एखाद्या क्षेत्रात झोकून देऊन त्यात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या यशवंतांची यशोगाथा कथन करणारं साप्ताहिक सदर..
काही माणसं दंतकथांसारखी असतात. त्यांच्याकडे पाहून त्यांच्या आयुष्याचं पुस्तक उलगडताच येत नाही. त्याची मागची पानं आपल्याला न कळणाऱ्या लिपीत लिहिलेली असावीत असं पुस्तक उघडण्याआधीच वाटू लागतं. अशा वेळी ती लिपी समजून घेण्यासाठी सरळ त्या माणसासमोर उभं ठाकावं आणि त्याच्याशी थेट संवादच साधावा. कधी कधी मागच्या पानांवरचा तोच तो मजकूर सांगणं त्या व्यक्तीलाही फारसं आवडत नसतं. कारण तिने भविष्याचा वेध घेण्याचीच सवय जोपासलेली असते. त्यांची नजर भविष्यातल्या शिखराकडे असते. त्या वाटचालीचं प्रत्येक पाऊल पुढे पडलं की मागची पायरी पुसून टाकलेली असते. तरीही मागे टाकलेली प्रत्येक पायरी आपल्याला जगणं शिकवून गेली, याचा त्या व्यक्तीला विसर पडलेला नसते. विदर्भातील आमखेडा गावात अशीच एक दंतकथा आहे. त्या कथेची मागची पानं त्या व्यक्तीच्याच तोंडून ऐकावीत.. समोर बसून! मग ती व्यक्तीच आपलं पुस्तक वाचू लागते.. त्रयस्थपणे! एक कथा हळूहळू जिवंत होते आणि वर्तमानात आणून सोडते. मग आपण जागे होतो. आजूबाजूला पाहतो. समोरची दंतकथा स्वत:शीच हसत आपल्याकडे पाहत असते..
वाशीम जिल्ह्यच्या मालेगाव तालुक्यात आमखेडा नावाचे गाव आहे. वर्षांनुवर्षांची नापिकी हेच या गावाचं नशीब. तिथेच ही दंतकथा जन्मते आणि आकार घेते. अविनाश जोगदंड हा त्या कथेचा नायक. काही वर्षांपूर्वी शिक्षण अर्धवट टाकून पळून गेल्यामुळे साऱ्या गावाने हिणवलेला हा अविनाश! अविनाशचे वडील बाबाराव व्यवसायाने डॉक्टर. घरी ७० एकर शेती व सख्खे, चुलत मिळून २५ जणांचा गोतावळा. वडिलांनी अनेक रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवा दिलेली. अविनाशनेदेखील डॉक्टर व्हावे अशी बाबारावांची इच्छा. मुलाने केवळ अभ्यासात हुशार होऊन चालणार नाही, तर त्याने संस्कारित माणूस व्हावे म्हणून त्यांनी अविनाशला प्रत्येक सुटीत बुलढाणा जिल्ह्यतील हिवऱ्याच्या विवेकानंद आश्रमात व गुरुकुंज मोझरीच्या तुकडोजी आश्रमात सेवा करायला पाठवले. या सेवेचा चांगला परिणाम अविनाशवर झाला. पण शिक्षणात मात्र त्याला तितकीशी गती नव्हती. तरीही वडिलांच्या इच्छेखातर त्याने अकोल्याला इलेक्ट्रोपॅथीच्या अभ्यासक्रमात प्रवेश घेतला. इच्छेविरुद्ध शिक्षण घेत असलेल्या अविनाशने घरची मदत घेण्याचे नाकारले व एका मेडिकल स्टोअरमध्ये नोकरी धरली. वर्षभर नोकरी व शिक्षण अशी धावपळ केली. पण शिक्षणात मन रमेना. अखेर एक दिवस कुणालाही न सांगता अविनाश शिक्षण सोडून थेट पुण्याला पोहोचला.
पुण्यात त्याचे काका इलेक्ट्रिक वायरिंगची लहान-मोठी कामे करायचे. काकांची मिळकत आधीच कमी; राहायचा निश्चित ठिकाणा नाही. त्यात आणखीन हा पुतण्या शिक्षण सोडून आलेला. त्यामुळे काका जोगदंडांना रागच आला. प्रारंभी त्यांनी अविनाशची बरीच समजूत काढली, पण तो शिक्षण चालू ठेवण्यास किंवा गावी परतण्यास अजिबात तयार नव्हता. अखेर केवळ दहावी उत्तीर्ण असलेल्या अविनाशला काकांनी त्यांच्या ओळखीच्या एका कंत्राटदाराकडे सुपरवायझरचे काम मिळवून दिले. बांधकामावरील मजुरांना कामाचे साहित्य द्यायचे, दिवसभर त्यांच्या कामावर लक्ष ठेवायचे आणि रात्री त्याच मजुरांच्या झोपडीत किंवा बांधकामाच्या साइटवर झोपायचे, असा अविनाशचा दिनक्रम सुरू झाला. इमारत बांधणीचे काम करणारे हे मजूर वेळ वाया घालवतात, हे लक्षात आल्यावर अविनाशने त्यांच्या कामाच्या वेळेआधीच साहित्य उपलब्ध करून देत त्यांचे दुपारच्या जेवणाचे डबे एकत्र करायला सुरुवात केली. यामुळे काम वेगात होऊ लागले. हे बघून कंत्राटदारही खूश झाला. अविनाश दीड वर्षे त्यांच्याकडे राबला.
पण एक पैशाचाही मोबदला त्याला मिळाला नाही व त्यानेही मागितला नाही.
एक दिवस गावी आजोबा आठवण काढताहेत असा निरोप अविनाशला मिळाला. हा निरोप मिळताच सैरभैर झालेल्या अविनाशने कंत्राटदाराकडे गावी जाण्यासाठी दीडशे रुपये मागितले. त्याने ते देण्यास नकार दिला. हा नकार अविनाशच्या मनावर मोठा ओरखडा उमटवून गेला. त्याने त्याक्षणीच ते काम सोडले. काकांकडून उसने पैसे घेतले व गावी परतला.
गावात अनेकांनी त्याची टिंगल केली. घरी बोलणी खावी लागली. त्यामुळे व्यथित झालेल्या अविनाशने पुन्हा पुण्याचा रस्ता धरला. आता काकांची उसनवारी फेडण्यासाठी त्यांच्याच सोबत वायरिंगचे काम करायचे असे त्याने ठरवले. १९९२ ची ही गोष्ट. नवीन बांधकामे शोधायची, कंत्राटदाराला गाठायचे आणि इलेक्ट्रिक वायरिंगचे काम मिळेल का, ही चौकशी करायची- असा अविनाशचा दिनक्रम सुरू झाला. ही धडपड सुरू असतानाच अविनाश व त्याच्या काकांना एका बडय़ा बांधकाम व्यावसायिकाच्या इलेक्ट्रिक हाऊस वायरिंगचे काम मिळाले. काका, पुतण्या व त्यांच्या हाताखाली काम करणारे चार मजूर एवढय़ा मनुष्यबळावर त्यांनी विक्रमी कालावधीत हे काम पूर्ण केले. आणि मग अनेक मोठी कामे त्यांना मिळायला सुरुवात झाली. केवळ वायरिंगची कामे करून भागणार नाही, तर वीजवहनाच्या क्षेत्रातील इतर कामे केली तरच मोठे होता येईल, हे लक्षात आल्यावर अविनाशने वीज मंडळात कामे मिळावी म्हणून प्रयत्न सुरू केले. तेथे त्याला आधीच वर्चस्व ठेवून असणारे कंत्राटदार घुसू देईनात. तरीही अविनाशने प्रयत्न सोडले नाहीत. मंडळात काम मिळावे यासाठीची आवश्यक कागदपत्रे त्याने मिळवली. अधिकाऱ्यांना भेटत राहिला. खूप प्रयत्नांनंतर अविनाशला पुण्याजवळ भूमिगत वीजवाहिनी टाकण्याचे काम मिळाले. मग वीज मंडळाची उपकेंद्रे व केंद्रे उभारण्याची कामे त्यांना मिळू लागली. १९९४ मध्ये अविनाश व त्याच्या काकाने रामेलेक्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी स्थापन केली व तिच्या माध्यमातून वीजवहनाच्या क्षेत्रातील कामे मिळवायला सुरुवात केली. कोणतेही कंत्राट केवळ उपचार म्हणून पूर्ण करायचे नाही, तर ते अधिक दर्जेदार कसे होईल याकडे कटाक्षाने लक्ष द्यायचे, शासनाचे चार पैसे वाचवून दाखवायचे, हे अधिकाऱ्यांना पटवून द्यायचे, असे सूत्र अविनाशने व्यवसाय करताना जपले.
वीज मंडळाची कामे करताना अविनाशच्या कंपनीने वीज वाहून नेताना होणारी हानी कशी टाळता येईल, यादृष्टीने संशोधन सुरू केले. यातून त्यांना ‘कॉम्प्रेशन टाइप क्लॉप्स अॅन्ड कंडक्टर’ हा फॉम्र्युला सुचला. मंडळातील अधिकाऱ्यांनी व बांधकाम व्यावसायिकांनी त्याचे कौतुक केले.
अविनाशच्या ‘रामेलेक्स’ने मग मागे वळून बघितलेच नाही. आज उच्चदाब वीजवाहिनी यंत्रणा उभारणाऱ्या देशातील काही मोजक्या कंपन्यांच्या यादीत ‘रामेलेक्स’चा समावेश होतो. कोटय़वधींची वार्षिक उलाढाल असलेल्या या कंपनीचे मुख्यालय पुण्याच्या एनडीए रस्त्यावरील दांगट औद्योगिक वसाहतीमध्ये आहे. देशातील अनेक राज्यांत या कंपनीची कामे सध्या सुरू आहेत. कोटींची उलाढाल करणाऱ्या अविनाशचे वेगळेपण येथेच संपत नाही. आज अडीचशे कामगार या कंपनीत काम करतात. या सर्वाकडून चांगले काम करून घेता यावे म्हणून अविनाशने पुण्याजवळ ४० हजार चौरस फुटांचा एक भूखंड विकत घेतला आणि त्यावर या कामगारांसाठी एक वसाहत उभारून दिली. यात फ्लॅट आहेत, सिंगल रूम्स् आहेत. या वसाहतीत शाळा आहे. मोठे ऑडिटोरियम आहे. खेळाचे मैदान आहे. ‘रामेलेक्स’ कंपनीचे काम सकाळी नऊ वाजता सुरू होते. सर्व कर्मचारी, अविनाश, त्याचे काका, कंपनीची वित्त संचालक असलेली त्याची पत्नी हे सारे जमले की राष्ट्रगीताने कामाला सुरुवात होते. सायंकाळी सहा वाजता काम संपले की अर्धा तास ध्यानधारणा होते. प्रत्येक सुटीच्या दिवशी पूर्ण जोगदंड कुटुंबीय या वसाहतीत असतात. कामगार व कर्मचाऱ्यांसोबत वेळ घालवतात. २६ जानेवारी व १५ ऑगस्ट हे दोन राष्ट्रीय सणाचे दिवस या कंपनीतर्फे स्थापना दिवस म्हणून पाळले जातात. प्रत्येक महिन्यात वसाहतीत एका नामवंताचे व्याख्यान होते. केवळ तांत्रिक प्रगतीने काहीच साध्य होत नाही, तर सकारात्मक ऊर्जाही अंगी असावी लागते, हा दृष्टिकोन बाळगणाऱ्या अविनाशने दर्जा, सुरक्षा व गती ही त्रिसूत्री कंपनी चालविण्यासाठी स्वीकारली आहे. ‘रामेलेक्स’ ही कंपनी खासगी असली तरी प्रत्येक कर्मचाऱ्याला ती आपलीच वाटते.
या कथेची पाने वाचून झाली की अविनाश ते पुस्तक बाजूला ठेवतात आणि त्यांची नजर मनातल्या गावावर खिळते.. दूरवर कुठेतरी एकटक पाहत ते बोलू लागतात..
‘लहान असताना वडिलांनी स्वामी विवेकानंद व तुकडोजींच्या आश्रमात पाठवले. तेथे मनात रुजलेले सेवेचे संस्कार आता असे कामी आले. या आश्रमांतील सेवेतून स्वावलंबन व दुसऱ्याचा आदर करणे शिकता आले. त्याचा खूप फायदा कंपनीविस्तारासाठी झाला.’
या कंपनीत काम करणारे प्रामुख्याने वायरमन व हेल्पर्स हेच आहेत. त्यांची वसाहत हे अविनाशच्या कुटुंबाचे दुसरे घर आहे. आता त्याला गावाच्या प्रगतीकडे लक्ष द्यायचंय. केवळ स्वत:च्या शेतीत नाही, तर गावातील प्रत्येकाच्या शेतीत तो नवनवे प्रयोग करणार आहे. नापिकीनं वैतागलेला शेतकरी पुन्हा उभारी घेऊन उभा राहिला पाहिजे हे त्याचे स्वप्न आहे.
आणि अविनाशच्या स्वप्नांचा वेग विजेसारखा चपळ आहे..
n devendra.gawande@expressindia.com

Gutkha worth six and a half lakh seized in Dindori taluka
दिंडोरी तालुक्यात साडेसहा लाखाचा गुटखा जप्त
nashik water crisis marathi news,
नाशिक जिल्ह्यात तहानलेल्या गावांच्या संख्येत वाढ, आठवडाभरात ५७ गावे-वाड्यांची भर; धरणसाठा २८ टक्क्यांवर
water shortage Nashik district
नाशिक : पाणी टंचाईचे नाशिक जिल्ह्यात दोन बळी, मायलेकीचा विहिरीत पडून मृत्यू
Mild earthquake tremors in Akola district
अकोला जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य हादरे