सोलापूर जिल्ह्यातला सांगोला तालुका म्हणजे दुष्काळाचे बारमाही ठिय्या आंदोलन! सुदैवानं तालुक्याला गणपतराव देशमुखांसारखा अनुभवी आमदार लाभल्याने सध्या दिवसाआड तरी पाणी मिळतंय. ग्रामीण भागात मात्र पाण्यासाठी वणवण सुरूच आहे. त्यामुळे साहजिकच आर्थिक कुवत नसलेल्या शेकडो कुटुंबांचा रोजच्या जगण्याचा संघर्ष आणखीनच तीव्र होतो. संसारातली शांतता ढळते. एवढय़ा-तेवढय़ा कारणावरून भांडय़ाला भांडे लागते आणि चिडचीड सुरू होते. परस्परांबद्दलच्या तक्रारींचे पाढे वाढत जातात. हे सगळं असह्य़ झालं की मग नवरा-बायको दोघंही सांगोल्याला येतात आणि संजीवनीताईंसमोर आपली कैफियत मांडतात. तक्रारींच्या मुळावर इथे घाव बसणार आणि सारं काही सुरळीत होणार, हा विश्वास त्यांना असतो. अनेकदा तसंच घडतं. आणि आहे त्या परिस्थितीत एकमेकांना सांभाळून घेत घराचा गाडा पुन्हा सुरू होतो..
परंतु समस्या एवढीच नसते. कितीतरी जणांच्या रोजच्या जगण्यात सुरक्षिततेचा प्रश्न उभा ठाकलेला असतो, कुणाला आर्थिक चणचण असते, तर कुणाला स्वत:च्या पायावर उभं राहायची ऊर्मी असते. अशा कितीतरी कुटुंबांना सांगोल्यात एक आधारस्तंभ मिळालाय- डॉ. संजीवनी केळकर नावाचा!
विवाहानंतर पुण्याहून सांगोल्यात आलेल्या डॉ. संजीवनी केळकर यांना तोवर ग्रामीण जगाच्या वेदनांची फारशी ओळख नव्हती. संजीवनीताई सांगोल्याला आल्या तोवर तालुक्यात एकही महिला डॉक्टर नव्हती. त्यामुळे पुरुष डॉक्टरशी बोलायची लाज वाटते म्हणून ग्रामीण भागातल्या अनेक महिला आपले आजार अंगावर काढत असत. संजीवनीताई आल्या आणि या भागातल्या स्त्रिया दवाखान्याची पायरी चढू लागल्या. आपल्या आजाराचं इथं नेमकं निदान होतंय हे हळूहळू तालुक्यातल्या स्त्रियांना कळू लागलं आणि सांगोला तालुक्यातल्या महिलांशी संजीवनीताईंचं वैद्यकीय व्यवसायापलीकडचं नातं जुळू लागलं. बायका त्यांच्याकडे आपलं मनही मोकळं करू लागल्या आणि त्यांच्या आजवर कोंडून राहिलेल्या वेदना जिवंत होऊ लागल्या. संजीवनीताईंना हा अनुभव नवा होता. लग्नाआधीच्या आपल्या जगात असा अनुभव त्यांना कधी आला नव्हता. रुग्ण म्हणून येणाऱ्या स्त्रियांपैकी प्रत्येकीलाच काही ना काही व्यक्तिगत वा कौटुंबिक समस्या आहेत, हे त्यांच्या लक्षात येऊ लागलं. आणि आजारपणातून उभं करण्याबरोबरच अशा महिलांना मानसिक हिंमत देण्याचीदेखील गरज आहे, हा विचार त्यांच्या मनात बळावू लागला.
त्यांच्या मनात असे विचारचक्र सुरू झाले की अस्वस्थपणा वाढत असे. आपण या स्त्रियांसाठी काहीतरी केलं पाहिजे ही जाणीव तीव्र होऊ लागली. पण नेमकं काय केलं पाहिजे, हे कळत नव्हतं. अशाच अस्वस्थ अवस्थेत असताना दवाखान्यात आलेल्या दोन-तीन महिला रुग्णांच्या कहाण्यांनी संजीवनीताईंचं हृदय अक्षरश: पिळवटून निघालं आणि निश्चय झाला.. तालुक्यातल्या प्रत्येक महिलेला सक्षम केलं पाहिजे. तिला आवाज दिला पाहिजे. तिला आपल्या शक्तीची व क्षमतेची जाणीव करून दिली पाहिजे. सांगोल्यात विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या ‘माता-बालक उत्कर्ष प्रतिष्ठान’च्या जन्माची मुळं इथूनच रुजू लागली होती.
..त्या दिवशी आईच्या आधाराने एक मुलगी संजीवनीताईंच्या दवाखान्यात आली. भयंकर अशक्त झालेली. पाऊलही पुढे टाकण्याचं त्राण तिच्या अंगात नव्हतं. पाऊलभर चालली तरी ती धापा टाकत होती. हिमोग्लोबिनचं प्रमाण घसरलेलं. खरं म्हणजे तिला रक्त देण्याची गरज होती. त्यावेळी सांगोल्यात रक्तपेढी नव्हती. तिची अवस्था पाहून संजीवनीताई खूप चिडल्या. मुलीच्या आरोग्याची काळजी घेतली नाही म्हणून तिच्या आईला खूप रागावल्या. आई गप्प राहून, खाली मान घालून सगळं निमूटपणे ऐकत होती. ‘उद्यापासून मुलीला रोज एक अंडं खायला दे..’ असं संजीवनीताईंनी तिच्या आईला सांगितलं आणि तिचा बांध फुटला. ती हमसून हमसून रडू लागली.
..आणि संजीवनीताईंनी क्षणभर डॉक्टरची भूमिका बाजूला ठेवली. तिच्या पाठीवर थोपटून तिला शेजारी बसवून घेतलं. तिला विश्वास दिला. आणि त्या मुलीच्या आईचं मन मोकळं होऊ लागलं.
आपल्या आजारी मुलीला डॉक्टरकडे नेण्यासाठी प्रवासाचे पैसे उभे करण्याकरतादेखील तिने शेजाऱ्यापाजाऱ्यांकडे हात पसरले होते. ‘अशा परिस्थितीत मुलीला पौष्टिक अन्न कुठून देणार?’ आईनं हतबलपणे विचारलं. आणि संजीवनीताई निरुत्तर झाल्या. त्यांच्या मनातली अस्वस्थता आणखीनच वाढली. गरिबीचं रूप इतकं भीषण असू शकतं? ही जाणीव त्यांचं मन पोखरू लागली.
पुढेही असे कितीतरी अनुभव येतच राहिले..
घरोघरी रोज दुधाचा रतीब घालणाऱ्या एका मुलीला नवऱ्यानं टाकलं होतं. पण एक दिवस अचानक तो आला, संतापानं शिव्याशाप देत तिला घरातून फराफरा ओढत त्यानं अंगणात आणलं आणि तिच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून देऊन तो निघूनही गेला..
तिच्या आईने आक्रोश करत संजीवनीताईंकडे धाव घेतली. तिचा आकांत त्यांना पाहवत नव्हता. मुलीला ताबडतोब दवाखान्यात आणलं. सत्तर टक्के भाजलेल्या अवस्थेत तिचा मृत्यूपूर्व जबाब लिहून घेतला.. तिला मरणानंतर तरी न्याय मिळालाच पाहिजे, यासाठी!
तिच्यावरचे उपचार व्यर्थ ठरले. ती गेली. पण तिच्या जबाबामुळे नवऱ्याला शिक्षा झाली.
..अनेक बायकांना रोज मुकाटपणे, ब्रदेखील न काढता अशा तऱ्हेने अन्याय सहन करावे लागतात हे त्यांना तीव्रतेनं जाणवत होतं. अशातच वन खात्याच्या नर्सरीत काम करणारं एक जोडपं दवाखान्यात आलं. बाई गरोदर होती. संजीवनीताईंनी तिला तपासलं आणि त्या खूप रागावल्या. गुप्तरोगाचं निदान झालं होतं. त्यांनी नवऱ्याचीही खरमरीत हजेरी घेतली. दोघं खाली मान घालून निमूटपणे ऐकून घेत होते. अचानक त्या बाईला हुंदका फुटला. मग संजीवनीताईंनी तिला बोलतं केलं.
तिनं सांगितलेली हकीकत ऐकून त्या अक्षरश: थिजल्या.
नर्सरीतून माणसं कमी करणार, अशी बरेच दिवस चर्चा चालली होती. तसं झालं तर नर्सरीत काम करणाऱ्या या जोडप्याची उपासमार अटळ होती. आपला रोजगार टिकवण्यासाठी नर्सरीच्या मुकादमाला रोज रात्री मुक्कामाला घरी आणायचा निर्णय घेतला गेला. नवरा रात्री घराबाहेर अंगणात झोपू लागला. हे असं सहा महिने सुरू होतं. तिच्या पोटातलं मूल आपलं नाही, हे सांगताना तिच्या नवऱ्याच्या चेहऱ्यावर उमटलेल्या वेदनांनी संजीवनीताई कळवळून गेल्या.
..गरिबीचं हे आणखीन एक बीभत्स रूप अक्राळविक्राळपणे त्यांच्यासमोर आलं आणि त्यांच्या अस्वस्थ मनाची तळमळ संपली. काय करायला पाहिजे, हे नक्की झालं. तालुक्यातल्या महिलांना आपण शक्ती द्यायची असं संजीवनीताईंनी ठरवलं. आता नुसती डॉक्टरकी करून चालणार नाही, असा निर्धार करून त्यांनी मनात कामाचं स्वरूप नक्की केलं. डॉक्टरकीमुळे गावात अनेक महिलांशी ओळख होती. अनेकींशी मैत्रीही झाली होती. आणि पेशंट म्हणून येणाऱ्या तालुक्यातल्या बायकांशी त्यांचं जिव्हाळ्याचं नातंही जडलं होतं. संजीवनीताईंशी मन मोकळं करताना स्त्रियांना आश्वस्त वाटायचं.
अशातल्याच सात-आठजणींनी आठवडय़ातून एकदा एकत्र यायचं ठरवलं. काम कसं सुरू करायचं, याचा कोणताच आराखडा तयार नव्हता. एकत्र आल्यावर वर्तमानपत्रं, पुस्तकं वाचायची, त्यावर चर्चा करायची, असं काही आठवडे चाललं. आणि लक्षात आलं की, या बायकांना बोलायचंय, त्यांना व्यक्त व्हायचंय. त्याचीच त्या जणू वाट पाहत होत्या. मग साऱ्याजणींनी मिळून लहान-मोठय़ा स्पर्धा सुरू केल्या. बायकांची परस्परांशी जवळीक निर्माण होऊ लागली. त्या आपले विचार व्यक्त करू लागल्या. हा काळ होता सुमारे ४० वर्षांपूर्वीचा. देशात आणीबाणी लागू झाली आणि सांगोल्यात जमणाऱ्या या महिलांनी काहीतरी रचनात्मक काम उभं करायचं ठरवलं.
आता संजीवनीताई एकटय़ा नव्हत्या. गावातल्या, तालुक्यातल्या अनेक महिला त्यांच्यासोबत होत्या. मग मुलांसाठी संस्कार वर्ग सुरू झाले. पुढे बालक मंदिराचा विचार पुढे आला, पण त्याकरता शिक्षिका उपलब्ध नव्हत्या. मग काही महिलांनी पोस्टाद्वारे बालवाडी शिक्षिकेचा कोर्स करायची तयारी सुरू केली. पण बालवाडीसाठी हातात पैसे नव्हते. पुण्यातील प्रसिद्ध जादूगार विजय रघुवीर हे संजीवनीताईंचे वर्गमित्र. त्यांनी सांगोल्यात चॅरिटी शो करायचं कबूल केलं आणि बघता बघता २२ हजार रुपये उभे राहिले.
हॉस्पिटलमधल्याच एका खोलीत बालक मंदिर सुरू झालं. गावातली मुलं येऊ लागली. त्यांना चांगल्या सवयी लागू लागल्या. घरातलं मुलांचं वागणं बघून आई-वडीलही सुखावले. पण बालवाडीनंतर पुढे पुन्हा तिथल्याच त्याच शाळेत जाऊन हे संस्कार कसे टिकणार, या प्रश्नानं पालक बेचैन झाले.
इथूनच एका शाळेच्या जन्माची प्रक्रिया सुरू झाली होती. पालकांच्या आग्रहामुळे या प्रक्रियेनं वेग घेतला आणि पहिलीचा पहिला वर्ग सुरू झाला. आमदार गणपतराव देशमुख यांनी थेट मंत्रालयातून शाळेची मंजुरी मिळवून आणली आणि एका वेगळ्या संकल्पनेची शाळा सांगोल्यात सुरू झाली. ग्राममंगलच्या धर्तीवरच्या या शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांना अध्यापनक्षमतेचं प्रशिक्षण दिलं गेलं आणि शाळा फोफावत गेली.
आज सांगोल्यात ही शाळा एक आदर्श म्हणून उभी आहे. इथल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच श्रमसंस्कारांचेही धडे दिले जातात. त्यांच्या भावी आयुष्यातल्या स्वयंपूर्णतेचा पाया इथे भक्कम केला जातो. चौथीपर्यंत या शाळेत मुलांनी शिक्षण घेतल्यावर ‘आता पुढेही तुम्हीच मुलांना शिकवा’ अशी गळ पालकांनी संजीवनीताईंना घातली आणि एकेक नवा वर्ग वाढत गेला. आज इथे नववीपर्यंत शाळा सुरू झाली आहे..
तालुक्यातल्या अनेक कुटुंबांमध्ये काही ना काही कारणांमुळे महिलांची घुसमट होतेय, हे संजीवनीताईंना दिसत होतं. तेव्हा १९९० मध्ये सांगोल्यात महिलांसाठी मोफत कायदेविषयक सल्ला व मदत केंद्र त्यांनी सुरू केलं आणि महिलांच्या समस्यांना वाचा फुटू लागली. असंख्य अन्यायग्रस्त महिलांवरील अत्याचाराच्या कहाण्या जिवंत झाल्या. २००४ मध्ये या केंद्राला केंद्र सरकारची मान्यता मिळाली आणि सांगोल्यात ‘मैत्रीण’ नावाची संस्था उभी राहिली. अन्यायग्रस्त, तसंच आर्थिक समस्यांना तोंड देताना हतबल ठरलेल्या महिलांसाठी नवा प्रकल्प उभा राहिला. सांगोला तालुक्यात मेंढीपालनाचा परंपरागत व्यवसाय करणाऱ्या कुटुंबांची संख्या मोठी आहे. मेंढीपालनापासून संगणकापर्यंत अनेक गोष्टींचं शिक्षण देणारं व्यवसाय प्रशिक्षण केंद्र सुरू झालं आणि महिलांना स्वयंविकासाची वाट सापडली. अनेक महिला उत्साहाने शिक्षण घेऊ लागल्या. पण त्याचबरोबर व्यवसायासाठी पैसा उभा करण्याचं आव्हानही त्यांच्यासमोर होतं. त्याकरता स्वयंसहाय्यता गट स्थापन करण्याचं संजीवनीताईंनी ठरवलं. आज तालुक्यात असे जवळपास पावणेतीनशे बचत गट आहेत आणि दोन हजारांहून जास्त महिलांनी स्वयंरोजगाराचं व्यवसाय शिक्षण घेऊन आपल्या कुटुंबाला उभं करण्याचं आव्हान आत्मविश्वासानं स्वीकारलंय.
पारंपरिक व्यवसायास प्रशिक्षणाची जोड मिळाली आणि स्त्रियांची हिंमत वाढली. त्यांच्या शब्दाचं वजनही वाढलं आणि कुटुंबातली किंमतही वाढली. परिणामी कुटुंबातलं सौख्य वाढलं. स्त्रीला कुटुंबात सन्मान मिळू लागला. आणि आपल्यात झालेल्या या परिवर्तनाच्या साक्षात्काराने स्त्रिया स्वत:च अचंबित झाल्या. आपण आधी काय होतो आणि आता काय आहोत, या जाणिवेनं सुखावल्या आहेत. अशा अनेक स्त्रियांनी स्वयंविकासाच्या यशोगाथा निर्माण केल्या आहेत. त्यामुळे तालुक्यातल्या महिलांचा आत्मविश्वास दुणावला आहे.
इथली दख्खन मेंढी प्रसिद्ध आहे. तालुक्यात घोंगडय़ा बनविण्याचा परंपरागत व्यवसाय चालायचा. पण काळाच्या ओघात घोंगडय़ांची मागणी कमी होत गेली आणि अनेक कुटुंबांचा जगण्याचा संघर्ष तीव्र होऊ लागला. मग लोकरीपासून कलात्मक वस्तू बनविण्याचं नवं तंत्र या कुटुंबांना शिकविण्याचा प्रकल्प संजीवनीताईंनी हाती घेतला. आता इथे तयार होणाऱ्या लोकरीच्या जाकिटांना जोरदार मागणी आहे.
कुटुंबं आर्थिकदृष्टय़ा स्थिरावली तरी आरोग्याबाबत जागरूक नसतील तर कुटुंबांचं स्वास्थ्य चांगलं राहत नाही. तालुक्यातल्या खेडोपाडी आरोग्य सुविधांचा अभाव होता. बालमृत्यू, बाळंतपणातील आजार आणि मृत्यूदरही वाढता होता. ही समस्या लक्षात घेऊन गावोगावी आरोग्यदूत योजना सुरू करण्याचं ठरलं आणि त्या- त्या गावातील चुणचुणीत मुलींची निवड करून त्यांना नर्सिगचं प्रशिक्षण देण्यात आलं. मोबाइल क्लिनिक्स सुरू झाली. ठरलेल्या दिवशी ठरलेल्या गावात आरोग्य तपासणी शिबिरं होऊ लागली. मुलींना आजार ओळखण्याचं आणि त्यावरील तात्पुरत्या उपायांचं, हिमोग्लोबिन, रक्तदाब तपासणीचं शिक्षण देण्यात आलं आणि गावातील गर्भवती महिला व बालकांच्या आरोग्याबाबत कुटुंबंही जागरूक झाली. आरोग्य जपण्याचं महत्त्व त्यांना उमगू लागलं. तरुणाईच्या उंबरठय़ावरील मुलींच्या समस्या, त्यावरील उपाय आणि पालकांच्या जबाबदाऱ्या समजावून देण्यासाठी कार्यक्रम आखले गेले. आता तालुक्यात माता, बालकं आणि उमलत्या कळ्या निर्भर झाल्या आहेत. कारण त्यांना जगण्यासाठी ‘संजीवनी’ लाभली आहे!
दिनेश गुणे -dinesh.gune@expressindia.com

Torrential rain with hail in Shirol and Hatkanangle taluka
शिरोळ, हातकणंगले तालुक्यात गाऱ्यांसह वळिवाची दमदार हजेरी; उन्हात गरव्याची सुखद अनुभूती
water scarcity, Pimpri chinchwad , shortage of water supply, Andhra Dam
पिंपरी : आंद्रा धरणातून मिळणाऱ्या पाण्यात घट…उपनगरांमध्ये पाणीटंचाई
Shivaji High School Janefal
धक्कादायक! मुख्याध्यापकाने शाळेतच घेतला गळफास
In Ralegaon taluka a young man and an old man were killed in Nepal
राळेगाव तालुक्यात रक्तरंजीत होळी; नेपाळच्या तरुणासह वृद्धाची हत्या