11 July 2020

News Flash

आरोग्याची गुरुकिल्ली

एकमेकांच्या अडीअडचणी सांगतो, मन मोकळे करतो. त्यामुळे अडचणीतून मार्ग निघतात.

डॉ. हिरालाल खैरनार, खारघर

नुकतीच मी पासष्टी गाठली. माझा मीच मनातून हुरळून गेलो. आता महाराष्ट्र सरकारही मला ज्येष्ठ नागरिक समजणार तर! केवढा आनंद झाला. केंद्र सरकार मला गेल्या पाच वर्षांपासून ज्येष्ठ नागरिक सन्मान देतच होते, बँकेच्या मुदत ठेवीत जास्त व्याज देत होते. रेल्वेने प्रवास केला नाही त्यामुळे सवलतीचा फायदा घेतला नाही ती माझीच चूक. आता वाटते अरे केंद्र सरकारने एव्हढी सवलत देऊन आपण देशात फिरलोच नाही. मग पासष्टी गाठली त्याच दिवशी ठरवून टाकलं, राज्य सरकारच्या प्रवास सवलतीचा फायदा घेऊ, एसटीच्या उत्पन्नाला जरा हातभार लावू आणि महाराष्ट्र संपूर्ण बघू. ते तरी होतंय का? काळच ठरवेल.

मी नाशिक जिल्ह्य़ातील, मालेगाव तालुक्यातील मौजे पाटणे गावचा मूळ रहिवासी. मराठवाडा कृषी विद्यापीठअंतर्गत पशुवैद्यकीय महाविद्यालयातून पशुवैद्यकीयशास्त्रातील पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. एकूण चौतीस वर्ष सोळा दिवस नोकरी केली. नाशिक, ठाणे आणि मुंबई जिल्ह्य़ांत नोकरीच्या निमित्ताने भटकंती झाली. आनंदी-सुखी जीवन जगण्यासाठी कडू आठवणी विसरायला शिकायचे आणि गोड आठवणींची उजळणी करायची म्हणजे त्रास कमी होतो. मुंबईत वांद्रे शासकीय वसाहतीत २३ वर्ष वास्तव्य राहिले. विविध विभागाच्या अधिकारी/ कर्मचारी यांच्याशी संबंध आला, त्यामुळे विविध प्रकारचे मित्रही मिळाले. त्याचा एक मोठा फायदा झाला, स्वत:ला तपासता आले. त्यामुळेच निवृत्तीनंतरचे जीवन जगताना त्याचा फायदा झाला, होतोय.

लिखाणाची आवड होती, माध्यमातून आलेल्या बातम्या राजकीय, सामाजिक इतर कुठल्याही विषयावर चिंतन मनन करण्याची सवय जडली, त्यातून वाचकांच्या पत्रातून स्वत:ची मतं पाठवू लागलो. ती छापून येऊ  लागली. मग तो छंदच लागला आणि जोपासला. त्याद्वारे अनेक जनसमस्या मांडता आल्या, अनेक पत्रांची दखल विविध यंत्रणांनी घेतली.

लिखाणाबरोबरच वाचनाचीही आवड होतीच. निवृत्तीनंतर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, पेशवाई, महात्मा गांधी, स्वातंत्र्यलढा या विषयांची अनेक पुस्तके वाचली. अजूनही वाचन चालू आहे. खारघर येथे प्रशस्त शिवमंदिर आहे. संध्याकाळी तेथे नेमाने जातो. मंदिरातले एक मित्रमंडळच तयार झाले. तेथेही विविध विषयांवर गप्पा होतात. एकमेकांच्या अडीअडचणी सांगतो, मन मोकळे करतो. त्यामुळे अडचणीतून मार्ग निघतात. दुपारी अजिबात झोपायचे नाही, असा ठरवून केलेला नित्यनेम कसोशीने पाळतो. दुपारी फिरायला जातो, दुपारचे पारावरचे एक मित्रमंडळ तयार करून टाकले. झाडाखाली, बागेत मोकळ्या हवेत निवांत गप्पा मारतो, नोकरीतले अनुभव एकमेकांना सांगतो.

विशेष म्हणजे रात्री झोप चांगली लागते. कदाचित त्यामुळेच मला उच्च रक्तदाब, मधुमेह यासाठी अजून तरी गोळी घ्यावी लागत नाही. आजही जमिनीवर मांडी घालून जेवायला बसतो. मजेत वेळ जातो. ताणतणाव नाहीसा होतो. मन आनंदी राहते, आनंदी मन ही आरोग्याची गुरुकिल्ली आहे.

डॉ. हिरालाल खैरनार, खारघर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 30, 2018 1:01 am

Web Title: dr hiralal khairnar successful life after retirement
Next Stories
1 समाधानी वृत्ती
2 आयुष्य नित्यनवे भासते
3 आनंददायी सेकंड इनिंग      
Just Now!
X