News Flash

रेनेलनंतरचा भारतीय भूगोल..

जेम्स रेनेल (१७४२-१८३०) याचे भारतीय ईस्ट इंडिया कंपनीतले सहकारी लष्करी सैनिक आणि छोटे अधिकारी होते.

(संग्रहित छायाचित्र)

प्रदीप आपटे

नकाशा-रेखनाचे शास्त्र भारतात जेम्स रेनेलने प्रथम आपल्यापरीने वापरले खरे, पण त्याच्या कामाचा आधार पुढेही अनेकांना मिळाला. कंपनीची, ब्रिटिशांची सत्ता वाढत असताना ‘नद्यांच्या गाळाचा प्रदेश’ यांसारखे अभ्यासही होत गेले..

जेम्स रेनेल (१७४२-१८३०) याचे भारतीय ईस्ट इंडिया कंपनीतले सहकारी लष्करी सैनिक आणि छोटे अधिकारी होते. दिशा ठरवायला चुंबकसूची आणि पेराम्ब्युलेटर (म्हणजे चालताचालता होणारे चाकाचे फेरे मोजून अंतर सांगणारी चाकवाली काठी. सायक्लोमीटरचा प्राथमिक अवतार) ही दोन मुख्य हत्यारे. नोंदीसाठी कागद, दौत, टाक आणि अर्थातच उघडे डोळे-जागरूक कान! ‘कंपनी लष्करा’मध्ये शेलक्या सैनिकांनी ‘रूट सव्‍‌र्हे’ ऊर्फ मार्गसर्वेक्षण ही नवी रूढी सुरूकेली. ती अजूनही निरनिराळ्या शाखा होत नांदते आहे. या चमूने बंगाल आणि तेथून पुढे अलाहाबादपर्यंतच्या भूभागाचे नकाशे बनविले. एके काळी उत्तरेकडील मोगली राजवटीत असणाऱ्या सुभ्यांचा अशा मार्गसर्वेक्षणाच्या आधारानेच नकाशात अंतर्भाव केला गेला.

या ‘बृहद् नकाशां’चा ग्रंथ नंतर प्रकाशित केला गेला. त्यात वेगवेगळ्या राजकीय हद्दी आणि राजवटींचा प्रदेश यांसाठी निराळ्या रंगांचा वापर होता. या पुस्तकाच्या प्रस्तावनेत रेनेलने नकाशांबद्दल आपली धारणा, साधने अगोदरच्या अभ्यासकांच्या अध्ययनांचा वापर याबद्दल रीतसर लिहिले आहे. त्यातले निवडक शेरे बघू :

‘‘अगोदरच्या आवृत्तींपेक्षा ही अधिक दोषहीन आहे.. (आधीच्या नकाशांशी तुलना केल्यास) या आवृत्तीमधला नकाशा सव्वादोन पटीने विस्तृत आहे. दीड इंच म्हणजे एक विषुवांश या मापाने तो रेखिला आहे. अवघ्या युरोपच्या निम्मा होईल एवढा त्यातला भूभाग त्यात चितारला आहे.’’

‘‘कॅप्टन हुडार्ट यांनी पश्चिमी अथवा ‘मलबार’ किनाऱ्याचे अक्षांश आणि रेखांश यांच्या मापाची मालिकाच बनविली. त्याचा वापर करून हिन्दी द्वीपकल्पाचे; तसेच कर्नल पिअर्सने केलेली पूर्वकिनाऱ्यांची मोजमापे समाविष्ट करून हे चित्रण साकारले आहे. त्यामुळे आधीच्या नकाशातल्या मोठय़ा (ठळक) बाह्य़रेखा फार बदललेल्या नाहीत पण आतल्या भागातील प्रदेशाचे वितरण आणि विस्तारण सत्य स्थितीच्या अधिक जवळ जाणारे घडविले आहे.’’  ‘‘नागपूर हिंदुस्तानच्या अगदी मध्यावर आहे. त्या (नागपूरच्या) महत्त्वाच्या बिंदूला बंगाल प्रदेशाशी जोडणारी रेखा यात अंतर्भूत केली आहे. या बिंदूभोवतीच्या तीनही बाजूंची मोकळी जागा भरून काढण्याचे महत्त्वाचे काम त्यातून सुकर होणार आहे.’’

पंजाब, हरियाणा, उत्तर प्रांत भागांबद्दल सांगताना रेनेल पानिपत लढाईचा उल्लेख तर करतोच पण विशेष उल्लेख आहे महाभारतातील युद्धाचा. कुरुक्षेत्र परिसराचे भौगोलिक वर्णन करताना त्याने त्याचे जनमानसातले पौराणिक महत्त्व आणि रूपही नोंदले आहे. त्या वेळी विल्किन्सने नुकतेच संस्कृतातून इंग्रजीत महाभारताचे भाषांतर केले होते; त्याचाही स्पष्ट संदर्भ दिलेला आहे!

रेनेलची सर्वेक्षण सर्वाधिकारी म्हणून भारतातील कारकीर्द जेमतेम दहा वर्षांची. या दगदगीने त्याचे शरीर थकले. त्यामुळे तो इंग्लंडला परतला. पण ‘भूगोल- विज्ञान’ आणि नकाशेशास्त्र त्याच्या उर्वरित आयुष्याचा ध्यास होऊन गेले होते. इंग्लंडमधला, युरोप खंडातला एक मातब्बर भूगोलज्ञ म्हणून त्याची गणना होते.

पण त्याच्या तालमीत आणि बसविलेल्या पठडीत घडलेल्या अधिकाऱ्यांनी या विद्येचा प्रचार- प्रसार डोळसपणे वाढविला. जेम्स रेनेलच्या अगोदर नकाशे बनवले जात होते; पण त्यांची घडण ज्याच्या-त्याच्या स्व-छंदानुसार असायची! त्यांची परस्परांमध्ये सांधेजोड करणे मुश्कील असायचे. सांगोवांगीचे तपशील फार खोलात पडताळले जात नसत. काही समजुती विनाकारण दृढ झालेल्या असायच्या. बरीच वर्षे गंगा दक्षिण (डेक्कन) भागात उगम पावून ओडिशात बंगालच्या उपसागराला मिळते असा समज होता. अनेक प्रवाशांनी उच्चारी ‘गँजेश’ म्हणून नोंदलेली नदी व हिंदूंची पवित्र ‘गंगा’ एकच आहेत हेही ज्ञात नव्हते.

रेनेलने नकाशे घडविताना अनेक प्रकारची माहिती, नोंदी, निरीक्षणे एकत्र गुंफायची रीत तयार केली. सागरी किनारे आणि मोठे जलमार्ग न्याहाळणारे अनेक नकाशे होते. ताऱ्यांची स्थाने, वेळा आणि मार्गक्रमणा पाहून भूभाग अजमावणारे काही होते. पृथ्वीचा आकार अगदी नेमका पूर्णार्थाने गोल नाही. त्याचे वक्राकार लंबवर्तुळसारखे कमीजास्ती आहेत असा संशय होता. म्हणून जागोजाग गोलाचे वक्राकार अजमावण्याचा उद्योग सुरू झाला होता.

परंतु या ‘दर्यावर्दी’ आणि ‘अस्मानी’ सर्वेक्षणाखेरीज आणखी एक माहितीचा ‘सुलतानी’ झरा पैदा होऊ लागला होता. कंपनीच्या लष्करातील अधिकारी चोखाळलेल्या वाटा आणि रस्ते याबद्दल जागरूक असत. त्यांच्या नोंदी आणि निरीक्षणाची एक प्रशासकीय घडी तयार झाली. कंपनी सरकारच्या संपर्काचा आणि हुकमतीचा प्रदेश दिवसेंदिवस वाढू लागला.

नंतरच्या अधिकाऱ्यांनी हाती असलेला तुटपुंजा कर्मचारी चमू आणि सरकारातील अपुरी, उधार-उसनवार करत मिळणारी सामग्री एवढय़ा आधारावर दीड-दोन हजार मैलांचे रस्ते पालथे घालून चितारले.

दक्षिणेमध्ये हैदर आणि टिपूशी केलेल्या लढायांनिमित्ताने निराळे टापू संपर्कात आले. कालांतराने लष्करी विजयामुळे कब्जातदेखील आले. अशा अनेक छोटय़ामोठय़ा मोहिमांत उमजणारा भूभाग निदान काही मोजक्या तपशिलांसह गोळा होत राहिला. या माहितीमध्ये आरंभाचे ठिकाण आणि पोहोचलेले ठिकाण यांचे नाव वेगवेगळ्या स्तंभांत लिहिलेले असे. त्यामधले अंतर निराळ्या स्तंभात मधोमध लिहिले जाई. आरंभाचे आणि अखेरीचे ठिकाण यांच्या दिशा, वाटेवरची गावे, रस्त्यांना फुटणारे मेट/ तिठे/ चौक पुढे कुठे जोडतात याचीही अशीच ‘दिशा’ आणि ‘अंतरे’ सांगणारी स्तंभरूपात कुंडली तयार होई. त्यांची वेळापत्रके लिहिताना स्तंभ आणि रांगांची ‘सारणी’ साकारू लागे. पूर्व आणि उत्तर दिशा पक्क्या करून मगच मोठा कागद घेतला जाई. ज्याचे अक्षांश-रेखांश स्थान नेमके माहीत असे असा आरंभबिंदू प्रथम कोरला जाई. एक इंच म्हणजे अमुक इतके मैल असे रेखाटनाचे प्रमाण निवडले जाई. छोटय़ाछोटय़ा कागदांच्या तुकडय़ावर ‘दिशा व अंतराचे’ रस्ते रेखलेले तुकडे तयार केले जात. जशी नोंद असेल तसा, एक कपटा दुसऱ्या कपटय़ाला दिशेला वळवीत जोडला जाई.

लष्करी नोंदीमध्ये रस्ते, दिशा, तिठा/चौक त्यांची अंतरे तर असायचीच. त्या जोडीनेच लागणारी टेकाडे, पर्वतरांगांचे तुकडे, रस्त्यांआसपासचा उंच सखलपणादेखील निरखलेले असे. कुठे ओहोळाची वाट आहे, आसपास झरा, डबकी तळे नदी आहे का? नदी असल्यास तिची दिशा कोणती? ओलांडायला सोयीचा उथळ भाग कुठे आहे? याचीही ‘रस्ते-वाटां’च्या नोंद पाहणीत स्पष्ट दखल घेतलेली असे. सोबतच्या घोडा/बैलांचा चारा कुठे आहे याची पण ठिकाणे वर्णनामध्ये हेरलेली असायची. (मराठी वाचकांनी याची उत्तम वानगी म्हणून त्यांना अधिक परिचित असलेल्या ‘मुंबई प्रांता’बद्दलचे असे ‘वाटाडय़ा मित्र’ पुस्तक जरूर पाहावे. जॉन क्लुनेस या कंपनी अधिकाऱ्याने सर्व माहिती संपादित करून तयार केले होते. (या मुंबई प्रांतामध्ये गुजरात, खान्देश, महाराष्ट्रातील गोवा, कर्नाटक आणि तेलंगणाचा काही भाग असा सगळा मुलूख येतो.)

माहिती व निरीक्षणांच्या तऱ्हा आणि वापर एवढय़ावर हा उद्योग थांबत नाही. त्याच्या लष्करी, मुलकी, प्रशासकीय उपयोगाचे मोल तर उघड होते. पण औत्सुक्य चाळविलेली बुद्धी आणखी पुढे पोखरत राहते. ब्रह्मपुत्रा आणि गंगा समुद्राला मिळतात तिथले माघारपाणलोट, नदीचे सपाट संथ ते जोमदार उताराचे वाहणे, गाळ साचण्याची उपजत जाणारी नैसर्गिक ठेवण यांचे बारकाईने अध्ययन केलेले आढळते. हे अध्ययन सतत चालूच राहिले. गंगा आणि ब्रह्मपुत्रा नदीच्या त्रिभुज खाडीगाळ भागांचा रेनेलच्या नकाशांचा पाठपुरावा जेम्स फग्र्युसन (१८०८-१८८३) याने केला. त्याने रॉयल सोसायटीला एक निबंध पाठविला. तो १ एप्रिल १८६३ रोजी जिओलॉजिकल सोसायटीमध्ये वाचला गेला. त्यामध्ये साचत्या गाळाने नदीप्रवाह कसे हलतात आणि पालटतात याचे नव्या स्थितीत रेखाटन रेनेलच्या नकाशावर केलेले आढळते. रेनेलचा मूळ नकाशा काळ्या रंगात तर नव्या प्रवाहांचे रूप लाल रंगामध्ये उजळून दाखविले आहे. भारतातील नद्यांचे वाहणे, प्रवाह बदलणे किनाऱ्यांची झीज आणि गाळाचे प्रमाण व तो साचण्याची ठेवण यांचे अध्ययन – तेही जगातील इतर समस्वभावी नद्यांच्या (उदा. नाइल) तुलनेसह – केलेले आढळते. गाळ साचून प्रवाहालगत भूभागाची उंची कशी बदलते; ती भूमिती श्रेणीने उंचावत राहण्याऐवजी आणखी कोणते पृष्ठीय बदल होतात; पाण्याच्या ओघांना आणि संथ जलाशयांनादेखील कशी मुरड पडते अशा अनेक भूगर्भी प्रश्नांचे मोहोळ पेरणारा हा वैज्ञानिक निबंध आहे. तो निबंधाच्या आरंभीच तो म्हणतो, ‘‘मी भूवैज्ञानिक नाही आणि या सोसायटीच्या विद्वानांना आहे तसे ज्ञान (मला) नाही. पण गेली पाच वर्षे मी ब्रह्मपुत्रा आणि गंगेच्या परिसराचे निरीक्षण सर्वेक्षण करतो आहे. रेनेलने केलेल्या सर्वेक्षणाशी तुलना करता मला या भूभागात जी उलथपालथ आढळली त्या आधारावर हे माझे टिपण लिहिले आहे.’’ लिहिणारा रूढ विद्यापीठ शिक्षित नाही पण ‘विद्यार्थी’ आहे! आणि रूढ कल्पनांवर प्रश्नचिन्ह लावणारी निरीक्षणे नोंदवत आहे. असे हे साम्राज्य उभारणीतले वाहते पाणी रॉयल सोसायटीतल्या विज्ञानाच्या पायऱ्यांना थडकत गेले.

लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सुप्रतिष्ठ प्राध्यापक असून ख्यातनाम अर्थतज्ज्ञ आणि विचक्षण अभ्यासक आहेत.

pradeepapte1687@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2021 12:03 am

Web Title: article on post renal indian geography abn 97
Next Stories
1 नकाशा-कार्याचे मोल..
Just Now!
X