08 July 2020

News Flash

चोवीस तासही कमीच

काही वर्गमित्रांसोबत कामाला लागलो आणि छत्तीसच्या छत्तीस जणांचा ठावठिकाणा शोधून काढला.

प्रफुल्ल पुरंदरे

आयुष्याची चांगली वर्षे ऑफिस एके ऑफिस करण्यात गेली. जशी निवृतीची वेळ जवळ आली तेव्हा मनाशी ठरवून टाकले, आता नोकरी करायची नाही, आयुष्याची दुसरी इनिंग एन्जॉय करायची. कॉलेजमध्ये असताना, एकांकिका, नाटकात अनेक वेळा अभिनयाची पारितोषिके मिळाली होती. म्हटलं पाहू या, आता काही जमते का? काही मालिका केल्या, ‘घर श्रीमंताचे’ या मालिकेत चक्क रमेश देव यांच्यासोबत काम करायची संधी मिळाली. पण मन काही रमत नव्हते. मग जाहिरातीकडे वळलो. वर्षांला दोन-तीन जाहिराती आणि शॉर्ट फिल्म करीत होतो आणि एका शॉर्ट फिल्ममध्ये प्रमुख भूमिका मिळाली.

फिरण्याची आवड होतीच. बाबा आमटे यांच्या ‘आनंदवन’ येथे जायचे होते, पण योग काही जुळून येत नव्हता. आणि अचानक माझ्या मित्रांनी आनंदवन, हेमलकसा सहल आयोजित केली. तेथे जाऊन आल्यावर जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला. ‘आनंदवन मित्र मंडळ, मुंबई’संस्थेची आम्ही काही जणांनी स्थापना केली. मार्गदर्शक होते ‘आनंदवन’चे विश्वस्त नरेंद्र मेस्त्री! त्यांच्यामुळे आता अनेक सामाजिक संस्थांशी संबंध आला. दरवर्षी आनंदवन, हेमलकसाकरिता महिन्याला दोन ते तीन सहली आयोजित करू लागलो. गेल्या दहा वर्षांत आनंदवन मित्र मंडळ, मुंबईचे रोपटे आता चांगलेच बाळसे धरू लागले आहे. अनेक मित्र जोडले गेले.

२०१२ मध्ये शाळेतली एक मैत्रीण भेटली. पन्नास वर्षांपूर्वी शाळेत का कुणास ठाऊक, मुलं-मुलींमध्ये संभाषण होत नव्हते. पण आता सूर जुळू लागले. आणि विषय निघाला पुढच्या वर्षी आम्ही एसएससी पास होऊन पन्नास वर्षे होत आहेत. आम्ही सारे विखुरले गेलो होतो. काही वर्गमित्रांसोबत कामाला लागलो आणि छत्तीसच्या छत्तीस जणांचा ठावठिकाणा शोधून काढला. २०१३ मध्ये आम्ही आमचा एसएससी पास होण्याचा सुवर्णमहोत्सव परिवारासहित दणक्यात साजरा केला.

त्याच सुमारास माझ्या मुलीने मला टॅब घेऊन दिला. माझ्या नातवाने मला कसे वापरायचे शिकवले. ईमेल, व्हॉटसअ‍ॅप, फेसबुक हाताळायला लागलो. रुपारेल कॉलेजमध्ये आजी-आजोबांसाठी तीन दिवस मजेदार स्पर्धा आयोजित केली जाते, ‘उमेद किंग’ आणि ‘उमेद क्वीन’ गेली दोन वर्षे सतत ‘उमेद किंगचा’ किताब मला मिळाला आहे.

निवृत्त होताना मला प्रश्न पडला होता आता दिवसभर काय करायचे? पण आता मला दिवसाचे चोवीस तास कमी पडत आहेत. सत्तरी पार केली पण अजून उत्साह, तरुणाचा आहे, तो तसाच राहावा, हीच प्रार्थना!

देवाने दिलेल्या आयुष्यात आपण काहीतरी समाजासाठी करावयास हवे. आमचे सानेसर (आता वय ९३) आम्हा विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणतात, ‘‘वय वाढणे हा निसर्गाचा नियम आहे. आपण म्हातारे झालो, असे म्हणू नका. ज्येष्ठत्व व म्हातारपण यातील फरक ओळखा. म्हातारपण इतरांचा आधार शोधीत असते, तर ज्येष्ठत्व दुसऱ्याला आधार देते. म्हातारपण लपवावेसे वाटते, तर ज्येष्ठत्व दाखवावेसे वाटते. म्हातारपण अहंकारी आणि हेकेखोर असते, तर ज्येष्ठत्व अनुभवसंपन्न, विनम्र व संयमी असते. विचारले तरच ज्येष्ठ व्यक्ती सल्ला देते. म्हातारपण व्यक्तिमत्त्व बिघडवते, तर ज्येष्ठत्व व्यक्तिमत्त्व घडवते.’’

प्रफुल्ल पुरंदरे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 30, 2018 1:02 am

Web Title: prafull purandare successful life after retirement
Next Stories
1 आरोग्याची गुरुकिल्ली
2 समाधानी वृत्ती
3 आयुष्य नित्यनवे भासते
Just Now!
X