१९६६ मध्ये शाळेत उपशिक्षिकेची नोकरी मिळाली. शाळा, घरसंसार यात ३४ वर्षे कशी गेली कळलंच नाही. मला संधिवाताचा त्रास जाणवायला लागल्यावर तीन वर्षे आधीच स्वेच्छानिवृत्ती घेतली. २००० मध्ये. पण माझे मन काही घरातच बसून राहण्यास तयार होईना. सारखी शाळेतील मैत्रिणींची, सहकारी शिक्षकांची आणि विद्यार्थिनींची आठवण येत असे. असे वाटे उगाच शाळा सोडली. पण एक मात्र झाले मला माझ्या तब्येतीकडे लक्ष देता आले. औषधपाणी वेळेवर घेणे, पथ्य पाळणे इत्यादींमुळे संधिवाताचा त्रास कमी झाला. गुडघे दुखणे कमी होऊन मी चांगली हिंडूफिरू लागले.

सुधाताई जोशींच्या गीता मंडळात जाऊ लागले. तेथे निरनिराळे स्तोत्र शिकले, गीता पठण करणे, निरनिराळ्या ग्रंथांचे वाचन करणे. जवळपासच्या छोटय़ा छोटय़ा ट्रिपला जाणे यात मी खूप रमले. खूप समवयस्क मैत्रिणी मिळाल्या. रेणुकामाता मंदिर सुयोग सोसायटीत मी ट्रस्टी असल्याने तेथील देवीचा जन्मोत्सव नवरात्र उत्सव, दरवर्षी होणारा मौंज सोहळा शिवाय मोठमोठय़ा लोकांचे कार्यक्रम व्याख्याने, भागवत, रामायण इत्यादी कार्यक्रम चालूच असतात. शिवाय दानपेटी उघडणे, पैसे मोजणे, देवीच्या प्रसाद साडय़ांची विक्री वगैरे करणे. तेथे आम्ही १३ जण ट्रस्टी आहोत, पैसे बँकेत भरणे, काही बांधकाम करणे. गरीब पण होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणे. शिवाय सेवाभावी संस्थांना यथाशक्ती मदत करणे हे एकमताने चालते.

Husband Appreciation Day
Husband Appreciation Day : महिलांनो, नवऱ्याला गृहीत धरता का? त्यांच्या पाठीवर कधी देणार कौतुकाची थाप?
lokrang
गीतांचा भीमसागर…: चळवळीची गाणी…
Dram Hridayangam picture and biography of village culturea
नाट्यरंग: ‘मुक्काम पोस्ट आडगाव’; ग्रामसंस्कृतीचं हृदयंगम चित्र आणि चरित्र
lokrang, article, pandit kumar gandharv, singing style, thoughts, indian classical music, book, about to launch, gandharvanche dene pandit kumarjinshi sanvad,
कुमारजींचा सांगीतिक विचार

आमच्या नगरमधील स्त्रियांनी ६० वर्षांपूर्वी बालक मंदिरची शाळा सुरू केली. तेथेही मी कार्यकारिणीवर आहे. तेथेही सर्वानुमते ठरवून गरीब विद्यार्थ्यांना गणवेश देणे. रिक्षाने शाळेत आणणे आणि पोहोचवणे त्यासाठी रिक्षाला लागणारे पैसे, तसेच वह्य़ा-पुस्तके इतर शैक्षणिक साहित्य पुरविणे, त्यासाठी आम्ही सर्वचजण आर्थिक मदत करीत असतो. हे सगळे करता करताच आमच्या कॉलनीत मी ‘स्वानंद’ मंडळ काढले आहे. १५ ते २० स्त्रिया दर सोमवार आणि गुरुवार चार ते साडेपाच एकत्र जमत असतो.

मला घरातली जबाबदारी काही नाही. तीन मुले, सुना, नातवंडे, जावई, लेक असे माझे गोकुळासारखे घर आहे.

मला लेखनाचा छंद आहे. मी ‘ज्ञानधारा’ या साप्ताहिकात ‘नारी तू नारायणी!’ हे सदर जवळजवळ तीन वर्षे चालविले.  मी जे जे मनात आणते ते आतापर्यंत पूर्णत्वास गेले आहे. माझ्या मते, ‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे’. सुखी आणि आनंदी जीवन जगणे हेच बरे.

– पुष्पा चितांबर, अहमदनगर</p>

समाधानी वार्धक्य

पूर्वीच्या काळी माणसाने साठी पार केली की कृतार्थ झाल्यासारखे वाटत असे. त्यामुळे ‘साठी शांत’ असे छोटे छोटे समारंभ साजरे केले जात असत. आता नवे नवे शोध लागत आहेत. विज्ञान खूपच प्रगत झालेलं आहे. औषधांच्या बाबतीत तर विचारूच नका. पूर्वी जे असाध्य रोग समजले जात. तेच रोग आता सहजपणे बरे होऊ लागलेत. ओघानेच माणसाचे आयुर्मान साठीच्या पुढे गेलेलं आहे. साठीच्या पुढील वर्ष माणूस कसं जगतो याला महत्त्व आहे. ‘हसत हसत जगायचं की कुरकुरत जगायचं’ हे आपण ५० ते ६० वय असतानाच ठरवलं पाहिजे. नाहीतर वयाच्या साठीनंतर आपलं आयुष्य अतिशय निरस आणि निराशाजनक होऊन जाईल. ‘साठीची स्त्री सर्वात तरुण असते, अनुभवाच्या शिदोरीसकट बोल्डही असते.’ हे माझं आवडतं गृहीतक असल्याने मी त्याप्रमाणे वागू लागले. मी गाणं शिकायला सुरुवात केली. अगदी यमन मालकंस आला पाहिजे, असं नाही पण एखादं भावगीत जरूर यावं असं वाटू लागलं. ग्रुप तयार केला. बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली. हाच ग्रुप बरोबर घेऊन छोटय़ा-मोठय़ा ट्रीप काढल्या. चांगली चांगली भाषणं ऐकली. एखाद्या दिवशी सगळ्या मिळून हॉटेलमध्ये ब्रेक फास्टला जात होतो. कोणाच्या परवानगीची जरूर भासेनाशी झाली. हे सगळं करत असताना माझं वाचन हे चालूच होतं.

पुढे सत्तरीत येऊन ठेपले. आणि मग मात्र काही काही गोष्टींना मर्यादा आली. खेळ तर बंदच झाला. कारण गुडघे कुरकुरायला लागले. सूर, ताल आणि आवाज यांचा मेळ बसणं कठीण झाल्यामुळे गाणं शिकणं बंद झालं. तब्येतीच्या तक्रारी चालू झाल्यामुळे मोठय़ा ट्रिप काढणं बंद झालं. आणि मग मात्र वाचन, थोडं फार लिखाण आणि मनसोक्त गप्पा.

आमचा एक दहाजणींचा खूप छान ग्रुप आहे. प्रत्येकजण वाचन वेडीच आहे. ‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान’ची पेटी येथे येतेच. त्यामुळे त्यातील पुस्तके वाचली जातात. शिवाय लायब्ररीतून आणूनही पुस्तके वाचली जातात. दर पंधरा दिवसांनी आम्ही दहाजणी जमतो. वाचलेल्या पुस्तकावर चर्चा करतो. आवडलेलं पुस्तक एकीमेकींना वाचायला सांगतो. का आवडलं तेही सांगतो. जी कोणी लिहिणारी असते ती एखादं छोटं लिखाण लिहून आणते. त्याचं वाचन करतो. त्यावर उलटसुलट चर्चा करतो. वर्तमानपत्रात आलेल्या स्त्रीविषयक सदरावरही चर्चा करतो. मोकळेपणाने बोलल्यामुळे थोडंसं मोकळं वाटतं. कुठं तरी व्यक्त झाल्यामुळे एक प्रकारचं समाधान वाटतं. सासू-सून याच्यापलीकडचे विषय बोलल्यामुळे एक प्रकारचं समाधान मिळतं.

हे महिन्यातून दोनदा होतं. शिवाय आमचं एक निवृत्त अभियंता मंडळही आहे. तिथं मात्र वाचन, पुस्तक हा विषय नाही. तिथं महिन्यातून एकदा जमतो. २५ जणी आहोत. दर महिन्याला एकीच्या घरी जमतो. गप्पा, छोटासा बैठा खेळ, खाणे यात दोन तास छान जातात. महिन्यातले हे चार दिवस अतिशय उत्तम जातात. आम्ही सर्वजणी ६० ते ७५ च्या वयाच्याच असल्यामुळे एकमेकींना सांभाळून मजा करतो. याशिवाय आमचा आणखीसुद्धा एक नऊ जणींचा ग्रुप आहे. तिथं मात्र आम्ही उभयता जातो. ज्याला जेव्हा सवड होईल तेव्हा तो त्याच्या घरी बोलावतो. राजकारण, अर्थकारण, विनोद, पदार्थाच्या रेसिपी अशा अनंत विषयावर चर्चा होत असते. या गप्पातून निष्पन्न काही होत नाही, पण माझा वेळ छान जातो.

– अनिता महाजनी, सातारा</p>

हा आलेख माझ्या वयाचा की..

मी एका यशस्वी अधिकाऱ्याची पत्नी. स्वहुशारीने, बुद्धीच्या जोरावर यशाची पताका फडकवणाऱ्या दोन पुत्रांची माता. ही रूपे यशस्वीपणे वठवणारी मी एक गृहिणी. पण स्वत:ची ओळख काय? कशासाठी जन्मले? मनात सतत प्रश्न – उत्तर? सर्व सुखसोयींनिशी जगले. पण हेच पुरे का?

‘‘बरंच काही करायचं राहून गेलं। बघता बघता। आयुष्य सरून गेलं

मनातले मांडे मनांत जिरले। फारच थोडं हाती आलं॥

काळ कधी थांबत नाही। वेळ अजून गेली नाही।

कुणी धावती ध्येयामागे। मी धावले सर्वासंगे।

आयुष्यात सारखी धावपळ। वाटे कशासाठी ही पळापळ।

हा आला तो भेटला पाहुणचार खूप केला। निवांत क्षण कुठं लपला?

त्याचीच वाट पाहात असते आयुष्याच्या संध्याकाळी । काहीबाही करत असते।

त्या छोटय़ाशा काहीबाहीत हर्षांची चाहूल लागत असते।

येणाऱ्या काळात नव्या उमेदीनं जगायचं आहे। जीवनगाणं लिहायचं आहे, अजून बरंच काही करायचं आहे॥’’

निवृत्तीनंतर स्वत:चं वेगळं सकारात्मक आयुष्य जगावं या ओढीनं जे जे जमेल ते ते करत गेले. घराजवळच राष्ट्र सेविका समितीची शाखा होती. तेथे जाऊ लागले. सामाजिक कार्याचे प्राथमिक धडे तेथे मिळाले. कामात आनंद वाटला. स्त्रियांची आत्मचरित्रे वाचली. समितीच्या आद्यसंस्थापिका मावशी केळकरांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त नागपूरला वर्ष २००७ मध्ये मोठे संमेलन भरले. त्यात दहा हजार सेविका देशभरातून आल्या होत्या. चर्चासत्रं, व्याख्यानांद्वारे थोरामोठय़ांचे विचार कानी पडले. सामाजिक ऐक्याची भावना फार भावली. त्या वेळी बाबा आमटे यांच्या आनंदवनाला भेट दिली. प्रत्यक्ष बाबा आणि साधनाताईंनी डोक्यावर हात फिरवून आशीर्वाद दिला. तो हिऱ्यामोत्यासम अमूल्य क्षण हृदयात जपला आहे. त्यांचा आशीर्वाद माझं जीवन सफल करेल या विश्वासानं पावलं पुढे पडू लागली. थोरामोठय़ांचे सान्निध्य लाभू लागले.

पुण्यात ग्राहक पंचायतीसाठी कार्यकर्ते हवे होते. त्या कामाची सविस्तर माहिती देऊन माझ्यासह चारपाच मैत्रिणी त्या कामात सहभागी झालो. त्यांच्यासोबत कार्य करताना – पालिका, आयकर कार्यालय, व्यापारी संघटनेचे काम पाहायला मिळाले. ग्राहक न्यायालयाचे कामकाज कळले. त्यामुळे आपापल्या विभागात कार्यक्रम आयोजनाचे धडे मिळाले. सभाधीटपणा आला. सामाजिक कामाबरोबर काही सामाजिक संस्थांशी परिचय झाला. पुढे नातू संगोपनात हे कार्य थांबवले.

आता पुन्हा समाजकार्याची ओढ लागली. त्यामुळे अंधशाळा, आदिवासी पाडय़ावरच्या शाळांना भेटी देणे, अन्नधान्य, आर्थिक मदत देणे चालू केले. नंदनपाडा येथील प्रमोद पाटील नावाच्या उत्साही तरुण कार्यकर्त्यांला सर्वतोपरी मदत केली. आता शारीरिक धडपड कमी झाल्यामुळे मैत्रिणींसोबत सामाजिक संस्थांच्या गरजा समजून घेते आणि सामूहिक अर्थसहाय करते. या कामाबरोबर मनाला संगीत अध्यात्माची आवड आहे. त्यातून एक गट जमला. गेल्या १५ वर्षांपासून दर बुधवारी घरी भजनाचा क्लास चालतो. मी निवेदन करते. पेटी वाजवायलाही शिकले. परिसरातल्या ‘सहजानंद ज्येष्ठ नागरिक संघाची’ सक्रिय सदस्य आहे. आमचे त्रमासिक ‘आवाज ज्येष्ठांचा’चे संपादकत्व माझ्याकडे आहे. सर्व वाटा पायाखाली घातल्यावर खरी वाट सापडली. पुण्यातील साहित्यात रमलेल्या भगिनींची प्रसिद्ध संस्था – ‘साहित्यप्रेमी भगिनी मंडळ’ची ओळख झाली. मी लेखनास सुरुवात केली. त्यातून अनेक कथा जन्माला घातल्या. डॉ. लीला दीक्षितांच्या सल्ल्याने २०११ मध्ये ‘अशी मी तशी मी’ कथासंग्रह प्रकाशित केला. प्रसिद्ध चित्रकार रवि परांजपे, डॉ. लीला दीक्षितांच्या अध्यक्षतेखाली ‘शिल्पा प्रकाशन’ने प्रकाशन केले. २०१४ मध्ये नीहरा प्रकाशनच्या डॉ. स्नेह सुधा कुळकर्णी यांनी ‘जातकुळी’ कथासंग्रह प्रकाशित केला. सध्या कादंबरी लेखन चालू आहे. वय वर्षे ७९ चालू आहे. ८० व्या वर्षांत पदार्पणाच्या उंबरठय़ावर उभी मी, कुठे निवृत्तीचे वय? हा आलेख माझ्या वयाचा की सांध्यछटेचा?

‘‘आयुष्याच्या सायंकाळी काहीबाही करत आहे। ह्या छोटय़ाशा काहीबाहीत हर्षांची चाहूल लागली आहे। माझी ‘मी’ मला सापडली आहे. जी जीवन भरभरून जगत आहे.’’

– सुजाता फडके, पुणे</p>

आयुष्याचा प्रवाह नदीसारखा

कविवर्य पाडगांवकर म्हणतात ‘प्याला अर्धा भरलाय म्हणायचा की अर्धा सरलाय म्हणायचा तुम्हीच ठरवा’. माझं वय सध्या ७८ वर्षे आहे. आत्तापर्यंत मी माझ्या जीवनाचा प्याला अर्धा भरलाय अशा सकारात्मक दृष्टीने पाहतच जगत आलेय. ऑफिसमध्ये स्वेच्छा निवृत्तीची योजना आल्यावर मात्र जास्त मोह न ठेवता लगेच निवृत्ती घेतली. आलेल्या पैशांतून टायपिंग इन्स्टिटय़ूट सुरू केलं. जीवनाच्या प्रवाहाने वेगळं वळण घेतलं. होतकरू विद्यार्थी संपर्कात आले. त्यांना जमेल तशी मदत केली, समुपदेशन केलं. विद्यार्थीप्रिय प्रिन्सिपल झाले. त्याबरोबर समाजातील खटकणाऱ्या रूढी, परंपरा, प्रवासात आलेले अनुभव यांवर वृत्तपत्रांतून वाचकपत्रे, लेख लिहायला सुरुवात केली. त्याला भरपूर प्रतिसाद  मिळाला. प्रमोद नवलकर पुरस्कृत राज्यस्तरीय पुरस्कार, भारतीय समाज अकादमीचा राज्यस्तरीय पुरस्कार, प्रजापिता ब्रह्मकुमारी विक्रोळी यांचा स्त्री-शक्ती पुरस्कार इत्यादी अनेक पुरस्कार मिळाले. तसेच ‘चतुरंग प्रतिष्ठान’, भगिनी मंडळे यांचीही क्रियाशील सदस्य होऊन कार्यक्रम सादर करून सामाजिक कार्य केले. ‘चतुरंग’मुळे अनेक कलाकारांशी परिचय झाला. युरोप, अमेरिका, दुबई येथील विश्वसाहित्य संमेलनात उपस्थित राहून इंग्लंड, हॉलंड, जर्मनी, फ्रान्स, स्वित्र्झलँड, इजिप्त ३० देश-विदेश पाहून मन तृप्त झालं.

अजूनही मी डोंबिवलीतील अनेक संस्थाची क्रियाशील सभासद असून मिळालेल्या आयुष्याचा भरभरून आस्वाद घेत आहे. सरलेल्या ७५ वर्षांच्या आयुष्याने भरभरून दिले, उरलेल्या आयुष्याकडून तीच

अपेक्षा. आयुष्याचा प्रवाह हा नदी(सरिता)सारखा आहे.

‘सरिता करिते का कधी खंत?’

– विजया आजगांवकर, डोंबिवली