विपरित परिस्थितीशी झगडताना कधी माणूस त्रागा करतो, कधी हतबल होतो, तर कधी परिस्थितीला शरण जातो. परंतु काही माणसे मात्र जगावेगळी जिद्द उराशी बाळगून परिस्थितीला सामोरी जातात, संधीचा योग्य वापर करतात आणि वेगळीच उंची गाठतात. स्थलांतरितांना तर आपले विश्व शून्यातूनच उभे करावे लागते. विदर्भातून नाशिकमध्ये स्थलांतरित झालेल्या अशाच एका व्यक्तीने उद्योगविश्वात स्वतंत्र ओळख निर्माण केली. दिलीप गिरासे यांचा हा व्यावसायिक प्रवास अनेकांना अचंबित करणारा आहे.
दिलीप गिरासे मूळचे अमरावती जिल्ह्यातील कारला या छोटय़ाशा गावातले. गावात सातवीपर्यंत शिक्षण घेतल्यावर ते पुढे शिकण्यासाठी मामाच्या गावी- सालोरा खुर्दला गेले. चांदूरला बारावीपर्यंतचे शिक्षण झाल्यावर त्यांनी अमरावतीच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून मशिनिस्ट ट्रेडमध्ये १९८१ मध्ये पदविका मिळवली आणि निकालानंतर दुसऱ्याच दिवशी नाशिकला धाव घेतली. नाशकात तेव्हा औद्योगिक विकासाचे वारे वाहू लागले होते. आयटीआय झालेल्या युवकांना सहज नोकऱ्या मिळत असत. पण पगार मात्र कमी होता. गिरासे यांनीही रोजंदारीवर छोटय़ाशा शॉपमध्ये काम सुरू केलं. एक्स्लो इंडिया या कंपनीत ३०० रुपये महिन्यावर काम केलं. पण या नोकरीत त्यांचं मन रमत नव्हतं. ज्या मशिनिस्ट ट्रेडचे आपण शिक्षण घेतले त्याचा वापर आपल्या स्वत:च्या उद्योगासाठी करावा असा विचार मनात बळावत होता. अखेरीस त्यांनी १९८६ मध्ये स्वत:चे वेल्डिंग शॉप सुरू केलं. पुढील काळात त्यांच्या या व्यावसायिक प्रवासाला निर्णायक वळण मिळणार होतं. त्यांनी एबीबी लिमिटेड कंपनीला परदेशातून आयात करावा लागणारा २५० रुपयांचा स्क्रू केवळ २० रुपयांमध्ये बनवून दिला. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिलेलं आव्हान त्यांनी लीलया पूर्ण केलं. त्यांच्या लेखी ‘मेक इन इंडिया’ची ती एक नांदी होती. आज त्यांच्या औद्योगिक व्यवसायाचा पसारा वाढला आहे. वार्षिक उलाढाल दरवर्षी कित्येक पटींनी वाढून १२१ कोटींपर्यंत पोहोचली आहे. अर्थात् इथवर पोहोचण्यासाठी त्यांना मोठय़ा संघर्षांतून जावं लागलं.
दिलीप गिरासे हे शेतकरी कुटुंबातले. शेतीतून मिळणारे उत्पन्न कमी. घरची परिस्थिती बेताचीच. आयटीआय झाल्यावर अमरावतीत नोकरी मिळण्याची शक्यता कमीच होती. त्यांनी आयटीआयमधील इतर सहकाऱ्यांप्रमाणेच थेट नाशिक गाठलं. त्यांच्या मित्रांनी मायको, महिंद्रा यांसारख्या मोठय़ा कंपन्यांमध्ये नोकरी पत्करली. गिरासे यांनाही एखाद्या मोठय़ा कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकली असती. परंतु ते आडवाटेने गेले. त्यांनी छोटय़ा वर्कशॉपमध्ये कामाला सुरुवात केली. त्यांचा या वर्कशॉपमधील अनुभव त्यांना मोठय़ा वर्तुळात प्रवेश करून देणारा ठरला. स्वत:चा व्यवसाय सुरू करावा असे त्यांच्या डोक्यात होते, परंतु परिस्थिती अनुकूल नव्हती. अखेरीस त्यांनी एका भाडय़ाच्या जागेत वेल्डिंग शॉप सुरू केलं. या व्यवसायात जम बसत नाही तोच मोटरसायकल अपघातात ते जायबंदी झाले. बरेच महिने ते अंथरूणावर खिळून होते. त्यातून सावरायला त्यांना वर्षभराहून अधिक काळ लागला. मध्यंतरीच्या काळात त्यांनी एक जुना ट्रक विकत घेऊन बिल्डिंग मटेरियल पुरवण्याचा व्यवसायही केला. परंतु त्यांचं मन या कामातही रमत नव्हतं. आपल्या शिक्षणाचा वापर आपल्या व्यवसायात कशा पद्धतीने करता येईल याचा विचार ते सातत्यानं करीतच होते. १९९५ मध्ये त्याला निर्णायक स्वरूप मिळालं. त्यांनी स्वत:ची जागा विकत घेतली. त्यावेळी बँकाही सहजासहजी कर्ज देत नसत. ‘एमएसएफसी’ या वित्तपुरवठा कंपनीकडून त्यांनी दहा लाखांचं कर्ज काढलं. त्यासाठी गावाकडची जमीन त्यांच्याकडे तारण ठेवली. या पैशांतून नीलय इंडस्ट्रीजची सुरुवात झाली. कारखान्यासाठी काम मिळवणं तेव्हा तितकंसं सोपं नव्हतं. मात्र, हे आव्हान स्विकारण्याची गरज होती. दिलीप गिरासे एक किस्सा सांगतात- ‘नाशिकच्याच एबीबी लिमिटेड या कंपनीसमोर एकदा मोठी अडचण निर्माण झाली. त्यांची उत्पादने तयार झाली होती, परंतु त्यांचे काम विशिष्ट प्रकारच्या स्क्रूसाठी अडले होते. कंपनीच्या झुरिच येथील मुख्य कार्यालयातून स्क्रूचा साठा वेळेवर पोहोचला नव्हता. उत्पादने वेळेत तयार झाली नाही तर कंपनीला मोठा फटका बसला असता. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी अशा प्रकारचे स्क्रू नाशिकमध्ये बनवून मिळतील काय, याचा शोध सुरू केला. ते जेव्हा आमच्यापर्यंत पोहोचले, तेव्हा आम्ही ते आव्हान स्वीकारले. एबीबी कंपनीला तो स्क्रू २५० रुपयांमध्ये मिळत होता. तो आम्ही फक्त २० रुपयांत त्यांना बनवून दिला. आधी पाच स्क्रू कंपनीला बनवून दिले. ते त्यांच्या मानकांवर योग्य ठरले. कंपनीने आमची मेहनत पाहून एका स्क्रूसाठी ३५ रुपये दिले आणि असे १०० स्क्रू बनवण्याची ऑर्डर दिली. आजही या कंपनीला स्क्रूचा पुरवठा आमच्याकडूनच सुरू आहे. क्रॉम्पटन ग्रीव्हज् कंपनीचे कामही अशा प्रकारच्या विशिष्ट स्क्रूसाठी अडले होते. त्यांनाही आम्ही मदत केली. आव्हाने स्विकारण्याची सवयच त्यामुळे लागली.’
दिलीप गिरासे यांचं संयुक्त कुटुंब आहे. त्यांच्या व्यवसायात मदत करण्यासाठी मग त्यांचे इतर तीन बंधूही धावून आले. त्यांनी रात्रंदिवस काम केलं. त्यांच्या व्यावसायिक प्रगतीची ही सुरुवात होती. गिरासे यांच्या बंधूंनी प्रत्येकाने व्यावसायिक जबाबदाऱ्या वाटून घेतल्या. आर्थिक व्यवस्था दिलीप गिरासे यांनी सांभाळली. महिन्याकाठी दीड ते दोन लाखांचा व्यवसाय झाला पाहिजे, हे लक्ष्य त्यांनी समोर ठेवलं होतं. ज्या बँकांनी त्यांना आधी कर्ज देण्यास नकार दिला, त्याच आता त्यांना कर्ज देण्यासाठी रेड कार्पेट घालत होत्या. १९९८ मध्ये गिरासे यांनी त्यांचे बंधू रत्नदीप यांच्या नावे ‘रत्नदीप इंडस्ट्रिज’ सुरू केली. परंतु त्याचदरम्यान औद्योगिक क्षेत्रात मंदीचं सावट आलं. पण त्यातूनही ते सावरले. आणखी जागा विकत घेतली. उद्योगांचा पसारा वाढतच होता. २००५ मध्ये त्यांनी एक बंद पडलेली कंपनी विकत घेतली. दीड एकर जागेवर इमारत तयार होतीच. सिंगापूरहून जुनी यंत्रे विकत आणली. आणखीन एक उद्योग सुरू झाला. असे करत नीलय इंडस्ट्रिज, नीलय मेटल इंडस्ट्रिज, इनाम कास्टिंग प्रा. लि., नीलचंद्र इंजिनिअरिंग प्रा. लि. असा त्यांच्या उद्योगसमूहाचा विस्तार होत गेला. अलीकडेच दिलीप गिरासे यांनी बांधकाम क्षेत्राशी संबंधित ‘नीलय बिलकॉम’ हे नवीन युनिट सुरू केलं आहे. मध्यंतरी त्यांनी गावाकडे दुग्ध-व्यवसाय सुरू केला होता. गावातील लोकांना या जोडव्यवसायातून लाभ मिळावा, हा हेतू त्यांनी डोळ्यासमोर ठेवला होता. याच ठिकाणी त्यांनी मिनरल वॉटर प्लान्टही सुरू केला होता.
नीलय उद्योगसमूहामध्ये प्रिसिजन मशिन कंपोनंट, पॅनल फॅब्रिकेशन, इलेक्ट्रिक स्वीचगिअर आदी उत्पादने तयार केली जातात. एबीबी, सीमेन्स, एल अ‍ॅन्ड टी, अरेव्हा यांसारख्या कंपन्या नीलय उद्योगसमूहाकडून सुटे भाग विकत घेतात. गेल्या दशकभरात गिरासे बंधूंनी मोठाच बदल अनुभवला आहे. सुरुवातीला त्यांना २१ टक्के व्याजदराने कर्ज घ्यावं लागलं होतं. आता ते ११ टक्क्यांनी मिळते. बँकर्स आधी त्यांना उभेही करत नव्हते. परंतु आता ते त्यांच्या मागे फिरू लागले आहेत. ‘काळाचा हा महिमा आहे. परंतु यातून फक्त शिकायचे असते, त्याचा बाऊ करायचा नसतो. वक्तशीरपणा, जिद्द, नियोजन आणि अविश्रांत मेहनत करण्याची तयारी या जोरावर उद्योगात निश्चितपणे प्रगती करता येते,’ असे दिलीप गिरासे यांचे म्हणणे आहे. त्यांना त्यांचा सुरुवातीचा संघर्षांचा काळ अजूनही आठवतो. रोजंदारीतून होणारी मिळकत अपुरी होती. गाव नवखे होते. अनेक रात्री उपाशीपोटी काढल्या. अपमान सहन केले. परंतु हे सारे अनुभवत असतानाच स्वत:चा उद्योग स्थापन करण्याची जिद्दही मनाशी बाळगली होती. गेल्या दशकभरात त्यांच्या उद्योगसमूहाची वार्षिक उलाढाल एक कोटी रुपयांवरून १२१ कोटींवर पोहोचली आहे. पुढल्या वर्षीचे त्यांचे उद्दिष्ट २०० कोटींचे आहे. या उद्दिष्टपूर्तीसाठी फार धावाधाव करावी लागणार नाही याची त्यांना खात्री आहे. तथापि विश्वसनीयता व कामातील गुणवत्ता या बाबी अत्यंत महत्वाच्या असतात, असे गिरासे यांचे मत आहे. आज ५०० लोकांना ते रोजगार पुरवतात. उद्योजक होण्याचा ध्यास बाळगल्यानेच ही किमया साधता आली, हे ते आवर्जून सांगतात.
मोहन अटाळकर / दिनेश गुणे
mohan.atalkar@expressindia.com
dinesh.gune@expressindia.com

Pune Rainwater Harvesting Project lead by retired colonel shashikant Dallvi
गोष्ट असामान्यांची Video: पुण्यातील निवृत्त कर्नल शशिकांत दळवींचं ‘मिशन पाणी वाचवा!’
MP Supriya Sule criticized the leaders who left NCP
“रिश्ता तोडना आसान है, निभाना मुश्किल है…” राष्ट्रवादी सोडून गेलेल्या नेत्यांवर खासदार सुप्रिया सुळेंची घणाघाती टीका
mudda maharashtracha indian center for policy and leadership development survey marine Rural and Urban Challenges in Konkan
मुद्दा महाराष्ट्राचा… कोकण : सागरी, ग्रामीण आणि शहरी आव्हाने…
brothers murdered in budaun
धक्कादायक! उत्तर प्रदेशमध्ये दोन चिमुकल्यांची गळा चिरून हत्या, पोलीस एन्काऊंटरमध्ये आरोपीचाही मृत्यू