05 August 2020

News Flash

शंभराव्या वर्षांत पदार्पण करताना

एक-दोन सॉलिसिटर्सच्या कंपनीत आणि नंतर तीन शासकीय कार्यालयात मला नोकऱ्या करण्याची संधी मिळाली.

मला कधी स्वप्नातही वाटले नव्हते की, मी माझ्या वयाची शंभरी पूर्ण करीन. पण हे घडले आणि मला, माझ्या कुटुंबीयांना फार आनंद झाला. ही बातमी सर्वत्र समजली. माझे अभिनंदन करणारे बरेचसे फोन मला आले. काही नातेवाईकांनी घरी प्रत्यक्ष येऊन माझे अभिनंदन केले. पण ही बातमी लगेच पसरली कशी आणि माझी जन्मतारीख त्यांना कशी माहीत झाली हे मला अजूनही कोडेच आहे. परंतु ज्या अर्थी अनेक जणांनी माझे उत्स्फूर्त अभिनंदन केले त्यामुळे मलाही या शंभर वर्षांच्या माझ्या जीवनक्रमाचा आढावा देणे क्रमप्राप्त आहे आणि ते माझे कर्तव्य आहे असे वाटते.

माझ्या वडिलांची आर्थिक स्थिती बेताची असल्यामुळे मॅट्रिक झाल्यानंतर पुढील शिक्षण घेता न आल्यामुळे इंग्रजी शीघ्रलिपी आणि टंकलेखन या कलांचा कोर्स केला. शीघ्रलिपी ही कला मला इतकी आवडली की ती माझी जीवनकलाच ठरली. या कलेच्या साहाय्याने वयाच्या वीस-एकवीस वर्षांचा असताना मी नोकरी करण्यास सुरुवात केली. एक-दोन सॉलिसिटर्सच्या कंपनीत आणि नंतर तीन शासकीय कार्यालयात मला नोकऱ्या करण्याची संधी मिळाली.

१९४० मध्ये मुंबईच्या उच्च न्यायालयात न्यायाधीशांचे स्टेनोग्राफर, १९४५ मध्ये मुंबईच्या मंत्रालयामध्ये आय.सी.एस. अधिकाऱ्यांचे स्टेनोग्राफर आणि १९४९ पासून ते निवृत्त होईपर्यंत, म्हणजे १९७७ पर्यंत जवळजवळ २७ वर्षे विधानमंडळ सचिवालयामध्ये रिपोर्टर या नात्याने काम केले. मंत्रालयात आय.सी.एस. अधिकारी फडर्य़ा इंग्रजीत डिक्टेशन कसे देतात आणि ते शीघ्रलिपीत टिपून घेताना कसा आनंद मिळतो याचा अनुभव घेतला. विधानसभेत तर पंचवीस वर्षांच्या प्रदीर्घ नोकरीच्या काळात विविध प्रकारची इतकी कार्ये हाताळण्यास मिळाली की माझ्या बुद्धीचा दिवसेंदिवस विकास होत गेला. मान्यवर आमदार आणि मंत्री यांची शब्दश: भाषणे घेणे, विधानसभेच्या ज्या काही दहा-बारा समित्या होत्या त्यांचे शब्दश: आणि काही समित्यांचे संक्षिप्त अहवाल घेणे म्हणजे बुद्धीची कसरतच. सेशन नसतासुद्धा आमच्या विधानसभेत इतर कार्ये भरपूर असायची. भाषणांचे संपादन करणे, ती छापखान्यात देणे. मुद्रित तपासणे संसदेमधल्या काही चौकशी समित्या मुंबईस आल्यावर त्यांचे अहवाल टिपून घेणे आणि असल्या जबाबदारीची कामे यशस्वीपणे करताना मला फार आनंद व्हायचा. या तीन महत्त्वाच्या शासकीय कार्यालयांत तब्बल सदतीस वर्षे काम करून निवृत्त झालो.

पण सतत काम करण्याची सवय असल्यामुळे, निवृत्तीनंतरही मला स्वस्थ बसणे जमत नव्हते. म्हणून मी समाजकार्य करण्याचे ठरवले. आमच्या समाजाची एक समिती होती. काही काळ चांगले कार्य केल्यानंतर, ती बरीच वर्षे सुप्तावस्थेत होती. तिला चालना देऊन ती पूर्ववत कार्यरत व्हावी यासाठी आमच्या समाजातील एका बांधवाने नवी समिती स्थापून त्या समितीचे मला अध्यक्ष केले. पहिली पाच वर्षे अनेक वर्षे त्या समितीची विस्कटलेली घडी नीट केली. त्या समितीची एक जुनी इमारत होती. तिचे जुने भाडे होते ते तुटपुंजे होते. समितीचा खर्च जास्त आणि उत्पन्न कमी, तेव्हा ती नेहमी तोटय़ातच असे. हे लक्षात आल्यावर मी धर्मादाय आयुक्तांना भेटून, ती जुनी इमारत पाडून विकसित करण्याची परवानगी मिळविली. लवकरच नवी इमारत बांधून झाली. समाजासाठी एक प्रशस्त हॉलही बांधला आणि मग मी वयाच्या नव्वदाव्या वर्षी त्या संस्थेतून निवृत्त झालो.

समाजाचे कार्य करीत असतानाच, मी ज्या सहकारी गृहनिर्माण संस्थेत राहतो तिच्या व्यवस्थापकीय समितीवरही काही वर्षे सचिव, कार्य सचिव या पदांवर काम करीत होतो. अशा रीतीने वयाची शंभरी गाठली. तरी माझी कार्यमग्नता मला स्वस्थ बसू देत नाही. कारण वर्तमानपत्रात कधी कधी काही विषयांवर निबंध स्पर्धा आयोजित केल्या जातात, त्या निबंध स्पर्धेतही मी मधून मधून भाग घेत असतो. अशा तऱ्हेने जिवात जीव असेपर्यंत मी कार्यमग्न राहणार अशी परमेश्वराची इच्छा दिसते.

– द. के. दिघे, मुंबई

आशावादावर जिंकत गेलो!

माझं सगळं जीवन बहुरंगी होईल, असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. मी ज्या वेळी बारावी झालो त्या वेळी महाराष्ट्र, गोवा आणि गुजरात यांना मिळून फक्त चार अभियांत्रिकी महाविद्यालये होती.

गुण कमी मिळाल्यामुळे बी.ई. सोडाच प्रसिद्ध सी.ओ.ई.पी. (पुणे)मध्ये एस.एस.सी.नंतरच्या डिप्लोमालासुद्धा मुश्किलीने प्रवेश मिळाला.

पुढे जिद्द कायम टिकवून चिकाटीने खूप उशिरा बी.ई., एम.ई. दोन्ही प्रथम श्रेणीत पास होऊन त्याच सी.ओ.ई.पी.तून प्राध्यापक म्हणून निवृत्त झालो.

प्रथम बांधकाम खात्यात, नंतर शिक्षण खात्यात, मग अमेरिकेत नोकऱ्या केल्या. अपयशाशी मैत्री केल्यामुळे जरी नैराश्य येत होते तरी चिकाटी आणि धडपड कायम ठेवून सुप्त कलांना पृष्ठभागावर आणले. निवृत्तीआधीच निरनिराळे छंद जोपासले होते. स्वत: कलमे करून कलमी गुलाबांची बाग केली. मुंबई आकाशवाणीवर बासरीवादनाचे दीडशे कार्यक्रम केले. वर्तमानपत्रात पत्रे छापून आलेली होती. निरनिराळ्या मासिकांनी दोनेकशे कथा प्रसिद्ध केल्या होत्या. चांगल्या प्रकाशकांनी ललित साहित्यावरची वीस पुस्तके प्रसिद्ध केलेली होती. आता उर्वरित आयुष्य शांतपणे आपल्या छंदात रमवावं म्हणून गावी आलो, तर एक नवे संकट उभे ठाकले होते. घरामागच्या मैदानात ओपन एअर थिएटरचे २८ ध्वनिक्षेपक कानठळ्या बसवत होते. भित्र्या रहिवाशांची एकजूट करून उच्च न्यायालयात दावा लावून अडीच वर्षांनी हरलो, पुन्हा जिंकून सभागृह बंदिस्त केले. मागचा छळ संपल्यावर गांडूळ खते तयार करून वेगळ्या पद्धतीने बगिचा केला. लिखाण सुरू केले. आजवर १०० पुस्तके प्रकाशित झाली. निवृत्तीनंतर घरातले वागणे पूर्ण बदलले. आयतेपणा सोडून देऊन स्वत:ची कामे स्वत: करू लागलो. मुलांच्या कुठल्याही व्यवहारात लक्ष घालत नाही. ‘ताट द्यावे पाट देऊ नये’ हे तत्त्व न पाळता अर्धा पाट केव्हाच देऊन टाकला आहे. मुले नातवंडे खेळीमेळीने राहतो. कॉम्प्युटर हा हातचा मळ झालाय, तब्येत उत्तम आहे. आणखी काय हवं?

– यशवंत भागवत, सहकारनगर, पुणे

मोडीच्या प्रसारासाठी

नोकरी-व्यवसायातून निवृत्त होणे म्हणजे आयुष्यातून निवृत्त होणे नाही. आयुष्यात दु:ख आणि वेदना विसरायच्या असतील तर निवृत्तीनंतरही सतत कार्यरत राहायला हवे. वय हे वाढतच राहणार. कारण ते थोडेच आपल्या हातात आहे, पण या वाढत्या वयाचे काय करायचे ते मात्र आपल्या हातात आहे, खरे तर सामाजिक बांधिलकी जपली तर त्यातच मानसिक समाधान आहे. आयुष्य भरभरून जगायचे असेल तर वेळेचे नियोजन आणि कामाचे नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तक्रारीचा सूर न लावता धमाल करीत आपले आयुष्य अधिकाधिक सकस पद्धतीने जगता यावे यासाठी मी माझ्या आयुष्याबद्दलच्या संकल्पना सेवानिवृत्त होतानाच स्पष्ट केल्या होत्या.

२००१ मध्ये मुंबई महानगरपालिकेतून सेवानिवृत्त झाल्याबरोबर नेमके काय करायचे हे आधीपासूनच ठरवले होते. गेल्या अर्धशतकाहून अधिक काळ मध्य मुंबईतील विद्यार्थ्यांच्या सर्वागीण उन्नतीसाठी कार्यरत असणाऱ्या ‘विद्यार्थी उत्कर्ष मंडळ’ या संस्थेत गेली अठ्ठावन्न वर्षे सतत कार्यरत असल्यामुळे याच संस्थेची बांधिलकी समजून येथेच नामशेष होत गेलेल्या आणि इतिहासजमा झालेल्या मोडी लिपीबाबत जनजागृती व्हायला हवी यासाठी स्वत: मोडी लिपीचे प्रशिक्षण आणि अध्यापन केले. २३ फेब्रुवारी २०१४ रोजी संस्थेच्या हीरकमहोत्सवी वर्षांचे औचित्य साधून मोडी लिपी प्रशिक्षण केंद्राची स्थापना केली.

चिंचपोकळी स्टेशननजीक संस्थेच्या उत्कर्ष केंद्रात प्राथमिक आणि प्रगत मोडी लिपीचे वर्ग सुरू केले. प्रशिक्षणार्थीना मोडी लिपी प्रशिक्षित करून प्रमाणपत्र देण्यात येते.

मोडी लिपी शिकवणे ही सामाजिक सेवा समजून विनामोबदला मोडी लिपीचे वर्ग घेत आहे. माझे गुरू सूर्यकांत पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोडी लिपीचे प्रशिक्षण पूर्ण करून त्यांच्याच मार्गदर्शनाने हा मोडी लिपीचा उपक्रम सुरू केला.

मोडी लिपी प्रशिक्षणाबरोबर मोडी लिपीचा प्रचार, प्रसार, प्रसिद्धी यासाठी चळवळ उभी करून मुंबईत आणि मुंबईबाहेर एकदिवसीय मोडी लिपी कार्यशाळेचे आयोजनही विनामोबदला करण्यात येते. प्रशिक्षणार्थीच्या ऐतिहासिक अभ्यास सहलीचे प्रतिवर्षी आयोजन करण्यात येते. याशिवाय मोडी देवनागरी लिपीतील हस्तलिखितांचे प्रकाशन, मोडी-देवनागरी आरती संग्रह,  मोडी देवनागरीत ‘विवेकानंदांची बोधवचने’ या पुस्तकांचे प्रकाशन नुकतेच पार पडले.

ही लिपी शिकण्याचे आणखी एक उद्दिष्ट म्हणजे सेवानिवृत्त लोकांना असे दस्तऐवज वाचून चार पैसे मिळतील. यासाठी मोडी लिपीचा प्रसार करण्यासाठी माझा आटोकाट प्रयत्न आहे. तसा यापुढेही सुरू होणार आहे. उर्वरित आयुष्य हे मोडी लिपीच्या प्रसारासाठी वाहून घेतल्याचा मी निश्चय केला आहे. पंचाहत्तर वर्षांत पदार्पण केले असून शारीरिक, मानसिक स्वास्थ्य उत्तम आहे. माझ्या या अभिनव छंदामुळे आणि उपक्रमामुळे मी आनंदी जीवन जगत आहे. आणि यात मी समाधानी आहे.

चेंबूर येथील प्रभातकुंज मित्रमंडळ ज्येष्ठ नागरिक संघ आणि चेंबूर सीनिअर सिटिझन फोरम या दोन्ही संघांचे आजीव सभासदत्व घेऊन त्यामध्ये समवयस्क ज्येष्ठ नागरिकांच्या विविध उपक्रमांचे आयोजन, नियोजन करण्यात आणि त्यांच्यात रममाण होण्याचा आनंद वेगळाच!

रामकृष्ण बळवंत बुटे पाटील, मुंबई 

समाधानी निश्चितच आहे

बँकेतून पूर्ण छत्तीस वर्षे नोकरी करून निवृत्त झाल्यानंतर एक गोष्ट ठरवून टाकली, ती म्हणजे आता यापुढे ‘नोकरी’ म्हणून (अर्थात पैशासाठी) काहीही न करणे! त्यामुळे अर्धवेळ किंवा मानद/ कुठल्याही स्वरूपात नोकरीचा विचार केला नाही. बँकेसाठी कर्ज प्रस्ताव तयार करून (प्रोसेसिंग करून) देणे किंवा म्युच्युअल फंड्स, इन्शुरन्स आदींचे कमिशन बेसिसवर मार्केटिंग हेही अर्थात बाद झाले. यामागे विचार एकच होता आतापर्यंत स्वत:साठी (पैशांसाठी) खूप करून झाले, आता शक्य तितके नि:स्वार्थीपणे इतरांसाठी काही करता येते का, बघावे.

अशा दृष्टीने आपल्याला करता येण्यासारखे काय आहे, याचा विचार सुरू केल्यावर – अर्थात आपली जमेची बाजू काय? आपण काय करू शकतो? – बँकिंग क्षेत्रातील अनुभव आणि अवांतर वाचनाची, लेखनाची आवड हे मुख्य मुद्दे लक्षात आले. वाचनात खरे तर बँकिंग सोडून इतर विषयांचीच आवड – साहित्य, इतिहास, तत्त्वज्ञान, अध्यात्म वगैरे जास्त जोपासली गेली. लेखनाची आवड अगदी पूर्वीपासूनच होती. त्यामुळे काही सार्वजनिक हिताच्या गोष्टींत लक्ष घालून वृत्तपत्रांत पत्रं/ पत्रलेख लिहू शकू, असे लक्षात आले. वृत्तपत्रीय लिखाणाची जी सुरुवात झाली, ती पुढे वाढतच गेली. निवृत्तीनंतर पाच वर्षांत सुमारे ९५ विविध विषयांवरील पत्रं/ पत्रलेख प्रसिद्ध झालेत.

यामध्ये बरेच जण कधी कधी विचारतात, ‘‘तुम्ही एवढी पत्रे लिहिता, पण पुढे त्याचे काय होते? काही उपयोग होतो का?’’ यावर माझे उत्तर हेच असते, की आपण आपले विचार व्यक्त करीत राहायचे. उपयोग झाला तर होईल, न झाला तरी आपण आपले काम केल्याचे समाधान आहेच!

पत्रलेखनाखेरीज दुसरा महत्त्वाचा उपक्रम म्हणजे स्थानिक ज्येष्ठ नागरिक संघामध्ये मी ‘बोलू’ लागलो. ‘पहिला बाजीराव पेशवा’सारख्या ऐतिहासिक विषयावर भाषण झाले. ज्येष्ठांसाठी ‘काळाचे नियोजन’ अशा विषयावर दोन-तीन भाषणे झाली. ‘भगवद्गीता’ या विषयावर व्याख्याने देऊ लागलो. त्यातून पुढे २०१७ च्या जानेवारीपासून मी दर महिन्याला गीतेवर दोन व्याख्याने द्यावीत, असे ठरले. ज्येष्ठ नागरिक संघाखेरीज बाहेरच्या संस्थांकडूनही एक-दोन वेळा भाषणासाठी बोलावणी आली. भगवद्गीतेवर पुढे-मागे स्वतंत्र लेखनही करायचे डोक्यात आहे. तर एकूण हे असे चालले आहे. मी समाधानी निश्चितच आहे.

श्रीकांत पटवर्धन, कांदिवली पूर्व, मुंबई

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 22, 2018 1:01 am

Web Title: interesting articles on retirement people
Next Stories
1 निवृत्ती-निरामय वृत्ती
2 प्रत्येक दिवस सोहळा
3 योगासनांची साथ..
Just Now!
X