गुहागरच्या बस स्टँडवर उतरलो तेव्हा बाहेर उजाडलं होतं. नुकतीच पावसाची सर कोसळून गेलेली होती. उन्हाळ्यानं करपलेल्या डोंगरदऱ्यांवर तजेल्याची झालर पसरली होती. नुकत्याच डोकावू लागलेल्या हिरव्या कोंबांचा गालिचा दूरदूपर्यंत अंथरलेला होता. गुहागरला निसर्गाचं अनोखं देणं लाभलेलं आहे. कितीही वेळा पाहिला तरी इथला निसर्ग प्रत्येक वेळी नवाच भासतो. निसर्गाचं हे नवेपण डोळ्यांत साठवतच गुहागपर्यंतचा प्रवास संपवून मी स्टँडवर उतरलो. स्टँडच्या कोपऱ्यावरल्या वर्तमानपत्रांच्या स्टॉलजवळ गेलो. गावातलाच एक तरुण कट्टय़ावर बसून पेपर वाचत होता. थंड नजरेनं एकदा मला पुरतं न्याहाळून त्यानं पुन्हा पेपरात डोकं घातलं.
‘इथून शिरवली कुठेसं आलं?’ तो आपल्याकडे पाहतही नाहीये हे लक्षात येऊनही मी त्यालाच विचारलं. त्यानं समोरचा पेपर बाजूला केला.
‘शिरवली..? पयल्यांदाच ऐकतोय हे नाव. कुठून मुंबईवरनं आलात?’ त्यानंच मला प्रतिप्रश्न विचारला. मी मानेनंच ‘हो’ म्हणालो.
‘असं कसं..? मला तर गुहागरजवळच्या शिरवलीचाच पत्ता दिला होता. असं काही गावच नाही इथे?’ मी म्हणालो. बाजूलाच उभ्या असलेल्या कंडक्टरनेही माझ्याकडे विचित्रपणे पाहिलं.
‘आमच्या विरारजवळ आहे एक शिरवली.’ तो हसत हसत म्हणाला आणि फलाटावर लागलेल्या गाडीकडे झपझप निघूनही गेला. ‘गुहागर-अर्नाळा’ गाडी भरली होती. त्यानं बेल मारली आणि गाडी निघून गेली. त्या तरुणानं आणखी एक-दोघांना विचारलं. ‘तुला माहीत आहे काय रे शिरवली?’.. सगळ्यांनीच माना आडव्या हलवत हात उडवले. तो तरुण मग पुन्हा पेपरात डोकं खुपसून बसला.
मी तिथून बाजूला झालो. बाजूलाच उभा असलेला, इयरफोन लावलेला एक मुलगा आमचं बोलणं बहुधा ऐकत होता. तेवढय़ात त्यानं कुणाला तरी मोबाइलवरनं फोन केला होता.
‘पक्षीनिरीक्षणाला आलायत?’ त्यानं मला विचारलं. आणि आपण पत्त्याच्या आसपास पोहोचतोय याची खात्री झाल्यानं मी मानेनंच ‘हो’ म्हटलं.
‘नंदू तांबेकडं जायचंय?’ त्यानं पुन्हा विचारलं. मी शोधत होतो तोच पत्ता तो आता न विचारताच मला सांगणार होता.
‘तुम्ही खूप पुढे आलायत. आता पुन्हा चिपळूणकडे जाणारी गाडी पकडा आणि गुढे फाटय़ावर उतरा. पुढे सहा-सात किलोमीटर आत शिरवली आहे. रिक्षा, वडाप काय तरी मिळेल..’ त्यानं सांगितलं. मी समोरचीच एक एसटी बस पकडून गुढे फाटय़ाचं तिकीट काढलं. नंदू तांबेकडेच मला जायचं होतं.
नंदू तांबे म्हणजे शिरवलीचा अवलिया. त्याच्याबद्दल खूप ऐकलं होतं. घराच्या आसपास चाळीसएक एकरावरचं मालकीचं जंगल त्यानं जीवापाड जपलंय. तिथल्या प्रत्येक झाडाची तो दिवसरात्र काळजी घेतोय. म्हणूनच अगदी पाच-सहाशे वर्षांच्या जुनाट झाडापासून पाच-सहा वर्षांच्या नवख्या झाडापर्यंत असंख्य झाडं त्याच्या जंगलात विश्वासानं वाढतायत.
असं आश्वस्त वातावरण असलं की प्राणी-पक्षीही तिथे बिनघोरपणे वावरू लागतात. नंदू तांबेच्या जंगलात अनेक दुर्मीळ पक्षी विणीच्या हंगामात मुक्कामाला येतात. काही पक्षी तर इथेच जन्मले. त्यांच्या पुढच्या पिढय़ाही इथल्याच झाडांच्या अंगाखांद्यांवर वाढल्या. अनेक वन्यप्राण्यांनी हक्कानं या जंगलाचा आसरा घेतलाय. कोकणात जंगलांची तशी वानवा नाही. जमिनीवर दिवसभर सूर्यप्रकाशही पोहोचत नाही अशी जंगलं कोकणातील डोंगरदऱ्यांत अजूनही आढळतात. त्यामुळे जंगल हे इथे अप्रूप नाहीच. पण जंगलं विकून पैसा करायची प्रवृत्ती वाढत असताना जंगल जपण्याचा आणि ते वाढवण्याचा प्रयोग नंदू तांबे नावाचा तरुण करतोय, हे ऐकल्यामुळे त्याची भेट घ्यायचीच असं मी ठरवलं.
अमेरिकेतल्या कुणा जोडप्यानं तीनशे एकर वैराण जमीन विकत घेऊन अपार कष्टाने तेथे जंगल फुलवल्याची एक बातमी नुकतीच वाचल्यानं नंदू तांबेच्या या खासगी जंगलाबाबतची माझी उत्सुकता शिगेला पोहोचली होती. त्या दिवशी सकाळी उलटासुलटा प्रवास करून मी अखेर नंदू तांबेच्या घरी पोहोचलो. अगोदर बोलणं झालेलं असल्याने लगेचच मांडवाखालच्या अंगणात आमच्या गप्पा सुरूही झाल्या. नंदू त्याच्या जंगलसंवर्धनाची हकिकत सांगत होता. या जंगलात कोकणातली दुर्मीळ होऊ पाहणारी झाडं आहेत. बिब्बा आहे. काळा बिब्बा आहे. कडू कवठ आहे. आणि आंबा-फणसाच्या झाडांची तर रेलचेलच आहे. तीन माणसांच्या कवेत मावणार नाही एवढं प्रचंड पाच-सहाशे वर्षांचं जुनं आंब्याचं झाड त्याच्या या जंगलात आहे. या आगळ्या संपत्तीचं वर्णन करताना नंदूचा आवाज अभिमानानं फुलून येतोय, हे जाणवत होतं.
तो बोलत होता आणि मी उगीचच त्याचं बोलणं संपू नये म्हणून मधूनमधून प्रश्न विचारत सुटलो होतो. अचानक तो थांबला. मला खूण करून त्यानं उठवलं आणि मी त्याच्या पाठोपाठ मांडवाबाहेर गेलो. शंभरएक फुटांवर एका तारेवर बसलेला एक खंडय़ा त्यानं मला दाखवला. हा वेगळा, दुर्मीळ प्रजातीचा खंडय़ा होता. सगळ्यात लहान आकाराचा, तीन बोटांचा.
‘आता तो खालच्या तारेवर जाऊन बसेल.. बघा. लक्ष द्या.’ नंदू म्हणाला. आणि पुढच्याच सेकंदाला त्या खंडय़ानं झेप घेऊन खालच्या तारेवर झोका घ्यायला सुरुवात केली. काही मिनिटं तो देखणा पक्षी नीट न्याहाळल्यानंतर आम्ही पुन्हा अंगणातल्या खुच्र्या पकडल्या आणि नंदूचं ‘जंगलबुक वाचन’ पुढे सुरू झालं..
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या आदेशामुळे त्यांच्या कार्यालयातील एक अधिकारी मुद्दाम नंदू तांबेचं जंगल बघायला या आडगावी आले होते. साहजिकच त्यांच्याशी गप्पा मारताना सरकारच्या जलसंवर्धन योजनांचा विषय निघताच सरकारी योजना कशा तकलादू आहेत, हे नंदूनं ताडकन् त्यांना सांगून टाकलं. ‘आज पाणी साठवण्यासाठी, ते वाचवण्यासाठी पाणीयोजना तयार कराल; परंतु या पाणीयोजनांमध्ये कालांतरानं गाळ साचणार, मग त्यांची साठवणक्षमता कमी होणार, आणि लाखो लिटर पाणी साठवण्यासाठी केलेल्या या पाणीयोजनांमध्ये काही वर्षांनी फक्त हजारो लिटरची क्षमताच उरणार. हे सगळं कशामुळे होणार, याच्या मुळाशी सरकारनं जायला हवं,’ असं त्याने सांगितलं तेव्हा तो अधिकारी नंदूकडे पाहतच राहिला होता. हे गणित काय आहे, आणि त्याचं उत्तर काय, हे नंदूच सांगू शकेल हे त्याने जाणलं.
‘जंगलं राखली नाहीत तर जमिनीची धूप होणार. ती माती तुमच्या पाणीयोजनांच्या तळाशी साठणार आणि ते गाळानं भरणार. आणि मग पाणीटंचाई पुन्हा कायमच राहणार. मग असं वर्षांनुवर्षे गाळ उपसून पाणीयोजना जगवण्यापेक्षा जंगलतोडीवर र्निबध आणा. जंगलं जपा. जंगलं वाढवा. जमिनीची धूप थांबवा, असं मी त्या अधिकाऱ्याला थेटपणे सांगितलं..’
नंदूच्या बोलण्यातील निखळ कोकणीपणा त्या अधिकाऱ्याला जाणवला असावा. त्याने त्याचा हा सल्ला शांतपणे ऐकून घेतला असणार असं माझ्या मनात आलं.
बोलता बोलता मधेच थांबून नंदूने बोट वर केलं.
‘हा आवाज ऐकलात?’ लांब कुठेतरी एका आवाजाकडे कान लावत त्यानं मला विचारलं. आसपास तर असंख्य पक्ष्यांची गोड किलबिल अखंडपणे सुरूच होती. सगळे आवाज एकमेकांत मिसळून एक सुरेल संगीत साधलं होतं. तरीही नंदूच्या कानांनी त्यातला एक वेगळा आवाज टिपला होता.
‘हा अलर्ट कॉल आहे. गरुड येतोय. बाकीच्या पक्ष्यांनी एकमेकांना सूचना द्यायला सुरुवात केलीय..’ असं सांगतच तो उठला आणि लांबवरच्या एका उंच झाडाकडे बोट करून उभा राहिला. काही क्षणांतच ऐसपैस पंख पसरलेला एक भव्य पक्षी त्या झाडाच्या शेंडय़ावर स्थिरावला.
‘गरुडाचं घरटं..!’ नंदू म्हणाला, ‘आपल्याएवढा माणूस आरामात बसू शकेल एवढं मोठं ऐसपैस घरटं असतं त्याचं.’
तेवढय़ात त्या घरटय़ातून काही पिल्लंही बाहेर आली होती. ‘आणखीन काही दिवसांनी ती उडायला लागतील..’ तो कौतुकानं सांगत होता.
माझं कुतूहल वाढलं होतं. ‘हे पक्षी दरवर्षी इथे येऊन घरटी बांधतात?’ मी अगदीच बाळबोध प्रश्न विचारला आणि नंदू हसला. ‘नाही. काही पक्ष्यांनी आपली घरं कायमस्वरूपी बांधूनच ठेवलीयत. ते दरवर्षी त्यांच्या या घरी येतात..’ तो म्हणाला. त्यानं विशिष्ट आवाज काढत शीळ घातली. पुढच्याच सेकंदाला लांबवरून तशीच शीळ ऐकू आली आणि नंदूनं एका झाडाकडे बोट दाखवलं. तो पक्षी समोर येऊन त्या झाडावर बसला होता.
‘तुम्हाला पक्ष्यांची भाषा समजते?’ माझं तोंडात बोट घालणं तेवढं बाकी होतं.
‘हो. पण मी कधीच त्यांच्या भाषेचा वापर करत नाही..’ असं त्याने म्हणताच माझ्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटलं.
‘प्रत्येक पक्ष्याची स्वतंत्र भाषा असते. ती संपूर्ण अवगत नसेल तर त्याचा आपल्यावरचा विश्वास उडतो,’ नंदू म्हणाला. माझा चेहरा कोराच होता. ‘म्हणजे बघा- एखाद्या पक्ष्याची एखादी शीळ मला हुबेहूब जमत असली, तरी त्याचा नेमका अर्थ मला माहीत असायला हवा. कदाचित तो तशी शीळ घालून जोडीदाराची प्रतीक्षा करत असू शकतो. त्याला त्याच भाषेत प्रतिसाद मिळाला की त्याचा जोडीदार मिळू शकतो. मी तशी शीळ घातली तर जोडीदार भेटणार या अपेक्षेनं तो येणार, पण त्याचा भ्रमनिरास होणार. मग तो पुढच्या वेळी शीळ घातली तरी येणारच नाही. आणि खरोखरीच एखाद्या वेळी जोडीदाराने शीळ घातली तरी त्यावर त्याचा विश्वास बसणार नाही. मग त्यांचे संबंध दुरावतील. अशानं पक्षी दुखावतात..’ नंदू बोलत होता. त्याच्या आवाजात पक्ष्यांबद्दलची माया भरभरून ओसंडत होती.
‘लहानपणी गंमत म्हणून मी पक्षी पकडायचो. थोडा वेळ त्यांच्याशी खेळून पुन्हा सोडून द्यायचो. त्यामुळे पक्ष्यांशी माझं मैत्र जमलं.. आपलं जग हेच आहे असं उमगलं. तोवर माझं शिक्षण पूर्ण झालं होतं. मग कोकणातल्या अनेक तरुणांसारखाच मीही मुंबईला गेलो. नोकरी मिळाली. आणि सात दिवसांतच जाणवलं, की हे आपलं जग नव्हे. माझं जंगल मला साद घालत होतं. मी नोकरी सोडली आणि घरी परत आलो. तेव्हापासून हे जंगल हेच माझं जगणं झालंय. इथली झाडं, पशुपक्षी हेच माझं कुटुंब आहे. इथल्या प्रत्येक पक्ष्याच्या पंखाची फडफड मला लांबवरून ऐकू येते आणि त्याच्या आवाजातले सुखदु:खाचे सूर मला समजतात. मला हे कसं साधलं, माहीत नाही.. पण इथला प्रत्येक पक्षी विश्वासानं जगतो आहे.’ नंदू बोलत होता आणि मी फक्त कान टवकारून ऐकत होतो.
नंदूच्या जंगलात पक्षीनिरीक्षणासाठी आणि छायाचित्रणासाठी आता देश-विदेशातील नामवंत छायाचित्रकार मुक्काम ठोकून असतात. आणि ते आल्याचं कळताच जंगलातले पक्षीही खास त्यांच्यासाठी लावलेल्या तारा, बांबू आणि मेढीवर येऊन छायाचित्रकारांना हवी तशी ‘पोझ’ देतात.
कोणता पक्षी कोणत्या वेळी कुठल्या झाडाच्या कोणत्या फांदीवर दिसणार, हे नंदूला नेमकं माहीत असतं. त्यामुळे पक्षीनिरीक्षण आणि छायाचित्रण करणाऱ्यांना फारसे कष्ट घ्यावे लागतच नाहीत. नंदूच्या खासगी जंगलाला कोकण कृषी विद्यापीठाने कोयना आणि चांदोली जंगलांच्या बरोबरीचा; किंबहुना त्याहूनही वरचा दर्जा बहाल केलाय.
सध्या प्रचंड जंगलतोडीमुळे एकेकाळचं हिरवं कोकण उजाड होणार अशी भीती व्यक्त होऊ लागली आहे. पर्यटनाबरोबर प्रदूषणही वाढू लागलंय. हिरवाईची आपुलकी जपणारी जुनी पिढी आता वयोमानानुसार थकली आहे. आणि तांब्याभर पाणी व गुळाच्या खडय़ासोबत होणारं आल्या-गेल्याचं स्वागत आता प्लास्टिकच्या बाटलीबंद पाण्यावर येऊन ठेपलंय. अशा वेळी नंदू तांबे आपल्या एका लहानशा कोपऱ्यातल्या शिरवली गावात कोकणाचं हरवत चाललेलं कोकणपण जिवापाड जपू पाहतोय.
गुहागरात अनेकांना शिरवली माहीत नसलं तरी पक्ष्यांच्या जगात वावरणाऱ्यांसाठी शिरवली हे गाव त्यांच्या छांदिष्ट विसाव्याचं ठिकाण बनलेलं आहे.
दिनेश गुणे –   dinesh.gune@expressindia.com

Sakkardara flyover, Nagpur,
नागपूर : भरधाव वाहनांसह अपघाताच्या भीतीचे सावट, सक्करदरा उड्डाण पुलावर मागील वर्षात १३ अपघात
crow trapped in Dombivli
डोंबिवलीत पतंगीच्या मांजात अडकलेल्या कावळ्याची अग्निशमन जवानांकडून सुखरूप सुटका
How to soften your face with Malai Dry Skin Care
Skin Care: दुधाची २ चमचे साय घ्या आणि उन्हाने काळवंडलेल्या-निस्तेज चेहऱ्यावर करा जादू
scorching heat
उन्हाच्या झळांनी हापूस आंबा काळवंडला; डाळिंब, द्राक्ष, भाजीपाल्यावर परिणाम