03 August 2020

News Flash

‘जोटो’वाले जोशी

नाशिक शहरालगत सय्यदपिंप्री हे जोशी यांचे मूळ गाव. जोशी कुटुंबाची स्थिती हलाखीची होती.

अनेकदा अपयश येऊनही त्यातून धडा घेत काम करण्याची प्रखर जिद्द ठेवली आणि स्वत:च्या कामावर ठाम विश्वास बाळगला तर एक दिवस नक्कीच असा येतो, की तुम्ही ज्या क्षेत्रात काम करीत आहात त्यात अधिराज्य गाजवू शकता. नाशिक येथील जोटो अ‍ॅब्रेसिव्हज् प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक जयप्रकाश जोशी यांनी अथक प्रयत्नांती हेच सिद्ध केले आहे. कधीकाळी भारत प्रतिभृती मुद्रणालयात कामगार म्हणून काम करणाऱ्या जोशींच्या कारखान्याने ‘प्रिसिजन ग्राइंडिंग व्हील्स’निर्मितीत आज जगभरात लौकिक प्राप्त केला आहे. गुणवत्तेच्या बळावर त्यांचे उत्पादन १८ राष्ट्रांत निर्यात होते. या क्षेत्रातील जगातील पहिल्या पाच कंपन्यांमध्ये ‘जोटो’चा समावेश आहे. ‘मेक इन इंडिया’चा बोलबाला नसणाऱ्या काळात जोशी यांनी सुरू केलेल्या कामाचे कार्यक्षेत्र विस्तारण्यात त्यांचा मुलगा मनोजने मोलाचा हातभार लावला. मर्सिडिझ, बीएमडब्लू आदी श्रीमंती गाडय़ांमधील इंजिन व चाकांसाठीच्या खास बेअरिंग बनवण्यासाठी ‘जोटो’च्याच प्रिसिजन ग्राइंडिंग व्हील्सचा वापर होतो.
जयप्रकाश जोशींच्या कारखान्याला ही भरारी सहजी साधलेली नाही. अनेक चढउतारांना तोंड देत, परिस्थितीशी झगडत त्यांनी हे यश मिळवले आहे. आज चीनने भारतातील बाजारपेठा काबीज केल्या असल्या तरी जोटोने मात्र या क्षेत्रातील चीनच्या बाजारपेठेत मुसंडी मारली आहे. त्यांच्या एकूण उत्पादनापैकी निम्मे चीनलाच निर्यात होते. फक्त चीनच नव्हे, तर जगातील प्रगत राष्ट्रांतील बडय़ा उद्योगांची भिस्त ‘जोटो’वर आहे.
नाशिक शहरालगत सय्यदपिंप्री हे जोशी यांचे मूळ गाव. जोशी कुटुंबाची स्थिती हलाखीची होती. वडील भिक्षुकी करायचे. पाच भाऊ व बहीण अशा मोठय़ा कुटुंबाचा गाडा हाकताना पोटभर अन्न मिळणेही मुश्कील. भावंडांत चौथ्या क्रमांकावर असणाऱ्या जयप्रकाश यांनी ओझरच्या शाळेतून रोज १४ कि. मी. पायपीट करीत कसेबसे अकरावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. अंतिम परीक्षेला पिंपळगाव बसवंत केंद्रात त्यांचा क्रमांक लागला. गावापासून २५ कि. मी. अंतरावरील हे ठिकाण. त्यामुळे रोज पायी ये-जा करणेही अशक्य. त्यामुळे परीक्षा संपेपर्यंत त्यांनी पिंपळगावमधील एका मंदिरात आपले बस्तान ठोकले. परीक्षा झाली आणि वडिलांनी काम शोधण्यासाठी नाशिकला रवाना केले. पंचवटीत गॅरेजमध्ये आठवडय़ाला दहा रुपये पगारावर त्यांना काम मिळाले. गोदावरी बाजूलाच असल्याने नदीवर अंघोळ करायची, अंगावरचे कपडे तिथेच धुवून सुकवायचे आणि वापरायचे. असे दोन वर्षे चालले. गॅरेजमधील अनुभवावर त्यांची एडीबी बॅटरी कंपनीने मॅकेनिक म्हणून निवड केली. प्रशिक्षणासाठी मुंबईला जाण्याची संधी मिळाली. व्यवसायानिमित्त आज जगभर भ्रमंती करणाऱ्या जोशी यांना तेव्हा मुंबई पहिल्यांदा पाहण्याचा कोण आनंद झाला होता. बॅटरी दुरुस्तीच्या कामादरम्यान नाशिक रोडच्या भारत प्रतिभृती मुद्रणालयात कामगार म्हणून त्यांना नोकरी मिळाली. केंद्र सरकारच्या अखत्यारीतील ही सेवा. फारसे काम नाही, तरी पगार बऱ्यापैकी! बहुतेकांसाठी खरे तर हा आनंदाचा विषय. परंतु जोशी यांना ते पटत नव्हते. त्यामुळे सुटीदिवशी गुजरातमधील कंपनीच्या ग्राइंडिंग व्हील्सच्या विपणनाचे काम त्यांनी औद्योगिक वसाहतीत सुरू केले आणि या उत्पादनाशी त्यांची प्रथमच ओळख झाली. यानिमित्ताने त्यांची औद्योगिक वसाहतीत पायपीट सुरू झाली. या कामात बरे-वाईट अनुभव येत होते. अशा परिस्थितीत मुद्रणालयातील सरकारी नोकरी सोडण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला. या सेवेत बिनकामाचे वेतन मिळत असल्याने त्यावर पाणी सोडून जोशी प्रवाहाविरुद्ध निघाले. त्यांचा हा निर्णय योग्यच होता, हे कालांतराने साध्य झालेल्या यशाने अधोरेखित केले.
मुद्रणालयातील नोकरी सोडल्यावर चार-पाच मित्रांच्या सहकार्याने त्यांनी अंबड औद्योगिक वसाहतीत ग्राइंडिंग व्हील्सचा कारखाना सुरू केला. भागीदारीच्या व्यवसायात मराठी माणूस फार काळ टिकत नाही असे म्हणतात. त्यामुळे सहकाऱ्यांनी काही वर्षांत ५० हजार रुपये देऊन त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. तेव्हा मिळालेल्या रकमेतील निम्म्याहून अधिक रक्कम त्यांना घरखरेदीसाठी वापरावी लागली. त्यामुळे उरलेल्या तुटपुंज्या रकमेत स्वतंत्र व्यवसाय करण्याचे आव्हान उभे ठाकले. यावेळी दिल्लीतील ग्राइंडिंग व्हील्सचा पुरवठादार असणारा एक मुस्लीम व्यावसायिक मदतीला धावून आला. त्याने उधारीवर माल देण्याची तयारी दर्शवली. काही वर्षे व्हील्सच्या विपणनाचे काम ते करू लागले. कालांतराने स्पर्धा वाढली. त्यात या ग्राइंिडग व्हील्सचा निभाव लागला नाही. या टप्प्यावर जोशी यांनी स्वत:च ग्राइंडिंग व्हील्स निर्मिती करण्याचे ठरवले आणि त्या अनुषंगाने चाचपणी व तयारी सुरू केली. हे तंत्रज्ञान ५० हजार रुपयांच्या मोबदल्यात देण्यास मद्रासमधील एक तज्ज्ञ राजी झाला. अंबड औद्योगिक वसाहतीत भाडेतत्त्वावर छोटय़ाशा जागेत ‘जोटो’ची मुहूर्तमेढ रोवली गेली. जुजबी माहितीच्या आधारे ग्राइंडिंग व्हील्स बनवण्याचे प्रयोग सुरू झाले. सुरुवातीला गरजेनुसार व्हील्सनिर्मितीच्या या धंद्यात अनेकदा अपयशाला तोंड द्यावे लागले. परंतु नंतर त्यात यश मिळू लागले आणि उत्पादन सुरू झाले. पुढे कामासाठी भाडेतत्त्वावरील जागा अपुरी पडू लागली. त्यामुळे सातपूर औद्योगिक वसाहतीतील एक इमारतीत बँकेकडून कर्ज घेऊन त्यांनी गाळा घेतला. अथक प्रयोग आणि प्रयत्नांती निर्मिलेले त्यांचे उत्पादन बाजारात पसंतीला उतरू लागले. देशातून मागणी येऊ लागली. याच सुमारास मनसबदार नावाचा मित्र त्यांना जर्मनीला घेऊन गेला. जर्मनीतील कार्यप्रवणतेने त्यांना अक्षरश: भुरळ घातली. त्यामुळे काही महिन्यांतच त्यांनी पुन्हा जर्मनीत आयोजित औद्योगिक प्रदर्शनाला भेट दिली. तिथे वापरले जाणारे आधुनिक तंत्रज्ञान, कामाची पद्धत अन् आवाका पाहून ते चकित झाले. आपल्याला खूप काम करावे लागेल, ही खूणगाठ बांधून ते भारतात परतले.
जर्मनीतील कंपनीकडून अत्याधुनिक पद्धतीची नवी भट्टी त्यांनी आपल्या कारखान्यासाठी खरेदी करून नव्या प्रयोगाचा श्रीगणेशा केला. याच काळात दहावीची परीक्षा देणारा मुलगा मनोज याला पुढील शिक्षण बाहेरून घेण्यास सांगून त्यांनी कारखान्यात बोलावले. आणि देशोदेशी भ्रमंती करत आपल्या प्रिसिजन ग्राइंडिंग व्हील्ससाठी बाजारपेठ शोधणे सुरू झाले. प्रारंभी उत्पादन खरेदीसाठी परदेशात कोणी त्यांना उभे करत नव्हते, तरीही त्यांचा पाठपुरावा सुरूच होता. एव्हाना बाहेरून शिक्षण घेत वाणिज्य शाखेची पदवी मिळवणाऱ्या मनोजची कामात चांगलीच मदत होऊ लागली. त्याच्या प्रयत्नांमुळे चीनमधून एसकेएफ बेअिरगकडून पहिली ‘ऑर्डर’ जोटो अ‍ॅब्रेसिव्हज्ला मिळाली. जोटोने निर्मिलेले ग्राइंडिंग व्हील्स चिनी चाचणीत उत्तीर्ण झाले. १२ हजार डॉलरच्या परदेशातील या पहिल्या मागणीनंतर आजतागायत ‘जोटो’ने कधीही मागे वळून पाहिलेले नाही. आता गाळ्यातील जागा अपुरी पडू लागली. त्यामुळे सातपूर औद्योगिक वसाहतीतील एका मोठय़ा भूखंडावर भव्य कारखाना आकारास आला. सवरेत्कृष्ट दर्जामुळे जगातील अनेक विकसित राष्ट्रांमध्ये त्यांचे उत्पादन आज निर्यात होते. जर्मनीची शाफलर, कोरियाची हुंडाई, जपानमधील एनटीएन, कोयो, नाची, एनएसके अशी ही बरीच मोठी यादी आहे. एसकेएफ बेअरिंगचे ते जागतिक पुरवठादार आहेत. जयप्रकाश जोशी यांनी प्रयोगातून गुणवत्तापूर्ण उत्पादन केले. त्यास जागतिक बाजारपेठ मिळवण्यात मनोजच्या प्रयत्नांची जोड लाभली. याच प्रयोगांमधून प्रिसिजन ग्राइंडिंग व्हील्सचा २५ सेकंदांच्या सायकलचा कालावधी त्यांनी साडेतीन सेकंदांपर्यंत आणण्याचे तंत्र विकसित केले. त्यामुळे त्याचा वापर करणाऱ्या उद्योगांच्या उत्पादकतेत वाढ झाली. प्रिसिजन ग्राइंडिंग व्हील्सनिर्मिती क्षेत्रात जगातील पहिल्या पाच कंपन्यांमध्ये भारतातील जोटो अ‍ॅब्रॅसिव्हज् या एकमेव कंपनीचा समावेश आहे. हब ग्राइंडिंग व्हील बनवणारा देशात त्यांचा एकमेव कारखाना आहे. कारखान्यात ४० कामगार आहेत. नाशिक जिल्हय़ातील लघुउद्योगांत सर्वाधिक आयकर भरणारे उद्योजक अशी त्यांची ओळख आहे.
जोटो अ‍ॅब्रेसिव्हिज्च्या कामगिरीची विविध पुरस्कारांच्या माध्यमातून दखलही घेण्यात आली. नाशिक जिल्हा उद्योग केंद्रातर्फे सवरेत्कृष्ट उद्योग, लोकसत्ता भरारी-जेडीके मेमोरियलचा पहिल्या पिढीतील यशस्वी उद्योजक, नाशिक इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनतर्फे ‘एक्सलन्स अवॉर्ड’ आदींचा यात समावेश आहे. विज्ञान परिषदेतर्फे डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते ‘बेस्ट इनोव्हेशन अवॉर्ड’ने जयप्रकाश जोशी यांना सन्मानित करण्यात आले, तर जर्मनीच्या शाफलर कंपनीने उत्पादन खर्चात बचत करणारे तंत्रज्ञान विकसित केल्याबद्दल मनोज जोशी यांना गौरवले आहे. यशाचे शिखर पादाक्रांत करताना जोशी कुटुंबीयांना परिस्थितीमुळे अनेक तडजोडी कराव्या लागल्या. खेळण्या-बागडण्याच्या वयात मुलाला कारखान्यात कामाला जुंपल्याचे शल्य जोशींना आजही बोचते.
कारखान्याची जबाबदारी सांभाळतानाच सामाजिक उपक्रमांतही त्यांचा सक्रीय सहभाग असतो. ग्रामीण विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, सेवाभावी संस्थांना आर्थिक मदत करत असतानाच उद्योजकांशी निगडित प्रश्नांवरही त्यांनी काम केले. जोटो अ‍ॅब्रेसिव्हज् या उंचीवर पोहोचण्यात त्यांचे परिश्रम कारणी लागले. उद्योग खात्याचे तत्कालीन प्रधान सचिव अजिज खान आणि नाशिकचे तत्कालीन जिल्हाधिकारी अशोक खोत यांनी कठीण परिस्थितीत त्यांना मदत केली. सर्वोत्तम कामाचा ध्यास ठेवल्यास तुमचे उत्पादन चांगले आहे हे सांगावे लागत नाही. जगातील स्पर्धकांशी ‘जोटो’ याच बळावर दोन हात करीत आहे.
अनिकेत साठे – aniket.sathe@expressindia.com
दिनेश गुणे – dinesh.gune@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 14, 2016 1:34 am

Web Title: jai prakash joshi inspirational story
Next Stories
1 जुईची संजीवनी!
2 फुलाची पाकळी!
3 वंचितांना शिक्षणप्रवाहात आणणारे ‘सदाफुले’!
Just Now!
X