एखाद्या क्षेत्रात झोकून देऊन त्यात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या यशवंतांची यशोगाथा कथन करणारं साप्ताहिक सदर..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कुशाग्र बुद्धी, जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या बळावर धान-उत्पादक शेतकरी संजय मुकरू गंडाटे या तरुणाने गडचिरोलीसारख्या मागास जिल्हय़ात गोडय़ा पाण्यात चक्क मोती पिकवण्याची किमया करून दाखवली आहे. त्याच्या या अभिनव प्रयोगाबद्दल..

मुंबई महानगरापासून राज्याच्या शेवटच्या टोकावर महाराष्ट्र, छत्तीसगढ व तेलंगणाच्या सीमावर्ती भागातला गडचिरोली हा अतिदुर्गम आदिवासी जिल्हा. नक्षलवाद्यांच्या रक्तरंजित क्रांतीत स्थानिक आदिवासींच्या रक्ताचे येथील भूमी शोषण करीत असल्याने गडचिरोलीतील शेती रक्ताने माखलेली- अर्थात लालबुंद झालेली आहे. घनदाट जंगल, विपुल खनिज संपत्ती असलेल्या या अरण्यप्रदेशात दळणवळणाची अत्यल्प साधने.. रेल्वेचा चंचुप्रवेशही झालेला नाही. शेतकऱ्यांची हजारो एकर जमीन संपादित करून सरकारने एमआयडीसी सुरू केली. मात्र, नक्षलवाद्यांच्या भीतीने तेथे एकही उद्योग आजवर सुरू होऊ शकलेला नाही. त्यामुळे या प्रदेशाच्या कपाळावरील मागासलेपणाची रेषा अजूनही पुसली गेलेली नाही. येथील आदिवासींना आजही अन्न माहिती नाही. कारण गावा-शहरांतील कुटुंबे जे अन्न खातात, ते त्यांना मिळतच नाही. मुंग्या-उंदरांची चटणी खाऊनच ते उदरनिर्वाह करतात. बेरोजगारीचा सर्वात मोठा प्रश्न असलेला राज्यातील पहिल्या क्रमांकाचा जिल्हा म्हणून गडचिरोलीचे नाव नेहमीच राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालातही आघाडीवर असते. रोजगारासाठी येथे केवळ दोनच पर्याय आहेत. पोलीस दलाची नोकरी किंवा नक्षल्यांची चाकरी! ज्यांना या दोन्हीत सहभागी व्हायचे नाही ते घरदार सोडून इतरत्र स्थलांतरित होतात. आणि मग मागे वळून पाहत नाहीत. मागे राहिलेली आदिवासी कुटुंबे बंदुकीच्या गोळ्यांच्या भयाचे सावट घेऊन जगत राहतात. त्यांना ‘बुलेट’ची ओळख आहे. मात्र, ‘बॅलट पेपर’ची माहिती नाही. निसर्गाच्या अवकृपेमुळे आणि सततच्या नापिकीमुळे एकीकडे शेती कठीण झाली आहे. तरीही आजही या जिल्हय़ातील प्रमुख रोजगार शेती हाच आहे.
जिल्ह्य़ातील इतर तरुणांप्रमाणेच रोजगाराच्या गंभीर समस्येत होरपळणाऱ्या एका तरुणाला मात्र इथेच आशेचा एक किरण सापडला आणि त्याने तो पकडून त्याचे सोने केले. संजय गंडाटे या तरुण, कल्पक शेतकऱ्याने परंपरेने पिकवली जाणारी शेती सोडली आणि शेतात तळे निर्माण केले. सुरुवातीला लोकांनी त्याला वेडय़ात काढले. जिथे साधे धानदेखील धडपणे पिकत नाही, त्या शेतातून हा तरुण मोती पिकवायला निघाला होता. शेतात मोती पिकवणे ही कविकल्पना म्हणून ठीक असली तरी असा प्रकार प्रत्यक्षात कुणी केल्याचे आसपास कुणालाच माहीत नव्हते. पण संजयने चिकाटीने गोडय़ा पाण्यात चक्क मोती पिकवण्याची जगावेगळी किमया करून दाखविली. मोत्याची शेती करून आज संजय वर्षांकाठी १० ते १२ लाखांचे उत्पन्न घेत आहे. ज्या शेतात पूर्वी जेमतेम पोटापुरते धान्य पिकत असे, तेथे आता ही मोत्यांची शेती सुरू आहे. आणि संजयचे हे मोत्याचे शेत गावकऱ्यांचाच नव्हे, तर राज्यातील जवाहिऱ्यांचा आणि अनेक उद्योजकांचा उत्सुकतेचा विषय झाला आहे. संजयची मोत्याची शेती ‘याचि डोळा’ पाहून अनेकांनी तोंडात अक्षरश: बोटे घातली आहेत. सुरुवातीला उपेक्षा आणि कुचेष्टेचा धनी झालेल्या संजयच्या या यशावर सन्मानाचे तुरे चढण्यास आता सुरुवात झाली आहे.
संजयच्या मोत्यांच्या शेतीची कथा मोठी रोमहर्षक आणि थक्क करणारी आहे. गडचिरोलीहून सात कि. मी.वरील पारडी या गावात एका शेतकरी कुटुंबात संजयचा जन्म झाला. शिक्षणाची आस असल्यामुळे घरच्या जेमतेम परिस्थितीशी जुळवून घेत त्याने बी. ए.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. आता तो एल. एल. बी.च्या चौथ्या वर्षांत आहे. संजयकडे वडिलोपार्जित तीन एकर शेती आहे. दोन एकर शेतीत धान आणि एक एकर शेतीवर सागवानाची लागवड आहे. तीन एकरांत आई, वडील, भाऊ, बहिणी, पत्नी आणि मुलाच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसाबसा सुरू होता. मात्र, नित्याची आर्थिक चणचण संजयला अस्वस्थ करत होती. अशी रडतखडत शेती कुठवर करायची? आधुनिक शेती करायची म्हटली तर एखादा वेगळा प्रयोग करायला हवा, ही भुणभुण त्याला रात्र रात्र झोपू देत नव्हती. अशातच त्याला एके दिवशी मोत्यांची शेती करण्याची कल्पना सुचली. त्याच्या मोत्यांच्या शेतीच्या कल्पनेचे गूढ बालपणात आहे. बालपणी आजोबा, आई-वडील, काका आणि भावांसह तो नेहमी नदीवर बैलांना आंघोळ घालण्यासाठी जात असे. तेव्हा तो नदीकाठावरील शिंपले घरी घेऊन यायचा. या शिंपल्यांचा उपयोग तेव्हा दुधावरची साय काढण्यासाठी केला जायचा. कालांतराने या शिंपल्यांची रांगोळी तयार करण्याची कला त्याने अवगत केली. रांगोळी तयार करतानाच या शिंपल्यांमध्ये कधी कधी मोती मिळायचे. त्यामुळे हे मोती कसे तयार होतात, याबाबत लहानपणापासून त्याच्या मनात कुतूहल होते. याच कुतूहलापोटी एक दिवस संजय गडचिरोली येथील कृषिविज्ञान केंद्रात गेला. तेथे त्याची भेट प्रा. संदीप कराडे यांच्याशी झाली. तेथे त्याने कराडे यांच्या मदतीने पाण्यात मोती तयार करण्याचे तंत्र शोधून काढले. त्यासाठी त्याला प्रचंड संशोधन व अभ्यास करावा लागला. संजयला ‘उलट लिहिण्याची कला’ अवगत असल्यामुळे त्याने शिंपल्यात मातीचे कण टाकून मोती तयार करणे सुरू केले. हे शिंपले प्लास्टिकच्या बरणीत ठेवल्यानंतर काही दिवसांत मोती तयार व्हायचे. मात्र, तयार झालेले मोती व शिंपले तीन ते चार महिन्यांतच मरायचे. मोती व शिंपले दीर्घकाळ टिकून राहत नाहीत म्हणून संजय अस्वस्थ असायचा. या अस्वस्थतेतून त्याने मग मोत्यांचा शास्त्रोक्त अभ्यास करून ते जास्तीत जास्त काळ कसे टिकून राहतील याचे तंत्र अवगत केले. केवळ तंत्र शोधून काढले नाही, तर ‘आता शेती करायची तर मोत्यांचीच!’ असा निर्धारही केला. या प्रयोगाबद्दल बोलताना संजयचे डोळे पाणीदार मोत्यासारखे चमकू लागतात. समोर पसरलेल्या शेतातील मोत्यांच्या पिकाकडे पाहत संजय आपल्या मोत्याच्या शेतीचे सुरुवातीचे दिवस आठवू लागतो..
मोत्यांची शेती करण्यासाठी संजयने गावातील तलावाची निवड केली. जवळ असलेली सर्व पुंजी मोत्यांच्या शेतीत लावली आणि पाच हजार मोत्यांचे बीज गावातील तलावात पेरले. परंतु गावातील काही लोकांना मोत्यांच्या शेतीचा हा प्रयोग रुचला नाही. द्वेषभावनेतून काहींनी तलावात विष टाकले. पाच हजार शिंपले आणि त्यात लपलेले मोती तयार होण्याआधीच नष्ट झाले. त्याच्यासाठी हा मोठाच धक्का होता. या धाडसासाठी संजयने सुमारे २५ लाख रुपयांची पुंजी पणाला लावली होती. एका क्षणात सारे होत्याचे नव्हते झाले. मोत्यांच्या शेतीला सुरुवात करत नाही तोच पहिल्याच प्रयत्नात २५ लाखांचे नुकसान झाल्याने त्याने आत्मविश्वासही गमावला. त्याला आता समोर फक्त कर्जाचा डोंगर तेवढा दिसत होता. बँकांची व नातेवाईकांची देणी द्यायची होती. निराशेच्या गर्तेत गेलेल्या संजयने मोत्यांच्या शेतीचा नाद सोडून दिला. आता केवळ धानाची शेती करायची आणि कायद्याचे शिक्षण पूर्ण करायचे असे त्याने ठरवले. आयुष्याला अशी कलाटणी मिळत असतानाच शैलेंद्र चव्हाण नावाच्या एका परिचिताने त्याला प्रोत्साहन दिले. एखाद्या प्रयोगात आर्थिक नुकसान झाले म्हणून तो प्रयोग कायमचा बंद करणे योग्य नाही, असे सांगून त्यांनी त्याला आत्मविश्वास दिला आणि संजयच्या डोळ्यांत मोत्याच्या शेतीची स्वप्ने पुन्हा चमकू लागली. त्याच तलावात त्याने पाच हजार शिंपल्यांत मोत्यांच्या शेतीची पुन्हा पेरणी केली. दुसऱ्या प्रयत्नात त्याला कमालीचे यश मिळाले आणि पाच हजार मोत्यांचे उत्पन्न झाले.
मोत्यांमध्ये नैसर्गिक, संवर्धित आणि कृत्रिम असे तीन प्रकार असतात. त्यानुसार त्यांचे रोपणही होते. कॅल्शिअम पदार्थ किंवा शिंपल्यापासून बनवलेले मणी किंवा केंद्रक मोती रोपणात वापरतात. शिंपल्यात ठरावीक एका शिंपल्याचा तुकडा किंवा भुकटी रोपण करून गोडय़ा पाण्यात तो शिंपला तीन वष्रे ठेवला जातो. त्या शिंपल्यात तयार झालेला मोती हा संवर्धित मोती असतो. तर नदी, नाले, तलावातील एखाद्या शिंपल्यात नकळत एखादा कण गेला आणि त्यापासून मोती तयार झाला तर तो नैसर्गिक मोती होय. संवर्धित मोती हा नैसर्गिक मोत्यासारखाच असतो. त्याची गुणवत्ताही अधिक असते.
संजयने केवळ संवर्धित व कृत्रिम मोत्यांची शेतीच केली नाही, तर या तयार केलेल्या मोत्यांना गडचिरोलीच्या आर्थिकदृष्टय़ा मागास सराफा बाजारात ३०० रुपये प्रति नग असा भावही मिळवला. अशा पद्धतीने संजयची मोत्यांची शेती सर्व अंगाने फुलत गेली. आता संजय दरवर्षी या शेतीतून लाखो रुपये कमावतो आहे. संजयने आता गावतलावात मोत्यांचे पीक घेणे बंद केले असून स्वत:च्या शेतात तो मोती पिकवीत आहे. संजय मोती तयार करण्यासाठी १० बाय १० चौरस फुटाच्या तळ्याचा वापर करतो. त्यात तो मोत्यांची शेती करतो. तीन हजार मोती पिकवण्यासाठी त्याला साधारणत: १८ महिन्यांचा काळ लागतो. सर्वात आधी शिंपल्यांमध्ये साच्यात तो मोत्याचे बीज टाकतो व नंतर शिंपले
बंद करून जाळ्याच्या साहाय्याने ते पाण्यात सोडतो. काही महिन्यांनंतर या शिंपल्यांमध्ये मोती तयार होतो. सध्या वर्षभरात तो या शेतीतून सुमारे १० ते १२ लाख रुपयांचे उत्पन्न घेतो आहे. मोती तयार व्हायला पाच ते सहा महिन्यांचा काळ लागतो. शिवाय शिंपल्याची बीजे नदीतूनच मिळत असल्याने त्याचा उत्पादन खर्च कमी असल्याचे संजय सांगतो.
यासोबतच संजयने डिझायनर मोती तयार करण्याचे तंत्रही शोधून काढले आहे. मोती तयार करण्यासाठी त्याने खास साचे तयार केले आहेत. या साच्यांमध्ये त्याने गणपती, लक्ष्मी, बुद्ध, क्रॉस यांच्यासह विविध आकारांतील मोती तयार केले आहेत. विशेष म्हणजे संजयने चेहऱ्यांच्या आकाराचे मोती तयार करण्याचे तंत्रही अवगत केले आहे. या मोत्यांना बाजारात चांगली मागणी आहे असे त्याचे म्हणणे आहे. एक ते दीड हजार रुपयांपर्यंत लोक या मोत्यासाठी देतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी, अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक सेलेब्रिटींच्या चेहऱ्यांचे मोती त्याने तयार केले आहेत. त्यासाठी शेततलाव, गोडे पाणी, जिवंत शिंपले, दगड व जाळी या पाच गोष्टींची आवश्यकता असते. आज अनेकजण प्लॅस्टिकचा दाणा घेऊन मोती तयार करत आहेत. मात्र, त्या मोत्यांचे आयुष्य अत्यल्प असते. दगडाशिवाय उत्कृष्ट गुणधर्माचा मोती तयारच होऊ शकत नाही अशी संजयची ठाम भावना आहे. प्लॅस्टिक दाण्यापासून तयार झालेले मोती जळतात, पण दगडापासून तयार झालेला मोती कधीच जळत नाही, असे तो सांगतो. मोत्यांच्या शेतीत संजयला त्याच्या आई-वडिलांसह पत्नी सीमा हिचीही मोलाची साथ लाभली आहे.
संजयने मोत्यांच्या शेतीसाठी खास ११ घटक व गुणधर्माचा समावेश असलेल्या मातीपासून एक दगड तयार केला आहे. या ११ घटकांच्या दगडापासून तो मोत्यांचे हे पीक घेत आहे. त्याच्या मोत्यांच्या शेतीला वर्तमानपत्रे, इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये प्रसिद्धी मिळताच मुंबई-पुण्यातील मोत्यांचे व्यापारी त्याच्याशी संपर्क साधून आहेत. यापुढे मोत्यांचे उत्पादन घेतले की आम्हालाच विकायचे, अशी विनंती त्याला मुंबईच्या एका मोतीविक्रेत्याने केली आहे. संजयने अल्पावधीत मोत्यांच्या शेतीचा प्रयोग यशस्वी करून दाखविल्याबद्दल २०१२ साली जळगाव येथे कृषीगौरव पुरस्काराने त्याला गौरवण्यात आले. नुकतेच १५ जानेवारीला पुणे येथे कृषी सन्मान पुरस्कार देऊन त्याला सन्मानित करण्यात आले. महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनीही त्याच्या या अभिनव प्रयोगाचे कौतुक केले. २०१२ मध्ये अकोल्याच्या पंजाबराव कृषी विद्यापीठात आयोजित कृषी प्रदर्शनात संजयने मोत्यांच्या शेतीची संकल्पना मांडली तेव्हा त्याच्या स्टॉलला तेव्हाचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भेट दिली आणि ते आश्चर्यचकित झाले. २०१३ साली गोंडवाना विद्यापीठात याच धर्तीवर कृषी प्रदर्शन आयोजित केले गेले होते तेव्हा राज्याचे पर्यावरण मंत्री संजय देवतळे, माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शांताराम पोटदुखे, जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा, राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे विभागीय संचालक डॉ. पी. एन. ढोळक यांनी संजयच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. या साऱ्यामुळे संजयचा आत्मविश्वास दुणावला आहे. लवकरच संजय राज्यातील विविध भागांत मोत्यांच्या शेतीच्या प्रयोगाची माहिती देण्यासाठी प्रदर्शने आयोजित करणार आहे. सांगली जिल्हय़ातील तासगाव, अहमदनगर व जळगाव येथील प्रदर्शनांचा कार्यक्रम निश्चित झाला आहे. नक्षलवाद्यांच्या भूमीत संजयने मोत्यांची पेरणी करून एक अभिनव प्रयोग यशस्वी करून दाखवीत तरुणांसमोर आदर्श वस्तुपाठ ठेवला आहे.
dinesh.gune@expressindia.com

मराठीतील सर्व बावनकशी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Naxal belt farmer takes to pearl cultivation
First published on: 31-01-2016 at 01:01 IST