एक मोठं माळरान होतं. त्या माळरानाच्या मधोमध होतं एक खोल खोल बीळ. त्या बिळात राहात होती एक मोठ्ठी नागीण.नागिणीचा संपूर्ण देह कुणीच कधीच बघितलेला नव्हता. कोणी म्हणायचं पन्नास हात लांब, कोणी म्हणायचं शंभर हात तर कोणी दोनशे हात..
ती नागीण सगळं खायची. छोटी छोटी झाडं, गवत, पानं, उंदीर, बेडूक, गायी, बकऱ्या, म्हशी, हरणं.. काय खायची नाही, सांगा. पण आपला हा विशाल देह घेऊन जास्त दूर जायचं धाडस तिच्यात नव्हतं.
त्या नागिणीच्या भीतीमुळे त्या बाजूला माणसं फिरकत नसत. परंतु अचानक एके दिवशी एक शेंडीधारी ब्राह्मण त्या माळरानाच्या मधून घाईघाईने चालत जाऊ लागला. त्या बिळाजवळ येताच फुस्स् करून फणा काढून ती मोठ्ठी नागीण बिळाबाहेर आली. घाबरून तो ब्राह्मण एकदम आपल्या जागीच स्तब्ध उभा राहिला. बापरे, हे काय संकट!
ब्राह्मण धीर धरून म्हणाला, ‘माझा रस्ता अडवू नकोस नागिणी. बाजूला हो, नाहीतर तुला भस्म करून टाकीन!’
आणि काय आश्चर्य! ती नागीण माणसाप्रमाणे बोलू लागली. ती म्हणाली, ‘मी बाजूला होईन, तुमची वाट मोकळी करीन, पण माझ्यावर तुम्ही एक उपकार केले पाहिजे.’
‘अरे! हे काय? तू माणसाप्रमाणे बोलतियेस. तू तर एक नागीण आहेस.’
‘या प्रश्नाचं उत्तर मी नंतर देईन.’ नागीण म्हणाली, ‘आत्ता, या क्षणी सांगा की, तुम्ही माझ्यावर एक उपकार करणार की नाही.’
‘म्हणजे काय करायला हवं?’
‘खूप सामान्य गोष्ट, पण सगळेच ते करू शकणार नाहीत. परंतु तुम्ही ते अगदी सहज करू शकाल.’
नागिणीने बोलायला सुरुवात केली. ‘या राज्याचं नाव पुण्यगड आणि जवळच्या राज्याचं नाव आहे क्षेत्रगड. एक वेळ अशी होती की, दोन्ही राज्यांच्या राजांची खूप मैत्री होती. ते एकमेकांवर खूप प्रेम करत होते. कुणावरही संकट आलं की, हे दोन्ही राजे खांद्याला खांदा लावून एकमेकांसाठी लढायचे. त्यामुळे तिसरा कुठलाही राजा या दोन्ही राजांकडे वाकडय़ा नजरेने बघत नसे. दिवस खूप सुखात आणि आनंदात जात होते.
अचानक या पुण्यगड राज्यावर संकट कोसळलं. शेतं, नद्या, ओढे सुकून जाऊ लागले. सगळीकडे वाळवंट पसरू लागलं. लोकांना, प्राण्यांना खायला काहीच मिळेनासं झालं. सगळीकडे हाहाकार माजला. सगळ्यांची अवस्था खूप वाईट झाली होती. पण हे घडलं कसं? पुण्यगडचा राजा खूप चिंतेत पडला. त्याने खूप विचार केला. शेवटी तो क्षेत्रगडच्या राजाकडे गेला आणि म्हणाला, ‘मित्रा, प्रजेवर खूप मोठं संकट कोसळलं आहे. माझ्या प्रजेला वाचव.’
क्षेत्रगडचा राजा म्हणाला, ‘हे बघ, तुझ्या राज्याचं नाव पुण्यगड आहे. पण पुण्य नावाचं काहीच तुझ्या राज्यात नाही. तुझं सगळं राज्य पापाने भरलंय. आता जर मी तुझ्याबरोबर मैत्री ठेवली, तर तुझं पाप मलाही लागेल. म्हणून आजपासून तुझी संगत मी सोडत आहे.’
थोडं थांबून नागीण पुन्हा बोलू लागली, ‘पुण्यगडच्या राजाचे कुलगुरू एक निष्ठावान धार्मिक ब्राह्मण होते. पण ते आता संन्यास घेऊन हिमालयात निघून गेले होते. तिथेच राहून अंतज्र्ञानाने सगळं जाणून घेण्याची योगशक्ती त्यांच्याजवळ होती. एके दिवशी त्यांना आपल्या शिष्याची दुरवस्था समजली. तेव्हा त्यांनी स्वत:च्या डोक्यावरचा एक केस कापून घेतला. त्याचा एक छोटा गोळा केला. तो गोळा जमिनीवर जोरात आपटत ते म्हणाले, ‘ज्या कोणी माझ्या शिष्याची ही दुर्दशा केली असेल, त्याची आत्ताच्या आत्ता एक सर्वभक्षिणी नागीण होईल आणि तेव्हापासूनच माझी ही दशा झाली आहे.’
ब्राह्मणाने तेव्हा नागिणीला विचारलं, ‘पुण्यगडच्या पापांना तू कारणीभूत कशी? तू खरी आहेस कोण?’
नागीण म्हणाली, ‘या आधी मी एक डाकीण होते. या आधी मी दुसऱ्या राज्यात होते. तिथून पुण्यगडला आले. खरं तर मी काहीच केलं नाही. डाकिणी ज्या राज्यात जातात, तिथे असंच होतं.’
ब्राह्मण म्हणाला, ‘समजलं. यात तुझा काहीच दोष नाही, परंतु त्या धार्मिक ब्राह्मणाला मी शोधू कुठे? तो कुठे सापडणार मला?’
नागीण म्हणाली, ‘ते आता महायोगनिद्रेत आणि एकांतवासात आहेत. जर तुम्ही तिथे जाऊन त्यांची भेट घेतलीत आणि मला शापमुक्त करण्याची विनंती केलीत, तर ते मला नक्कीच शापमुक्त करतील.’
ब्राह्मण म्हणाला, ‘हे बघ, तुला जेवढं वाटतंय तेवढं हे सोपं नाहीए. एक तर हिमालयात जाणं आणि दुसरं म्हणजे तिथे त्यांना शोधून काढणं, हे दोन्ही खूप अवघड आहे.’
त्यावर नागिणीने उत्तर दिलं, ‘ती व्यवस्था मी करीन. जर तुम्हाला मान्य असेल, तर मी माझी डाकिणीविद्या वापरू शकीन.’
ब्राह्मणाने विचारलं, ‘किती दिवस लागतील?’
ती म्हणाली, ‘नऊ दिवस. तुम्हाला मी कधीही हिमालयात पोहोचवू शकते.’
ब्राह्मणाचं कुतूहल जागं झालं. हे काय अविश्वसनीय बोलतिये ही डाकीण. असं काय कधी होऊ शकतं? नागिणीने ब्राह्मणाच्या मनातली द्विधा ओळखली आणि ती म्हणाली, ‘तुम्ही आत्ता कुठे आणि का जात आहात हे मी तुम्हाला सांगू शकते, म्हणजे तुमचा माझ्यावर विश्वास बसेल.’
ब्राह्मणाने विचारलं, ‘हे तुला कसं समजणार?’
‘तुम्हाला मी आधीच सांगितलं आहे, ही विद्या आहे डाकिणीविद्या. जेव्हापासून मी डाकीण आहे, तेव्हापासूनच ही विद्या मला प्राप्त आहे.’
एक क्षण थांबून ती म्हणाली, ‘तुम्ही काही मदत मागायला राजाकडे जाताय. परंतु आत्ता राजाची अवस्था इतकी वाईट आहे की, तुम्हाला कुठलीच मदत मिळणार नाही.’
ब्राह्मणाने मनातल्या मनातच विचार केला, ‘अरे खरंच, नागिणीने तर बरोबर सांगितलं.’ प्रत्येक वर्षी या वेळी तो नेहमी राजाकडे मदत मागायला जायचा. मग त्याने त्या नागिणीला विचारलं, ‘खरंच मी तुझ्यावर उपकार करू शकतो का?’
नागिणीने उत्तर दिलं, ‘हो नक्कीच. जर तुम्ही मला या शापातून मुक्त केलंत, तर तुम्हाला कधीच काहीही कमी पडणार नाही. या माझ्या बिळाशी येऊन जे काही मागाल, ते तुम्हाला मिळेल. पण एक गोष्ट आहे, तुम्ही एकटंच आलं पाहिजे. दुसऱ्या कोणाहीसमोर मागितलंत तर मिळणार नाही.’
तो म्हणाला, ‘ठीक आहे. मान्य आहे मला. माझी हिमालयात पोहोचण्याची व्यवस्था कर.’
नागीण म्हणाली, ‘माझ्या या बिळातून एक कण माती घ्या. ती तोंडात ठेवा आणि शांत उभे राहा. याशिवाय तुम्हाला काहीच करायचं नाहीए.’ ब्राह्मणाने तेच केलं.
आणि काय आश्चर्य! ब्राह्मणाचं शरीर छोटं छोटं होत गेलं, त्याचं रूपांतर एका धुळीच्या कणात झालं आणि हिमालयात त्या एकांत ठिकाणी तो ब्राह्मण पोहोचलादेखील. तिथे त्याला त्याचं खरं रूप मिळालं. तिथे त्याने त्या संन्यासी गुरूला सर्व हकीकत सविस्तर सांगितली. संन्यासी गुरूने तिथलं एक फूल घेतलं आणि ब्राह्मणाला दिलं.
तत्क्षणी त्या ब्राह्मणाचं रूप बदललं आणि तो पुन्हा धूलिकण झाला. लवकरच तो त्या नागिणीकडे जाऊन पोहोचला आणि आपोआप ते फूल त्या नागिणीच्या डोक्यावर जाऊन पडलं. त्या फुलाचा स्पर्श डोक्याला होताच तिचं रूप बदललं आणि तिचं रूपांतर एका सुंदर स्त्रीत झालं. त्याही पुढे अजून एक आश्चर्य घडलं. हसत हसत ती युवती हवेत मिसळून अदृश्य होऊन गेली. आता तिथे नागीणही उरली नाही आणि ती तरुणीही नव्हती.
त्या ब्राह्मणाला खूप भूक लागली होती. तो बिळाजवळ गेला आणि खाण्याची इच्छा व्यक्त केली. त्या बिळातून लगेचच विविध पक्वान्न बाहेर आली. ब्राह्मणाने पोटभर खाल्लं आणि उरलेलं अन्न एका गाठोडय़ात बांधून घेतलं.
ती जागा ब्राह्मणाने नीट लक्षात ठेवली. पुन्हा तिथे यायचं होतं ना त्याला! तो आता आपल्या घराकडे चालू लागला. त्याने विचार केला, ‘किती पुण्यवान मी. माझ्यामुळे एक नागीण शापमुक्त झाली. आता कसलीच भीती नाही, कसलीच काळजी नाही. पुण्यगडात पुन्हा सोन्यासारखं धान्य पिकेल. राज्यात पुन्हा सुखशांती नांदेल. माझ्या देशात दु:ख म्हणून काही शिल्लक राहणार नाही.’
संग्रहित लेख, दिनांक 8th Dec 2012 रोजी प्रकाशित
बंगाली लोककथा – ब्राह्मण आणि डाकिणीची गोष्ट
एक मोठं माळरान होतं. त्या माळरानाच्या मधोमध होतं एक खोल खोल बीळ. त्या बिळात राहात होती एक मोठ्ठी नागीण.नागिणीचा संपूर्ण देह कुणीच कधीच बघितलेला नव्हता. कोणी म्हणायचं पन्नास हात लांब, कोणी म्हणायचं शंभर हात तर कोणी दोनशे हात..

First published on: 08-12-2012 at 05:45 IST
मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traditional stories of bengal