News Flash

अंतर, देशांतर … वेषांतर!

मासल्यादाखल विल्यम मूरक्रॉफ्ट नावाच्या पशुवैद्यकाने लिहिलेला प्रवास वृत्तान्त बघण्यासारखा आहे.

वेषांतराने देशांतर : मूरक्रॉफ्ट आणि हेअरसे (उजवीकडचे) यांचे ब्रिटिश लायब्ररीतील चित्र

|| प्रदीप आपटे

तिबेट, नेपाळ आदी भागांतल्या राजवटी आणि लोक, एकोणिसाव्या शतकात इंग्रज वा कुणाही परकीयाला येऊच देत नसत. तरीही इंग्रजांनी वेषांतर करून किंवा कुमाऊँच्या हुशार भोतिया आदिवासींना प्रशिक्षण देऊन तेथील पाहण्या केल्याच…

ईस्ट इंडिया कंपनी ही राजाश्रयी व्यापारी होती. हिंदुस्तानच्या निरनिराळ्या भागांत टप्प्याटप्प्याने त्यांच्या हाती सत्ता आली. पण त्यालगतचे अनेक भूभाग होते जे हिंदुस्तानमध्ये होते आणि नव्हते! नेपाळ, तिबेट, काश्मीरचे खोरे, हिंदुकुश, सिंध प्रांत, अफगाण देश इथल्या राजकीय सत्ता निरनिराळ्या होत्या. प्रत्येकाचा पूर्वेतिहास आणि त्यातून उपजलेली वैरे आणि आकांक्षाची घडण निरनिराळी होती. हिंदुकुश आणि सिंधू नदीच्या जवळपास पूर्ण खोऱ्यात, वायव्य सरहद्दींवरील भागात टोळ्यांची अंदाधुंद राजवट होती. तिबेट चीनच्या दबावाखाली होता. नेपाळ सध्यापेक्षा ‘विस्तीर्ण’ होता. भूतान दुर्गम पण तुलनेने मवाळ होता. सरासरीने या भागातील सर्वांनाच कुणाही ‘गोऱ्या’ परकीयांभोवती धास्तीचे धुके दाटलेले असायचे. प्लासीच्या विजयानंतर ईस्ट इंडिया कंपनीबद्दलचा संशयपूर्ण आकस बळावला होता.

तिबेटबद्दल विशेष कुतूहल होते. वेगवेगळ्या मध्यान्हरेखा धरून बनवलेल्या ‘त्रिकोणजाली’ नकाशांची मोहीम अशा ‘पर-प्रांता’त चालविणे तर दुरापास्तच. पण सोन्याचा साठा असणाऱ्याखाणी, विशेष प्राणिज लोकर, शाली आणि कारागिरीच्या अन्य वस्तू यांसाठी या भागाचा लौकिक होता… त्या बाजारपेठांची भुरळ लागलेला व्यापारी भुंगा कुठवर शांत राहणार?

वॉरन हेस्टिंग्जने तिबेट, नेपाळ भागांत आपले अधिकृत सदिच्छा प्रतिनिधी पाठवून चाचपणी सुरू केली होती. एक गोस्वामी ऊर्फ गोसाई ब्राह्मण त्याची धूळपेर करायला त्याने हाती धरला होता. बोगल नावाचा खास दूत धाडून तिबेटी राजवटीमध्ये व्यापारी शिरकाव मिळण्याची खटपट आरंभली होती. पण व्यापार कसा, कशाचा, कोणता चालू शकेल? तिथे जाणारे रस्ते, त्यातले धोके आणि संकटाचे खाचखळगे याची फार अंधूक माहिती होती. या साऱ्याअज्ञानाचे हिमालयी टेकाडासारखे दडपण होते. तलवार आणि तागडी या दोन्हीला जरुरी प्रदेश-ज्ञान कुठून पैदा होणार? युरोपीय गोऱ्याकातडीचा माणूस म्हटले की संशयाचे आग्यामोहोळ उठे. त्यांना संशय फिटेस्तोवर डांबून ठेवले जाई. माल जप्त होई. गयावया करून, लाच देऊन अनेक जण कसेबसे सुटका करून घेत. तीसुद्धा परत चालते होण्याच्या अटीवर! बरेच हिकमती युरोपीय परवानाधारक व्यापारी तांड्यांमध्ये सामील होऊन जमेल तेवढा शिरकाव करून बघायचे. पण राजवटींचे संशयपिशाच्च त्यांनादेखील झपाटायचेच.

मासल्यादाखल विल्यम मूरक्रॉफ्ट नावाच्या पशुवैद्यकाने लिहिलेला प्रवास वृत्तान्त बघण्यासारखा आहे. भारतात सैन्य प्रशासन आणि व्यापारासाठी चांगले दमदार दणकट घोडदळ पाहिजे. तसे घोडदळ उभे करायला घोड्यांचे चांगले वाण हेरून पैदास करायला पाहिजे. या खास कामगिरीवर तो कलकत्त्याला आला. चांगल्या जातीचे घोडे उझबेक प्रांतात मिळतील तिथून ते विकत आणून पैदासीला वापरायचा त्याचा मानस होता. पण तिथे पोहोचण्याचे सगळेच मार्ग ‘अगम्य’! पहाडी उजाड वाटा, अमानुष वादळे, थंडी, विरळ प्राणवायू आणि तितकीच विरळ लोकवस्ती. आणि या ‘अस्मानी’ला जोड संशयी क्रूर ‘सुलतानी’ राजवटींची. मूरक्रॉफ्टने तरीही धाडस केले. काही वेळा अशा धाडसांना कंपनीची परवानगी नसताना बेमुर्वतीनेदेखील केले. पण त्याच्या सफरी बव्हंश उद्देशांमध्ये अपयशी ठरल्या. तरीही त्याने नोंदवून ठेवलेले मार्ग, वर्णने आणि इतर तपशील उपयुक्त होतेच. अशाच एका गारटोक आणि हिंडोज या भागांच्या धाडसी सफरीत १८१२ साली मूरक्रॉफ्ट आणि हैदर यंग  हेअरसे हे दोघं इंग्रज गेले होते. मयपुरी आणि हरिगिरी अशी नावे घेऊन हिंदू ‘गोसावी यात्रेकरू’च्या वेषात ते कैलास पर्वताकडे, मानसरोवरच्या शोधात निघाले. मानसरोवरापासून सगळ्या पवित्र नद्यांचा उगम आहे असा प्रवाद होता. त्याच्या दर्शनार्थ हे दोन ‘भाविक’ घोड्यावरून आणि याकवर आपले सामान लादून फिरत होते. परत येताना, का कुणास ठाऊक पण अगोदर घेतलेले गोसावी सोंग त्यांनी टाकून दिले. मानसरोवरापासून ८० किलोमीटर वरच्या त्सोंग गावी त्यांना तिबेटींनी हेरले आणि अटक करून सक्त कैदेत ठेवले गेले. त्यांना कुणी कसे सोडवावे हा यक्षप्रश्न होता. सुटकेला मदतगार ठरले दोन भोतिया वीरसिंग आणि देवीसिंग. या दोघांच्या रदबदलीने त्यांची सुटका झाली.

काश्मीर ते सिंध ते तिबेट बव्हंशी सतत जोखीम वाटावे असे अनिश्चित भारलेले वातावरण होते. १८५७ साली मूळचा जर्मन पण ब्रिटिश झालेला वनस्पतीशास्त्रज्ञ आडोल्फ व्हॉन ष्लागेन्वाइट हा हिमालयात कोणत्या वनस्पतींचा आढळ आणि अधिवास असतो याचा शोध घेत फिरत होता; त्याची काशघर येथे हत्या झाली.

अन्य भागात केले तसे सर्वेक्षण करणारे लोक आणि उपकरणे धाडणे शक्य नाही; तर त्यावर उपाय कोणता? अनेकांनी आपापल्या परीने जी काही अर्धीमुर्धी माहिती गोळा केली, त्यात विसंगती होत्या. त्याची छाननी आणि पडताळणी तरी कशी करायची?

त्सांगपो नावाची भली मोठी लांबलचक नदी आहे. तिचा उगम कुठे? ती कुठून कुठे वाहते? ती कुठे ओलांडता येते? ल्हासा किती उंचीवर आहे? अशा प्रश्नांचे मोहोळ निवारल्याखेरीज नकाशातले कोरे राहिलेले मोठमोठे कोपरे कसे भरायचे?

कॅप्टन माँटगोमेरीने या समस्येची तड लावायला वेगळाच उपाय योजला, तेव्हा त्रिकोणमिती सर्वेक्षणाचा प्रमुख होता जे. टी. वॉकर. त्याच्या गळी त्याने आपली कल्पना उतरवली. कुमाऊँ किंवा सिंध कश्मीर भागातील स्थानिक माहीतगार हाती धरायचे. त्यांना रीतसर निरनिराळे प्रशिक्षण द्यायचे. महिना १६ ते २० रुपये पगार, औषधपाणी, प्रवासखर्च, वरखर्च याचे वेगळे पैसे हाती द्यायचे. आणि केलेल्या कामाचे मोल जोखून वेगळी बख्शीशी द्यायची. त्या वेळी चिनी सम्राटाने हुकूम काढला होता की कुणाही हिंदुस्तानी, मुघली, पठाण किंवा तत्सम उपऱ्याला तिबेटमध्ये प्रवेश करू देऊ नये! म्हणून या भागांत शिरताना काय सोंग घ्यायचे हे ज्यांनीत्यांनीच वेळ- काळ- स्थळ ओळखून ठरवायचे.

वॉकरने शिक्षण खात्याशी सल्लामसलत करून मिलाम येथील भोतियांची प्रशिक्षणासाठी निवड केली : नैनसिंग आणि मणिसिंग. स्वत: वॉकर आणि माँटगोमेरीने त्यांचे डेहराडूनला प्रशिक्षण केले. निरनिराळे व्यापारी, वस्तू, त्यांची भाषा, प्रथा अवगत करून दिल्याच. उदा.- त्यांनी नंतर बशिहारी व्यापारी असल्याची बतावणी केली होती. त्या प्रकारचे हावभाव, भाषा, वस्तूंची जानपहचान इ. इ. सगळ्या तपशिलांसह तालीम दिली गेली. त्याहून महत्त्वाचे म्हणजे मुख्यत: रात्री तारे वेळेनुसार कसे ओळखायचे, छोटा साठअंशी कोनमापक वापरून अक्षांश कसे काढायचे, जमिनीवरचे चढउतार कसे नोंदायचे, आणि विशेष खुणांनी नोंदलेले कागद कसे दडवायचे, अनेक चिठ्ठ्या आणि वस्तू लपवायला तिबेटी बुद्धांचे ‘गडगडी प्रार्थना चक्र’ कसे वापरायचे याची इत्थंभूत संथा दिली!

१८६४ साली कुमाऊँमधून तिबेटात शिरकाव करायचा पहिला प्रयत्न फसला. मग नैनसिंगने नेपाळमधून शिरकाव करायचा प्रयत्न केला. पण ज्या व्यापाऱ्याने त्याला ल्हासा येथे तांड्याबरोबर न्यायचे कबूल केले होते त्यानेच पैसे घेऊन लुटून सोडून दिले. तेथून दोघांनी निरनिराळ्या वाटा अवलंबल्या. नैनसिंग त्सांगपो काठच्या त्रादोमला पोहोचला. तेथे एका व्यापारी तांड्यात सामील झाला. लदाखमधून ल्हासाला पोहोचला. तिथे काही दिवस हिशेबनीस शिक्षकाचे काम करून गुजराण केली. आणि पुन्हा त्रादोममार्गे मानसरोवरावरून हिंदुस्तानात परतला. त्याचा चुलत भाऊ मणिसिंग नेपाळला पोहोचला आणि गारटोकमार्गे हिंदुस्तानात परतला.

या त्यांच्या शोधयात्रेचे फलित चांगलेच घवघवीत ठरले. तिबेटच्या त्सांगपो या सर्वात थोर नदीचा सहाशे मैलांचा प्रवाह आणि किनारा यात सामावला होता. हीच नदी म्हणजे ब्रह्मपुत्र असा अंधूक समज होता. त्याला बळकटी देणारे अनेक पुरावे हाती आले होते. ल्हासा आणि गारटोकमध्ये अनेकांशी बोलून सोन्याचा साठा कुठे आहे याच्या ‘बित्तंबातम्या’ हाती आल्या होत्या. अनेक ठिकाणचे मार्ग, छोट्यामोठ्या बाजारपेठा यांची भरपूर माहिती उमगली होती. या यशाच्या अनुभवाने ही पद्धत आणखी विस्तारायचे निर्णय झाले. कलियन सिंग नावाचा आणखी एक असा खंदा हेर सामील केला गेला. या सर्वांना पंडित म्हणून संबोधले जायचे. भोतिया या आदिवासी समाजातील या ‘पंडितां’मुळे, युरोपातल्या भूगोलतज्ज्ञांना भारावून टाकणाऱ्याअनेक बाबी प्रथमच समजल्या होत्या. त्या अनेकांना कंपनी सरकारने तर भरघोस बक्षीस दिलेच. आणि नैनसिंगला रॉयल जिओग्राफिकल सोसायटीने सन्मान पारितोषिक म्हणून सोन्याचे घड्याळ बहाल केले!

लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सुप्रतिष्ठ प्राध्यापक असून ख्यातनाम अर्थतज्ज्ञ आणि विचक्षण अभ्यासक आहेत.

pradeepapte1687@gmail.com

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2021 1:28 am

Web Title: kingdoms and peoples of tibet nepal and other parts east india company akp 94
Next Stories
1 नामी उजळे भाग्य शिखरीचे
2 दूरच्या दिव्यांचा ‘किरणमाग’!
3 त्रिकोणे कोंडिले अवकाश
Just Now!
X