21 January 2019

News Flash

दोस्ती समाजसेवेशी

खुदावाडी गावातली दोन उजाड टेकडय़ांवर महिला बचतगटाच्या मदतीने ३ वर्षांत १० हजार झाडे लावायची होती.

भावना आपटे, विलेपार्ले पूर्व

भटकण्याचं किंवा फिरण्याचं वेड रक्तातच होतं असं म्हणायला हरकत नाही. १९८६ मध्ये पहिल्यांदा बद्रिनाथ, केदारनाथ, व्हॅली ऑफ फ्लॉवर्स व हेमकुंड हा प्रवास मित्रमैत्रिणींबरोबर केला आणि हिमालयाची ओढच लागली. १९९४ मध्ये अचानक साथीदार सोडून निघून गेला, पण हिमालयाची ओढ स्वस्थ बसू देईना. मग मीच १९९७ ते २००७-८ पर्यंत दरवर्षी नवनवे गट बनवून हिमालयात जायला लागले. मग हा छंदच लागला. पुढे एकटीच बहिणीकडे जर्मनी, पुढे नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्कला गेले. तसेच हॉलंड, जर्मनी, प्राग, तुर्कस्तान, चीनमध्येही एकटीने प्रवास केला.

प्रवास करत असले तरी उरलेल्या वेळेत काय करायचे, हा प्रश्नच होता. रिकामे बसणे स्वभावात नव्हते. मग कौटुंबिक स्नेही के. आर. दाते ज्यांचा संबंध खूप संस्थांशी होता, त्यांना भेटले. त्यांचा एक प्रकल्प सोलापूरजवळ चालू होता. खुदावाडी गावातली दोन उजाड टेकडय़ांवर महिला बचतगटाच्या मदतीने ३ वर्षांत १० हजार झाडे लावायची होती. तिथे राहून त्या कामाला सुरुवात केली आणि माझ्या सामाजिक कार्याला प्रारंभ झाला. तिथे प्रकल्पावर जाण्यासाठी बस फारच अनियमित असल्याने गावातून एक सायकल मिळवली आणि तिने ये-जा सुरू केली. तोपर्यंत सायकल चालवणारी बाई गावातच नव्हती. त्यामुळे खूप चर्चा झाली; पण मग माझे बघून हळूहळू मुली सायकल चालवायला लागल्या. या प्रकल्पानंतर जवळच भोगाय येथे बाळकृष्ण रेणके यांच्या समवेत ३ वर्षे काम केले.

त्यानंतर दाते यांच्याकडेच डॉ. उज्ज्वला पेंडसे यांची भेट झाली. त्या विक्रमगड तालुक्यात सेंद्रिय शेतीचा प्रचार, प्रसार व प्रयोग करण्यासाठी जात होत्या. त्यांच्याबरोबर जायला लागले.

डॉ. एम. एल. ढवळे मेमोरियल ट्रस्ट या संस्थेचे भोपोली इथे १० खाटांचे रुग्णालय आहे, तिथून कामाला सुरुवात केली. २००५ मध्ये आम्ही दोघी त्या भागात जायला लागलो. तोपर्यंत रासायनिक खतांचे दुष्परिणाम जाणवायला लागले होते. आम्ही आसपासच्या गावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घ्यायला सुरुवात केली. महिला बचतगटांमध्ये जाऊन भेटलो. सेंद्रिय शेती म्हणजे काय, कशी करावी याची माहिती द्यायला सुरुवात केली. महिला बचतगटांना परसबाग करायला शिकवले. त्यातून घरचा भाजीपाला मिळू लागला. सेंद्रिय खते कशी करावी, सेंद्रिय फवारण्या, गांडूळखत, कंपोस्ट खत करण्याची प्रात्यक्षिके घेतली.

सात शेतकऱ्यांचा गट करून त्यांच्याबरोबर काम सुरू केले. या पद्धतीच्या स्वीकारामुळे जमिनीची प्रत सुधारली, पाणी जास्त वेळ टिकून राहू लागले. उत्पादनाला चव आली हे दिसून आले. बांधावर झाडे लावायला प्रोत्साहन दिले, रोपे आणून दिली. परसबागेत जास्तीत जास्त उत्पादन घेणाऱ्या स्त्रियांना बक्षिसे दिली. ज्या शेतकऱ्यांची रोपे ३ वर्षे जगतील त्यांनाही बक्षिसे दिली. आता शेतकरी आपणहून रोपांची मागणी करतात. पाण्याची सोय शक्य असेल तिथे केली व भात झाल्यावर भाजीपाला लावायला शिकवले, प्रोत्साहन दिले. विक्रीची व्यवस्था करण्याची धडपड केली. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले. शेतकऱ्यांचे नवीन गट तयार होऊ लागले. आज ८० शेतकरी सेंद्रिय शेती व भाजी उत्पादन करत आहेत. १० वर्षांपासून लावलेली फळझाडे फळे देऊ लागली आहेत.

या कामाचे समाधान खूप आहे. आपल्या ज्ञानाचा उपयोग कोणाला तरी होतो आहे, त्यांचे उत्पन्न वाढत आहे, त्यांच्या चेहऱ्यावर समाधान व हसू आहे हेच या कामाचे बक्षीस आहे. शक्य असेल ती मदत आपल्याकडून समाजाला व्हावी, सकारात्मक दृष्टीने आयुष्य जगावे. काय नाही त्याचा विचार न करता काय आहे त्याचा विचार करावा, हाच या सगळ्याचा हेतू. या सगळ्या कामांमध्ये सीमा कुलकर्णी, संध्या एदलाबादकर, शारदाबाई रेणके, बाळकृष्ण रेणके यांची खूप मदत झाली. उज्ज्वला व मी तर गेली १२ वर्षे बरोबर काम करत आहोत. जमेल तोवर करावे, ही इच्छा आहे. दाते यांच्यामुळे मी या कामाकडे वळले व माझे आयुष्य बदलून गेले.

या घडीला माझे वय ७५ आहे, जगण्याचा आनंद, समाधान खूप मिळत आहे..

– भावना आपटे, विलेपार्ले पूर्व

First Published on February 10, 2018 1:13 am

Web Title: bhavana apte help farmers for organic farming