scorecardresearch

शून्याची धमाल

‘‘एकावर शून्य दहा.. दोनावर शून्य वीस.. तीनावर शून्य तीस.. दहावर शून्य शंभर..’’ बंडू तालासुरावर ठेक्यात आणि मोठय़ा आवाजात घोकत होता.

शून्याची धमाल
(संग्रहित छायाचित्र)

भालचंद्र देशपांडे

‘‘एकावर शून्य दहा.. दोनावर शून्य वीस.. तीनावर शून्य तीस.. दहावर शून्य शंभर..’’ बंडू तालासुरावर ठेक्यात आणि मोठय़ा आवाजात घोकत होता. आजोबा जवळच बसले होते. ते कौतुकानं बंडूचं पठण ऐकत होते. त्याचवेळी बंडूच्या डोक्यात शून्याविषयीचे विचार सुरू होते. शेवटी न राहवून तो म्हणाला,

‘‘आजोबा, हे शून्य खूपच मजेदार आहेत, नाही का?’’

‘‘ते कसं काय बुवा?’’

‘‘आजोबा, कोणत्याही संख्येसमोर शून्य लिहिलं की त्या संख्येचं मूल्य दहा पटींनी वाढते.’’

‘‘होऽऽ! बंडोबा! तू म्हणतोस ते बरोबर आहे. पण बंडू, तुला या शून्याची गोष्ट माहीत आहे?’’ गोष्ट म्हटल्याबरोबर बंडू सरसावून बसला.

‘‘सांगा ना आजोबा शून्याची गोष्ट.’’ आजोबांना उत्सुक श्रोता मिळाला. ते सांगू लागले.

‘‘बरं का बंडोबा, आपण वर्तुळाकार ‘(०)’ शून्य लिहितो ना, तसं पूर्वी लिहीत नसत. किंबहुना शून्य लिहायचं तरी कसं, हे कोणालाच माहीत नव्हतं.

बंडूने प्रश्न उपस्थित केला, ‘‘रोमन लोक काय करायचे?’’

ते समजावून सांगण्यासाठी आजोबांनी जवळच्या आगपेटीतील काडय़ा घेतल्या आणि त्यांच्या मदतीने क,कक,ककक,कश्, श्..  अशा प्रकारे एक ते दहा ही रोमन अंक- मांडणी आजोबांनी बंडूला समजावून सांगितली. पुढे आजोबा म्हणाले, ‘‘बंडू, ही पद्धत कठीण तर होतीच; पण बेरीज, वजाबाकी, गुणाकार आदी गणिती प्रक्रिया करणं या पद्धतीत अवघड होतं.’’

‘‘मग आजोबा, हे शून्य आलं तरी कुठून? आणि ते कोणी आणलं?’’

‘‘बंडोबा, (०) शून्य ही आपल्या भारतानं जगाला दिलेली अमूल्य स्वरूपाची देणगी आहे.’’

‘‘आजोबा, कोणी दिली ही देणगी?’’

‘‘अरे, इ. स. ६३० च्या सुमाराला ब्रह्मगुप्त नावाच्या नामवंत गणितीनं तत्कालीन आंतरराष्ट्रीय गणितींच्या परिषदेत ही शून्य (०) या चिन्हाची, संकल्पनेची देणगी जगाला दिली.’’

‘‘आजोबा, आपल्या भारताच्या दृष्टीनं ही केवढी अभिमानाची गोष्ट आहे, नाही का!’’

‘‘बंडू! तू म्हणतोस ते खरंच आहे. त्या परिषदेत ब्रह्मगुप्त म्हणाले, ‘मित्रांनो! शून्य म्हणजे कशाचाही अभाव, म्हणजेच काही नाही, हे दाखवणारा अंक. बघा, मी काय सांगतो ते नीट लक्षात घ्या. आपण एक ते नऊ हे अंक लिहितो. नऊनंतर अंकलेखनाचं एक चक्र पूर्ण झालं असं दाखविण्याकरिता आपण एक (१) या अंकासमोर शून्य (०) लिहू या, म्हणजे ती संख्या झाली दहा (१०). त्याचप्रमाणे ११, १२, १३.. १९ या संख्यांकरिता अंकलेखनाचं दुसरं चक्र १९ पाशी पूणं होतं म्हणून काय लिहिशील?’’

‘‘आजोबा, सोपं आहे. मी लिहीन दोनावर शून्य वीस (२०). अशा प्रकारे पुढे जात जात आपण ९१, ९२, ९३.. ९९ या संख्या लिहिल्या की संख्या- लेखनाचं दहावं चक्र पूर्ण होतं, म्हणून लिहायचं दहावर शून्य (१००) म्हणजे शंभर.’’

‘‘शाब्बास बंडू, ब्रह्मगुप्ताचं सांगणं पूर्णपणे तुझ्या लक्षात आलं आहे.’’

‘‘ओहोहोऽऽऽ आजोबा, ब्रह्मगुप्तानं जगाला शून्य (०) हे चिन्ह देऊन धमाल केली म्हणायची.’’

‘‘बंडोबा, त्यामुळेच गणितशास्त्रात मोठी क्रांती घडून आली आणि अवरुद्ध झालेला गणिताच्या प्रगतीचा मार्ग मोकळा झाला. तसंच शून्यामुळे जगाला आणखी एक गोष्ट मिळाली. ती म्हणजे संख्यालेखनाची दशमान पद्धती. शून्यामुळे बेरीज, वजाबाकी, आदी गणिती क्रिया सोप्या झाल्या.’’

‘‘आजोबा, शून्य नसतं तर?’’

‘‘तर गणितशास्त्र ‘शून्य’ झालं असतं. शून्य म्हणजे गणिताचं सुदर्शनचक्र. शून्य म्हणजे गणिताचं विकासचक्र. बंडोबा, रिझोनंस नावाच्या नियतकालिकाने तर शून्याचं महत्त्व अधोरेखित करण्याकरिता एक चित्रच प्रकाशित केलं. त्या चित्रात ब्रह्मगुप्ताच्या हातात भलंमोठं शून्य दाखवलं आहे. शून्याच्या दुसऱ्या बाजूला जग उभं आहे आणि अखिल जगताला ब्रह्मगुप्त ते शून्य प्रदान करत आहेत.’’

‘‘ब्राव्हो! ब्रह्मगुप्त ब्राव्हो!!’’ भारावलेला बंडू उद्गारला.

lokrang@expressindia.com

मराठीतील सर्व बालमैफल ( Balmaifalya ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या