सज्जनपणाचे मोल

आपापल्या शेतात धान्य, फळे, भाज्या वगैरे पिकवावे अन् कष्टाच्या कमाईचे खावे, असे साधे-सोपे आयुष्य होते त्यांचे.

(संग्रहित छायाचित्र)

ज्योती देशपांडे

पूर्वी चीन हासुद्धा भारतासारखाच शेतीप्रधान देश होता. अनेक लोक शेतीचाच व्यवसाय करत. आपापल्या शेतात धान्य, फळे, भाज्या वगैरे पिकवावे अन् कष्टाच्या कमाईचे खावे, असे साधे-सोपे आयुष्य होते त्यांचे.

असेच एके दिवशी चीनमधल्या छोटय़ा गावातील आठ-दहा शेतकरी नेहमीप्रमाणे आपापल्या शेतात काम करत होते. त्यांची शेते एकमेकाला लागून होती. काम केल्यानंतर एकत्र जेवावे आणि संध्याकाळी मिळून घरी जावे, असा त्यांचा दिनक्रम असे. त्या सगळ्यांमध्ये एक शेतकरी अगदी सरळ, प्रामाणिक आणि गरीब स्वभावाचा होता. काहीजण मात्र उगीचच त्याचा राग राग करत किंवा त्याला विनाकारण सतावीत असत. अर्थात, तो त्याच्या सरळ, गरीब, स्वभावानुसार त्या इतरांकडे आणि त्यांच्या टीकेकडे दुर्लक्ष करत असे. सर्वाबरोबर मिळून मिसळून राहत असे. त्या दिवशी ते असेच घरी निघाले असताना अगदी अचानक अतिशय जोराचा पाऊस सुरू झाला. आकाश काळ्या ढगांनी पूर्ण झाकोळून गेले. प्रचंड जोराचे वादळ सुटले आणि विजांच्या कडकडाटात पावसाचे थैमान सुरू झाले.

‘छे! हा काहीतरी वेगळाच, नेहमीपेक्षा भयंकर राक्षसी पाऊस आहे,’ असे म्हणत पावसाच्या रौद्र, भीषण रूपाकडे पाहून घाबरलेले ते सारेजण लवकरच घराकडे निघाले. पाऊस अन् वाऱ्यामुळे त्यांना त्यांच्या डोक्यावरील वाळलेल्या गवताच्या टोप्या सावरणेही मुश्कील झाले. वादळ, पाऊस या साऱ्यामुळे ते थंडीने गारठून गेले.

शेवटी त्यांनी वाटेत असलेल्या एका जुन्या- पुराण्या देवळात आसरा घ्यायचे ठरवले. दरवेळेस विजेच्या कडकडाटाबरोबर आणि वादळामुळे देवळाच्या भींती हादरू लागल्या. आता देऊळ पडेल की काय, अशी भीतीही त्यांना वाटू लागली.

‘‘छे! असा राक्षसी, अघोरी पाऊस मी प्रथमच बघतो आहे. नक्कीच आपल्यावर देवाचा, निसर्गदेवतेचा कोप झाला असणार म्हणून हे अस्मानी संकट आपल्यावर कोसळले,’’ असे त्यांच्यातील जरा वयस्कर शेतकरी चिंतेने म्हणाला.

‘‘अहो, बाबाजी, पण कोप का होईल?’’ दुसऱ्याने विचारले.

‘‘नक्कीच आपल्यापैकी कुणीतरी पापी, दुष्ट असणार. त्याला आपण आपल्यापासून दूर सारू या. या देवळातून बाहेर काढूयात, नाहीतर आपल्या सर्वाचाच नाश होईल.’’ तिसरा कुणी घाबरट आवाजात म्हणाला.

’‘हो, पण वाईट कोण आहे हे आपण कसं शोधणार?’’ असा प्रश्न एकाने विचारताच दुसऱ्याने म्हटले, ‘‘मला एक छान कल्पना सुचली आहे. आपण आतापर्यंत उडणाऱ्या आपल्या टोप्या कशाबशा सांभाळल्या आहेत; त्या आपण देवळाच्या बाहेर धरूयात मग कदाचित देवच, पर्जन्यदेवताच आपल्याला काही मार्ग दाखवेल आणि आपल्यापैकी वाईटकोण आहे ते बरोबर शोधून देईल.’’

त्या माणसाच्या म्हणण्याप्रमाणे सर्वानी आपापल्या टोप्या त्या देवळाच्या भिंतीबाहेर धरल्या. नंतर क्षणार्धात परत वीज कडाडली आणि त्यातील एका शेतकऱ्याची हॅट उडून जाऊन त्या विजेने जळून राख झाली. ती हॅट नेमकी त्या गरीब, प्रामाणिक शेतकऱ्याची होती. साहजिकच इतर सारे त्याला देवळाबाहेर ढकलून काढू लागले. आतापर्यंत फारसे काही न बोललेला तो सज्जन शेतकरी इतरांकडे गयावया करत म्हणाला ‘मी काहीच पाप केले नाही. मी तर नेहमी सर्वाशी चांगले वागतो. माझ्यावर माझी बायकामुले अवलंबून आहेत. मी बाहेर या राक्षसी वादळापावसात वीज पडून मरेन. मला नका बाहेर काढू.’’

पण कुणीही त्या गरीब शेतकऱ्याचे ऐकले नाही. ‘‘चल, पापी, दुष्ट माणसा.. निघ,’’ असे म्हणत सर्वानी त्याला बाहेर ढकलले. बिचारा कसाबसा लंगडत दूर असलेल्या एका झाडाखाली आसऱ्याला जाऊन पोहोचतो ना पोहोचतो तोच परत एकदा जोरदार वीज चमकली आणि इतर शेतकरी होते त्या देवळावर पडली. क्षणात ते देऊळ भस्मसात झाले, आतील शेतकऱ्यांसकट. खरं तर आतापर्यंत ते सारे सुरक्षित होते ते त्यांच्यात उपस्थित असलेल्या सज्जन शेतकऱ्यामुळेच.

मुलांनो, खरं तर कोणत्याही लोककथां मधला संदेश महत्त्वाचा. दैवी कोप, वगैरे गोष्टींच्या निमित्ताने सांगायचे एवढेच की उगीचंच एखाद्याला वाईट, पापी म्हणून कुणाचाच कुणीही दु:स्वास करू नये. लोकांना समोरच्याला दोषी ठरवण्यापेक्षा आपल्यात काही दोष, कमतरता नाहीत ना, याचा विचार करा.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Value of gentleness balmaifal article abn

Next Story
थकल्या-भागल्या आईसाठी
ताज्या बातम्या