News Flash

प्रत्येक दिवस सोहळा

मला झालेला कर्करोग साडेआठ वर्षे माझा सांगाती झाला.

प्रतिनिधिक छायाचित्र

आपण या जन्मात कसं जगायचं, हसत-हसत की रडत-कुंथत हे आपल्यावरच अवलंबून असतं. आजकाल हे संदेश देण्यात प्रसारमाध्यमांचा विशेषत: व्हॉट्सअ‍ॅपचा हात कोणीही धरू शकणार नाही. कितीही जरी सकारात्मक विचारांनी जगायचं म्हटलं तरी आपल्याला आयुष्यात सतत मनाविरुद्ध घडणाऱ्या घटनांचा आणि कसोटी पाहणाऱ्या प्रसंगांचा आपल्यावर नकळत परिणाम होत असतोच. त्यातून बाहेर पडायचे असेल तर जिद्द, चिकाटी, संयम, कष्ट  करण्याची तयारी, प्रामाणिकपणा हे गुण वाढीला लावण्यासाठी डोळस प्रयत्न करावे लागतात.

माझ्या वयाची ६१ वर्षे पूर्ण होऊन मी ६२ व्या वर्षांत पदार्पण केले आहे. २५ वर्षे शिक्षिकेची नोकरी करून तीन वर्षांपूर्वी निवृत्त झाले. मी सामाजिक कामात उतरू शकलेली नाही, पण सामाजिक बांधिलकी मानून, समजून उमजून गरज असेल तेथे अल्प-स्वल्प मदत करते. २००४ मध्ये मला रक्ताचा कर्करोग (फॉलिक्युलर लिम्फोमा-ग्रेड वन) झाला. केमोथेरपीच्या सहा सायकल्स घेऊनही आजार नाहीसा झाला नाही. या प्रकारचा कर्करोग माणसाला अगदी झोपवून ठेवत नाही पण तो पूर्णपणे बरा होतोच असेही नाही. मला झालेला कर्करोग साडेआठ वर्षे माझा सांगाती झाला. खचून न जाता मी संसार आणि नोकरी दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडीत होते. नुकताच मोठा मुलगा शिकून नोकरीसाठी विदेशी गेलेला होता. २००९ मध्ये धाकटा मुलगाही एम्.एस्.आणि पीएच्.डी. करायला परदेशी गेला. पिल्लांच्या पंखात बळ आले होते. त्यांनी अवकाशात भरारी घेतली. आमच्या घरात राहिलो आम्ही दोघेच. त्यातच माझ्या पतीला वयाच्या ६० व्या वर्षांपासूनच स्मृतिऱ्हास सुरू झाला. २०१२ मध्ये मला फॉलिक्युलर लिम्फोमाचे डिफ्यूज लार्ज बी सेल लिम्फोमा ग्रेड तीनमध्ये रूपांतर झाले. पुन्हा केमोथेरपीच्या दिव्यातून जावे लागले. या प्रकारचा लिम्फोमा केमोथेरपीने नाहीसा झाला तरी तो पुन्हा पुन्हा येण्याचा खूपच संभव असतो. म्हणून डॉक्टरांनी केमोथेरपीनंतर स्टेम सेल्स ट्रान्सप्लान्टचा सल्ला दिला. २०१३ च्या एप्रिल-मेमध्ये स्टेम सेल्स् ट्रान्सप्लान्ट झाले वयाच्या ५७ व्या वर्षी हे उपचार घेताना अनेक दिव्यातून जावे लागले. हतबलता, अगतिकता, एकाकीपणा यातून सावरून सगळ्या परिस्थितीतून बाहेर पडून निवृत्तीपूर्वीचे उरलेले १० महिने पुन्हा शाळेत अगदी मनापासून काम केले. ३० नोव्हेंबर २०१४ रोजी समाधानाने निवृत्त झाले. २०१२ च्या डिसेंबरमध्ये कर्करोगाच्या उपचारांसाठी चिपळूण येथून मुंबईला यावे लागले. तरी अगदी पहिल्या दिवसापासून माझ्या शाळेत मी परत जाणार आहे आणि निवृत्तीच्या अखेरच्या दिवसापर्यंत काम करूनच शाळेचा निरोप घेणार आहे असा सकारात्मक भाव मनात ठेवला होता म्हणूनच मी त्यातून बाहेर पडू शकले. गेली साडेचार वर्षे मी कर्करोगमुक्त जीवन आनंदाने जगत आहे. पतीचा स्मृतिभ्रंश हळूहळू वाढतो आहे त्यामुळे घर सोडून फारसे कोठे जाता येत नाही. त्यांना एकटे ठेवता येत नाही. व्यायाम, योगासने, प्राणायाम आणि सतत क्रियाशील राहणे, विद्यार्थी हिताचे काम करणे यात कार्यमग्न आहे. उगवलेला प्रत्येक दिवस माझ्यासाठी ‘सोहळा’ आहे असे मी मानते. वाचन, नाटय़, संगीत, चित्रपट याचा आनंद लुटते. मुले, सुना, नातवंडे खूप दूर आहेत. मुलांचे आयुष्य हे त्यांचे आहे. त्यांनी हवे तसे आणि हवे तेथे राहावे हे मनापासून पटते आहे म्हणून या गोष्टींची खंत न बाळगता मस्त जगते आहे. स्टेम सेल्स ट्रान्सप्लान्टच्या आणि आजाराच्या एकंदर अनुभवावर नुकतेच माझे पुस्तक ‘सर करा कॅन्सर’, पुण्याच्या ‘स्नेहल प्रकाशन’ने प्रकाशित केले आहे. माझी जिद्द, चिकाटी, संयम, सहनशीलता, सोशिकता यातून कर्करोगपीडितांना आणि त्यांच्या आप्तेष्टांना लढण्याचे बळ मिळावे हा या पुस्तकामागचा उद्देश आहे. तो पूर्ण होईल याविषयी खात्री आहे. मधल्या नऊ वर्षांनंतर का होईना मला कर्करोगमुक्त जगणं पुन्हा मिळाले आहे. आणि मी ते भरभरून जगते आहे, नकारात्मक गोष्टींना वगळून.

– मुग्धा बरवे, चिपळूण

मस्त चाललंय आमचं!

निवृत्त होऊन ३० सप्टेंबर रोजी बारा वर्षे पूर्ण होतील, पण ऑफिसला जाणे बंद होण्याव्यतिरिक्त निवृत्त झाल्यासारखे वाटलेच नाही. नियमितपणे अथवा स्वखुशीने निवृत्त होणाऱ्यांना मी नेहमी सांगतो की निवृत्तीनंतरचे नियोजन आधी करा. मेंदू आणि देह गुंतलेला असला पाहिजे नाहीतर वेड लागण्याची वेळ येते. मला हा प्रश्न कधीच भेडसावणार नव्हता. कारण लष्कराच्या भाकऱ्या भाजण्याचा घरचा परंपरागत व्यवसाय. पेणमध्ये असताना अनेक संस्था व त्यांच्या कार्याशी निगडित होतो. संघटनेचे काम अजूनही चालू आहे. सध्या रहातो इथे वस्तीच नसल्याने सामाजिक कार्य जवळजवळ शून्य, पण लेखन-वाचनात वेळ कसा जातो कळत नाही. आत्तापर्यंत ३३ पुस्तके प्रकाशित झाली.

जनरेशन गॅप प्रकार नसल्याने कुठल्याही वयाच्या व्यक्तीशी सहज जमू शकते. इथे रहाणाऱ्यांनी महिन्यातून एकदा तरी एकत्र यावे, आपले व्यवसाय, नोकरी इत्यादींमधील लक्षात राहिलेले अनुभव सांगावेत. आपण इतरांसाठी काय करू शकतो ते सांगावे या उद्देशाने काहीजणांशी बोललो पण अजूनही त्यात कुणाला रस दिसला नाही. आमच्या वेळी असे होते, हा काय करतो अशा स्वरूपाची चर्चा करणे मनाला कधीच पटले नाही. भूतकाळ विसरा, भविष्याची चिंता करू नका, वर्तमानात जगा ही शिकवण मिळाली ती प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करतो. त्यात बऱ्यापैकी यशही मिळते. व्यसन लागल्यासारखी लोकांची कामे करीत गेलो. बऱ्याच जणांचा विश्वास संपादन करता आला याचा मोठा आनंद आहे.

स्वत: नियोजन करून अंदमानसह बहुतेक भारताची भटकंती केली. सर्वसामान्यात मिसळलो. स्थानिक संस्कृती; इतिहासाची माहिती करून घेतली. काही कारणाने एकाकी पडलेल्या (विशेषत: वृद्ध; विकलांग ) व्यक्तींशी बोलल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारे समाधान बघून मिळणारा आनंद काही औरच असतो. अशा छोटय़ा छोटय़ा गोष्टी हातून नकळत होतात आणि लोक ते लक्षात ठेवतात हा अनुभव अनेक वेळा आला आहे. भरत जाधवचा एक चित्रपट आहे; ‘मस्त चाललंय आमचं!’. तसंच माझं मस्त चाललं आहे.

– विलास वि.फडके

सव्वा लाख शुभेच्छा

मी स्वत:ला खूप नशीबवान समजतो कारण नोकरी चालू असताना आणि नंतर निवृत्ती घेतल्यानंतरही माझा मित्रांचा सहवास पिंपळवृक्षासारखा वाढतच राहिला. भरदार आणि दाट!

‘वयाच्या ५८ व्या वर्षी २००५ मध्ये मी बँकेतून समाधानाने निवृत्त झालो. पत्नी अपर्णा हिच्या आग्रहाने देश-विदेश फिरून आलो. त्याच दरम्यान मुलांची लग्नंही झाली आणि जबाबदारीतून मुक्त झालो.

तसा मी मूळचा अहमदनगरचा, पण नोकरीतील शेवटची १० -१२ वर्षे पुण्यात गेल्यामुळे शेवटी पुण्यातच स्थायिक झालो. मित्रांशी ओळख वाढवणे, त्यांना सुखदु:खाच्या प्रसंगी आणि अडीअडचणीच्या वेळी मदत करणे हा माझा स्वभाव. निवृत्तीनंतर काय करायचे हा माझा प्रश्न? हा प्रश्न ‘स्टेट बँक ऑफ इंडिया पेन्शनर्स असोसिएशन पुणे येथील पदाधिकारी व्ही. एम. गोखले, बी. जी. दांडेकर, एस. बी. गोखले, लबिंगकर, विलास गंधे यांनी सोडवला. त्यांच्या सूचनेवरून मी या संघटनेत साधा कार्यकर्ता म्हणून काम सुरू केले. हे काम मला खूप आवडले, कारण त्यामुळे प्रत्यक्षात अप्रत्यक्षपणे माझा मित्रपरिवार वाढतच राहिला.

२०१२ पासून माझा छंद आणखी वाढला. ही संघटना संस्थेच्या सभासदांना त्यांच्या वाढदिवसाची शुभेच्छापत्रे पाठवते. हे काम पूर्वी माधव बापट करत होते. नंतर मी स्वेच्छेने हे काम स्वीकारले.  ही संख्या दरमहा १८०० ते २००० पर्यंत आहे. कारण संघटनेचे सध्या २५ हजारांपेक्षा जास्त सभासद आहेत. त्यामध्ये सभासद १४ हजार आणि सहसभासद (पत्नी/पती) ११ हजार आहेत. जूनपर्यंत मी साधारणपणे

सव्वा लाख वाढदिवस शुभेच्छापत्रे पाठवली आहेत.

या कामात माझी पत्नी अपर्णा खूप मदत करत होती. (तिचे जानेवारी २०१८ मध्ये निधन झाले) तिचे ऋ ण मी विसरूच शकत नाही. माझे हे काम अत्यंत शिस्तबद्ध रीतीने चालू आहे. संबंधित व्यक्तीच्या वाढदिवसाच्या १२ ते १५ दिवस आधी पोस्टात टाकतो. ज्यामुळे सभासदाला ते पत्र वाढदिवसापूर्वीच मिळेल हे मी पाहतो. यात मी आतापर्यंत कुठल्याही प्रकारे चालढकल किंवा कंटाळा केला नाही.

हे काम खूप आनंदाने करत असतो. काम करताना खूप बरे वाटते. सभासदांना पत्र मिळाल्यानंतर त्यांचे फोन येतात. काहीजण उलट टपाली पत्र पाठवून आभार मानतात आणि माझी चौकशीपण करतात.

मला अभिमान आहे की, बँकेचे निवृत्त चेअरमन, अत्यंत वरिष्ठ अधिकारी आणि मित्र यानिमित्ताने माझी चौकशी करतात. आपल्या प्रत्येकाच्या जीवनात वाढदिवस हा आनंदी दिवस असतो.

२०१२ पासून मीपण शुभेच्छापत्रे पाठवून आमच्या सभासदांच्या आनंदात सहभागी होत आहे. ७१ व्या वर्षीदेखील माझा मित्रपरिवार जास्वंदीच्या वृक्षाप्रमाणे बहरलेला आहे. हे काम माझ्या मनाला कायम ताजेतवाने ठेवते. दिवंगत पत्नीच्या आठवणीत रमत मी हे काम करून माझे जीवन भरभरून जगतो आहे. शेवटच्या श्वासापर्यंत परमेश्वराने माझ्याकडून हे काम करून घ्यावे हीच माझी इच्छा.

– प्रमोद ह. चाटे, पुणे

उमेद, उत्साह कायम

नगरपालिका मराठी शाळेत ४० वर्षे नोकरी झाली. मुख्याध्यापिका होते. २००१ ला सेवामुक्त झाले. संस्कृतची जाण आहे. भगवद्गीता पूर्ण पाठ आहे. खोपोलीसारखं छोटंस शहर – लगेच स्त्रियांना एकत्र करून श्रीसूक्त, रुद्र, विष्णुसहस्रनाम शिकवायला सुरुवात केली.

आठवडय़ातून दोनदा गीता म्हणायला शिकवली. अर्थ सांगायला सुरुवात केली. २५-३० स्त्रियांचा गट तयार झाला. मनाचे श्लोक, आचार्य शंकराचार्य यांची स्तोत्रे शिकवून पाठ झाली. विशेष म्हणजे १२ वर्ष झाली, आता नवरात्र, श्रावण महिना घरोघरी गटाने जाऊन सर्व सूक्ते म्हणतो. अस्खलित उच्चार, पाठांतर सर्वाचे एकत्र छान जमते. विशेषत: सर्वजणी ५०-५५ वयाच्या पुढे आहेत. त्यांनाही घराबाहेर पडण्याची संधी मिळते. कोणाच्या घरी वाढदिवस असेल तर आमच्या ग्रूपला बोलावून गीता, सूक्त, रुद्रपठण ठेवले जाते. दक्षिणेची आवश्यकता नाहीच. खुशीने दिली तर चिन्मय मिशनला दिली जाते. पैशासाठी नाहीतर आनंदासाठी हे होत आहे. माझ्या घरीही येऊन गीता आणि संस्कृत शिकणारे स्त्री आणि पुरुष आहेत. चैत्रात नऊ दिवस रामायण वाचतो. आज माझे वय ७५ वर्षे आहे. घराजवळ मंदिर आहे. तिथे सर्व कार्यक्रम करतो. प्रकृतीची तक्रार आहेच. चिन्मय मिशन देवी वर्ग हा आमचा ग्रूप. दासनवमीनिमित्त दासबोध वाचन करून दासनवमीला सांगता करतो. वय विसरून सर्वजणी येतात. लहान मुलेही स्तोत्रे शिकतात. ५० वर्षे संसार केला. सहजीवन जगलो. आता मला येते दुसऱ्याला वाटावे म्हणून शिकवत गेले. शिकवण्याचा आनंद मला मिळाला. संसाराच्या रामरगाडय़ातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडला. स्वत:ची प्रत्येकीला नवी ओळख मिळाली. गीतेचा खरा अर्थ समजतोय. बघण्याची दृष्टी बदलत आहे. सृष्टी बदलत नाही, मीच बदल करायला हवा, याची जाणीव होऊ लागली. आनंदमेळाच असतो. शरीर थकले आहे, पण मनाची उमेद, उत्साह कायम आहे. आमचे एक चिन्मय कुटुंबच आहे. सुखदु:खात सर्वजणी बरोबर असतो. अहंकार नाही. द्वेषमत्सर नाही. मीपणाचे ओझे नाही. फक्त आनंदासाठीच जमतो.

– उज्ज्वला भावे, खोपोली

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2018 1:01 am

Web Title: careers after retirement happy retirement successful life after retirement
Next Stories
1 योगासनांची साथ..
2 उद्याची चिंताच नाही..
3 त्याला कसलेच भय नाही..
Just Now!
X