खरे तर मी एक सामान्य गृहिणी. आजमितीला वय ८२ चालू आहे. १९५८ला ग्रॅज्युएट झाले आणि त्याच वर्षी माझा विवाहही झाला. माझा प्रेमविवाह. आम्ही दोघे लहानपणापासूनचे सख्खे शेजारी. आवक मर्यादित, गरजा मर्यादित, संसारात अडचणी आल्या अन् गेल्या. ज्याची कधी वादळे झाली नाहीत. मुले, समजूतदार. अशी ४९ वर्षे अक्षरश: ४९ दिवसांसारखी गेली. जावई- सून- नातवंडे सर्व मनासारखे. पण अचानक नियतीने मोठा धक्का दिला. जोडीदार हृदयविकाराने निघून गेला.

चार आठवडय़ांपूर्वीच मुलगा परदेशी नोकरीसाठी गेलेला होता. मुलगी सासरी. पण सर्व सुहृद जवळ होते. पण मनाने मी एकटीच होते. बधिर झालेल्या मन:स्थितीमध्ये काही निर्णय घेतले आणि आर्थिकदृष्टय़ाही स्वतंत्र झाले. एकटीने राहायची सवय नव्हती. पण मग स्वत:ला सावरत गेले. कोथरुडच्या घरी गेले. तिथे एका छान व्यक्तिमत्त्वाची ओळख झाली, ‘लोकसत्ता’चे भूतपूर्व संपादक ह. रा. महाजनी यांची कन्या आणि प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी यांची थोरली बहीण,  कमलिनी फडके, त्यांचेच वाचनालय होते. नाव ‘किताबघर’. असंख्य पुस्तके होती. आम्ही दोघी छान मैत्रिणी झालो. वाचनाबरोबर, लेखन-चर्चा, नावाजलेल्या लोकांना वर्धापनदिनी बोलावणे हे होतेच. शिवाय वाचलेल्या पुस्तकावर स्वत:चे मत मांडणे. यामुळे लेखनालासुद्धा वाव मिळाला. निबंध स्पर्धा घेतल्या जात. त्यात मला बक्षीसही मिळाले. साधारण चार वर्षे अशी छान गेली. पण मग थोडय़ा प्रकृतीच्या तक्रारी सुरू झाल्या. त्यामुळे कोथरुड सोडून निगडीला येण्याचे ठरवले. कारण तिथेच मुलीचे वास्तव्य. जावई सर्जन – घरचे हॉस्पिटल, सर्व सुविधा. पुन्हा स्थलांतर. पण इथे मुलगी – जावई आणि व्याहीसुद्धा खूपच ‘सोशल’ असल्यामुळे मला सगळ्या गोष्टींमध्ये चटकन सामावून घेतले. मुलीने (अनघा रत्नपारखी) चालू केलेला बुकक्लब होताच. माझा सगळीकडे प्रवेश झाला. तिथल्या ग्रुपमध्ये खूप मैत्रिणी मिळाल्या. एक वेगळी दिशा मिळाली. अनाथाश्रम, मतिमंद मुलांच्या संस्था, वृद्धाश्रम, दिव्यांग मुले, एचआयव्हीबाधित मुले अशा खूप संस्थांना भेटी दिल्या आणि जमेल तेवढी आर्थिक मदतही केली. करीतही आहे. एका अंध जोडप्याच्या दोन मुलांना शिक्षणासाठी हातभार लावीत आहे. भले हा खारीचा वाटा आहे पण आनंद आणि समाधान देऊन जातो.

Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
chaturang article, maintain relationship, good relations, avoid assuming, assuming in relationship, assume, stay away from toxic people, spreading bad thoughts in relationship, husband wife
जिंकावे नि जगावेही : नात्यांमधला नीरक्षीरविवेक!
Ram Navami 2024 Shubh Yog
२०२४ च्या रामनवमीला अत्यंत शुभ योग जुळून आल्याने ‘या’ राशी होणार श्रीमंत? ‘या’ रूपात दिसू शकते श्रीरामकृपा
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र

बुकक्लबसुद्धा खूप छान आहे. सर्व वयाच्या, सुशिक्षित, डॉक्टर, प्रोफेसर आदींचा. मी त्यांच्यामध्ये खूप मोठी असूनही मला छान सामावून घेतले. त्यांच्या चर्चामुळे माझ्या ज्ञानात भरच पडत गेली. मानसिक समाधान खूप मिळते. ‘सीनिअर लेडीज क्लब’मध्ये सुद्धा खूप उच्चशिक्षित स्त्रिया आहेत. लेखनही करतात. नाटके बसवतात. सहली काढतात. चांगले वाचण्यात आले की सुसंवाद चर्चा वगैरे होते. महिन्यातून एका बैठकीत वेगवेगळे खेळ पण खेळतो. या ११ वर्षांत प्रवासही खूप केला. देश-परदेश खूप हिंडून झाले. कधी एकटीने तर कधी सुहृदांबरोबर. माझी मुले, जावई, भाऊ-भावजया मला घेतल्याशिवाय ट्रीप करतच नाहीत.

अनघाने माझ्या आणखी एका छंदाला चालना दिली. मला भरतकाम करण्याची खूप आवड. मध्यंतरी ते मागे पडले. मग तिने स्वत:चे ड्रेसेस काम करण्यासाठी दिले. ती शाळेत नोकरीला असल्यामुळे तिच्या मैत्रिणींनी बघितले. त्यांना आवडले. मला खूपच काम मिळू लागले. मोबदलाही मिळू लागला. वेळ छानच जाऊ लागला. पुढे मी चार-पाच कष्टकरी बायकांना (४५/६० वयोगट) ‘‘अ-आ-इ- ई’’पासून शिकवू लागले. त्याही उत्साहाने कामे संपल्यावर येतात. शिकवत राहा, असे सांगतात. त्यांना पेपर वाचायला आला पाहिजे ही त्यांची इच्छा आहे. मी ते त्यांना समाधान देणार आहे.

मी एकटी राहते. स्वत:ची सर्व कामे – आर्थिक व्यवहारसुद्धा माझे मीच करते. त्यामुळे ११ वर्षे कशी गेली हे कळलेच नाही. अर्थात या वाटचालीत माझे सर्व सुहृद – दोन्ही मुले, सून, जावई, मोठी बहीण, भाऊ-भावजया यांचा सर्वाचा खूप मोठा आधार आहे. त्यांचा जिव्हाळा, आपुलकी आणि केव्हाही मदतीला धावून येणे यामुळे हा नवा मांडलेला डाव जरी एकपात्री असला तरी खूप आनंदाचा आहे. आजचा दिवस आपला – उद्याची चिंता कशाला कारण वय त्यापलीकडे गेलेले आहे. म्हणून

‘या जगण्यावर – या जन्मावर शतदा प्रेम करावे..’

– विमल सुहास जोशी

मनसोक्त जगणे

शनिवारचा गावातील आठवडा बाजार होता. गर्दी पुष्कळ होती. त्यात वाहनांची वर्दळ भयंकर होती. ज्याला हवे त्या मार्गाने जो तो आपले वाहन पुढे नेत होता. इतक्यात माझे चुलतमामा ज्यांचे वय ‘फक्त’

८८ वर्षे आहे ते त्यांची मोटारसायकल जोराने चालवत आम्ही उभे होतो त्या ठिकाणी जास्त वेगाने घेऊन आले आणि करकचून ब्रेक लावला. आम्ही अवाक् होऊन त्यांच्याकडे पाहातच राहिलो. एवढी ऊर्जा त्यांच्याकडे आली कुठून? माझे वय ७६ वर्षे आहे. मी पण मोठी गाडी चालवितो पण त्यांच्या वयाएवढे असू तेव्हा आपण ही गाडी चालवू शकू का, असा प्रश्न पडलाच.

मी सरकारी नोकरीतून १९९२ मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतली. शेती बागायत असल्याने नोकरीतून वेळ मिळत नव्हता म्हणून निवृत्ती पत्करली. तेव्हापासून आजतागायत सेवानिवृत्ती कर्मचारी संघटनेचे काम करीत आहे. सुरुवातीला अगदीच बोटावर मोजण्याएवढे सभासद झाले. परंतु आजमितीस डहाणू तालुक्यातून हजारो सभासद संघटनेत सामील झाले आहेत. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी सोडवणे, पेन्शन वेळेवर मिळवून देणे, सरकारच्या अनेक निर्णयांचे फायदे त्यांच्यापर्यंत पोहोचविणे वगैरे कामे आमची संघटना करते. वार्षिक स्नेहसंमेलने भरवणे आणि त्यायोगे अहवाल छापून निरनिराळ्या कथा, कविता, लेख, माहितीचे नियतकालिक प्रसिद्ध करणे हे दरवर्षी आम्ही करीत असतो. वर्षांतून एक-दोन वेळा ज्यांना शक्य असेल त्यांच्यासह पर्यटनस्थळांना भेट देत असतो. तसेच परदेशवाऱ्या पण केल्या आहेत. हे सर्व सेवानिवृत्त झाल्यानंतरच पूर्ण केलेले आहे. माझी पत्नीसुद्धा सेवानिवृत्त शिक्षिका आहे. आम्ही दोघेही समाजकार्यात कार्यरत आहोत.

या सर्व उपक्रमांबरोबरच मी अजूनही शेतीवाडी कामांत प्रत्यक्ष मजुरासह काम करतो. ही कामे करताना अजिबात कंटाळा येत नाही. उलट या कामामुळे मन प्रसन्न होते. शरीराला जास्त ऊर्जा मिळते आणि समाधान मिळते. दिवस भरकन निघून जातो. फावल्या वेळी बाकी इतर उद्योग होतच असतात.

याचबरोबर मला सर्वाना एकत्र आणून एकमेकांना भेटवण्याचा आणि त्याद्वारे त्यांचे विचार शेअर करण्याचा मोठा छंद आहे. असाच २०१५ला मी पाटील कुटुंबाचा मोठा मेळावा जमवून आणला. भारतात आणि परदेशात जिथे तिथे आमच्या पाटील कुटुंबाची माणसे असतील त्या सर्वाना एके ठिकाणी जमविली. बोर्डी येथे ८ मार्च २०१५ रोजी स्नेहसंमेलन झाले. सुमारे ४०० जण या मेळाव्यात हजर होते. दिवसभर चर्चा आणि करमणूक कार्यक्रम झाले. त्यानिमित्ताने पाटील कुटुंबाची वंशावळ तयार केली. सुमारे ७००-८०० वर्षांपासूनचा इतिहास नावानिशी लिहून काढला आणि तो पुस्तकाद्वारे प्रकाशित केला. ज्याचा उपयोग आता अनेक जण जात पडताळणी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी घेऊ लागले आहेत. अनेकांनी प्रत्यक्षात भेटून आणि फोन करून माझे अभिनंदन केले आहे.

मला एक दुसरा छंद आहे तो म्हणजे लेखनाचा. मी आजपर्यंत दोन पुस्तके प्रकाशित केलेली आहेत. आणि तिसरे पुस्तक प्रकाशनाच्या मार्गावर आहे. मी अनेक वृत्तपत्रांत किंवा मासिकात नंदू पाटील या टोपणनावाने लेख-पत्रे-कविता प्रसिद्ध केलेल्या आहेत. दिवसाकाठी काहीतरी वाचावे, लिहावे ही माझी कायमच दिनचर्या ठरलेली आहे. १०० वर्षे जगलात म्हणजे खूप जगलात असे आपण म्हणतो. पण ते कसे जगलात याला महत्त्व आहे. नेहमी प्रसन्न मुद्रा, कुणाशी भांडणे नाही, कसलीही तक्रार नाही आणि वेळच्या वेळी खाणे- पिणे- फिरणे आणि शरीराची काळजी घेणे हे सूत्र अवलंबले तर निश्चित आपण आपले आयुष्य मनसोक्त जगलो असे म्हणता येईल. आणि हे सर्व ‘भरभरून जगताना’ मला खूप आनंद वाटतोय. आपणही असे जगा आणि या जीवनाचे सार्थक करा.

– अनंत आत्माराम पाटील (बोर्डी, ता. डहाणू, जि. पालघर)

आयुष्य सार्थकी लागले

अमेरिकेमधून माझ्या मुलीकडे राहून २० जुलै २००६ला मी मुंबई विमानतळावर उतरले. माझ्या आयुष्यात या दिवसाचे काही वेगळेच महत्त्व आहे. याच दिवशी दादरस्थित १२५ वर्षे पुरातन अशा श्रीराम मंदिराची जबाबदारी माझ्या अंगावर आली. ३१ जुलै २००३ रोजी मी माझ्या ३७ वर्षांच्या यशस्वी वैज्ञानिक कारकीर्दीमधून निवृत्त झाले. या माझ्या दीर्घ कारकीर्दीत माझ्या वयाच्या ५०व्या वर्षी कॉटन सीड प्रोटिन या विषयात मिळवलेली डॉक्टरेट पदवी, तीन विषयांतील पेटंट आणि ५० पेपर्स हे विविध टप्पे आहेत.

निवृत्तीनंतर काय करायचे याचा विचार फारसा केलाच नव्हता. रोज विश्रांती घ्यायची, उशिरा उठायचे आणि ३० वर्षांचा मधुमेह असल्यामुळे प्रकृतीची काळजी घ्यायची एवढेच ठरवले होते. थोडा काळ गेल्यावर आध्यात्मिक वर्ग चालू केला. रामदास स्वामींच्या दासबोधात मी चांगली रमले असतानाच श्रीराम मंदिराची कार्यकारी विश्वस्त म्हणून जबाबदारी अंगावर पडली.

सुरुवातीला यातील कामाचा आवाका लक्षात आला नाही. परंतु जसजसे दिवस गेले तसतसे लक्षात यायला लागले की, देवळाच्या संदर्भात आमच्याकडे काहीच कागदपत्रे नव्हती. जसे, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, प्रॉपर्टी कार्ड, पॅन कार्ड. हे सर्व जमवले.. यासाठी हेलपाटे मात्र खूप घालावे लागले. दोन-दोन महिन्यांनंतर दानपेटी उघडून पैसे काढणे, त्याचा हिशोब ठेवणे, मीटिंग घेणे आणि त्याचा अहवाल लिहिणे याही गोष्टी अंगीकारल्या.

‘मंदिर’ हे संस्कार आणि सांस्कृतिक देवाण-घेवाण करण्याचे केंद्र व्हावे’ असे एका ज्येष्ठ शिक्षिकेने नजरेत आणून दिले. यालाच अनुसरून मंदिरात विविध कार्यक्रम आयोजित करायला सुरुवात केली. शालेय मुलांसाठी शिबीर, निबंध स्पर्धा, स्त्रियांसाठी सांस्कृतिक खेळ.. सर्व वयोगटांतील व्यक्तींसाठी निबंध स्पर्धा. त्याचबरोबरच भजन, कीर्तन, हळदीकुंकू समारंभ चालू होतेच. या कार्यक्रमांना

खूप छान प्रतिसाद मिळू लागला आणि भाविकांना राम मंदिराची नव्याने ओळख होऊ लागली. इतर कार्यक्रमांबरोबरच रामनवमी आणि नवरात्रोत्सव या सणांचे कार्यक्रमही गाजू लागले.

हे सगळे सुरळीत चालू असतानाच या १२५ वर्षे पुरातन मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा विचार मनात येऊ लागला.

आव्हान खूप मोठे होते, पण ते पेलायची जिद्दही होती. पैशाचे सोंग आणता येत नाही, या उक्तीनुसार आधी गंगाजळी वाढवण्याकडे लक्ष दिले. एक आवाहन पत्र तयार केले आणि ते रोज सर्वाना द्यायला सुरुवात केली. याच बरोबरीने वास्तुविशारदाचा शोधही सुरू ठेवला. जीर्णोद्धाराच्या वाटेत लागणाऱ्या सर्व गोष्टी जमवत गेले.

ही जबाबदारी स्वत:वर घेतली खरी परंतु त्यात किती अडचणी, आव्हाने आहेत याची हळूहळू कल्पना यायला लागली. माझ्या आयुष्यातले हे संपूर्ण नवीन क्षेत्र होते. मुंबई महानगरपालिकेतून नूतनीकरणासाठी परवानगी मिळवणे, नूतनीकरणासाठी वृत्तपत्रात जाहिरात देणे, निविदा तपासून निश्चित करणे. एकदा योग्य कंत्राटदाराला काम दिल्यावर कामावर देखरेख ठेवणे, मजुरांची राहण्या-जेवणाची व्यवस्था करणे, अबूहून अर्ध्यावर तयार झालेले अवजड सामान क्रेन वगैरेच्या साहाय्याने उतरवून घेणे (मंदिर गर्दीच्या भागात असल्याने हे काम रात्री १२ ते पहाटे ५ याच वेळेत करावे लागत होते.), जुन्या अवजड मूर्तीचे चैतन्य काढणे आणि त्यांचे विसर्जन करणे, त्यासाठी बोट असलेल्या कोळ्याला शोधून त्याच्याकरवी काम करवून घेणे, या सर्व कामांचा समावेश होता.

ऑगस्ट २०१३ रोजी मूर्तीचे चैतन्य काढण्याच्या विधीने प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली. देवळातील सर्व मार्बलचे कोरीव काम अहमदाबादजवळील अबू येथे झाले. जसे कोरीव काम होत गेले तसतसे, हे सर्व साहित्य भवानी शंकर रोडवरील राममंदिरात येऊ लागले. साहित्य आल्यावर ते बसवण्याचे काम मंदिरात सुरू झाले. अखेर दीड वर्षांच्या अथक प्रयत्नाने दादरमध्ये एक सुंदर- कलात्मक मंदिर उभे राहिले. १४ ऑगस्ट २०१४ रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळा पूर्ण केला. सर्वाना काही चांगले देऊ शकले, याचा आनंद वाटला.

या सर्वामध्ये माझी निवृत्तीनंतरची १२ वर्षे कशी गेली ते कळलेच नाही. एक कालातीत वास्तू उभारल्याचे समाधान आहे; खूप जणांना आनंद देण्याच् समाधान आहे. भरभरून जगण्याबरोबरच आयुष्य सार्थकी लागण्याचे समाधान आज मी ७४व्या वर्षी अनुभवते आहे.

– शैला भाटवडेकर, दादर