आता मी वयाच्या ८०च्या टप्प्यावर येऊन पोचले. ६० नंतरची २० वर्षे कशी गेली याचा विचार केल्यावर केवढा प्रवास केल्यासारखे वाटते.

दरम्यान, हृदयविकाराचा झटका, पॅरॅलिसिसचा अ‍ॅटॅक इतकेच नाही तर कर्करोगही होऊन गेला पण मी त्यातून मुक्त झालेय. साठीनंतर मोकळा वेळ मिळाला. कर्नाटकी कशिद्याची पुस्तके दुकानात पाहिली, विकत घेतली. त्यात कशिदा कसा करायचा याची सविस्तर आकृतीसह माहिती होती. मी कर्नाटकी कशिदा करून पाहिला, आवडला. मग खूप कशिदाकाम केले. माझ्या, नातलगांच्या साडय़ांवर करून झाल्यावर खूप ऑर्डर्स पुऱ्या करून दिल्या (५० तरी साडय़ा केल्या.). मग नवीन सोसायटीत राहायला गेल्यावर तिथल्या लायब्ररीच्या मेंबर्सचे वेगवेगळे गट होते. १२ जणींच्या एका वाचक गटात सामील झाले. दर महिन्याला एकेक जण पुस्तके विकत घ्यायची, मग आम्ही सर्व जणी नवे काही वाचले आणि लिहिले असेल तर त्यावर चर्चा करायचो. वाचनाची आवड ही सामायिक आवड त्यामुळे या दिवसाची वाट पाहायची.

पण मग एकदा पूर्वी कधीही न केलेली गोष्ट म्हणजे नोकरी करायची सणक आली. माझे ६५ वय, साहजिकच चटकन मला नोकरी द्यायला कोणी तयार होईनात. पण एका संस्थेत नोकरी मिळाली. बसने मी मजेत जात होते. दोन बस बदलाव्या लागायच्या पण मी मस्त एन्जॉय करत होते. पण नंतर दुसऱ्या एका संस्थेत नोकरी स्वीकारली. ही मूळ संस्थेची शाखा असल्याने मी एकटीच ऑफिस सांभाळत असे. एक निराळा अनुभव मिळाला. त्याचा फायदा मला लेखनाला झाला. कथा लिहीत होते. त्या मासिकातून छापून येऊ लागल्या. कथा स्पर्धेत बक्षिसे मिळू लागली. त्याच्या आधीपासून आम्हा दोघांनाही शब्दकोडी तयार करण्याचा छंद होता मग त्यातून वेगवेगळ्या विषयांवरची कोडी वर्तमानपत्रातून छापून येऊ लागली. प्रत्येक कोडे विशिष्ट विषयाला वाहिलेले म्हणजे इतिहास, साहित्य, विज्ञान, राजकारण, खेळ यावरची कोडी रचण्यात छान वेळ जायचा. मेंदूला खुराक मिळाला.

याच दरम्यान मी इंग्रजीतून बालकथा मराठीत भाषांतरित करायला सुरुवात केली. वर्तमानपत्रात छापून येऊ लागल्या. मग देशोदेशीच्या लोककथा आणि दूरदेशच्या परीकथा यांची पुस्तके प्रसिद्ध झाली. लेखनाचा आनंद किती असतो हे स्वत: अनुभवल्याशिवाय कळणार नाही आयुष्य भरभरून जगत होते.

याच सुमारास वयाच्या ७५व्या वर्षी इंडॉलॉजी (भारतीय विद्या) या विषयात एम.ए. करण्याची संधी मिळाली. टिळक विद्यापीठाच्या २ वर्षांच्या अभ्यासक्रमाला मी प्रवेश घेतला. शनिवार – रविवार कॉलेज असे. हा एक वेगळाच अनुभव होता.

५५ वर्षांच्या गॅपनंतर वर्गात लेक्चर्स ऐकणे, नोट्स घेणे, मधल्या सुट्टीत टपरीवर जाऊन चहा पिणे, सहाध्यायांशी गप्पा मारणे, टिवल्याबावल्या करणे, सेमिस्टरच्या वेळेला जीव तोडून अभ्यास करणे, वर्गात शंका विचारणे, पेपर लिहिणे, असाइन्मेंट्स पूर्ण करणे, ‘क्वेश्चन बँक’  मिळवून सर्वानी मिळून उत्तरे लिहिणे असे कॉलेज लाइफ पुन्हा अनुभवताना खूप धमाल आली. मी वर्गात सीनिअर, तर २० वर्षांची विद्यार्थिनी सर्वात लहान यामुळे तरुण पिढीचे विचार समजून घेणे हेही अनुभवता आले.

तब्येतीच्या काही तक्रारी आहेत पण मी फारशी फिकीर करीत नाही. आता ८० वय आहे म्हणजे शरीर कुरकुर करणारच. पण माझ्या मनाला मी कधीही कुरकुर करू देत नाही. प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले की अडचणींशी सामना करण्याची ताकद आपोआपच येते. शरीराला वार्धक्याने घेरले असले तरी मन अजून उत्साही, तरुण आहे. तरुण पिढीशी मला समरस होता येते.

– मीनाक्षी केतकर, पुणे</strong>

नवा दिवस नवी ऊर्जा

मी   करत असलेल्या खासगी कंपनीतून स्वेच्छा निवृत्ती घेतली आणि त्यानंतर लागलीच मी स्वत:चा व्यवसाय, पॅथॉलॉजी क्लिनिक सुरू केले. माझ्या घराजवळच हे क्लिनिक सुरू केले. खरे तर हे माझे स्वप्न होते आणि ते मी पूर्णत्वाला नेले. हा व्यवसाय मी पंधरा वर्षे केला. छान प्रतिसाद मिळाला. निरनिराळ्या क्षेत्रांतील माणसे संपर्कात आली. माझी एक ओळख निर्माण झाली.

आयुष्य जगताना काही स्वप्ने राहून जातात. पण मी ठरवले होते, उशीर झाला तरी चालेल, पण आपली स्वप्न पूर्ण करायची. वयाच्या ६५व्या वर्षी पुन्हा जुना छंद जडला आणि मी कथा, कविता लिहू लागलो. वृत्तपत्रात प्रतिक्रिया लिहू लागलो आणि लिखाणाला प्रतिसाद मिळू लागला, त्यामुळे स्वाभाविक उत्साह वाढला. आज सत्तरी पार केल्यानंतरसुद्धा तीच ऊर्जा, तोच उत्साह माझ्यात आहे. आजही मी नवी मुंबईच्या साहित्य परिषदांच्या कविता स्पर्धा, वत्कृत्व स्पर्धा, कथाकथन यात भाग घेतो.

खरे तर आयुष्य भरभरून जगताना, प्रत्येक दिवसाचा सूर्य मला ऊर्जा देत गेला आणि ती ऊर्जा मी घेत गेलो. त्याचा उपयोग मी केला. त्यामुळे सत्तरी कधी संपली आणि ७१ व्या पायरीवर कधी आलो ते कळलेसुद्धा नाही. आयुष्याच्या तीनही अवस्थेत मजा असते, एक अनोखा आनंद असतो. तोअनुभवतोय.

वयाच्या ६५ व्या वर्षी मी कॉम्प्युटर शिकलो. एमएस-सीआयटी परीक्षा दिली. चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालो. माझ्या मुलाकडून, सुनेकडून आणखी या तंत्रज्ञानाबद्दल समजून घेतले. आज व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक, ई-मेल या गोष्टी मला हाताळता येतात. आम्ही कॉलेजचा १९६६ चा कट्टा ग्रुप तयार केला. काळाबरोबर चालायची वृत्ती ठेवली पाहिजे. कुणालाही समजावण्यापेक्षा, समजून घेणे महत्वाचे.

आज ७१व्या वर्षी माझ्या मनावर कोणताही ताण नाही, कोणतीही व्याधी नाही, औषध नाही, कोणतीही अपेक्षा नाही. आयुष्य किती असते ते आपणाला माहीत नसते. पण अस्त येईपर्यंत मस्त आणि व्यस्त राहायचे इतकेच मला कळते. ही भावना घेऊन राहिलो तर आयुष्य सुंदर असते, कृतार्थ असते नाही तर नुसताच अस्त असतो.

– सुबोध रा. निगुडकर, बेलापूर

शब्दांना जोडत आहे

निवृत्त होईपर्यंत भरभरून कामे केली.. नोकरीत, संसारात, मित्र-परिवारात, समाजात झोकून कामे केली. दोन मुली उच्चशिक्षित करून स्वत:च्या पायावर उभ्या करण्यासाठी पत्नीनेही खास साथ दिली. चित्रकला आणि साहित्याची आवड असल्यामुळे सर्व बाबतीत भाग घेता आला. आनंदही घेता आला.. सर्वाचीच भरभरून साथ असल्यामुळे निवृत्तीकडे आयुष्याची नवीन आवृत्ती म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन तयार झाला. नोकरीत असताना समाजकार्याची आवड असणारे सहकारी लाभल्यामुळे आणि मनामध्ये समाजासाठी आपणही काही देणे लागतो या भावनेमुळे प्रत्येक क्षण असा जीव ओतून जगत गेलो. निवृत्तीनंतर मात्र कामाचे ८-१० तास आता स्वत:साठी मोकळे झाले होते. वाशी, नवी मुंबईतील दोन साहित्य संस्थांशी समाजकार्याच्या हेतूने जोडला गेलो. आर्थिक बाब योग्य त्या गुंतवणुकीने सांभाळली गेल्यामुळेच आयुष्याच्या या उत्तरार्धात मनाला गुंतवू शकलो.

‘मराठी साहित्य संस्कृती आणि कला मंडळ’ आणि ‘नवी मुंबई साहित्य परिषदे’तर्फे आम्ही प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या आणि चौथ्या शनिवारी एक साहित्यिक कार्यक्रम विनामूल्य करत असतो. कधी वक्ते वा सादर करणारे मानधनाशिवाय येतात ही. पण नागरिकांना, रसिकांना आपण छानसे काही देतोय याचा आनंद मन मोहरून टाकतो. आता असे कार्यक्रम ठरवताना एखादा कवी/साहित्यिक / गजलकार / लेखक वा सामाजिक भान असलेला वक्ता शोधणे, त्यांची भेट घेण्यासाठी पाठपुरावा करून त्यांना कार्यक्रमासाठी आवर्जून आमंत्रित करणे, हे सर्व करताना अगदी घरचे कार्य असल्यासारखे वाटते.

अन् हे सगळे एवढय़ा प्रेमाने घडत असते की या प्रेमात सहकारी ही मिळत जातात. आपली संस्कृती अजून खूप टिकून आहे याचा प्रत्यय रसिकांची दाद अधोरेखित करत असते. आपण शेवटी काय घेऊन जाणार आहोत, यापेक्षाही आहे तो क्षण आपण इतरांना काय देऊ शकतो. आपल्या भेटीचा कोणी स्वीकार नाही केला तरी चालेल पण धिक्कार करता कामा नये. आपल्या भेटीमुळे त्याचा तो क्षण अविस्मरणीय व्हायला हवा या विचारानेच मन भरून येते.. आता लिखाणाकडे वळल्यावर मित्र आश्चर्य व्यक्त करतात. त्यांना मी एवढेच सांगतो..

मित्र जमवायचे भरपूर प्रयत्न केले.. नाही जमले.. आता मी शब्दांना जोडत असतो..

पण खरे सांगू! शब्द हे मित्र जोडण्यासाठीच हवेत.. नि:शब्द राहाल तर आयुष्य भरभरून जगला हे सांगाल कसे?

– दिलीप जांभळे, नवीमुंबई

नवे शिकण्याच्या ध्यासातून आनंद

आयुष्य भरभरून जगताना त्याचा आस्वाद घेत गोडी चाखली तर ते मधुरमय बनते. आता सत्तरी जवळ आली. पाऊस, रानफुले, हिरवाई, आकाशीच्या छटा, निसर्ग यांचा आनंद आजही घ्यायला आवडते.

थोडा सामाजिक सहभाग म्हणजे दर वर्षी रिमांड होमला जाऊन खाऊ वाटणे, नाश्त्यासाठी पैसे देणे, वसतिगृहातल्या विद्यार्थ्यांना पुरणपोळीचे जेवण, एखाद्या गरीब विद्यार्थ्यांची फी भरणे, कामवाल्या बाईच्या मुलांना तीन-चार वर्षे मोफत शिकवणे, अनाथाश्रम आणि आदिवासी पाडय़ाकरिता मैत्रिणींच्या सहकार्यातून साडय़ा जमवणे आदी छोटी कामे करताना समाधान हाती गवसते.

निरनिराळ्या वृत्तपत्रातून आतापर्यंत ४५ लेख प्रकाशित झालेत. माझ्या कविता मला आनंदाचे देणे देतात. त्यातून नवनवीन शब्दशोध कल्पना चालू असतात. ५८ ते ६१ या वयात क्लासिकल संगीताच्या परीक्षा देत असताना कॉलेजवर जाऊन पेपर (थिअरी) लिहिताना पुन्हा वय लहान होऊन गेले. आम्हा मैत्रिणींचा बुक – क्लब आहे. त्यातून चर्चा, प्रश्नोत्तरे असा प्रवास घडतो.

– कुमुद कदरकर, सातारा

सतत कार्यरत

सांगली इथल्या राणी सरस्वती देवी कन्याशाळेतून मे २०१३ मध्ये मुख्याध्यापिका पदावरून निवृत्त झाले. त्या आधीपासूनच डोक्यात भावी आयुष्याबद्दलचे नियोजन पक्के केले होते. मला वाचन आणि पर्यटन याची आवड आणि सामाजिक कार्याची ओढ आहे. या सर्वाचा मेळ घालायचा आणि निरामय जीवन जगायचे हे दोन उद्देश समोर ठेवले.

रोज सकाळी पंचेचाळीस मिनिटे चालण्याचा व्यायाम, घरी येऊन तीस मिनिटे योगासने आणि प्राणायाम; तसेच मर्यादित आहार याद्वारे तब्येत सांभाळते आहे. वयाच्या एकसष्टाव्या वर्षी ट्रेनरकडून ‘आंबराई स्विमिंग टँक’ मध्ये रोज एक तास या प्रमाणे वीस तासांत पोहायला शिकले. काठावरून टँकमध्ये उडय़ा मारायला लागले तेव्हा झालेला आनंद अवर्णनीय होता. यामुळे व्यायामातील विविधताही वाढली आहे.

‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान’तर्फे ‘ग्रंथ येता घरा’ या योजनेत आम्ही कुटुंबीय सहभागी आहोत. आमच्याकडे बत्तीस सभासदांची पुस्तक-देवघेव सुरू असते. या देवघेवीत पुस्तकांवर चर्चा आणि विचारांचे आदान-प्रदान होत असते. खुद्द हरिपूरमध्ये ‘रोटरी समाजदल’तर्फे ग्रामपंचायतीचे वाचनालय आम्ही चालवायला घेतले आहे. त्याचे कामही आम्ही तीन-चार सदस्या प्रामुख्याने पहातो. जिल्हा परिषदेच्या तसेच खासगी शाळांतून प्रकल्प, स्पर्धा आणि व्याख्यानांद्वारे वाचनसंस्कृती रुजवण्याचा माझ्या परीने प्रयत्न करते. सांगलीच्याही काही शाळांमधून आणि शिबिरात मी व्यक्तिमत्त्व विकास, वाचनसंस्कृती इत्यादी विषयांवर व्याख्यानाद्वारे मार्गदर्शन करते. या सर्वातून माझाही अभ्यास होत राहतो आणि दर्जेदार पुस्तकांची मेजवानी मिळते. ‘इंग्लिश’ हा माझा अध्यापनाचा विषय. अठ्ठावीस वर्षे या विषयाच्या सुलभीकरणासाठी केलेले निरनिराळे प्रयोग आणि त्यातून आलेली फलिते या सर्वाचा उपयोग मी हरिपूरमधील ‘जिल्हा परिषद क्र. २’ या शाळेत करण्याचे ठरवले. एक वर्ष ‘इंग्लिश स्पीकिंग’चा वर्ग घेतला. ‘इंग्लिश ग्रामर आणि काँपोझिशन’चा एक अभ्यासक्रमही मी तयार केला आहे. काही विद्यार्थी त्याचा लाभ घेतात. हे अध्यापन मोफत आहे. ‘पर्यावरण आणि उत्सव’ हे सूत्र ठेवून डी. जे. विरुद्ध प्रसार, विद्यार्थ्यांच्यात गटचर्चाचे नियोजन, सर्व उत्सव – मंडळांना लेखी निवेदने, व्याख्याने असे अनेक उपक्रम माझ्या सहकाऱ्यांच्या साहाय्याने घेत आहे. ‘व्यक्तिमत्त्व-विकास’ आणि वाचन संस्कृती यावर काही शाळांमधून आणि शिबिरांमधून आमंत्रणानुसार जाते. विद्यार्थ्यांच्या उत्तम आरोग्याच्या दृष्टीने नेत्रशिबीर, दंतशिबीर असे कार्यक्रम तज्ञांच्या मार्गदर्शनानुसार सुरू आहेत. रोटरी क्लबच्या ‘लीडरशिप फोरम’मध्ये माझ्या अहवाल वाचनानंतर आमच्या समाजदलाचे खूप कौतुक झाले. तसेच या वर्षी ‘पर्सन ऑफ द इयर’ हा बहुमान मला प्राप्त झाला.

– आरती लिमये, सांगली</strong>

सदर समाप्त