परिणीता दांडेकर

वर्षभरात जगभरच्या नद्या, नदी व्यवस्थापन आणि त्यातील प्रयोगांची ओळख करून देणाऱ्या या पाक्षिक सदरातील हा अखेरचा लेख.. नदी व्यवस्थापन ही सरकारची मक्तेदारी नाही; नदी सर्वाची आहे, याची जाणीव करून देणारा..

Dram Hridayangam picture and biography of village culturea
नाट्यरंग: ‘मुक्काम पोस्ट आडगाव’; ग्रामसंस्कृतीचं हृदयंगम चित्र आणि चरित्र
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips
यूपीएससीची तयारी :  भूगोल (भाग २)
I will continue to question the system through my songs Neha Rathod
मी माझ्या गाण्यांतून व्यवस्थेला प्रश्न विचारत राहणार – नेहा राठोड
Cooking Competition in Mumbai on the occasion of Loksatta Purnabraham publication Mumbai
‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’ प्रकाशनानिमित्त आज मुंबईत पाककला स्पर्धा

गेले वर्षभर आपण भारतातील आणि जगभरातील नद्यांच्या आणि नदी व्यवस्थापनाच्या गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ‘पाणी व्यवस्थापन’ हा शब्द वापरला नाही; कारण गेल्या २५ लेखांतून आणि त्यांवर झालेल्या चर्चेतून मांडायचा मुख्य मुद्दा म्हणजे-पाणी हे ‘पाणी’ म्हणून निसर्गात कधीच नसते, ते कुठल्या न कुठल्या जिवंत परिसंस्थेचा भाग बनून येते. मग ती नदी परिसंस्था असो-ज्यात उगम प्रदेश, संगम क्षेत्रे, नदीकाठची राई, खाडी, त्रिभुज प्रदेश सगळेच महत्त्वाचे ठरतात; किंवा भूजल असो-ज्यात पुनर्भरण होण्याच्या जागा असतात, तसेच भूजल अवतीर्ण होण्याच्या जागा असतात. हा अंधारा, गुप्त प्रदेशही जैवविविधतेने संपन्न. जगातील पाणीपुरवठय़ाचा कणा हेच भूजल आहे. परिसंस्थेला दृष्टिआड करून फक्त ‘पाणी’ व्यवस्थापनाच्या, धरणांच्या, प्रदूषण नियंत्रण तंत्रज्ञानाच्या आणि अधिकाधिक पाणीपुरवठय़ाच्या मागे लागून आपण आपलाच घात करत आहोत. जगभरात नदी व्यवस्थापन निसर्गाभिमुख होत आहे. आपल्या उपखंडातील साहित्य, लोककथा, गाणी, कविता यांत पाण्याविषयी एक खोल जाण आहे. सरकारी अहवाल, समित्या, आयोग आणि बैठकी यांना फटकून असलेली ही जिवंत जाण हे आपले संचित आहे व त्यास कमी लेखणे दुर्दैवाचे आहे.

काझी नजरूल इस्लाम म्हणतात,

‘‘एकुल भांगे, ओकुल गॉरे, ए तो नदिर खेला,

सकाल बेलार आमिर रे भाय, फोकीर संध्या बेला’’

– एका तीराला पोखरत दुसऱ्या तीराला समृद्ध करणं ही नदीची तऱ्हाच आहे. या ओळीत फक्त कविता नसून नद्यांचे सत्य आहे!

तर.. वाल्मीकी रामायणात नद्यांचे वर्णन कधीच त्यांच्या पशू-पक्षी-माशांशिवाय करत नाहीत. गंगेचे वर्णन तर फक्त विविध नादांनी (‘नदी’ म्हणजे ‘नाद’ करणारी) केले आहे :

‘‘क्वचित्स्तिमितगम्भीराम् क्वचिद्वेगजलाकुलाम्।

क्वचिद्गम्भीरनिघरेषाम् क्वचिद्भैरवनिस्वनाम्।।’’

तिस्ता नदीच्या धरणांचा अभ्यास करून आलेला सहकारी म्हटला होता, ‘‘सगळ्यात भीतीदायक तिथले खोदकाम, ढासळते डोंगरउतार वा व्यथित लोक हे नाही, तर पूर्णपणे शांत झालेली नदी.’’

रवींद्रनाथ टागोरांच्या लिखाणाची सुरुवात नदीने झाली व अनेकार्थानी शेवटदेखील. ‘जन्मो दिनो’ या त्यांच्या अखेरच्या कवितेत गुरुदेव म्हणतात,

‘‘या आयुष्याला नदीने पोसले आहे.

माझ्या धमन्यांमधून उंच पर्वताचे पाणी वाहते,

जगण्याची पठारे नदीच्या गाळाने

समृद्ध झाली आहेत.

डोळे बंद करीन तसे माहीत आहे मला,

नदीचे अविरत संगीत सोबत असेल माझ्या,

सदैव..’’

नदीची सगळ्यात समृद्ध वर्णने संगम साहित्यात सापडतात. ‘सिलप्पाटिकाराम’ या महाकाव्यात कावेरीची वर्णने वाचताना एका संस्कृतीतले नदीचे अनन्यसाधारण महत्त्व आणि सौंदर्य पानोपानी दिसते. ही कावेरी केवळ शेतीसाठीच पाणी देते असे नाही, तर जाई-जुईची फुले, कमळे, विविध मासे यांनादेखील त्याच प्रेमाने पोसते. संत कवी त्यागराज म्हणतात की, समता आणि एकता कावेरीकडून शिकावी; ती शिक्षित-अशिक्षित, गरीब-श्रीमंत, स्त्री-पुरुष असे भेद करत नाही. संगम काव्यातील पाच भाव किंवा ‘थिनाइ’ हे परिसंस्थेशी जोडलेले आहेत आणि या सगळ्या भावांत कावेरी आहेच : कुिरजी भाव दिसतो कोडागुच्या डोंगरउतारात, पालाई भाव दिसतो थलक्कडच्या वाळवंटात, मुल्लाई भाव दिसतो सीमेच्या भरगच्च जंगलात, मारुतम भाव दिसतो थांजावूरच्या सपाट प्रदेशात, तर नैताल भाव दिसतो कावेरीच्या त्रिभुज संपन्न प्रदेशात. या प्रदेशांच्या आणि मानवी भावछटांच्या वैविध्याला कावेरीच्या प्रवाहाने एकवटले आहे.

वैविध्यातील हीच एकता दिसते गोव्यात-२४ जूनच्या नद्यांचा अन् विहिरींच्या ‘सांव जांव फिएस्टा’मध्ये.. ती दिसते तवांगमध्ये-जेव्हा मोन्पा बौद्ध नदीत घर करणाऱ्या क्रौंच पक्ष्यांची दलाई लामा म्हणून वाट बघतात (वाल्मीकींनीदेखील सीतेचे वर्णन ‘सारस-आरव नादिनी’ असा केला होता).. ती दिसते, जेव्हा भारत-पाकिस्तान सीमेपल्याडचे हिंदू-मुसलमान-शीख सिंधू नदीचा आणि नदीच्या ‘मुर्शिद’ झुलेलालचा उत्सव करतात किंवा काश्मीरमध्ये सिंध-वितस्ता संगमातल्या शेकडो वर्षे जुन्या चिनार वृक्षाची पूजा होते तेव्हा!

कितीही सीमा आखा, नदीचा मूळ स्वभाव माणूस आणि जीवसृष्टीला एकत्र आणणे हा आहे. एक नदी समृद्ध व स्वस्थ असल्याने जी विविधता फुलते, ती नदीला केवळ पाणीपुरवठा करणारा आणि सांडपाणी वाहून नेणारा कालवा समजून समाजाला मिळू शकत नाही. ज्ञानदेव ‘प्रकृती’बद्दल जे म्हणतात ते नदीलादेखील लागू आहे :

‘‘ऐक्याचाही दुष्काळा। बहुपणाचा सोहळा।

जियें सदैवेचिया लिळा। दाखविला॥’’

या सदरात आपण पाहिले की, नदीचे पुनरुजीवन तिच्या काठी सिमेंट ओतून, तिला बंदिस्त करून होत नाही. पूरवाहक क्षमता वाढवण्यासाठी, पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी, काठ स्वस्थ ठेवण्यासाठी, लोकांना विसाव्याचे आणि पर्यावरण शिक्षणाचे हक्काचे ठिकाण बनवण्यासाठी पुनरुज्जीवन हे शास्त्रीयरीत्या, लोकसहभागाने आणि नदीच्या कलाने होणे गरजेचे आहे. आपण जगभरातील अनुभव जाणून घेतले, पुण्यातील ‘जीवितनदी’ संस्थेचे काम तसेच नाशिकमध्ये होत असलेल्या ऐतिहासिक कामाचा आढावा घेतला-ज्यात गोदावरीत ओतलेले काँक्रीट चक्क बुलडोझर लावून काढण्यात येत आहे. सांगण्यास आनंद होतो की, काँक्रीटमुळे मूक झालेले झरे वाहू लागले आहेत व रामकुंडातही अगदी जमिनीलगत भूजल सापडले आहे! ही सरत्या वर्षांतील सर्वात दिलासादायक बातमी असावी!

आपण पूरनियंत्रणाच्या निसर्गाभिमुख प्रयोगांबद्दल जाणून घेतले बघितले : नदीला वाहण्यासाठी जागा देणे, धरणांचे डोळस आणि लोकाभिमुख व्यवस्थापन, नेदरलॅण्ड्स व चीनमध्ये होत असलेले महत्त्वाकांक्षी प्रयोग. असेच उदाहरण आज बेंगळूरुच्या तलाव व्यवस्थापनात दिसून येत आहे. पुराच्या पूर्वसूचना किती विखुरलेल्या आहेत व त्या एकत्रित असणे कसे गरजेचे आहे, यासाठी इतर देश (अगदी बांगलादेशही!) कोणत्या वेगळ्या प्रणाली वापरताहेत, हेही आपण पाहिले.

आपण जंगल राखणाऱ्या ग्रामीण समूहांचे शहरांच्या आरोग्यातले मौलिक स्थान बघितले. अनेक देशांत धरणांभोवतीचा आणि नदी-उगमाचा भाग संरक्षित करून तिथल्या गटांना त्याचा मोबदला दिला जात आहे. आपण भारत आणि महाराष्ट्रातील भूजल व्यवस्थापन ढोबळमानाने समजून घेतले; त्यातले सगळ्यात मोठे अडसर हे आपलेच सरकार आणि क्लिष्ट राज्यकारभार आहे, हेदेखील. गेल्या दशकात चार मोठे दुष्काळ येऊनही भूजल कायदा महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने लागू झाला नाही.

मुक्तवाहिनी नद्यांचे महत्त्व समजून घेतले : एक बारकी मुक्तवाहिनी नदी हजारो लोकांना रोजगार पुरवू शकते, जीवसंस्थेला फुलवू शकते व शहरांना हवामान बदलाच्या धक्क्यातून सांभाळू शकते. अशा मुक्तवाहिनी नद्या संरक्षित करण्यासाठी जगभर प्रगत कायदे आहेत. आपल्याकडे मात्र प्रत्येक नदीवर सगळी शक्य असलेली धरणे बांधायची जणू शर्यत आहे; नदी मुक्तवाहिनी दिसली की- ‘समुद्राकडे जाणारे पाणी वाया’ असे तद्दन बिनडोक आणि अशास्त्रीय शेरे ऐकवले जातात.

यंदा सप्टेंबरमध्ये अनन्वित पावसानंतर आपण हवामान बदलाविषयी चर्चा केली. बदलते हवामान हे अप्रूप नसून आपले वास्तव आहे आणि त्यामागे न लपता त्याचा स्वीकार करून वाटचाल करणे शक्य आहे. उगम प्रदेशांचे महत्त्व जाणून घेताना चारधाम-यात्रा महामार्गसारख्या प्रकल्पांचे गंभीर परिणामदेखील पाहिले. नदीचा आकार घडवणारी वाळू, तिचे पाणी साठवण्याचे, पूर नियंत्रणाचे कार्य, तसेच वाळूउपशाचे वास्तवही समजून घेतले.

याबरोबरच, प्रशासनाचे प्रश्न : नवा पर्यावरणीय आघात मूल्यमापन नियमावलीचा (ईआयए) मसुदा व त्यातील गंभीर त्रुटी; महाराष्ट्र सरकारला असलेली समित्यांची आवड आणि त्यांचा शून्य उपयोग; पाणीपुरवठय़ातील असमानता, त्यात दलित, स्त्रिया आणि गरीब यांना मिळणारी दुय्यम वागणूक-हे वास्तव बघितले. पाण्याचा प्रश्न फक्त सरकारी बाबूंचा, तंत्रज्ञानाचा, गुंतवणुकीचा नसून मानवी हक्काचा आहे.

मात्र, काही महत्त्वाचे विषय राहून गेले. पण अनेक प्रतिक्रिया आल्या, ईआयए मसुद्यावर अनेकांनी सरकारला पत्रे पाठवली, टाळेबंदीमध्ये नद्यांचे आरोग्य विविध गटांनी तपासले, नद्यांची बोलीभाषेतील शेकडो नावे पत्रांद्वारे कळवली, माशांच्या प्रजाती कळवल्या, आपल्या नदीतील माशांच्या आणि मासेमारांचा अभ्यास सुरू केला. यात हेच अधोरेखित झाले की, नदी व्यवस्थापन सरकारची मक्तेदारी नाही. नदी सर्वाची आहे. आपण जितके नदीला विविध अंगांनी समजून घेऊ, प्रसंगी सरकारला प्रश्न विचारू, समोर उभे ठाकू, कधी हात पुढे करून एकत्र काम करू, तितके महत्त्वाचे.

भारतात डोळस नदी व्यवस्थापनासाठी ना तंत्रज्ञानाची कमतरता आहे, ना पैशाची. गरज आहे ती आपल्या नदीसाठी एकत्र येत राहण्याची-प्रशासनात आणि निर्णय प्रक्रियेतदेखील. असे तरुणांचे, प्रौढांचे, शहरांतले, गावांतले गट पुढे येतच आहेत..

‘‘तयाचिया गांवींचिया। नदी अमृतें वाहाविया।

नवल कायि राया। विचारीं पां॥’’

लेखिका ‘साउथ एशियन नेटवर्क ऑन डॅम्स, रिव्हर्स अँड पीपल’ या ‘ना नफा’ संस्थेसाठी काम करतात.                                  

ईमेल : parineeta.dandekar@gmail.com