मी व्यवसायातून निवृत्ती घेतली २००० मध्ये. त्याआधी तीन वर्षे मी एकटीनेच राहायला सुरुवात केली होती. कारण मुलगा अमेरिकेला गेला आणि नवरा हयात नव्हता. मुलगीही लग्न होऊन परगावी होती. एकटे राहातानाच मनाला बजावले होते की मुलगा आपला उत्कर्ष करायला परदेशी जातो आहे त्याला आपली काळजी वाटता कामा नये तेव्हा आपण मजेत राहायचे. आपण आपल्या मनासारखे जगायचे. स्वतंत्र पक्षी आहोत असं समजायचं.

मी मुंबईत विलेपार्ले पूर्व भागात राहते. व्यवसाय आणि घर यामुळे इतर गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळच नसायचा. आता मी पाल्र्यातल्या संघटनांची सदस्य होऊन त्यांच्या कार्यक्रमांना जायला लागले. दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या सोमवारी सखी मंडळ, दर बुधवारी ‘सोबती’ ही ज्येष्ठ नागरिक संघटना आणि गुरुवारी ‘दिलासा’ त्यांच्या कार्यक्रमातही भाग घ्यायला लागले. कधी नाटुकली, कधी कथाकथन, कविता वाचन इत्यादी मध्यंतरीच्या काळात या आवडत्या गोष्टी मागेच पडल्या होत्या. कार्यक्रमाच्या प्रॅक्टिसच्या निमित्ताने एकत्र जमतो, त्यामुळे वेगवेगळ्या व्यक्ती मैत्रिणी होतात. सर्व संघटनांच्या ट्रिप्स जातात. तोही एक वेगळा आनंद असतो.

आम्ही बऱ्याच जणी एकटय़ा राहतो. एकदा मैत्रीण शीला म्हणाली, ‘‘आपण एकटय़ा राहणाऱ्यांचा एक ग्रुप करायचा का?’’ मी लगेच होकार दिला आणि त्याच बैठकीत आठ-नऊ जणींची नावे काढली. त्यांना विचारले तर सगळ्याच तयार झाल्या. पहिल्या भेटीतच नियम ठरवले, जास्तीत जास्त १० जणींचा ग्रुप करायचा कारण प्रत्येकीच्या घरी १० पेक्षा जास्त जणी आरामात बसू शकत नाहीत. सणांना एकटे राहायचे नाही. सर्वानी मिळून एकत्र सण साजरा करायचा. आम्ही महिन्यातून एकदा भेटतोच. कुणा एकीच्या घरी पूर्ण दिवस घालवतो. त्या महिन्यात सण नसेल तर नुसतेच भेटतो. कधी हॉटेलात जेवायला जातो, कधी बाहेरून जेवण मागवतो, तर कधी प्रत्येकजण एक एक पदार्थ आणून पॉटलक करतो. वर्षांतून एकदा एखाद्या रिसॉर्टला ट्रिप काढतो. थोडक्यात महिन्यातून एकदा उंडारतो. हा आमचा ‘मितवा ग्रुप.’

आमच्या काही मैत्रिणींना वाचनाची खूप आवड आहे. अशा १० मैत्रिणींचा आमचा ‘मंथन’ ग्रुप आहे. या मैत्रिणीही महिन्यातून एकदा आळीपाळीने एकीच्या घरी जमतो, चार ते सात. इथे आपण वाचलेले एखादे छान पुस्तक, एखादा महत्त्वाचा लेख त्यावर ती ती व्यक्ती बोलते. स्वत:ची पुस्तके आम्ही एकमेकींना देतो. नवीन चांगल्या पुस्तकांची माहिती कळते त्यामुळे लायब्ररीतून ती पुस्तके आणून वाचली जातात. ‘मंथन’मध्ये आम्ही चौथ्या सोमवारी जमतो. पहिला आणि तिसरा सोमवार सखी मंडळ असते, दुसऱ्या सोमवारी ‘लोकमान्य सेवा संघा’च्या स्त्री शाखेतर्फे संघाच्या छोटय़ा हॉलमध्ये ‘मनोगत’ हा उपक्रम असतो. २५-३० जणी असतात. एखादा विषय ठरवून प्रत्येकीने काहीतरी बोलायचे. कोणी लिहून आणून वाचतात कोणी उत्स्फूर्त बोलतात. असे महिन्याचे १५ दिवस काही ना काही कार्यक्रमात जातात.

मला शिवणाची खूप आवड आहे. फावल्या वेळात मी ‘वात्सल्य ट्रस्ट’ची दुपाटी शिवून देते. माझ्या स्वत:च्या साडय़ांचीही शिवते आणि त्यांना कोणी दिलेल्या साडय़ांचीही शिवून देते. पाल्र्यात अनेकजण वेगवेगळ्या संस्थांची कामे करतात. तुमच्याकडे असलेल्या अतिरिक्त वस्तू जमा करून गरजू लोकांना संस्थांना पोचवतात. कपडे, चादरी, भांडी, पुस्तके इत्यादी. माझ्या माहितीच्या लोकांना, नातलगांना त्याची माहिती देते. सर्वाकडे अशा खूप वस्तू असतात आणि त्यांना द्यायच्या असतात. त्यांना त्या व्यक्तींचे वा संस्थांचे फोन नंबर देते. त्यांना बोलवणे शक्य नसेल तर वस्तू आणून द्या, मी त्या पोचवते.

हे सर्व करताना मी स्वत:च्या तब्येतीकडेही नीट लक्ष देते. एकटी आहे म्हणून स्वयंपाकाचा कंटाळा न करता स्वत: नीट खाते पिते. रोज चालण्याचा व्यायाम करते. काही दुखले खुपले तर नीट उपाय करते. माझ्या आयुष्यात मला मिळालेली ही बोनस वर्षे मी मजेत घालवते आहे. एखाद्या मैत्रिणीला जर एकटेपण येऊन नैराश्य येत असेल तर तिला त्यातून बाहेर पडायला मदत करते. आज मी ८० व्या वर्षांत पदार्पण केले आहे. पण वयाचा बाऊ न करता आयुष्य भरभरून जगते आहे.

– आशा रेगे, विलेपार्ले पूर्व

 

ग्रंथपालाचे कार्य आयुष्यभर करतोय

ऑक्टोबर १९९२ मध्ये वयाची साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर पुणे विद्यापीठाच्या प्रदीर्घ सेवेतून ग्रंथपाल आणि प्राध्यापक, प्रमुख गंथालय आणि माहितीशास्त्र विभाग या पदावरून निवृत्त झालो. त्यावेळी माझ्या घरी माझे जीवनाविषयी एक प्रदर्शन मी मांडले होते. ते पाहण्यासाठी कुलगुरू डॉ. ताकवले आले होते. त्यावेळी ते म्हणाले, ‘‘सेवानिवृत्तीनंतर तुम्ही काय करणार आहात?’’ त्यावेळी मी एक संकल्प पत्र तयार केले होते. त्या संकल्प पत्रानुसार माझे सर्व संकल्प मी पूर्ण करू शकलो, त्याबाबत मला आजआनंद वाटतो. माझे वय आता ८५ वर्षे आहे. महत्त्वाचे म्हणजे गेल्या २५ वर्षांत मी ५० पुस्तके लिहिली आहेत. इतर अनेक उपक्रमही पूर्ण केले आहेत.

मी पहिला संकल्प केला की निवृत्तीनंतर पुन्हा नोकरी करायची नाही. दुसरा संकल्प केला की पर्यटन करायचे. त्यानुसार १९९३ मध्ये मी पत्नीसह ‘हिमालयातील चारीधाम यात्रा’ केल्या. त्यावर आधारित ‘हिमालयातील चारीधाम यात्रा’ हे पुस्तक लिहिले व प्रकाशित केले. नंतर दक्षिण भारत यात्रा, उत्तर भारत यात्रांसह अनेक देशांचे पर्यटनही केले.

तिसरा संकल्प केला की मुक्त विद्यापीठात काम करावं. डॉ. ताकवले यांच्या निमंत्रणावरून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्तविद्यापीठामध्ये मराठीतून बी.लिब. (ग्रंथपालविषयक) शिक्षणक्रम सुरू केला. त्यासाठी ३३ ग्रंथांची निर्मिती इतर लेखकांच्या साहाय्याने केली. त्यामध्ये मी सहा ग्रंथ लिहिले. एम.लिब. शिक्षणक्रम विकसित केला. त्यासाठी दप्तरखाने व वस्तुसंग्रहालये हा ग्रंथ लिहिला. नंतर दिल्ली येथील इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठात गेलो आणि बी.लिब. आणि एम.लिब. शिक्षणक्रमात सुधारणा केल्या. पीएच.डी. शिक्षणक्रम विकसित करण्यासाठी सहभाग घेतला.

पुणे शहरविषयक ग्रंथांची निर्मिती त्यानंतर यूजीसीचा पुणे शहराच्या इतिहासाची साधने हा संशोधन प्रकल्प पूर्ण केला आणि २००० मध्ये पुणे शहर सूची हा ग्रंथ प्रसिद्ध केला. त्यानंतर २००४ मध्ये पुणे शहराचा ज्ञानकोष हा संदर्भग्रंथ प्रसिद्ध केला. या ग्रंथास महाराष्ट्र साहित्य परिषदेचा श्रीपाद जोशी पुरस्कार आणि जयंतराव टिळक स्मृती पुरस्कार प्राप्त झाला. त्यानंतर पुणे शहरविषयक एकूण १२ ग्रंथ लिहिले.        दैनिक ‘लोकसत्ता’च्या ‘नवनीत’ या पुरवणीमध्ये १ ऑक्टोबर २००१ ते ३१ डिसेंबर २००३ पर्यंत ‘दिनविशेष’ हे सदर लिहिले. जगाच्या इतिहासातील एका घटनेची माहिती देणारे ‘इतिहासात आज’ हे सदर १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २००४ पर्यंत लिहिले. डॉ. अब्दुल कलाम यांचे स्फूíतदायक चरित्र ‘रामेश्वरम् ने राष्ट्रपती भवन’ या नावाचा ग्रंथ २००२ मध्ये लिहून प्रसिद्ध केला. या ग्रंथाचे कौतुक स्वत: डॉ. अब्दुल कलाम यांनी त्यांच्या पत्रामध्ये केला.

प्रत्येक माणसाने आत्मचरित्र लिहावे असे माझे मत आहे. म्हणून माझे आत्मचरित्र दोन भागात प्रसिद्ध केले आहे. याच कालखंडात ग्रंथपालन प्रमाणपत्र वर्गासाठी १४ पुस्तके लिहिली. ६ विद्यार्थ्यांना पीएच.डी.साठी मार्गदर्शन केले. ५ विद्यार्थ्यांना एम.फिल.साठी मार्गदर्शन केले. त्यानंतर एमफिल, पीएच.डी.साठी ११ ग्रंथ लिहिले. त्यातील ‘हसत खेळत एम फिल करा’, ‘वाचन संस्कृती जोपासावी’ हे ग्रंथ गाजले.

स्वस्तिश्री सोसायटी या गृहरचना संस्थेमध्ये मी राहतो. तेथे ग्रंथालय सुरू केले आहे. दिवाळी अंक योजनाही राबवली. सांस्कृतिक समितीचे आणि गणेशोत्सवाचे अध्यक्ष म्हणून २२ वर्षे काम पाहिले. ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यक्रमात सहभागी होतो. मला पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी आहे. सूनबाई, नातवंडे, पतवंडे यांचे समवेत जीवन जगत आहे. दीर्घ आयुष्याचे सोने केले असे वाटते. (माझ्या जीवनावर आधारित ‘नामवंत ग्रंथपाल डॉ. शां.ग. महाजन व्यक्ती आणि कार्य’ हा संशोधनवर ग्रंथ कोल्हापूरच्या डॉ. नीता पाटील यांनी लिहिला आहे.)

ज्ञानगंगा घरोघरी पोचविणे हे ग्रंथपालाचे कार्य होय. ते मी आयुष्यभर करीत आलो आहे. याबद्दल समाधान वाटते. माणसाने सतत कर्म करीत राहावे असे मला वाटते. मी तसंच आयुष्य जगत आहे.

– डॉ. शां. ग. महाजन, पुणे

 

सेवाभावाचा आनंद

माझं जगणं गाणं आहे; कधी गझल आहे

कधी भक्तीगीत तरी कधी भावगीत आहे

कधी वीराणी तर कधी प्रेमगीत आहे

कधी नात्यात बांधलेली सुंदर बंदीश आहे

या संगीताची गुंफण माझं जगणं आहे

माझ्या जगण्यातला सूर, ताल, लय आहे.

मी मूळची गिरगावची. शिक्षण घेतल्यावर मी स्टेट बँकेत नोकरी करू लागले. योगासने, प्राणायम आणि सूर्यनमस्कार घातल्याने आरोग्य उत्तम राहाते हा संस्कार लहानपणी बाबांकडून मिळाला होता. सामाजिक बांधिलकी, स्त्रियांचे आरोग्य हे माझे एकच ध्येय. तिच माझ्या कामाची प्रेरणा झाली.

मी दोन वर्षांचा ‘डिप्लोमा इन नॅचरोपॅथी’ हा अभ्यासक्रम पूर्ण केला आणि योगासने आणि प्राणायाम यांचे वर्ग घेण्यास सुरुवात केली. ‘ज्यांनी जीभ जिंकली त्यांनी जग जिंकलं’ या सुविचाराने मी माझ्या उपक्रमाची सुरुवात केली. योगासने आणि प्राणायाम करून उत्तम आरोग्य कसे साधावे यासाठी मी वर्ग घेऊ लागले. अनेक ठिकाणी या विषयावर मार्गदर्शनपर भाषणे केली. जनजागृती हा त्यामागचा विचार होता. उत्तम आरोग्याशिवाय प्रगती नाही. ‘जीभ जिंकली’ म्हणजे काय तर खाण्यावर नियंत्रण ठेवा तर शरीराचे आरोग्य आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा तर मनाचे आरोग्य उत्तम राहाते हा संदेश महत्त्वाचा!

नॅचरोपॅथीचा अभ्यासक्रम केल्यावर समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन नव्याने समोर आला. वनवासी कल्याणच्या मुलींना आरोग्याचे महत्त्व, योगासने, निरनिराळ्या वनस्पतींचे गुणधर्म या संदर्भात शिकवायला सुरुवात केली. कर्णबधिर मुलांच्या शाळेला भेट देऊन त्यांच्या गरजा आणि समस्या जाणून घेतल्या. त्यांच्या पालकांशी संवाद साधला.

आज मीही ज्येष्ठ नागरिक आहे. म्हणूनच  ‘योग आणि आरोग्य’ या विषयाची गरज लक्षात घेऊन ठिकठिकाणी मार्गदर्शन करते. हे सर्व कार्य सेवाभावी आहे. जे ज्ञान आपणास आहे ते द्यायचे इतकेच. त्याचा आनंद चिरकाल टिकणारा असतो. सध्या मी तो घेते आहे.

– वीणा रानडे, डोंबिवली