25 September 2020

News Flash

हॅपी इंडियन व्हिलेज!

लातूर जिल्हय़ाच्या उदगीर तालुक्यातील धोंडीहिप्परगा या छोटय़ाशा गावातील रवी काशिनाथ बापटले हा तरुण!

लातूर जिल्हय़ाच्या उदगीर तालुक्यातील धोंडीहिप्परगा या छोटय़ाशा गावातील रवी काशिनाथ बापटले हा तरुण! निरक्षर, अल्पभूधारक शेतकरी कुटुंबाची पाश्र्वभूमी असणाऱ्या रवीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून ‘कमवा व शिका’ योजनेंतर्गत काम करत पत्रकारितेतील पदव्युत्तर पदवी मिळवली. सात वष्रे पत्रकारिता केल्यानंतर समाजासाठी काही वेगळे करण्याच्या ध्येयाने त्याला पछाडले आणि लातूरपासून नऊ किलोमीटरवर एड्सग्रस्त मुलामुलींसाठी त्याने ‘सेवालय’ ही संस्था सुरू केली. गेल्या दहा वर्षांत हा आधारवड चांगलाच फोफावला आहे. आज या सेवालयात शेकडो एचआयव्हीबाधित मुलामुलींना आधार मिळाला आहे. जेमतेम ४० वर्षांच्या आयुष्यात प्रत्येक वळणावर रवीला ध्येयाची नवी वाट सापडत गेली. आज मागे वळून त्याकडे पाहताना तो स्वत:ही अचंबित आणि भावुक होतो.
धोंडीहिप्परगा या गावात सातवीपर्यंतचे शिक्षण झाल्यावर लातूरच्या यशवंत विद्यालयात त्याने आठवीच्या वर्गात प्रवेश घेतला. आणि पहिल्यांदाच अंगावर चढलेल्या स्काऊट-गाइडच्या वर्दीने त्याला झपाटून टाकले आणि मोठेपणी सन्यात जायचा त्याचा निर्णय ठाम होत गेला. पुढे दयानंद कला महाविद्यालयात एनसीसीमुळे सैन्यात प्रवेश हाच त्याचा ध्यास बनला आणि पदवी पदरी पडताच त्याने सन्यभरतीसाठी सोलापूर गाठले. पण तिथे त्याच्या पदरी निराशा आली. शारीरिक उंची कमी असल्यामुळे आपल्याला कधीच सन्यात भरती होता येणार नाही हे त्याला कळले आणि तो ध्यास मनाच्या कप्प्यात बंद करून तो पत्रकारितेकडे वळला. त्याने औरंगाबाद गाठले. दोन वर्षे ‘कमवा व शिका’ योजनेंतर्गत काम करून पसे मिळवत बी. जे. व एम. जे. शिक्षण त्याने पूर्ण केले. विद्यापीठाच्या आवारातील झाडांना पाणी घालण्याचे काम करून महिन्याला साडेसहाशे रुपये मिळत. मासिक पन्नास रुपये भाडय़ात मकाई गेटजवळील माजलगाव महाराजांच्या मठात राहण्यास जागा मिळाली. जेवणाकरता उरलेले ६०० रुपये खर्च होत. अशा खडतर परिस्थितीशी सामना करत पत्रकारितेची पदवी घेतल्यानंतर लातूरला एका दैनिकात त्याला नोकरीही मिळाली. सात वष्रे पत्रकारिता करत असतानाच एमआयटी पत्रकारिता महाविद्यालयात प्राध्यापकीही सुरू केली. याच काळात समस्यांची अनेक रूपे त्याला जवळून पाहायला मिळाली आणि तो अस्वस्थ झाला. या समस्याग्रस्तांसाठी काहीतरी केले पाहिजे ही भावना बळावत गेली. समाजासाठी विनामोबदला वेळ देऊन काही केले पाहिजे असे आवाहन रवीने आपल्या विद्यार्थ्यांना केले आणि त्यांनीही त्याला प्रतिसाद दिला.
मग आठ विद्यार्थी, दोन विद्याíथनी व दोन प्राध्यापक अशा बारा जणांनी शहर सफाईचा विडा उचलला. दीड वष्रे रोज पहाटे शहरात स्वच्छता मोहीम राबवली. यादरम्यान त्याला अनेक बरेवाईट अनुभव आले. शहरातील एड्स रुग्णांवर उपचार करणारे डॉ. प्रदीप उगीले यांच्याशी पुढे मत्री जमली आणि त्यातून एड्सग्रस्तांच्या भीषण समस्येचे स्वरूप लक्षात आले. धोंडीहिप्परगा गावात याच काळात एड्समुळे एका कुटुंबातील पती-पत्नी मरण पावले आणि नंतर सात वर्षांचं त्यांचं मूलही या आजाराला बळी पडले. त्या लहानग्याचा अंत्यविधी करण्यासही कुणी पुढे येत नव्हतं. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेने रवीच्या आयुष्याला कलाटणी दिली. आपल्या काही मित्रांना सोबत घेऊन त्याने त्या मुलाचा अंत्यविधी उरकला. अंत्यविधी आटोपल्यावर त्याचा निर्धार पक्का झाला : आपण एड्सग्रस्तांसाठी काम करायचे. ताबडतोब त्याने पत्रकारिता व प्राध्यापकीलाही सोडचिठ्ठी देऊन शहराच्या जवळपास जागेचा शोध सुरू केला. लातूरचे तत्कालीन नगराध्यक्ष डॉ. जे. एम. वाघमारे यांच्याशी असलेला संपर्क यासाठी कामी आला. त्यांनी अंबाजोगाई रस्त्यावर पालिकेची अर्धा एकर जागा देण्याचे मान्य केले. या समस्याग्रस्तांसाठी ही जागा अपुरी पडणार हे त्याला ठाऊक होतं. त्यामुळे आणखी मोठय़ा जागेचा शोध सुरू झाला.
शाळेत शिकत असताना हासेगाव येथील शांतेश्वर मुक्त या मित्राच्या घरी त्याचे जाणे-येणे होते. आपली अस्वस्थता रवीने त्याच्याजवळ बोलून दाखवली आणि शांतेश्वरला त्याची तळमळ उमगली. शांतेश्वरने आजोबा मन्मथअप्पा यांच्याकडे हा विषय काढला आणि त्यांनी तात्काळ स्वत:ची साडेसहा एकर जमीन २००७ साली दानपत्राने रवीला देण्याचे मान्य केले. त्यावेळी या जमिनीची किंमत ५० लाखांच्या घरात होती. ‘आम्ही सेवक’ या नावाने संस्थेची नोंदणी झालीच होती. त्याच्या बारा सहकाऱ्यांपैकी पाच-सातजणांनी रवीला या प्रकल्पात साथ देण्याचे मान्य केले आणि रवी कामाला लागला. त्याआधी सारे मोहपाश तोडायचे त्याने ठरवले. आई, दोन भाऊ, बहिणींना सांगून त्याने घर सोडले. या कामात व्यक्तिगत पाश नको म्हणून त्याने लग्न न करण्याचा निर्णय घेतला आणि हासेगाव येथील शेतावर डिजिटल बॅनरच्या छपराच्या झोपडीत जुल २००८ मध्ये कामास सुरुवात केली.
या आजाराकडे पाहण्याची लोकांची मानसिकता तोवर काहीशी अलिप्ततेचीच होती. याच लोकांचा मानसिक आणि आर्थिक सहभाग मिळवायचा असा निर्धार करून रवीची भटकंती सुरू झाली. भेटीगाठी सुरू झाल्या. शाळा, महाविद्यालयांत जाऊन विद्यार्थ्यांना विश्वासात घेत त्याने आपल्या कामाची माहिती देण्यास सुरुवात केली. प्रत्येकाने फक्त एक रुपया द्या, आपण अनेक पीडितांच्या आयुष्यात आनंद फुलवू, असे आवाहन तो करत असे. अशा तऱ्हेने विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून ६० हजार रुपये गोळा झाले व दोन खोल्यांचे बांधकाम सुरू झाले. पण एवढय़ाने काम पुढे सरकणार नव्हते. स्लॅबपर्यंतचे काम पूर्ण झाले असतानाच एके दिवशी रात्री तो लातूरला गेल्याचे निमित्त साधून गावातील लोकांनी या खोल्यांचे बांधकाम जमीनदोस्त केले. रवीसोबत काम करणाऱ्यांनाही मारहाण केली. मात्र, रवीच्या कामात विघ्न आणण्याच्या या प्रकाराचा परिणाम उलटाच झाला. त्याच्या प्रामाणिक प्रयत्नांना साथ देण्यासाठी अनेकांचे मदतीचे हात पुढे आले. पुन्हा नव्या उभारीने दोन खोल्यांचे बांधकाम पूर्ण झाले. परिसरात ९०० खड्डे तयार करून केशर आंबा, नारळ, काशी बोर तसेच विविध फळझाडे त्यांनी लावली. तत्कालीन खासदार रूपाताई पाटील-निलंगेकर यांनी रवीचे काम पाहून हॉल बांधण्यासाठी पाच लाख रुपयांचा निधी दिला. त्यातून हॉल व तीन छोटय़ा कुटी उभ्या राहिल्या. एड्सग्रस्त मुलामुलींसाठी राहण्याची सोय झाली. त्यानंतर एड्सग्रस्त मुलांचा शोध सुरू झाला. रवीचे काम पाहून खा. डॉ. जे. एम. वाघमारे यांनी दहा लाख रुपये दिले आणि टप्प्याटप्प्याने आवश्यक ते बांधकाम सुरू झाले.
जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण गेडाम यांनी निवासी सेतू शाळेची मान्यता दिली. ९० दिवसांच्या या शाळेत शाळाबाहय़ मुलांना अक्षरओळख करण्याची सोय उपलब्ध होती. रवीने अथक मेहनत घेत मुले जमवली. जून २००९ मध्ये हासेगावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत बारा मुलांना प्रवेश दिला. एड्सग्रस्त मुलांना शाळेत प्रवेश दिल्याचे समजल्यावर गावकऱ्यांनी आपली अडीचशे मुले शाळेतून काढली. त्यामुळे जिल्हा परिषदेची शाळा बंद होण्याची परिस्थिती निर्माण झाली. हे प्रकरण देशभर गाजले. पण रवीने परिस्थितीला घाबरून माघार न घेता समजुतीचा पवित्रा घेऊन गावकऱ्यांशी संवाद साधला. त्याचे अपेक्षित परिणाम दिसू लागले आणि गावातील मुलांनी पुन्हा शाळेत प्रवेश घेतला. या शाळेत गेल्या आठ वर्षांत उत्तम वातावरण आहे. पहिली ते दहावीपर्यंत मुले-मुली गावातील जिल्हा परिषद शाळेत शिकतात. नंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते लातूरला ये-जा करतात. एक मुलगी नìसगच्या शेवटच्या वर्षांत शिकते आहे. एक कायद्याचे शिक्षण घेते आहे. दोन मुलींची लग्नं झाली असून त्यातील एकीने एचआयव्ही निगेटिव्ह मुलीला जन्म दिला आहे.
महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या मुलांसाठी वसतिगृहात पाच टक्के आरक्षण मिळावे यासाठी रवीने गेल्या चार वर्षांपासून प्रयत्न सुरू केले आहेत. काही प्रमाणात त्याला यशही येत आहे. १८ वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी शासन अनुदान देते. त्यानंतरही मुले जगू शकतात याचा अंदाज पूर्वी शासनाला नव्हता. आता चांगले औषधोपचार होत असल्यामुळे या मुलांचे आयुष्यमान वाढले आहे.
रवीने उभारलेल्या सेवालयात सध्या ६५ मुले आहेत. त्यापकी १८ जण १८ वर्षांपेक्षा अधिक वयाचे आहेत. या मुलांचे करायचे काय? त्यांना सेवालयातून निघून जा असे कसे म्हणायचे? त्यांना आयुष्यात उभे केले पाहिजे, हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या पुनर्वसनाचा प्रकल्प सुरू करण्याचे त्याने ठरवले. तीन वर्षांपूर्वी स्नेहा शिंदे या नृत्यकलेचे शिक्षण घेतलेल्या मुलीने सेवालयातील मुलामुलींना नृत्य शिकवण्याची इच्छा व्यक्त केली व ती नृत्य शिकवायला इथे येऊ लागली. सेवालयातील मुलांनी एक उत्तम संगीत-नृत्याचा कार्यक्रमही बसवला आहे. गेल्या वर्षी १७ सप्टेंबरला पुण्यातील बालगंधर्व नाटय़गृहात त्यांचा पहिला कार्यक्रम झाला. या कार्यक्रमासाठी व्यावसायिक पद्धतीने एक लाख रुपयांचे मानधन घेण्यात आले आणि अशा मानधनातून मिळणाऱ्या पैशांतून पुनर्वसन प्रकल्पासाठी २० एकर जमीन विकत घेण्यात आली आहे.
या जमिनीवर आता दहा खोल्या बांधण्यात आल्या आहेत. विहीरही आहे. आता संस्थेतील मुलांना छोटे उद्योग सुरू करण्यासाठी मदत करण्याचे संस्थेने ठरवले आहे. त्याअंतर्गत कुक्कुटपालनाचा व्यवसाय आकार घेतो आहे. या पुनर्वसन प्रकल्पास ‘हॅपी इंडियन व्हिलेज’ (एचआयव्ही) असे नाव देण्यात आले आहे. या पद्धतीने आकार घेणारा देशातील हा पहिलाच प्रकल्प आहे. सेवालयातील कामासाठी रवीने सोबत पूर्णवेळ काम करणारे आठ सहकारी तयार केले आहेत. या सहकाऱ्यांबरोबरच लातूरमधील विविध वर्गातली मंडळीही या प्रकल्पाशी जोडली गेली आहेत. राज्यातून वर्षभरात सुमारे सातशे ते साडेसातशे लोक सेवालयास भेट देतात. येथील कार्य पाहून ते सेवालयाशी कायमचे जोडले जातात. प्रकाश आमटे, विकास आमटे, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यासह विविध राजकीय पक्षांच्या मंडळींनीही सेवालयास भेट दिली आहे. सेवालयाच्या आवारात २० लाख लिटर पाण्याच्या क्षमतेचे शेततळे उभारले गेले आहे. यंदा सेवालयातील पाणी गावकऱ्यांना रोज चार टँकरने पुरवण्यात येत होते. एकेकाळी सेवालय प्रकल्पास विरोध करणारे हासेगाव आता रवीच्या पाठीशी उभे राहिले आहे.
एड्सग्रस्त मुलांच्या नृत्याच्या कार्यक्रमामुळे मुलांची शारीरिक प्रतिकारशक्ती वाढली असल्याचे दिसून आले आहे. अमरावतीचे डॉ. अविनाश सावजी याबाबत संशोधन करत आहेत. एड्सबाबतीत आता जे नवे संशोधन पुढे आले आहे त्यातून आई-वडिलांना एड्स असला तरी जन्मणाऱ्या मुलास एड्स होणार नाही असे उपचार उपलब्ध झाले आहेत. येत्या काळात या आजाराचे भय संपण्याची शक्यता वाढली आहे. ‘समाजासमोर अनेक प्रश्न आहेत. त्या प्रश्नांना भिडताना समाजमन तयार केले तर त्या प्रामाणिक प्रयत्नांना समाज हातचे न राखता मदत करतो. जातपात, पंथ यापलीकडे जाऊन ही साथ मिळते,’ हा आपला अनुभव असल्याचे रवी सांगतो. ‘माझ्या मनात एक छोटे स्वप्न रुजले. त्याची पूर्तता करण्यासाठी रोज एकेक पाऊल टाकण्याचा मी प्रयत्न केला आणि त्याला अनेकांची साथ मिळत गेली. पुढचे पाऊल टाकण्याचे बळही त्यातूनच मिळत गेले,’ असे सांगणाऱ्या रवीच्या सुरात समाधान ओसंडतना दिसत होते.
प्रदीप नणंदकर – pradeepnanandkar@gmail.com
दिनेश गुणे – dinesh.gune@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 26, 2016 1:22 am

Web Title: happy indian village ngo for hiv children run by ravi kashinath bapatle
Next Stories
1 जंगल बुक!
2 निसर्गव्रती हेमाताई
3 मिशन पॉसिबल!
Just Now!
X