श्रीनिवास बाळकृष्ण
मित्रा,
मला माहित्येय की तुला कशाकशामुळे राग येत असेल. पण तुला हे माहित्येय का की आपल्याला मुळात राग येतोच का? नाही ना? सोड, मलाही माहीत नाही. पण मला हे आठवतंय की, मला पहिला राग मी चार महिन्यांचा बाळ असतानाच आला. बहुधा मला खसाखसा अंघोळ घातली असेल किंवा बोबड्या आवाजात कर्कश्शपणे माझ्याशी कुणी बोलत असेल. मी रागात कसा दिसतो हे मी पाहू शकलो नाही. रागात आल्यावर आरशात पळत जाऊन स्वत:ला पाहण्याचा प्रयत्नही फसला, त्यामुळे आजही मी माझ्या रागाला पाहू शकलो नाही. पण स्वत:चा आणि इतरांचा राग ‘ऐकता’ मात्र येतो.
मित्रा, हा मुळात राग दिसतो तरी कसा? तो काळा की पांढरा हेही मला माहीत नाही. तुला दिसलाय का रे तुझा राग? कोणत्या रंगाचा आहे? तुझे वेगवेगळे राग रंगीत असतात की एकाच रंगात? राग वाढत जाताना त्याचा आकारही वाढतो का? राग निवळताना कुल्फीसारखा पातळ पसरतो का? मनात दाबून ठेवलेल्या रागाचे रंग घट्ट कडक असतात का?
रागाचं चित्र काढून पाहूया का?
चल, मनात पटकन एक तुझा आवडता राग आण- छोटा किंवा मोठा, कसाही चालेल. त्यानुसार आकाराचा कागद घे. डोळे बंद करून आठव की, हा राग गुळगुळीत आहे की काटेरी? साधारण कुठल्या रंगात येतोय? तसे रंग हाताशी घे. ब्रश, टूथब्रश, हाताची बोटे, चमचा… काय पाहिजे ते वापर. पण मनातून तो कागदावर पूर्णपणे आण.
रागात काही लिहायचं नाहीये. ज्याच्यावर रागावलो आहे त्याचे चित्र काढायचं नाहीये… निव्वळ रागाचं चित्र काढायचं आहे. अं हं कागद फाडू नकोस. आपल्याला कागदावर राग काढायचा नाहीये. तर रागाला कागदावर आणायचं आहे.
कसं वाटतंय?
मनातून मोकळं? छान!
रागावून… सॉरी, रंगवून झाले की मला चित्र पाठवायला विसरू नकोस.
तुझा चित्रमित्र,
श्रीबा
शिक्षक आणि पालकांसाठी सूचना…
तुम्हाला छान पाहायला मिळावं म्हणून चित्र जन्म घेत नाही. बोलता-लिहिता न आलेल्या भावना कागदावर व्यक्त होत असतात. यातून मन मोकळं होतं. तुम्हीही मन मोकळं करायला हरकत नाहीच.
पण तसं करून झाल्यावरच मुलांचा राग मोठा की तुमचा हे पाहायला जा. ushriba29@gmail.com

