचा अनुभव घ्यायला शिकत आहेत का?

कलेच्या वर्गात म्हणूनच स्पर्शाला जागा असायला हवी. पोत हा केवळ चित्र सुंदर करण्याचा सजावटीचा प्रकार नाही. तो निरीक्षणाची एक पद्धत आहे.

स्पर्शातून मुलं पदार्थ ओळखतात, फरक जाणतात, तुलना करतात, अंदाज बांधतात आणि त्यानंतर त्या अनुभवाला स्वत:ची भाषा देतात.

आजच्या डिजिटल जगात हे आणखी महत्त्वाचं आहे. कारण टचस्क्रीनला आपण स्पर्श करतो खरा…

पण स्क्रीन आपल्याला काही संपूर्ण जाणीव देत नाही. म्हणून मुलांना कागदाला, भिंतीला हात लावू द्या. माती चुरडू द्या. झाडाची साल स्पर्शू द्या. वाळू नखात जाऊ द्या. काट्याचा अणकुचीदारपणा अनुभवू द्या, दगड उलटसुलट करून पाहू द्या. विकायला आलेल्या माशांवरच्या खवल्यांचे पोत हातानी पाहू द्या.

दोन डोळे जग दाखवतात. डोळ्या-हाताचा स्पर्श अनुभव परिपूर्ण करतात.
ushriba29@gmail.com