मित्रा, आज आपण चित्र काढणार आहोत. थांब. कागद, रंग, ब्रश, पाणी आणायला लगेच पळू नकोस. एक अडचण आहे. हे वापरून आपण खूप चित्रं काढली. हे न वापरूनदेखील आपण चित्रं काढलीच म्हणा! पण आजच्या चित्रात मात्र असलं काहीच काढायचं नाही की करायचं नाही.
काय झालं? चेहरा असा का केलास? थांब. सगळं सांगतो.
एक पांढरा कागद घे. कुठलीही एक पेन्सिल किंवा एक काळा क्रेयॉन किंवा एक काळा स्केच पेन… असं हाताला जे मिळेल ते घे. आता त्या कागदावर फक्त एक रेषा काढ. कशीही. सरळ, वाकडी, गोल, तिरकी, अधेमधेच थांबलेली अर्धवट. झाली? बस्स! आता आणखी काही काढायचं नाही.
हे काढून झाल्यावर आता पुढचं वाच. विशेषत: आत्ता मनात आलं तरी एक बिंदूही काढू नकोस. आता आपल्या त्या एकमेव रेषेकडे बघ काय दिसतंय?
रेष सरळ असेल तर कदाचित ती समुद्राची क्षितिजरेषा असेल. थोडी जाडसर, वेडीवाकडी असेल तर कदाचित एखाद्या झाडाची फांदी. वळणदार गेलेला रस्ता किंवा रेल्वेची पटरी. कागदावर तिरपी रेषा असेल तर कदाचित आकाशातून सरळ रेषेत धूर सोडत जाणारं एखादं विमान. आणि कदाचित… काहीच नाही! आज तेही अगदी ठीक आहे.
चित्र पाहताना आपण फक्त कागदावर काय आहे ते पाहत नाही. तर ते पाहून रेषेच्या अवतीभोवती अनेक प्रतिमा (इमेज) आपल्या डोक्यात येतायेत आणि हीच आजची खरी गंमत आहे. एक उदाहरण पाहा. याच रेषेला एका टोकाला एक छोटं वर्तुळ काढ. काय दिसतंय? एक माणूस? सुई? चमचा?
आपल्याला शाळेत चित्र म्हणजे फक्त रंगाने कागद भरायची गोष्ट वाटते. घर काढलं की दार पाहिजे. दार असेल तर खिडकी पाहिजे. खिडकी आली की कुंडी पाहिजे. तिला फूल पाहिजे. डोंगर काढले की त्याच्या मधून वाहणारी नदी पाहिजे, वर सूर्य पाहिजे. सूर्याच्या बाजूला ढग पाहिजे.
आणि कुठे तरी जागा उरलीच तर ‘इथं दोन पक्षी काढ.’ आपण लहानपणी जवळजवळ प्रत्येक चित्रात तेच दोन-चार पक्षी का काढायचो, याचं उत्तर अजून कुणालाच सापडलेलं नाही!
पण एकदा विचार करून बघ.
चित्रातली रिकामी जागा खरंच रिकामी असते का? पांढर्या कागदाचा तो भाग समुद्राची शांतता होऊ शकतो. आकाश होऊ शकतो. धुकं होऊ शकतो. बांबूचं झाड होऊ शकतो, नाटकाचा स्टेज होऊ शकतो, स्वप्नांचं अवकाश होऊ शकतो. म्हणजे चित्रात जे काढलं आहे त्यालाच महत्त्व नसतं. जे काढलेलं नाही ते त्याहून जास्त काही सांगत असतं.
आता आणखी एक गंमत. या रेषेच्या बाजूला आणखी एक रेषा काढ. चित्रात दोन रेषांच्या मधली जागाही आपल्याला काही सुचवत असेल. इथं एक मोठी गंमत आहे. मी तुला सांगितलं नाही की ती रेषा समुद्र आहे. तरी तुला समुद्र दिसला. मी बांबू सांगितल्यानंतर तुला हिरवा रंग दिसला. म्हणजे चित्रकार चित्र काढतो, मात्र त्याचा अर्थ ते पाहणाराही लावत असतो. म्हणून आजच्या चित्रात आपण एक वेगळा प्रयोग करणार आहोत.
सहा जाड कागद घे. ३ पांढरे, ३ काळे. त्यावर वेगवेगळ्या आकाराच्या ब्रशने रेषा काढ. एका कागदावर एकच. जाड किंवा बारीक रेषा असाव्यात. रेषेच्या आजूबाजूची जागा जशी आहे तशीच सोडायची आहे. त्यावर एक थेंबही नको. ते सुकल्यावर भिंतीवर लाव. रेषेला लगेच अर्थ देऊ नकोस. आज काहीही दिसले तरी कदाचित उद्या त्या रिकाम्या जागेत आणखी काही तरी दिसेल. सुचेल. परवा आणखी काही आणि कदाचित महिनाभरानंतरही ते चित्र तुला वेगळंच काही सांगेल. म्हणून पुढच्या वेळी चित्र काढताना ‘‘इथं अजून काय काढू?’’ पेक्षा ‘‘इथं काहीच काढलं नाही तर काय होईल?’’ असा प्रश्न विचार. कदाचित तिथूनच पुढं तुझं खरं चित्र सुरू होईल.
आणि हो…
आजपासून त्या श् आकाराच्या दोन-चार पक्ष्यांना सुट्टी बरं का? त्यांनाही कधी तरी रिकाम्या आकाशाचा आनंद घेऊ दे!
तुझा चित्रमित्र,
श्रीबा
ushriba29@gmail.com
