सांगली जिल्ह्यतलं आटपाडी गाव आजच्याइतकं वाढलं नव्हतं तेव्हाची गोष्ट! गावकरी एकमेकांना ओळखायचे. गप्पागोष्टींतून अनुभवांची देवाणघेवाण व्हायची. काही अडलं-नडलं तर गावातल्या जाणत्यांचा सल्ला घेतला जायचा. शेती म्हटलं की नव्या तंत्रालाही जुन्या अनुभवांची जोड लागतेच. अजूनही ते चुकलेलं नाही. जग कितीही पुढे चाललं तरी शेतीच्या बाबतीत अनुभवांची शिदोरी अजूनही मोलाची ठरते. आटपाडीतही तसंच होतं. प्रत्येक अनुभव नवं काहीतरी शिकवणारा. पाण्याचे दुर्भिक्ष्य असल्याने सिंचनाचे प्रकल्पही नाहीत. साहजिकच शेळी-मेंढीपालन हाच इथल्या बहुसंख्यांचा चरितार्थाचा व्यवसाय. जसा तो पूर्वजांनी केला, तसाच पुढेही चालू राहिला. कुठेही दिसणाऱ्या मोकाट शेळ्या-मेंढय़ा ही जणू आटपाडीची ओळख होती.
गरज ही शोधाची जननी असते असं म्हणतात. आटपाडीतल्या नारायणराव देशपांडे नावाच्या शेतकऱ्याच्या बाबतीतही असंच काहीसं झालं. भर गावात रस्त्याकडेला असलेल्या शेतात रोज शेळ्यांचे कळप घुसायचे आणि लक्षात येऊन त्यांना हुसकावून लावेपर्यंत पिकाची नासाडी व्हायची. परिसरातल्या भूमिहीन शेतकऱ्यांचे तांडे गावकुसात पालं ठोकायचे आणि त्यांची मुलं शेळ्या चारायला अशीच कुणाकुणाच्या कुरणांत घालायची. देशपांडय़ांच्या शेतात दर चार-सहा दिवसांनी हे कळप शिरायचे आणि मग नेहमीचीच भांडणं, रागावणं, तक्रारी.
ही माणसं शेळ्या बांधून का ठेवत नाहीत, असा प्रश्न देशपांडेंना पडायचा. पण बांधलेल्या शेळ्यांना पोसण्याइतका चारा विकत घ्यायची या गरीब, भूमिहीन शेतकऱ्यांची ऐपत नाही, हे उत्तरही त्यांना ठाऊक होतं. यावर काहीतरी उपाय शोधायचा असं त्यांनी ठरवलं.
..आणि मग देशपांडय़ांच्या घरात शेळी आली. एकच शेळी पाळून एक आगळा प्रयोग त्यांनी सुरू केला. बंदिस्त शेळीपालनाच्या प्रयोगाची सुरुवात झाली. ही गोष्ट १९७५ च्या आसपासची. पुढच्या दहा-बारा वर्षांत देशपांडेंच्या घरी या शेळीचा परिवार फुलला आणि पन्नासएक शेळ्यांचा कळपच तयार झाला.
आता देशपांडेंच्या उपाय शोधण्याच्या प्रयोगाला संशोधनाचं स्वरूप आलं होतं. मग एक संस्था स्थापन करायचं ठरलं. देशपांडेंनी आपल्याच शेतातला नऊ-दहा गुंठय़ांचा तुकडा या प्रयोगासाठी संस्थेला दिला आणि ‘शेती परिवार कल्याण संस्था’ जन्माला आली. थोडीशी शेती व सोबत शेळी असेल तर शेतकऱ्यांचा संसार फुलू शकतो, हे ठसविण्यासाठी नवनवे प्रयोग सुरू झाले. आणि एक गोष्ट सिद्ध करण्यात देशपांडेंच्या या संस्थेला यश आलं. ती म्हणजे शेळी हे ग्रामीण कुटुंबातल्या महिलेचं ‘एटीएम’ आहे!!
पुढे दहा वर्षांनी- १९८६ च्या दरम्यान आठव्या पंचवार्षिक योजनेची एक बैठक पुण्यात सुरू होती. नारायणरावांनी या बैठकीतील काही तज्ज्ञांची, सरकारी अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि आपल्या एका योजनेचा आराखडा त्यांच्यापुढे ठेवला. पडीक जमीन लागवडीखाली आणण्याचा आराखडा! यात तिहेरी लाभ होईल, हे योजना मंडळाच्या सदस्यांना पटवून देण्याचा प्रयत्न ते करत होते. अशा जमिनींवर शेळ्यांसाठी चारा म्हणून उपयुक्त ठरेल अशा वनस्पतींची लागवड करावी असे त्यांचे म्हणणे होते. यामुळे पडीक जमीन लागवडीखाली येईल, रोजगारनिर्मिती होईल, बागायती जमिनींना सेंद्रीय खत मिळेल आणि शेळ्यांनाही चारा मिळेल. मुख्य म्हणजे चाऱ्यासाठी शेळ्यांना शेतात घुसवण्याची वेळ येणार नाही आणि पिकांची नासाडी टळेल व बंदिस्त शेळीपालन शक्य होईल.
बैठकीत हजर असलेल्या एका अधिकाऱ्याला ही योजना खुणावू लागली. नाही तरी शेळी हा सामाजिक वनीकरणाचा शत्रू आहे हे ग्रामीण भागातल्या सामाजिक वनीकरण योजनांच्या अनुभवावरून स्पष्ट होऊ लागलेच होते. हा प्रयोग करून बघायला हरकत नाही असं त्यांना वाटलं. या अधिकाऱ्यानं आटपाडीला देशपांडेंच्या प्रकल्पास भेट दिली. आणि बंदिस्त शेळीपालनाचा प्रयोग सरकारी पातळीवर पोहोचला.
मग संस्थेनं नव्या जोमानं कामाला सुरुवात केली. कुरणविकास, चारानिर्मिती व जातिवंत उस्मानाबादी शेळीची पैदास करण्याचं काम सुरू झालं. या प्रयोगानं तोवर शेतकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. आपणही यात सहभागी व्हावं असं अनेकांना वाटू लागलं होतं. मग शेतकऱ्यांचं प्रशिक्षण सुरू झालं. अनेक संसार नव्यानं फुलू लागल्याचं दृश्य आटपाडी परिसरात दिसू लागलं.
या प्रयोगाची दखल उत्तर प्रदेशातल्या अखिल भारतीय शेळी संशोधन संस्थेनं घेतली आणि आटपाडीच्या शेती परिवार कल्याण संस्थेला मथुरेच्या या संस्थेचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
आज संस्थेचा पसारा खूप वाढलाय. आता बंदिस्त शेळीपालनाचं प्रशिक्षण घेण्यासाठी शेतकरी संस्थेत येतात, तज्ज्ञ लोकांचं मार्गदर्शन घेऊन परततात आणि शेतीला शेळीपालनाची जोड देतात.
मागे एकदा नारायणरावांचा मुलगा प्रसाद मुंबईत भेटला. त्याच्या तोंडून या संस्थेची माहिती मिळाली होती. प्रसाद स्वत: कृषी पदवीधर आहे. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यानं घरच्या शेतीबरोबरच शेळीपालनाच्या संशोधनात स्वत:ला झोकून दिलं. शेळीपालनाबरोबरच सेंद्रीय खतांचा वापर व पर्यावरण रक्षणावर भर देणारे अनेक प्रयोग संस्थेत सुरू आहेत. जातिवंत शेळ्यांची पैदास आणि चारानिर्मितीचं प्रशिक्षण संस्थेत दिलं जातं.
हे प्रयोग यशस्वी झाल्यानं आटपाडीच्या पलीकडे जायचं प्रसादनं ठरवलं. परिसरातल्या ग्रामपंचायतींच्या हद्दीतील पडीक जमिनींवर शेळ्यांसाठी चारानिर्मिती करण्याचा प्रयोग गावागावांत राबवावा असं त्यानं ठरवलंय. लोकसहभागातून कुरणविकास हा त्याच्या संशोधनाचा पुढचा टप्पा आहे. याची दोन-तीन कारणं आहेत. या प्रत्येक प्रयोगाला भूतकाळातील प्रयोगांच्या अनुभवांची जोड आहे. प्रसादच्या वडिलांनी संस्था सुरू करेपर्यंत आणि नंतरच्या प्रत्येक टप्प्यात घेतलेल्या अनुभवांचा तोही एक साक्षीदार आहे. मुख्य म्हणजे गेल्या चार दशकांतील प्रयोगांच्या आणि प्रयत्नांच्या यशाचे दस्तावेजीकरण हे त्यामागचं गमक आहे.
‘कृषी पदवीधर होऊन शेतीत हात घातले तेव्हा मी ठरवलं- आपल्या प्रत्येक प्रयोगाचे अनुभव लिहून ठेवायचे. कोणत्या हवामानात कोणतं पीक घेतलं, त्यासाठी किती पाणी वापरलं, त्याचा काय परिणाम झाला, कोणती औजारं उपयोगाला आली, बियाणे, खते कोणती वापरली, स्त्री-पुरुषांचे किती श्रम-दिवस वापरले गेले, याची संपूर्ण माहिती लिहून काढली. वर्षांगणिक लिहीत गेलेल्या या डायऱ्यांतून शेतीचं एक ‘गाइड’च आपोआप जन्माला आलं..’ प्रसादच्या शब्दांत आत्मविश्वास ठासून भरला होता.
‘एका कोऱ्या डायरीची किंमत फारशी नसेल; पण अशा रीतीने लिहिलेल्या प्रत्येक डायरीची किंमत लाखो रुपये असते हे मला पटलं. अशी डायरी प्रत्येक शेतकऱ्याने लिहावी म्हणून आम्ही प्रयत्न करतोय. शेतकऱ्याची डायरी हा प्रयोग इथे आता रुजतोय. काही हजार शेतकरी डायऱ्या लिहिताहेत. गेल्या बारा वर्षांपासूनच्या हजारो डायऱ्या हा शेतकऱ्यांच्या प्रयोगांचा मोलाचा दस्तावेज ठरतोय. आता याचं डाटा अ‍ॅनेलिसिस करायचं आम्ही ठरवलंय. त्यातून शेतकऱ्याला शेतीची नवी दृष्टी मिळेल. तसंच कृषीविषयक धोरणं तयार करताना राज्याच्या कृषी खात्यालाही या हजारो पानांत उतरलेल्या कृतिशील अनुभवांचा उपयोग होईल. त्यातून शेतकरी हा राज्याच्या कृषिधोरण आखणीचा एक अविभाज्य घटक ठरेल. बंद दरवाजाआड ठरणारी शेतीची धोरणं थेट बांधावरच्या अनुभवांशी जोडली जातील..’
प्रसादच्या डोळ्यांत एक स्वप्न स्पष्ट उमटलं होतं.
राज्यातला शेतकरी सध्या दुष्काळात होरपळतोय. आणि राजकारणात सिंचन प्रकल्पांतील घोटाळ्यांचं वादळ उठलंय. गेल्या दहा वर्षांत सिंचनक्षमतेत किती वाढ झाली, इतके प्रकल्प होऊनही सिंचनक्षमता का वाढली नाही, याची उत्तरं अजूनही गुलदस्त्यात आहेत. प्रसादशी बोलता बोलता हा विषय निघाला आणि मागच्या एका भेटीत प्रसादने सांगितलेल्या शेती परिवारच्या एका आगळ्या प्रकल्पाची आठवण झाली. मग बोलण्याचा प्रवाह तिकडे वळला.
‘आपल्या राज्यात कितीही सिंचन प्रकल्प झाले तरी येथील भौगोलिक स्थितीमुळे सिंचनक्षम क्षेत्र ३० टक्कय़ांपलीकडे जाणार नाही. त्यामुळे कोरडवाहू शेतीतूनच जास्त पिकवण्याचं तंत्र शोधणं गरजेचं आहे. आम्ही एक नवा प्रयोग केला आणि त्याचे अनुभवही लिहून ठेवलेत..’ प्रसाद म्हणाला आणि माझी उत्सुकता वाढली.
‘कोरडय़ा, नांगरलेल्या जमिनीत बी पेरलं तर जमिनीतलं पाणी शोषून घेऊन ते बीज अंकुरेपर्यंत बीजाची शक्ती पणाला लागते. म्हणून अस्सल बीज ओळखण्याचं तंत्र आम्ही शेतकऱ्यांना शिकवलं. हे बी पेरणीआधी दहा तास बादलीतल्या पाण्यात भिजवलं तर जमिनीतलं पाणी शोषून घेण्यासाठीची त्याची शक्ती वाया जात नाही आणि ते लवकर अंकुरतं. शिवाय प्रत्येक दाण्यातून उमलणारा अंकुर सशक्त असतो हे सिद्ध झालंय. यामुळे पिकाचा कालावधी दहा टक्कय़ांनी कमी होतो आणि एकरी ४० हजार लिटर पाणी वाचतं. आटपाडीसारख्या दुष्काळप्रवण गावात या प्रयोगातून आम्ही एकरी पाच क्विंटल ज्वारीचं पीक घेतलं. सातशे पेंडय़ा कडबा काढला. अर्थात बांधबंदिस्ती, सेंद्रीय खतांचा जोड देऊनच हे साधलंय.’
प्रसाद देशपांडे हा शेतकरी आपल्या अनुभवांचा दस्तावेज शब्दांतून मोकळा करत होता आणि माझ्या डोळ्यासमोर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना जगण्याचा नवा मार्ग सापडल्याचं स्वप्न तरळू लागलं होतं..
शाश्वत आणि पर्यावरणस्नेही विकासासाठी आधी आपण या मातीची मुलं आहोत याची जाणीव मनामनांत रुजवली पाहिजे. प्रसाद देशपांडेंच्या संस्थेचे ते स्वप्न आहे. आणि त्यासाठी आवश्यक ते सारे प्रयत्न करायचे, हे त्यांच्या संस्थेचे ध्येय आहे. ‘बकरी पंडित’ पुरस्काराने सन्मानित झालेल्या नारायणरावांनी सुरू केलेल्या एका लहानशा कामाचा पसारा आता प्रचंड वाढला आहे.
हे प्रयोग पडताळून त्यांना जर शेतकऱ्यांची आणि सरकारची जोरदार साथ मिळाली, तर? सिंचन प्रकल्पांत मुरणारा पाण्यासारखा पैसा शेतकऱ्यांच्या हितासाठी खर्ची पडेल आणि शेतकऱ्यांच्या घरोघरी एटीएम उभे राहील.
तो दिवस लांब नाही अशी प्रसाद देशपांडेंची आशा आहे!
दिनेश गुणे dinesh.gune@expressindia.com

out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
peter higgs
अन्वयार्थ: ‘देव कणा’मागचा द्रष्टा!
ग्रामविकासाची कहाणी