25 October 2020

News Flash

एकमेकां साह्य़ करू..

कोणताही उद्योग करायचा म्हटला की स्थानिक पातळीवर कच्च्या मालाची उपलब्धता अनिवार्य ठरते.

रेशीमगाठ जुळवतानाच उद्योग उभारणीचे स्वप्न पाहणारे शशिकांत आणि मनीषा धात्रक दाम्पत्य.

लग्न ठरवताना कुटुंबीय मुलामुलीला एकमेकांशी बोलण्याची संधी देतात तेव्हा त्यांच्यात आवडनिवड, छंद, अपेक्षा, स्वयंपाक अशी नित्याच्या पठडीतलीच चर्चा बहुश: होते. पण त्यांच्यात एखादा उद्योग सुरू करण्याबद्दल चर्चा होऊ शकते..? वीस वर्षांपूर्वी रेशीमगाठ जुळवताना मनीषा धात्रक आणि शशिकांत धात्रक यांच्यात मात्र अशी चर्चा झाली होती. नोकरीऐवजी केवळ उद्योग-व्यवसाय करण्याची! सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातील या दोघांनी तेव्हा पाहिलेले हे स्वप्न जिद्द आणि मेहनतीतून असे प्रत्यक्षात आणले, की कोणालाही आश्चर्य वाटावे. उद्योग-व्यवसायाची कोणतीही पाश्र्वभूमी नसताना धात्रक दाम्पत्याने उभारलेल्या ‘वरुण अ‍ॅग्रो प्रोसेसिंग फूड्स प्रा. लि.’च्या उत्पादनाने देशातच नव्हे, तर जगातील तब्बल ८० राष्ट्रांमध्ये गुणवत्तेच्या बळावर स्थान मिळवले आहे. भारतात टोमॅटोची सर्वाधिक पेस्ट तयार करणाऱ्या या कारखान्यात आंबा, पेरू, पपई, केळी, लिंबू या फळांवरही प्रक्रिया केली जाते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज्यातील सुमारे पाच हजार शेतकऱ्यांशी करार पद्धतीची शेती करत त्यांनी संबंधितांच्या कृषिमालाला शाश्वत भाव आणि बाजारपेठही मिळवून दिली आहे.

वरुण अ‍ॅग्रोचे व्यवस्थापकीय संचालकपद भूषविणाऱ्या मनीषा धात्रक यांच्या फळप्रक्रिया उद्योग उभारण्याच्या संकल्पनेला पती व सासरच्या मंडळींनी भक्कम पाठबळ दिले आणि दिंडोरी तालुक्यातील उमराळे या त्यांच्या गावात हा प्रकल्प उभा राहिला. आज असंख्य शेतकऱ्यांच्या शेतमालाला तो भरभक्कम आर्थिक आधार देत आहे. जेमतेम ५०० किलो फळांवर प्रक्रिया करून सुरू झालेल्या या उद्योगाने आता दररोज ५०० मेट्रिक टन इतक्या प्रचंड प्रमाणात प्रक्रियेची क्षमता विस्तारली आहे. वर्षभरात या प्रकल्पात एक लाख मेट्रिक टन फळांवर प्रक्रिया केली जाते. डोळे दिपवणाऱ्या या प्रवासामागे अपार कष्ट आहेत. मनीषा यांचे वडील हवालदार होते. मनमाड येथे मराठी माध्यमाच्या शाळेतून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले आणि पुढच्या महाविद्यालयीन शिक्षणासाठी प्रवरानगर गाठले. प्रवरानगरला इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीची पदवी त्यांनी प्राप्त केली. या शिक्षणाच्या आधारे त्या काळात चांगल्या वेतनाची नोकरी मिळणे अवघड नव्हते; परंतु उद्योग-व्यवसाय हेच त्यांचे ध्येय होते. शिक्षण पूर्ण झाल्यावर घरच्यांनी लग्नासाठी स्थळ शोधण्यास सुरुवात केली. तेव्हा दिंडोरीतील उमराळे गावातील शशिकांत धात्रक यांचे स्थळ त्यांच्या पाहण्यात आले. कला शाखेत पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या शशिकांत यांच्याशी लग्नाची बोलणी करतानाच उभयतांनी आपल्या भविष्यातील वाटचालीचीही चर्चा केली. त्यातून आपण एकाच वाटेचे प्रवासी आहोत याची दोघांना खात्री पटली. उद्योग-व्यवसाय करण्यावर त्यांच्यात एकमत झाले आणि रेशीमगाठ जुळल्यावर त्या दृष्टीने प्रवासास सुरुवातही झाली.

कोणताही उद्योग करायचा म्हटला की स्थानिक पातळीवर कच्च्या मालाची उपलब्धता अनिवार्य ठरते. धात्रक कुटुंबाची उमराळे गावात सात एकर शेती आहे. १९९६ चा तो काळ. नाशिक जिल्ह्यत टोमॅटोचे विपुल उत्पादन झाले होते. पण भाव इतके कोसळले, की उत्पादन खर्च वसूल होणे तर दूरच; टॉमेटो बाजारात विक्रीला नेण्याचा खर्चही परवडत नव्हता. त्यामुळे ग्रामीण भागात ठिकठिकाणी शेताबाहेर टोमॅटो फेकला जात होता. प्रचंड उत्पादनामुळे टोमॅटो, कांदा आणि  इतर नाशिवंत कृषिमालाच्या बाबतीत आजही अनेकदा ही स्थिती ओढवते. टोमॅटोची ही बिकट अवस्था धात्रक यांच्या अन्नप्रक्रिया उद्योगाची खरी प्रेरणा ठरली.

टोमॅटोवर प्रक्रिया कशी होते, त्याची बाजारपेठ आणि त्याकरता लागणारी यंत्रसामग्री इत्यादीबाबत त्यांनी माहिती गोळा केली. प्रारंभी ५०० किलो क्षमतेचा प्रक्रिया उद्योग सुरू करण्याचे निश्चित झाले. परंतु मुख्य अडचण पशांची होती. नुकतेच लग्न झालेल्या दाम्पत्याच्या गाठीशी केवळ पाच हजार रुपये होते. माहेर व सासरच्या मंडळींची आíथक स्थितीही बेताचीच असल्याने त्यांच्याकडून मदत मिळण्याची शक्यता नव्हती. दुसरीकडे बँकाही कर्ज देण्यास तयार नव्हत्या. काही बँकांनी बिनशेती मालमत्ता तारण ठेवण्याची मागणी केली. धात्रक कुटुंबाकडे शेतीव्यतिरिक्त तारण देण्यासाठी काहीच नव्हते. त्यामुळे कर्ज मिळणे अवघड झाले. यावेळी मूळचे उमराळे गावातील असलेले, नाशिकच्या जनलक्ष्मी बँकेचे अध्यक्ष माधवराव पाटील यांनी या नवउद्योजकांना आपल्या बँकेतून कर्ज दिले. त्यानंतर अर्धा एकर जागेत या छोटय़ाशा उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली गेली.

टोमॅटो पेस्ट तयार करण्याचे काम सुरू झाले. जिल्ह्यत कच्चा माल मुबलक असल्याने अल्पावधीत या उद्योगाने गती घेतली. काही वष्रे हेच काम सुरू राहिले. कालांतराने या क्षेत्रातील इतरही संधी लक्षात येऊ लागल्या. एव्हाना प्रक्रिया करण्याची क्षमताही अपुरी पडू लागली होती. तेव्हा इतर फळांवरील प्रक्रियेचाही समावेश करत उद्योग विस्तारण्याचा विचार सुरू झाला. त्या अनुषंगाने परदेशात वापरल्या जाणाऱ्या तंत्राची माहिती त्यांनी जागतिक पातळीवर आयोजित कृषी प्रदर्शनास भेट देऊन जमविण्यास सुरुवात केली. फळांवर प्रक्रिया करण्याची क्षमता प्रतिदिन ५०० मेट्रिक टनपर्यंत नेण्याची त्यांची प्रबळ इच्छा होती. त्यासाठी यंत्रसामग्री खरेदी करायची तर मोठय़ा प्रमाणात भांडवलाची आवश्यकता होती. जवळपास तीन ते चार र्वष त्यासाठी धडपड करावी लागली. या काळात बँक ऑफ महाराष्ट्रच्या एका अधिकाऱ्याने त्यांना प्रकल्प उभारणीचा अहवाल, त्या अनुषंगाने करावयाची पूर्तता याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्याआधारे बँक कर्ज देण्यास तयार झाली. परदेशातून अत्याधुनिक यंत्रसामग्री खरेदी करण्यात आली. २०११ साली उमराळे गावात टेकडीवजा पडीक जमिनीवर वरुण अ‍ॅग्रोचा १७ एकर क्षेत्रात विस्तार करण्यात आला. अशा तऱ्हेचा मोठय़ा क्षमतेचा उद्योग नाशिकमध्ये कार्यान्वित होत असल्याची चर्चा तत्पूर्वीच उद्योग- जगतात सुरू झाली होती. ही वार्ता ऐकून हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीचे अधिकारी उत्सुकतेपोटी धात्रक यांच्या भेटीला आले. इतक्या प्रचंड क्षमतेने फळांवर प्रक्रिया करण्याचा विचार करणाऱ्या उद्योगाच्या आíथक स्थितीची चाचपणी केल्यावर त्यांनाही प्रश्न पडला. परंतु धात्रक दाम्पत्याने कठोर मेहनत आणि दर्जेदार उत्पादनातून अशा सर्व प्रश्नांना चोख उत्तर दिले. प्रतवारी करून फळ प्रक्रियेसाठी स्वयंचलित यंत्रणेत सोडल्यानंतर पेस्ट वा गर थेट पॅकबंद होऊन बाहेर येते. म्हणजे या प्रक्रियेत प्रतवारीचा भागवगळता मानवी स्पर्श कुठेही होत नाही. टोमॅटोची पेस्ट आणि आंबा, पेरू, पपई, केळी, लिंबू यांचा गर काढल्यानंतर तो १८० दिवस चांगला राहील, यादृष्टीने अतिशय विशिष्ट स्वरूपाच्या पिशवीत वेष्टित होतो.

टोमॅटो केचअप बनविणारा हिंदुस्थान युनिलिव्हर हा देशातील सर्वात मोठा उद्योग! भारतात आवश्यक त्या प्रमाणात टोमॅटो पेस्ट उपलब्ध होत नसल्याने त्यांना चीनमधून ती आयात करावी लागत असे. त्यांची ही निकड वरुण अ‍ॅग्रोने पूर्ण केली. त्यामुळे या उद्योगाला आता चीनमधून टोमॅटो पेस्ट आयात करावी लागत नाही. आज केवळ भारतातच नाही, तर युरोपीय आणि आखाती देशांसह जवळपास ८० राष्ट्रांमध्ये वरुण अ‍ॅग्रोची उत्पादने निर्यात केली जातात. अमेरिका व युरोपीय देशांत कृषिमाल पाठवायचा झाल्यास कठोर स्वरूपाचे निकष असतात. त्या निकषांची पूर्तता करून वरुण अ‍ॅग्रो जगभरात प्रक्रिया केलेले उत्पादन निर्यात करीत आहे. आंबा व पेरूच्या गराला परदेशात प्रचंड मागणी आहे. पाच हजार रुपयांत सुरू झालेल्या वरुण अ‍ॅग्रोची वार्षकि उलाढाल आज कोटय़वधीच्या घरात गेली आहे. ग्रामीण भागातील या कारखान्याने २०० जणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. इतकेच नव्हे, तर प्रक्रियेसाठी नियमितपणे कच्चा माल उपलब्ध होण्यासाठी पाच हजार शेतकऱ्यांशी करार पद्धतीने शेती केली जाते. त्यासाठी संबंधितांना बियाण्यांपासून आवश्यक ते संपूर्ण तंत्रज्ञान पुरविले जाते. विशेष वाणांची लागवड करून शेतकऱ्यांच्या एकरी उत्पादनातही लक्षणीय वाढ करण्यात आली आहे. यामुळे आदिवासीबहुल नंदुरबारसारख्या कोरडवाहू शेतीत पपईच्या लागवडीचा विचार आज शेतकरी करू शकतो. संबंधितांचा कृषिमाल थेट शेतातून कारखान्याचे वाहन घेऊन जाते. त्यासाठी बाजारपेठ शोधण्याची त्यांना गरज राहिलेली नाही. उत्पादकता वाढविण्यासाठी टोमॅटोच्या नव्या वाणांवर संशोधन केले जात आहे. करारबद्ध शेतकऱ्यांना मार्गदर्शन व तंत्रज्ञान पुरविण्यासाठी वरुण अ‍ॅग्रोने तज्ज्ञांचे स्वतंत्र पथक नियुक्त केले आहे.

प्रगतीचे हे शिखर गाठताना धात्रक दाम्पत्याला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. भांडवल जमवताना जशी कसरत करावी लागली, तसेच प्रक्रिया उद्योगासाठी आवश्यक ५० परवाने मिळवतानाही प्रचंड दमछाक झाली. कृषिमालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांना प्रोत्साहन देण्याचे शासनाचे धोरण असल्याचे नेहमी सांगितले जाते. परंतु एखाद्या उद्योजकाने त्यात रुची दाखवली तर परवाने मिळवताना लालफितीच्या कारभाराचा विदारक अनुभव त्याला घ्यावा लागतो. वास्तविक अधिक प्रमाणात उत्पादित होणाऱ्या कृषिमालावर प्रक्रिया झाल्यास शेतकरी व पर्यायाने राज्यालाच लाभ होणार असतो. परंतु शासकीय यंत्रणेला त्याच्याशी काही देणेघेणेच नसल्याची स्थिती आहे. या शासकीय अनास्थेतून उद्भवलेल्या आव्हानावर मात करत वरुण अ‍ॅग्रो वर्षांकाठी तब्बल एक लाख मेट्रिक टन फळांवर प्रक्रिया करत आहे.

दोन दशकांत अथक मेहनतीतून साध्य केलेल्या या कामगिरीची दखल विविध पातळीवर घेण्यात आली. िहदुस्थान युनिलिव्हरने ‘बेस्ट सस्टेनेबल सप्लायर’ तसेच ‘आशिया खंडातील सर्वोत्कृष्ट पुरवठादार’ या पुरस्कारांनी वरुण अ‍ॅग्रोला सन्मानित केले आहे. मनीषा धात्रक यांना राज्य शासनाने ‘कृषिभूषण’, तर एबीपी माझा वृत्तवाहिनीने ‘शेती सन्मान’ पुरस्काराने गौरविले आहे. दिल्ली येथील केंद्रीय संस्थेमार्फत दोन पुरस्कारांनी धात्रक दाम्पत्याच्या कामगिरीची नोंद घेण्यात आली. वरुण अ‍ॅग्रो लवकरच फळांचा रस तयार करण्याच्या क्षेत्रात उतरत आहे. महाराष्ट्रासह गुजरात तसेच इतर प्रांतांतील अन्न तंत्रज्ञानाचे शिक्षण घेणारे विद्यार्थी दरवर्षी या कारखान्यात प्रशिक्षणार्थी म्हणून येतात. शेती व्यवसाय निश्चितपणे फायदेशीर होऊ शकतो. पारंपरिक पद्धतीऐवजी आधुनिक तंत्राने नियोजनपूर्वक काम करून कृषिमालाची उत्पादकता वाढविणे, त्यावर प्रक्रिया करणे आणि नवनवीन बाजारपेठ शोधणे ही त्रिसूत्री त्यासाठी महत्त्वपूर्ण ठरते. कोणत्याही शासकीय अनुदानावर विसंबून न राहता धात्रक दाम्पत्याने शेतक ऱ्यांना यशाचा हा राजमार्ग दाखवला आहे.

अनिकेत साठे / aniket.sathe@expressindia.com

दिनेश गुणे/ dinesh.gune@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 11, 2016 1:42 am

Web Title: inspirational stories of successful people
Next Stories
1 मैत्र जिवांचे..
2 विद्यादानाचे व्रत
3 ‘जोटो’वाले जोशी
Just Now!
X