साठी उलटूनही बराच काळ लोटलाय. माझ्या पिढीतल्या स्त्रियांनी घरदार व नोकरी असा अवघड ताळमेळ यशस्वीपणे पार पाडलेला. साहजिकच, निवृत्तीनंतर मनसोक्त मजा करायची असा निश्चयच बहुतेकींनी केलेला असतो. मीही त्याला अपवाद नव्हते. तरीही माझी गोष्ट थोडीवेगळीच म्हणावी लागेल.

मी स्वत:ला भाग्यवानच समजते कारण विशेष यातायात न करताही मी सुनियोजित आयुष्य जगू शकले. आयुष्यातील महत्त्वाचे टप्पे सुरळीतपणे पार पडले. जून महिन्याअखेर निवृत्त होऊन मी घरी बसले तेव्हा कर्मधर्मसंयोगानं मी एकटीच होते कारण पतिदेव मुलीकडे नातीला सांभाळण्यासाठी गेलेले. दिवसभराचा वेळ घालवायचा कसा, या प्रश्नाचं उत्तर शोधू लागले अन् काही मार्ग सापडले त्यांचीच ही कहाणी.

नोकरीतल्या अनुभवाचा, शिक्षणाचा उपयोग होईल अशी संधी मिळाली. मी एका समाजोपयोगी काम करणाऱ्या संस्थेच्या शिक्षण वर्गात इंग्रजी शिकवू लागले. संध्याकाळच्या दोन तासांची सोय झाली. हळूहळू जवळपास राहाणाऱ्या समवयस्क मत्रिणींसह मी काही उपक्रमांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली. आम्ही आमच्या साहित्यविषयक आवडीनिवडी भागतील, असं वाचनालय सुरू केलं. वर्षांकाठी उच्च साहित्य दर्जा असलेली वीस-बावीस पुस्तकं विकत घ्यायची, महिन्यातून एकदा भेटून पुस्तकांची अदलाबदल करायची, एक-दोघींनी वाचलेल्या पुस्तकाचं परीक्षण वाचायचं, त्यावर चर्चा करायची असा नियम केला. लवकरच आम्ही दिवाळी अंकांचं वाचनालयही सुरू केलं. आमच्या नेहमीच्या दहा-पंधरा सदस्यांव्यतिरिक्त वीसेक स्त्रिया त्याचा आनंद घेतात. वर्षांतले तीन-चार महिने या वाचनालयाच्या निमित्तानं आमचं वाचकवर्तुळ विस्तारतं. याच काळात आम्ही मत्रिणींनी ‘स्वरसंवाद’ नावाची एक संस्था सुरू केली आणि तिच्या माध्यमातून काही सांस्कृतिक कार्यक्रम सभागृहांमधून केले. विना नफा असलेल्या या कार्यक्रमांद्वारे आम्हाला अनेक चांगले अनुभव आणि आठवणीही गाठीशी बांधल्या.

स्वत:विषयी सांगायचं तर निवृत्तीनंतर मी माझ्या आवडत्या छंदाला जोपासण्यात यशस्वी ठरले. नोकरी चालू असतानाच मी दोन इंग्रजी पुस्तकांचे अनुवाद केले होते. त्यांना वाचकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्यामुळे मी निवृत्तीनंतर पंधराहून अधिक पुस्तकं मराठी भाषेत आणली, दोन पुस्तकांना पारितोषिकंही मिळाली. मग मी आणखी एक पाऊल पुढे टाकलं. संगणकाच्या साहाय्यानं मी भाषांतर करण्याचं तंत्रज्ञान आत्मसात केलं. भाषांतराचं काम तर सुलभ झालंच, शिवाय नवीन काही तरी शिकल्याचा आनंद मिळाला अन् कौतुकाची थापही पाठीवर पडली.

अंध विद्यार्थिनींसाठी वाचक म्हणून केलेल्या कामानं आणखी एक संधी मिळाली. त्यांना उपयुक्त ठरेल असा इंग्रजी ऑडिओ शब्दकोशही आम्ही निर्माण केला. पुस्तकवाचनाच्या निमित्तानं काही मुली माझ्या घरी येत. घरापासून दूर राहून, अंधत्वावर मात करत शिकणाऱ्या मुलींनी माझ्या मनाला एक वेगळी उमेद दिली. त्यांच्या आवडीनिवडी विचारात घेऊन त्यांना काहीवेळा जेवू घालण्यात जे समाधान मला मिळालं त्याची तुलना एकाच गोष्टीशी होऊ शकते. बऱ्याच काळानं माहेरी आलेल्या लेकीची हौसमौज पुरवणं हा अनुभव मला एका वेगळ्याच पातळीवर घेऊन गेला. माझ्या लक्षात आलं- आजूबाजूला, नात्यात, मित्रपरिवारातही माझ्यासारख्या एकटं, एकाकी आयुष्य जगणाऱ्या स्त्रिया रिकाम्या घरटय़ात राहात आहेत. हळूहळू मी हेच काम माझ्याही नकळत करू लागले. कधी एखाद्या सखी शेजारणीबरोबर कॉफीसमवेत संध्याकाळी गप्पा मारायच्या, कधी एखाद्या मत्रिणीची आवड लक्षात ठेवून तो पदार्थ करून तिला खाऊ घालायचा, तर निव्वळ श्रवणभक्ती करून एखादीला क्षणभराचा दिलासा द्यायचा..

शारीरिक, आर्थिक अन् मानसिक स्वास्थ्य लाभलेल्या आम्ही स्त्रिया अनेकदा प्रवास करतो, भरभरून आनंद लुटतो, पण खरं सात्त्विक समाधान मिळतं ते याच चारदोन क्षणांमधून जेव्हा आम्ही एकमेकींच्या सुखदु:खात सहभागी होतो. आयुष्य जगायचं ते ‘कण्हत कण्हत नव्हे तर गाणं म्हणत’ हा पाठ स्वत: गिरवत अन् त्यांनाही बळ देत. असे प्रसंग म्हणजे सायंपटावर उमटलेलं सप्तरंगी इंद्रधनुष्यच.

–  नीला चांदोरकर, मुंबई</p>