एखाद्याची प्रगती किती वेगवान असू शकते? ज्यांची शिक्षण घेण्याची भ्रांत होती त्या बी. बी. ठोंबरे यांनी जिद्दीने शिक्षण तर घेतलेच; परंतु त्याचबरोबर त्यांनी आपल्या उद्यमशीलतेने व्यवसायाची उलाढाल आज तब्बल साडेचारशे कोटींच्या घरात नेली आहे. साखर, पोलाद ही उत्पादने रांजणीसारख्या खेडय़ातून निर्यात होतात. दूध आणि जलसंधारणाच्या कामात आदर्श ठरेल असे काम ठोंबरे उभे करत आहेत.

केवळ स्वत:च्या प्रगतीची स्वप्ने कितीही उत्तुंग असली, तरी सामूहिक प्रगतीची उदाहरणे समोर आली की ही स्वप्ने हिरमुसली होतात. कारण सामूहिक प्रगतीसाठी उत्तमाचा ध्यास, समूहाचा विकास आणि कष्टांची आस ही त्रिसूत्री रुजवावी लागते. ती आपोआप रुजत नसते. त्यासाठी मनाची तशी जडणघडण असावी लागते. असे मन घडण्यासाठी दुसऱ्याची दु:खे, समस्या स्वत: अनुभवाव्या लागतात. दुष्काळी मराठवाडय़ाला असंख्य समस्यांनी घेरले आहे. शेतकरी तर पुरता पिचला आहे. परंतु या पाश्र्वभूमीवरही आशेचे, नव्या उमेदीचे काही किरण चमकदारपणे या परिसराला उमेद देत आहेत. भैरवनाथ ठोंबरे हा असाच एक आशेचा किरण! या नुसत्या नावाच्या उच्चारानचे शेतकऱ्यांच्या नजरेतील निराशेचे सावट दूर होताना दिसते. कारण या माणसाने समस्यांना संपविण्याचा ध्यास घेतला आहे. त्यासाठी अगोदर साऱ्या समस्या स्वत: अंगावर घेतल्या आणि त्यांच्याशी संघर्ष करून त्या परतवून लावल्या. भैरवनाथ ठोंबरे यांच्यापासून आता समस्या दूरच उभ्या राहतात.
भैरवनाथ तथा बी. बी. ठोंबरे हा मराठवाडय़ाच्याच नव्हे, तर अवघ्या उद्योग-कृषीविश्वाच्या यशाचा एक आलेख आहे. शिखरावर पोहोचेपर्यंत कधीही त्याने उतरणीची दिशा पाहिलेली नाही. रांजणी हे तसे छोटेसे गाव. तिथे फक्त चौथीपर्यंतचीच शाळा. त्यानंतर शिकायचे तर बाहेरगावी जावे लागे. ज्यांची परिस्थिती चांगली असे त्यांची मुले परगावी शिकायला जायची. भैरवनाथच्या घरची स्थिती तशी नाजूकच. अगदी खायचे-प्यायचे वांदे जरी नसले, तरी परगावी मुलाला शिकायला ठेवून पैसा देता येईल अशीही नव्हती. त्यामुळे चौथीनंतर शाळा सुटली. वडिलांनी सांगितले, ‘आता शेतातली कामं कर!’ तेव्हा भैरवनाथसमोर मुकाटपणे घरची गुरे राखण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. मग सहा महिने गुरांमागे भटकण्यात गेले. रांजणीच्या शाळेत एक चुणचुणीत मुलगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भैरवनाथला याचे खूप वाईट वाटत होते. भैरवनाथचे शिक्षण सुटल्याचे त्याच्या आजोबांना समजले. तेव्हा त्यांनी त्याला येरमाळाजवळील कडकनाथवाडीतील शाळेत टाकण्याचा निर्णय घेतला. गावाहून आई-वडिलांना सोडून जाताना भैरवनाथला वाईट वाटले नाही, कारण त्याला पुढे शिकायचे होते. पाचवीत इंग्रजी शिकणाऱ्या भैरवनाथाचे नाव आता ‘बी. बी.’ झाले होते. पुढे बी. बी. ठोंबरे या नावाची जादू ‘नॅचरल’मुळे सर्वदूर पसरली.
एखाद्याची प्रगती किती वेगवान असू शकते? त्यांच्या व्यवसायाची उलाढाल आज तब्बल साडेचारशे कोटींच्या घरात गेली आहे. साखर, पोलाद ही उत्पादने रांजणीसारख्या खेडय़ातून निर्यात होतात. दूध आणि जलसंधारणाच्या कामात आदर्श ठरेल असे काम बी. बी. ठोंबरे उभे करत आहेत. साखर कारखानदारीच्या क्षेत्रात ते प्रत्येकाला हवेहवेसे वाटू लागले आहेत.
हे सगळे घडले ते शिक्षणामुळे. चौथीनंतर प्रत्येक टप्प्यावर शिक्षणासाठी संघर्ष सुरू झाला. जिथे सोय होईल तिथे जायचे, पण शिक्षण अध्र्यावर सोडायचे नाही, हे भैरवनाथ ठोंबरेंनी पाचव्या इयत्तेतच मनाशी पक्के ठरवले होते. कडकनाथवाडीलाही शाळा फक्त सातवीपर्यंतच. त्यामुळे १९६४ साली पुन्हा त्यांना पुढील शिक्षणासाठी बार्शीला जावे लागले. आजोबांनीच शिक्षणाचा भार उचलला. दर आठवडय़ाला आजोबा डोक्यावर शिधा घेऊन बार्शीला यायचे. पुढे आठवडाभर हाताने ते स्वयंपाक करायचे आणि शिकायचे. खडतर परिस्थितीत तावूनसुलाखून, अपार कष्ट उपसत शिक्षण घेतले की सरस्वती प्रसन्न होते म्हणतात. दहावीत सोलापूर जिल्ह्यतून तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या भैरवनाथाच्या डोळ्यात इतर हुशार मुलांसारखीच डॉक्टर किंवा इंजिनीअर बनण्याची स्वप्ने तरळत होती. पण या शिक्षणासाठी तेव्हा पाच हजार रुपये लागायचे. तेवढी रक्कम त्यांच्यापाशी नव्हती. म्हणून मग त्यांनी बार्शीच्या प्रभावती झाडबुके महाविद्यालयात कॉमर्सला प्रवेश घेतला. कारण या महाविद्यालयात तेव्हा विज्ञान शाखा नव्हती. पुढे एम. बी. ए. करण्यासाठी त्यांनी कोल्हापूर गाठले आणि पुढच्या आयुष्याची दिशा हळूहळू स्पष्ट होऊ लागली. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर हिंदुस्थान पेट्रोलियममध्ये त्यांना नोकरी मिळाली. पण तिथे त्यांचे मन काही रमले नाही. ज्या मातीतून आपण आलो तिथेच पुन्हा जाऊ या असे म्हणत त्यांनी मराठवाडय़ातील अंबाजोगाई साखर कारखान्यात लेखापाल म्हणून नोकरी पत्करली. पुढे भास्करराव खतगावकरांच्या कारखान्यात मुख्य लेखाधिकारी आणि नंतर शिवराज पाटील चाकूरकर प्रवर्तक असलेल्या नळेगाव कारखान्यावर बी. बी ठोंबरे रुजू झाले. त्यांची कामावरची निष्ठा आणि पद्धत तोपर्यंत अनेकांना माहीत झाली होती.
कशी होती त्यांच्या कामाची पद्धत?
..विलासराव देशमुखांच्या मांजरा कारखान्यात व्यवस्थापकीय संचालक पदावर ते काम करत होते. कारखान्याच्या निवडणुका घोषित झाल्या होत्या. विलासरावांच्या विरोधकांनी आरोपांची राळ उठवली होती. मनोहर गोमारे हे त्यांचे विरोधक. ते मांजराचे सभासद असतानाही त्यांचा ऊस गाळपासाठी आणला जात नव्हता. एवढा विरोध करणाऱ्या व्यक्तीचा ऊस गाळपच करू नका, असे सांगणाऱ्या संचालकांची संख्या अधिक होती. गळित हंगाम संपत आला होता. गोमारेंचा ऊस गाळप होणार नाही, असेच सर्वजण सांगायचे. तेव्हा ठोंबरेंनी धाडसाने विलासरावांना सांगितले, ‘ते कारखान्याचे सभासद आहेत. राजकारण काहीही असले तरी नियमानुसार त्यांचा ऊस आणणे बंधनकारक आहे.’ ठोंबरेंचे म्हणणे विलासरावांना पटले. गोमारेंच्या ऊसाचे गाळप करण्यासाठी एक दिवस अधिकचा कारखाना सुरू ठेवला गेला. त्यातून असा संदेश गेला की, विलासराव सुडाचे राजकारण करीत नाहीत. विरोधकांचा ऊस अगदी निवडणुकीतही गाळप होतो. याचा पुढे विलासरावांना निवडणुकीत लाभच झाला. त्यातून नियमांचा आग्रह धरणारा, योग्य नियोजन करणारा माणूस अशी बी. बी ठोंबरेंची प्रतिमा निर्माण झाली.
राजकीय पटलावर तेव्हा बऱ्याच घडामोडी घडत होत्या. १३ दिवसांच्या अटलबिहारी वाजपेयींच्या सरकारकडून गोपीनाथ मुंडे यांना परळीत कारखाना काढण्याची परवानगी मिळाली तेव्हा ठोंबरेंना त्यांनी बोलावून घेतले. विलासरावांनीही त्यांना परवानगी दिली आणि वैद्यनाथ साखर कारखान्याच्या उभारणीत व त्याची घडी बसवून देण्यातही बी. बी. ठोंबरेंनी सिंहाचा वाटा उचलला. सरकारने याच काळात खासगी साखर कारखान्यांनाही परवानगी दिली. तेव्हा पहिला अर्ज बी. बी ठोंबरे यांनी केला. रांजणीच्या ज्या शेतात आपले आई-वडील राबले, तेथेच कारखाना उभा करण्याचे स्वप्न ठोंबरे यांनी पाहिले. १८ कोटी रुपयांच्या शेतकऱ्यांच्या गुंतवणुकीतून हा खासगी साखर कारखाना उभा राहिला. आता त्याची क्षमता पाच हजार मेट्रिक टन ऊस गाळपाची आहे. इथेनॉल, आसवानी प्रकल्प सुरू करतानाच वीजनिर्मिती करण्याचेही त्यांनी ठरविले. त्यांनी सहा मेगावॅट वीजनिर्मिती केली; पण त्या विजेची खरेदी करण्यास कोणीच तयार नव्हते. ही ऊर्जा वाया जाऊ नये म्हणून त्यांनी पोलादनिर्मिती सुरू केली आणि या क्षेत्रातही भरारी घेतली. रांजणीहून पाकिस्तानला पोलाद निर्यात होऊ लागले.
व्यवसाय सांभाळताना जगाचे भान असावे लागते. साखरेच्या क्षेत्रातील सर्वोत्तम तंत्रज्ञान आपल्या कारखान्याकडे असावे, त्यात उत्तम व्यवस्थापन असावे, यासाठी केवळ कर्मचाऱ्यांसमोर भाषणे झोडून चालत नाहीत, तर झपाटलेल्या सहकाऱ्यांचा संच तयार करावा लागतो. त्यासाठी नेत्याकडे संघटनाचे असामान्य कौशल्य असावे लागते. बी. बी. ठोंबरेंच्या नॅचरल शुगरमध्ये काम करणारी मंडळी रांजणीसारख्या गावातही युनिफॉर्ममध्ये कारखान्यात येतात. मराठवाडय़ात कारखाना असूनही यंत्रणेत कुठल्याही प्रकारे आळस येणार नाही याची पुरेपूर काळजी ते घेतात. म्हणूनच गंधकविरहित अतिशुद्ध साखरेची निर्यात करण्याचे स्वप्न गेल्या सात वर्षांपासून इथे वास्तवात अवतरले आहे.
ऊस टिकवायचा असेल तर पाणी असायला हवे. मराठवाडय़ातील पाण्याची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालल्याने जलसंधारणाची कामे हाती घेणारा हा एकमेव कारखाना असावा. एवढेच नाही तर उसातील पाण्याचा प्रक्रियेसाठी पुनर्वापर करत साखर कारखानदारीला इथे नवे आयाम लाभले. केवळ ऊसच नाही, तर बगॉससाठी लागणाऱ्या तुराटय़ा-पराटय़ासुद्धा त्यांनी शेतकऱ्यांकडून विकत घेतल्या. ७५० रुपये प्रतिटन तुराटय़ांना व टाकाऊ कचऱ्यालाही त्यांनी भाव दिला. ग्रामीण भागातील तरुणांच्या हाताला काम मिळावे, या उद्देशाने कार्यरत असणाऱ्या बी. बी. ठोंबरे यांनी दूधप्रक्रिया उद्योग सुरू केला. सहकारी तत्त्वावरील पतसंस्थांचे मोठे जाळे उभे केले. गावातील मुलांसाठी इंग्रजी माध्यमाची शाळा त्यांनी उभारली. ‘नॅचरल’च्या परिसरात कुणासही व्यसन करता येणार नाही असा त्यांचा दंडक आहे. दारू, गुटखा व धूम्रपान न करणारे कर्मचारी आज ‘नॅचरल’च्या यशाची कमान उंचावत आहेत. कर्मचारी चांगले असतील तरच उद्योगाचा डोलारा टिकतो, हे
माहीत असल्याने अनेक योजना ते हाती घेत असतात. कर्मचाऱ्यांच्या वृद्ध माता-पित्यांना व्यवस्थित आयुष्य जगता यावे यासाठी त्यांच्या पगारातील दहा टक्के रक्कम कापून घेऊन आई-वडिलांच्या खात्यात भरली जाते. त्यामुळे कर्मचारी मानसिकदृष्टय़ा नीटपणे काम करू शकतो असा दावा ठोंबरे करतात. ग्रामीण भागात असो किंवा शहरात, व्यवसाय वाढवायचा असेल तर माणसे बांधावी लागतात, असे ते म्हणतात. शिकायला मिळेल की नाही, अशा वातावरण वाढलेले ठोंबरे आज स्वत: तर मोठे झालेच आहेत; त्याचबरोबर सबंध रांजणी पंचक्रोशीतील अर्थकारणही त्यांच्याशी निगडित झाले आहे. ते सध्या खासगी साखर कारखानदार संघटनेचे अध्यक्ष आहेत. विविध सरकारी समित्यांवर ते काम करतात. समस्येची नाहक चिंता करत बसण्यापेक्षा त्यावर उपाय शोधण्याकडे त्यांचा कल असतो. त्यामुळे मराठवाडय़ात बी. बी. ठोंबरेंची ओळख ‘गोड’ माणूस अशीच होते.
सुहास सरदेशमुख – suhas.sardeshmukh@expressindia.com

Kolhapur district, election campaign, caste and religion issues, kolhapur, hatkanangale constituency
कोल्हापूरच्या पुरोगामी भूमीत जाती धर्माच्या आधारातून मतांची जुळवाजुळव
sanjay ruat and shrikant shinde
श्रीकांत शिंदे फाऊंडेशनमध्ये गैरव्यवहार? संजय राऊतांची थेट मोदींकडे तक्रार; म्हणाले, “बिदागीच्या रकमा…”
Ramzan 2024
रमजान: जगातील विविध धर्मीय उपवासाच्या परंपरा नक्की काय सांगतात?
Uddhav Thackeray Patrika Major Change On 1st May
उद्धव ठाकरेंच्या कुंडलीत ‘१ मे’ला मोठा बदल, यश येईल भाळी; ज्योतिषी उल्हास गुप्ते सांगतायत नेमकं घडणार काय?