२०१० मध्ये सक्तीची निवृत्ती घेऊन ५८व्या वर्षी निवृत्त झालो. पुढे काय? हे आधीच ठरवले होते. काहीतरी समाजोपयोगी कार्य करायचे होते पण दिशा मिळत नव्हती. अचानक माझे स्नेही गुरुदास तांबे भेटले आणि मी देहदान मंडळाचा सभासद झालो. रीतसर देहदानाचा फॉर्म भरला. तिथे मला आमच्या बदलापूरचे रेवाळे भेटले. ते ज्येष्ठ नागरिक संघाचे खजिनदार होते. मी ज्येष्ठ नागरिक संघाचा सभासद झालो.  रोज संध्याकाळी ५ ते ७ या वेळेत संघाच्या कार्यालयात जाऊ लागलो. तिथूनच मला माझे जीवन भरभरून कसे जगायचे हे उमजले.

संघामध्ये जे ज्येष्ठ नागरिक होते त्यांना शारीरिक, मानसिक, आर्थिक व इतर समस्या होत्या. त्यांच्याशी संवाद साधताना त्या लक्षात येत होत्या. शारीरिक समस्यांमुळे त्यांना वीज बिल, पाणी बिल व इतर कामे करणे शक्य होत नव्हते. त्याकामी मी त्यांना मदत केली. मानसिक समस्या ‘एकटेपणा’ घालविण्यासाठी मी घरी जाऊन त्यांच्याबरोबर गप्पा मारणे, बैठे खेळ खेळणे अशा गोष्टी करतो. त्यांना वाचनासाठी पुस्तकं उपलब्ध करून देतो. मला या कार्यात खूप आनंद मिळतो.

२०१२ला मी सुद्धा ज्येष्ठ झाल्याने हळूहळू मी या ज्येष्ठांमध्ये एक ज्येष्ठ आणि मित्र म्हणून गणला जाऊ लागलो. वयामुळे ज्येष्ठामध्ये  विसराळूपणा येतो व त्यामुळे अनेक गोंधळ उडतात. बरेच वेळेस मी वीज बिल भरले असले तरी काही जणांना ते विसरल्यामुळे भरलेच नाही असे वाटते. मग ते माझ्यावर चिडतात. त्यांची समजूत काढता काढता नाकीनऊ  येतात. काही चांगले सल्ले दिलेले आवडत नाहीत. अनेक जण हिशोबामध्ये गोंधळ करतात. असं असून माझ्यावर प्रेम करतात. हेच खरे भरभरून जगणे.

उमाकांत रेवाळे यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांच्या अंतिम इच्छेप्रमाणे त्यांचा देह कळवा येथील हॉस्पिटलमध्ये दान केला. त्या दिवशी मी पहाटे ५ वाजल्यापासून दुपारी १ वाजेपर्यंत त्यांच्या घरी देहदानाची तयारी करण्यासाठी एकटा झटलो पण त्यात यश आल्यामुळे खूप छान वाटले. यानंतर देहदान मंडळाचे काम व देहदानाचा प्रचार व प्रसार या कार्यात मग्न झालो. दरम्यान ज्येष्ठ नागरिक संघामध्ये सह-सचिव म्हणून कार्यरत झालो. त्यामुळे दुहेरी जबाबदारी आली पण न डगमगता काम करतो आहे. शारीरिक त्रास होतो, पण काम फत्ते झाले की त्रासाचा ऱ्हास होतो.

देहदानाचे काम म्हणजे प्रवाहाविरुद्ध पोहणे आहे. कारण असंख्य प्रश्न घेऊन लोक येतात व समाधानकारक उत्तर मिळाले तरच देहदान करण्यास तयार होतात. त्यांचे प्रश्न पण मजेशीर असतात. खूप साऱ्या प्रश्नांची काय उत्तरे द्यावीत हे लगेच कळत नाही. विचार करून उत्तरे द्यावी लागतात. काही महाभाग तर असे भेटले की, आता आम्हाला फॉर्म भरला तरी देहदान करायचे नाहीये. तर काही चांगली माणसे पण आहेत. कुठलाही प्रश्न व शंका न विचारता देहदानाचा फॉर्म भरतात. पण समाजात याबद्दल जागृती आली आहे. त्यामुळे देहदान मंडळाचे सभासद वाढत आहेत. माझी दोन्ही कार्ये मी करतो आहे. त्यात मला काही प्रेमळ व मदतीला येणाऱ्यांचे सहकार्य मिळते आहे.

ज्येष्ठ नागरिक संघाचा व देहदान मंडळाचा मी ऋणी आहे. आज अनेक मित्र व मैत्रिणी मिळाल्यामुळे मी माझे हे जीवन आनंदाने व भरभरून जगतो आहे.

– गोविंद रामदास क्षिरे, बदलापूर (पूर्व)