X
X

माहेरची सावली

READ IN APP

मुंबई-गोवा महामार्गावर कोलाड नाक्यापासून काही अंतरावर एक भवानीमातेचं मंदिर लागतं.

मुंबई-गोवा महामार्गावर कोलाड नाक्यापासून काही अंतरावर एक भवानीमातेचं मंदिर लागतं. मंदिरातील मूर्तीसमोर जाण्याआधी बाहेरच्या छत्रपतींच्या मूर्तीसमोर मान झुकते आणि हा परिसर ओळखीचा वाटू लागतो. मायभवानीची सेवा करणाऱ्या एका माऊलीचंही इथेच दर्शन घडतं. गप्पांच्या ओघात आपलेपणा वाढतो आणि जवळिकीचं नातंही जडतं..
कोलाडजवळच्या भवानी मंदिराचा हा परिसर आज देशविदेशातील निराधार व माहेरच्या ममतेला पारख्या झालेल्या अनेक विवाहित महिलांचं माहेरघर बनला आहे. अडचणीत सापडलेल्या, स्वत:ची ओळख हरवून बसलेल्या, परिस्थितीने खचलेल्या, मातेच्या ममतेला पोरक्या झालेल्या स्त्रिया इथे येतात. या आईच्या खांद्यावर डोकं टेकून दु:खाला डोळ्यांवाटे वाट करून देतात.. आणि जगण्याची नवी उमेद घेऊन माघारी परततात. या माऊलीचं नाव : चंदाराणी कोंडाळकर. अनेक माहेरवाशिणींच्या चंदाताई!
समाधानी जीवन कसं जगावं, यावर अनेक पुस्तकं लिहिली गेली आहेत, पण खडतर जीवनाशी दोन हात करत कसं जगावं, याचं शिक्षण मात्र तशी परिस्थिती समोर उभी ठाकल्यावरच मिळतं. चंदाताईंनी उभारलेलं हे मंदिर म्हणजे खडतर जगण्याशी दोन हात करत जिंकण्याची कार्यशाळा आहे. समस्यांना घाबरून पळ काढायचा नसतो, तर त्यांचा धैर्याने सामना करायचा असतो, हे त्यांच्या भेटीत उमगतं. विवाहानंतर माहेरच्या मायेला पोरक्या झालेल्या अनेक स्त्रिया चंदाराणींकडे माहेरपणासाठी येतात. त्यांचं हे पोरकेपणाचं दु:ख आपल्या पदरात घेऊन चंदाताई त्यांच्यावर मायेची पाखर घालतात. आजवर दहा हजारांवर स्त्रियांना चंदाताईंच्या या घराच्या अंगणात माहेरच्या सुवासाची बरसात अनुभवायला मिळाली आहे.
चंदाताईंनी आज वयाची सत्तरी ओलांडली आहे. पण काम करण्याची उमेद आणि परिस्थितीशी दोन हात करण्याची त्यांची जिद्द मात्र तरुण आहे. त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा प्रसंग मुंबईत भांडुपला त्यांच्या घरी घडला. तोवर चारचौघांसारखंच त्यांचंही आयुष्य सुरू होतं. एका संध्याकाळी त्यांच्या घरी ओळखीचीच एक मुलगी आली. चेहऱ्यावर तजेला नव्हता. नजरही उदास. तिचं काहीतरी बिनसलं होतं, हे चंदाताईंनी ओळखलं आणि तिच्या पाठीवरून मायेनं हात फिरवत त्यांनी तिला जवळ घेतलं. मग मात्र त्या मुलीचा बांध फुटला. एक भयानक करुण कहाणी त्या संध्याकाळी बोलकी झाली. जन्मदात्या पित्याच्या वासनेची शिकार झालेल्या त्या मुलीनं टाहो फोडला. ‘मला त्या नरकातून सोडवा’ अशी आर्त साद घातली. कुणाचंही हृदय पिळवटून निघेल अशा या कहाणीनं चंदाराणीही हेलावल्या. त्यांनी त्या मुलीला आपल्या घरी आश्रय दिला. त्यांच्या घरच्यांचा याला फारसा पाठिंबा नव्हता. पण एका विस्कटलेल्या आयुष्याची घडी नीट बसवायचीच, असा निर्धार करून त्यांनी पदर खोचला. काही वर्षांतच त्या मुलीच्या भरकटलेल्या आयुष्याची घडी बसली. पोरक्या जगण्याला माहेर देण्याचा वसा इथेच सुरू झाला होता..
भांडुपला तयार कपडय़ांचा व्यवसाय करत चंदाताईंचा प्रपंच सुरू होता. या कारखान्यात एक तरुणी नोकरीला होती. तिचा नवरा आखाती देशात कामाला होता. कधीतरी तिकडून सुट्टीवर येताना त्याच्यासोबत त्याचे काही अरब मित्रही असत. नवऱ्याच्या बळजबरीने ती त्या अरबांच्या वासनेची शिकार व्हायची. चंदाताईंनी तिच्या नजरेतलं कारुण्य ओळखलं. पाठीवर प्रेमळ हात फिरवला. त्यानं तिची व्यथाही बोलकी झाली. तिला हिमतीनं जगण्याचं बळ देण्यासाठी चंदाराणींनी पदर खोचला. या लढाईत परिस्थितीनं त्यांच्या त्या हिमतीपुढे गुडघे टेकले!
या समाजसेवेपायी त्यांच्या स्वत:च्या संसाराची घडी मात्र काहीशी विस्कळीत होत होती. घरातून विरोध वाढू लागला, आणि चंदाताईंनी घर सोडण्याचा निर्णय घेतला. रायगड जिल्ह्य़ात कोलाडजवळ एक जागा खरेदी केली. शिवरायांच्या मुलखात भवानीमातेच्या सावलीत पोरक्या आयुष्यांचं ‘स्वराज्य’ फुलवण्याचं व्रत चंदाताईंनी स्वीकारलं. आणि इथे भवानीचं मंदिरही उभं राहिलं. उपजीविकेची सोय म्हणून त्यांनी हॉटेल सुरू केलं. पण त्यातून फारसं उत्पन्न मिळत नव्हतं. मग लोणची, आयुर्वेदिक तेलं, सरबतं तयार करून विकायला सुरुवात केली. हॉटेल आणि गृहोद्योगातून मिळणाऱ्या उत्पन्नातील दहा टक्के वाटा स्वत:साठी ठेवून उरलेलं सर्व उत्पन्न माहेरवाशिणींच्या सेवेखातर राखून ठेवायचं, हे त्यांनी आधीच ठरवलं होतं. गेली तीस वर्षे हे व्रत अखंडपणे सुरू आहे. देशविदेशातील दहा हजारांहून अधिक स्त्रियांनी चंदाताईंच्या माहेरची सावली अनुभवली आहे. ब्रिटिश नागरिक हेलन आणि जॉन हे हिंदू धर्माचा अभ्यास करण्यासाठी भारतात आले होते. त्यांची चंदाताईंशी योगायोगानं भेट झाली. दोघं त्यांच्या घरी राहिले. परतताना भारतात माहेर मिळाल्याच्या भावनेनं हेलन हेलावली होती.

अबुधाबीची रजिया आणि तिचे पती म्हसळा येथे काही कामासाठी आले होते. वाटेत भवानी मंदिरासमोर त्यांची गाडी बंद पडली. रजियाचा नवरा पाणी विकत घेण्यासाठी चंदाताईंच्या हॉटेलात आला आणि गाडी दुरुस्त होईपर्यंतच्या तासभरात चंदाताईंच्या मायेने त्यांना भारावून टाकलं. त्यानंतर रजिया चंदाताईंची मानसकन्याच झाली. उभयतांनी तीन-चार दिवस चंदाताईंच्या घरी मुक्काम केला. त्यांचं पाहुणचार आणि प्रेम अनुभवलं. आणि धर्मापलीकडचं एक नितांतसुंदर नातं जन्माला आलं. आजही रजिया भारतात येते तेव्हा चंदाताईंना भेटून आईच्या मायेचा अनुभव घेते..
माहेरपणासाठी येणाऱ्या मुलींकडून अथवा तिच्या कुटुंबाकडून चंदाताई एका रुपयाचीही मदत घेत नाहीत. त्यांच्या राहण्याचा, खाण्याचा सर्व खर्च त्या स्वत:च करतात. मुलींचे डोहाळे, आवडनिवडही त्या अगत्याने सांभाळतात. ‘स्त्री अबला नाही. ती आदिशक्तीचं रूप आहे. त्यामुळे स्त्रियांनी खंबीर व्हायला हवं. मग जगण्याचं गणित सोपं होतं,’ असं त्या सांगतात.
वयोमानानुसार चंदाताईंचं शरीर अलीकडे थकलं असलं तरी मन थकलेलं नाही. त्यामुळे माहेरपणाचा हा वसा जोवर शक्य आहे तोवर सुरू ठेवायचा असा त्यांचा निर्धार आहे. ‘कमरेला बाक आला आहे, पण अनुभवाची ओझी झेललेला माझा कणा अजूनही ताठ आहे,’ असं त्या निर्धारानं म्हणतात.
मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणात चंदाराणींचं हॉटेल आणि मंदिर बाधित झालं. रुंदीकरणासाठी जागा देणं भाग होतं. जी जागा शिल्लक राहिली त्यात पुन्हा नवं मंदिर आणि माहेरवाशिणींसाठी निवास उभारण्याचा संकल्प सोडून त्यांनी तो पूर्णत्वास नेला आहे.
dinesh.gune@expressindia.com

21
X