|| श्रीपाद

तुम्ही चिमुकल्यांनी मोठय़ांची छोटी-मोठी मदत घेऊन त्यांना पोटभरीचं जेवायलाच वाढलंत तर? कल्पना तर करा, या मोठय़ांना किती अप्रूप वाटेल. शिवाय अशा बेतामुळे तुमचं कौतुक होईल ते वेगळंच. हं, पण आजची पाककृती मात्र तुमच्यातल्याही थोडय़ा मोठय़ा मुलामुलीं-करताच आहे बरं का! कारण या पाककृतीमध्ये चुलीपाशी, उकळत्या पाण्यापाशी काम करावं लागणार आहे. अर्थात त्यांनी पदार्थ करतानादेखील घरातल्या मोठय़ा सदस्याच्या मदतीने, त्यांच्या देखरेखीखालीच हा पदार्थ करायचा आहे. थोडय़ा छोटय़ा बच्चेकंपनीने तयारीला मदत करायला काहीच हरकत नाही. तेव्हा लागा तयारीला आणि आपल्या लेखामध्ये मागे दिलेली क्रंची-कुरकुरीत कोशिंबीर तयार करा. उपम्यासोबत ती खूपच छान लागते.

चार जणांकरता साहित्य : दीड वाटी बारीक रवा, त्याच मापाच्या वाटीने चार-सहा वाटय़ा पाणी. तिखट आवडत असेल तर अधिक, नाहीतर तीन पोपटी हिरव्या रंगाच्या मिरच्या. एक-दीड इंच आलं. प्रत्येकी दोन मध्यम आकाराचे कांदे, बटाटे, टॉमेटो, गाजर. दोन-तीन मुठी ताजे मटार दाणे. कढीपत्त्याच्या दोन काडय़ा किंवा १०-१२ ताजी पानं. दोन-तीन मोठे चमचे मूग किंवा उडीद डाळ. फोडणीकरता दोन-तीन मोठे चमचे गोडं किंवा खोबऱ्याचं तेल, एक-दीड चमचा मोहरी, सहा चिमटी हिंग. वरून घालण्याकरता खोबऱ्याचं तेल किंवा तूप दोन चमचे. सजावटीकरता कोथिंबीर, ओल्या खोबऱ्याचा चव किंवा तिखट शेव. चवीनुसार मीठ आणि साखर.

उपकरणं : गॅस किंवा इतर कुठलीही शेगडी. एक मोठंसं जाड बुडाचं पातेलं पाणी तापवण्याकरता. उपमा करण्याकरता नॉनस्टिक किंवा जाड बुडाचं, योग्य आकाराचं भांडं, त्यावर झाकण्याकरता मापाचं झाकण आणि डाव.

सर्वप्रथम भाजी स्वच्छ धुवून, सालं वगरे काढून साधारण मध्यम आकाराच्या तुकडय़ांमध्ये चिरून घ्या. एक लक्षात ठेवा, तुकडे मोठे चिरलेत तर भाज्या शिजायला वेळ लागेल, फार बारीक केलेत तर उपमा नावाचा गिजगा तयार होईल. तेव्हा त्या अंदाजाने भाज्यांचे तुकडे करा. मी सोप्पं माप वापरतो. मटाराच्या तीन मोठय़ा दाण्यांच्या आकाराचे तुकडे परफेक्ट आकाराचे होतात. त्यानंतर मिरचीचे साधारण एक सेंटिमीटर लांबीचे तुकडे करा. आल्याचे बारीक चिरून तुकडे करा. माझी पद्धत म्हणजे, मी आलं आणि मिरचीचे मोठे तुकडे करून खलबत्त्यात बारीक कुटून काढतो, चटकन् काम होतं. वर सांगितलेलं साहित्यही- अगदी मोहरी-हिंग, रवा वगरे मापामध्ये छोटय़ा वाटय़ा-भांडय़ांमध्ये काढून ठेवा आणि ही भाज्यांची सगळी तयारी करून मगच चुलीपाशी किंवा गरम शेगडीपाशी जा.

चुलीपाशी किंवा गरम शेगडीपाशी काम करताना घरातल्या मोठय़ा माणसाची देखरेख आणि मदत हवीच बरं का! फक्त दादा-ताई वगरेंची नव्हे, तर आई-बाबा, मामा, मावशी, आत्या, काका, आजी-आजोबा अशा मोठय़ा माणसांची मदत घ्या. आता पाणी गरम करायच्या पातेल्यामध्ये मापाने पाणी घेऊन ते शेगडीवर गरम करायला ठेवा. आच मध्यम ठेवा. पाणी गरम करायचं आहे, उकळायची आवश्यकता नाही, म्हणजे ते दुसऱ्या पातेल्यात ओतायला सोपं होईल.

उपमा करायच्या नॉनस्टिक किंवा थोडय़ा मोठय़ा भांडय़ात फोडणीकरता तेल तापत ठेवा. तेल साधारण तापलं म्हणजे त्यामध्ये सर्वप्रथम मूगडाळ किंवा उडीद डाळ घाला, त्यानंतर लगेचच मोहरी टाका. मोहरी तडतडेपर्यंत डाळ भाजून निघते. मोहरी तडतडली म्हणजे त्यामध्ये हिंग, मिरची-आल्याचे तुकडे किंवा कुट्टा आणि कढीपत्त्याची पानं घाला. चतकोर-मिनिटं हे शिजू दिल्यावर त्यामध्ये कांदा घाला. किंचित मीठ घालून कांदा थोडा मऊ होईतोवर परता. मग बटाटा, गाजर, मटार, टॉमेटो घाला. चांगलं एकजीव होईतोवर हे मिश्रण हलवून झाकण लावून मंद आचेवर शिजू द्या. बटाटा-मटार शिजायला साधारण दोन-चार मिनिटं लागतील. थोडा अधिक वेळ लागला तरी चालेल. आच मोठी करू नका, नाही तर सारंच करपेल. भाज्या साधारण शिजल्या म्हणजे त्या पातेल्यामध्ये दुसऱ्या शेगडीवर ठेवलेलं गरम पाणी हलकेच ओता. चवीच्या अंदाजाने सारं मीठ घाला. आता आच मोठी करून या पाण्याला चांगली उकळी येऊ द्या. पाणी उकळायला लागलं म्हणजे त्या पाण्यामध्ये हळूहळू वाटीनेच बारीक रवा घाला. एकदम घालू नका बरं का! आणि रवा घालताना मदतीला घेतलेल्या घरच्या मोठय़ा व्यक्तीला डावाने हे मिश्रण ढवळायला सांगा. ढवळतानाच तुम्हाला दिसेल की रवा हळूहळू फुलायला लागेल आणि पाणी आटत जाऊन उपमा तयार होईल. पाणी जास्त झालं तर त्या अंदाजाने थोडा रवा घाला. किंवा पाणी कमी पडलं तर त्या अंदाजाने थोडं अधिक पाणी कोमट करून घाला. फार काही अवघड नाही, उपमा बिघडायचा नाही.

आता उपम्याचं हे मिश्रण घट्ट झालं म्हणजे त्यावर झाकण ठेवून, मंद आचेवर त्याला छान वाफ काढा. दोन-तीन मिनिटं मंद आचेवर उपमा शिजू द्या. म्हणजे तो रवा छान फुलेल, उपमा मऊ होईल. आता झाकण काढा. आच बंद करा. तयार उपम्यावर खोबऱ्याचं तेल किंवा तूप घाला आणि चांगला छान ढवळा. वरखाली, सगळीकडे हे तूप पसरू द्या. उपम्याला छान तकाकी येईल. या वेळी कोिथबीर, ओलं खोबरं वगरे घालून उपमा वाढायलाच घ्या. सोबत कोिशबीर आणि पेलाभर ताक वाढलंत तर छान संध्याकाळच्या जेवणालाही साजरा होईल. करून तर पहा, मी खात्री देतो की दक्षिण भारतात सर्रास करणाऱ्या या पद्धतीचा हा उपमा हमखास छान होईल.

contact@ascharya.co.in