बालमैफल : आजीच्या सुटकेची गोष्ट

आज सगळी नातवंडं, पतवंडं आजीभोवती जमली आणि ‘आजी गोष्ट.. आजी गोष्ट..’ असा धोशा लावला त्यांनी.

राजश्री राजवाडे-काळे
आज सगळी नातवंडं, पतवंडं आजीभोवती जमली आणि ‘आजी गोष्ट.. आजी गोष्ट..’ असा धोशा लावला त्यांनी. आणि नागीआजीसुद्धा गोष्ट सांगायला लग्गेच तयार झाली. आजी बिळात सरसावून बसली तशी नाडू, नांदू, नागु, नानू ही सगळी नातवंडं भोवती वेटोळे करून बसले. नागीआजीने ठरवलंच होतं की, आपण जिवंत आहोत तोपर्यंत ही गोष्ट सगळ्यांना सांगत राहायचं. ही गोष्ट पुढच्या सगळ्या पिढय़ांना तोंडपाठ झाली पाहिजे असं नागीआजीला वाटायचं. खरं तर तिची इच्छा होती की तिची गोष्ट माणसांमध्येसुद्धा प्रसिद्ध व्हायला हवी. कारण तिला माहीत होतं की माणसांमध्ये प्रसिद्ध असलेल्या सगळ्या गोष्टींमध्ये साप हा कायम दुष्टच असतो. बिचाऱ्या पक्ष्यांची अंडी गिळणारा, नाही तर बेडकाला गिळणारा. आजीला वाटे, आता आम्ही आहोत हे असे आहोत! देवानेच आम्हाला असं बनवलं आहे त्याला आम्ही तरी काय करणार? बरं, गोष्टींमध्ये हे असं.. पण भगवान शंकराच्या गळ्याभोवती नाग असतोच ना! भगवान विष्णू तर शेषनागावर विराजमान. आणि गणपतीबाप्पाच्या कमरेलासुद्धा नाग असतो. हा सगळा विचार करता करता नागीआजीला तंद्री लागली आणि पिल्लावळीची सळसळ वाढली. ‘‘सांग ना गोष्ट, सांग ना गोष्ट..’ ही विनवणी वाढली. नागीआजी भानावर आली आणि गोष्ट सांगू लागली- ‘‘तर ऐका बाळांनो.. ही गोष्ट आहे खूप जुनी, खरीखुरी घडलेली.. माझ्याबाबतीत. तर नुकताच श्रावण महिना सुरू झाला होता. ऊन-पावसाचा खेळ सुरू होता. मी आणि माझे काही मित्र-मैत्रिणी बिळाबाहेर खेळत होतो. आम्ही आमच्याच धुंदीत बागडत होतो आणि अचानक विपरीत काहीतरी घडलं. एकच गोंधळ उडाला. मी पटकन् चपळाईने बिळात पळाले. हृदय धडधडत होतं. काही काळ गेला. जरा बरं वाटल्यावर मी आणि अजून काही जण बिळाबाहेर पडलो. आमच्या लक्षात आलं की आमच्यातले दोघे जण नाहीसे झाले आहेत. त्यांच्या आई-वडिलांनी आक्रोश केला. त्यांना सर्वानी खूप शोधलं, पण ते कुठेच सापडले नाहीत. असा कोणता हिंस्र पशू आला होता- जो नागाला गिळू शकतो? कोणाला काहीच कळेना. अधूनमधून त्याचा विचार माझ्या मनात यायचा आणि मन दु:खी व्हायचं. पण मला तरी कुठे माहीत होतं की त्यांचं काय झालं? ते कुठे आहेत?

..एक वर्ष लोटलं. पुन्हा श्रावण महिना आला आणि मी बिळाबाहेर बसले असताना अचानक काहीतरी दणकन् अंगावर पडल्यासारखं वाटलं. काठीने मला दाबून ठेवलं होतं आणि मग मला पकडून एका टोपलीत ठेवलं गेलं. हे कृत्य करणाऱ्या प्राण्याचं नाव होतं माणूस!!
मी टोपलीत बंदिस्त होते. मला जाणवत होतं की, माझ्यासारखे अनेक जण बंदिस्त आहेत. न जाणो, त्यात माझे दोस्तही असतील!
शेवटी तो दिवस उजाडला. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमीचा दिवस होता तो.. नागपंचमीचा!! टोपलीतले बंदिस्त आम्ही सगळे देव होतो त्यांच्यासाठी. आमच्या टोपल्या उघडल्या गेल्या. समोरचा माणूस मोठय़ा त्वेषाने पुंगी वाजवत होता. त्या पुंगीच्या हालचाली टिपत आम्ही हालचाल सुरू केली. काही स्त्रिया येऊन आमच्यासमोर दूध, लाह्य टाकत होत्या. खरं तर आम्हाला खूप भूक लागली होती, पण आमचं खाणं आम्हाला कोणीही देत नव्हतं. आम्ही उपाशी होतो. आमची अशी अवस्था.. तर आजूबाजूच्या झाडांवर मुली झोके बांधून त्यावर खिदळत, झुलत हात्या. काही जणी तर हातांवर मेंदी काढत बसल्या होत्या. पण आम्हाला असं उपाशीपोटी ठेवून हे सण का साजरे करताहेत, तेच कळेना. मला वाटलं, आता हेच आपलं आयुष्य आहे. बिळाच्या आठवणीने जीव कासावीस होत होता. आता बिळात कधीच जाता येणार नाही, या विचाराने रडूही येत होतं. पण अचानक काय झालं कोण जाणे- एकच धांदल उडाली. आम्हाला घाईघाईने परत टोपल्यांमध्ये कोंबून आमच्या टोपल्या घेऊन माणसं पळू लागली. दुसऱ्या माणसांनी त्यांना पकडलं. त्यांच्याकडून टोपल्या हिसकावून घेतल्या. मला काहीच समजेना- काय चाललं आहे ते. मग आमच्या टोपल्या गाडीत ठेवून आम्हाला जंगलात आणलं गेलं आणि..

आणि काय सांगू तुम्हाला- आम्हाला मुक्त केलं गेलं. काही भल्या माणसांनी आम्हाला स्वतंत्र केलं. त्यांच्या न्यायालयाने सापांना पकडायला बंदी घातली होती. अशा तऱ्हेने माझी सुटका झाली. आणि आज मी तुमच्यासोबत आहे.
‘‘आजी, आता नाही ना आम्हाला कोणी पकडणार?’’ गोष्ट ऐकून एका पिल्लाने विचारलं.
‘‘असं समजू नका बरं. कायदा असला तरी तो मोडून कोणी पकडलं तर..? म्हणूनच हलगर्जीपणा नको. पावसाळ्यात बिळातून बाहेर पडलात तरी उगाच जास्त फिरत बसायचं नाही बरं..’’ असं म्हणत माणसांच्या नावाने नागीआजी बोटं मोडणार होती; पण बोटंच नव्हती ना, म्हणून जोरजोराने तिने शेपूट सळसळवली आणि पिल्लांना बजावून सांगितलं, ‘‘ही तुमच्या नागीआजीच्या सुटकेची गोष्ट कायम लक्षात ठेवा बरं!’’
shriyakale1@gmail.com

मराठीतील सर्व बालमैफल ( Balmaifalya ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

फोटो गॅलरी